बंदरावरची लगबग
बैलगाड्यांमधून पाणी,डिझेल यांचे भरलेले बॅरल्स उतरवले जात होते.संध्याकाळी नावा सज्ज करून निघण्याची कोळी बांधवांची तयारी सुरु होती.दुसरीकडे छोट्या नावांमधून माशांचे क्रेट उतरवले जात होते.तिन्हीसांजेच्या आधीची उधळण आकाशात सुरु झाली होती.त्या पार्श्वभूमीवर भरपूर दागिन्यांनी मढलेल्या कोळणी ताया मावश्या काकवा क्रेटमधले वेगवेगळ्या नावाचे आकाराचे प्रकारचे मासे वेताच्या टोपल्यांमधे काढत होत्या.पाण्याने धुवून घेत होत्या.बाजार मांडला जात होता. मोठ मोठे मासे तसेच वाळूत ओळीत मांडले जात होते. बोली लावली जात होती. कुणी मावशी मासे चिरत होत्या! कुणी बर्फ किसण्याच्या यंत्रापाशी गर्दीत उभे राहून बर्फ पोत्यात भरत होते!
एकच गलका भरून राहिला होता.
मोठ्या गोंधळाला "मासळी बाजार" भरला आहे असं का म्हणत असतील ते आज समजलं!!
दीपगृहाच्या पायर्यांवर मासळी सुकवायला ठेवली होती. सिगल्स आणि कावळे त्यावर ताव मारत होते. भणाणता बोचरा वारा आणि समुद्राच्या लाटेवर बोटी हिंदकळत होत्या! सगळं वातावरण वेगळ्याच उत्साहाने भरून गेलं होतं!
समोर उभा सुवर्णदुर्ग सरत्या संध्येला निरोप देत होता!या सर्वात दोघच स्थिर होते! सुवर्णदुर्ग आणि समोरचं अनामिक हुरहुरीने भरलेलं दीपगृह!
फोटो सौजन्य-- गुगल इमेजेस