कोरोनाच्या सावटामुळे वारी रद्द ही बातमी समजली आणि मी पंढरपूरला नाही तर फर्ग्युसन रोडला पोहोचले.
पालखी पुण्यात येणार तो दिवस नव्हे ती लगबग माझी आधीच सुरू होते. पिलूच्या जन्मानंतर कुणी ना कुणी कुटुंबीय किंवा त्यांच्या अनुपस्थितीत स्नेही मदतीला धावतात आणि कॅमेरा लटकवून माझी पदयात्रा सुरू होते.
SLR ची बॅग उघडली जाते. सर्व काही ठीक आहे ना याची तपासणी होते. टिपायचं असतं टीपकागदासारखं आणि कोरायचं असतं मनावर.... पण हे आयुध हवंच. मोबाईलवर कितीही छान फोटो काढता आले तरी हेधूड गळ्यात घेऊन त्यातून माऊली तुकोबांचा उत्सव "पाहणं"हा स्वर्गीय आनंद असतो.
एखाद्या वारकरी आजी आजोबांकडे, दादा वहिनीकडे, चिमण्या बाळाकडे, अश्वाकडे लेन्समधून पाहताना अनेकदा डोळ्यात पाणी जमा होतं. मग ती आकृती धूसर होते. फोटो काढायचाय हेही विस्मरणात जातं... अशी अनेक यंत्रावर न उमटलेली छायाचित्र काळजावर उमटतात क्षणभर आणि तिथेच कायमची बंदिस्त होतात. काही क्षण अचानक "टिपले" जातात. सकाळच्या छायाचित्र स्पर्धेसाठी वेगवेगळी दृश्य पकडायचा प्रयत्न होतो. गणेशोत्सवात प्रदर्शनात ती झळकलेली पाहतानाच आनंद काय वर्णावा? त्यात बक्षिसाची अपेक्षा नसते. कारण ते अख्खं दालन विठूमय झालेलं असतं प्रत्येकाचा अँगल वेगळा... पण भावना तीच....
गुडलकचा बनमस्का, वैशालीत जागा मिळालीच तर थकल्या पावलाला पाठिला विश्रांती आणि पोटालाही खुश करणे.
एकटी निघाले तरी वाटेत ओळखीची अनेक माणसं जोडली जातात. तो आनंद औरच!
माऊलीची वाट पाहणारे हौशे,नवशे,गवशे नुसत्या नजरेने टिपणही विलक्षण सुंदर असतं या संध्याकाळी! पावसाची सर येते आणि रांगोळी धुवून जाते. पण तरी प्रयत्नपूर्वक कलाकारांची सेवा सुरूच असते.
डोळ्यातलं आणि यंत्रातलं आता एकजिनसी होऊ लागतं. गळ्यात कॅमेरा तसाच लटकलेला राहतो आणि ज्ञानेश्वर पादुका चौकात रंगलेला पखवाज टाळांचा टिपेला गेलेला सूर मी चर्मचक्षुंनी अनुभवते...खोल खोल आत पाझरू लागतो विठूराया...
असं खूप काही या संध्याकाळी आणि मग दोन दिवस निवडुंग्या विठोबापाशीचा भक्तीमय "जिवंतपणा" जगायलाही जाणं. कॅमेरा हा अवयवच असतो.
दरवर्षी काय फोटो काढायचेत ??? तोच रस्ता... तेच वारकरी... तीच माऊली... तोच विठोबा... तेच तुकोबा...
अहो पण दरवर्षिची ""मी""" बदलते ना! आयुष्य मलाही घडवत असतं... बदलत असतं.. घावांचे वार मी झेलते तर कधी कुंदपुष्पात नहाते...
मग हे सगळं गाठोडं घेऊन मी फिरते या आनंदवारीत तेव्हा माझे घाव भरू लागतात... हळद लोण्याने माझ्या जखमा भरतात... मन शांतावतं... कुंदपुष्पांना गुलाबांची, निशिगंधाची जोड मिळते, पडलेल्या पावसाने मनाला थंडावा मिळतो अन् माऊलीचा हा अनमोल कृपाप्रसाद घेऊन मी ताजीतवानी होते... पुढच्या वारीची वाट पहात...
छायाचित्र सौजन्य- गुगल इमेजेस