किती सुखात नहावे
आनंदात डुंबत रहावे!
ताम्हाण्यातला पूसभाजीचा दारचा फणस हाती आला आणि मावशीच्या देवाच्या गोठण्यातली आठवण आली! माझ्या ताम्हाण्यातल्या आठवणींची अशी गाथा कदाचित माझं लेकरू सांगेल पण तोपर्यंत ही माझ्या आठवणीची पोतडी!
देवाच्या गोठण्यात मे महिन्यात दरवर्षी मोठ्ठा कार्यक्रम... फणसाची भाजी!! तशी ती पुण्यातही व्हायची.पण पडवीतल्या झोपाळ्यावर बसून ही लगबग पाहणं म्हणजे चित्रपटाचाच आनंद!
सुट्टीतले पंधरा- वीस पै पाहुणे दारात गप्पांचे ;भेंड्याचे फड रंगवत.उतरत्या संध्याकाळी खाडीवरून आम्ही मुले परतत असू. दारात यशोदी आमची दृष्ट काढी.मग मागच्या दोणीवर पाय धुवून आत येऊन मी झोपाळा गाठे. आपटे काका आणि सखाराम काका तेलाने माखलेल्या सुर्या, तेलाची वाटी असं पुढ्यात घेऊन पडवीतच फणसोबांना घेऊन बसत! तो सगळा सोहळा पाहत राहूनच डोळे तृप्त होत. शांतीआजी मोठ्या विळीवर बसून ओला ताजा नारळ खोवत असे.
मावशीने वयपरत्वे सोयीसाठी ओटा करुन घेतला होता.पण या भाजीला मात्र चुलीची खमंग साथ मिळे.
चरचरीत खमंग फोडणी, लाल मिरच्या,धने जिरे पूड आणि मीठ गूळ आणि वरून ताजा नारळ आणि कोथिंबीर!!साधी सोपी पाककृती!
काका उत्साहाने ताज्या करकरीत कैरीचे लगेचच खाण्याजोगे लोणचे करीत. मऊभात, मेतकूट, फणसाची भाजी आणि पोह्याचा पापड !बरेचदा या भाजीत ओल्या काजूंची ओंजळ पडे!
आधी डोळे मग जीभ आणि शरीर मन तृप्त!
शेवटी हातावर घट्ट दह्याची कवडी पडली की मग डोळ्यावर पेंग येई.
सारवलेल्या अंगणात अंथरूणावर पडल्या पडल्या चांदण्या मोजताना अजूनही भाजीचा दरवळ येत राही...