नववी दहावीच्या मोठ्या सुट्ट्यांमधे दिवस आणि रात्रीही भर उन्हाळ्यात गार वारं खात या रस्त्यावरून सुसाट सायकल चालवली आहे मी!
आमच्या सर्वच मैत्रिणींचा एक हात सायकलचं हँडल धरलेला आणि दुसरा दुसरीच्या हातात गुंफलेला! पाच सायकली सहज मावायच्या या रस्त्यावर!
स्वप्नात आता एक गाव येऊ लागतं! आपण त्या गावात एका परीसोबत वावरतो! ही परी दिवास्वप्नं दाखवते! भविष्याच्या रेशमी लडी गुंफत भावी सुंदर आयुष्याचं सुंदर जरतारी वस्रं विणते! खास आपल्यासाठी! त्यात अजून नव्या माणसांची भर पडलेली नसते! वर्तमान आयुष्य जगण्यातच मोठी मौज आहे असं वाटत असतानाच हे वस्र आपल्याभोवती लपेटतो हा रस्ता! मैत्रिणींचे गुंफलेले हात मधेच सुटतात! दोन्ही हात सोडून गार वारा पीत या रस्त्यावरुन मी बेफाट सायकल चालवली आहे! कोणताही भविष्याचा विचार न करता!
कोणतेही रस्ते पालथे घातले कधी चालत कधी चारचाकीतून! कधी भावी सहजीवनाची स्वप्नं रंगवत सहचरासह तर कधी दोन जीवांची होत सावध पाऊल टाकत!
पण कानात शिरलेला तो बेफाम वारा आजही या रस्त्यावरच भेटतो ! आणि ओळखतो मनातलं गुज! आणि कुजबुजतो कानात पूर्वीसारखाच तो माझ्या कानात..... तो... रस्ता...
जग गं तशीच पुन्हा! कारण मी तिथेच आहे पण तू बदलली आहेस!!!