*** जैन मंदिर आंबेगांव. ***
-----------------------------
पुणे शहरापासून भोसरी- चाकण- खेड- मंचर - घोडेगाव -डिंभे असा१०० कि.मी प्रवास करतआपणास आंबेगावात पोहचता येते.आंबेगाव तालुक्यातील पश्र्चिम भागात "आंबेगाव"हे नावाजलेले.जुन्या पध्दतीच्या विटांमध्ये बांधलेल्या इमारती, विविध मंदिरे व चारही दिशांना पसरलेल्या सह्याद्रीच्या सुंदर रांगानी हे गाव आजुनच वैभवसंपन्न दिसत होते. त्यात भर घातली होती ती गाव किना-यावरून खळखळ वाहणा-या घोड सरीता मातेने. अगदी पाहणाऱ्यांची दृष्ट लागावी असे हे गाव प्रत्येकाच्या नजरेत भरलेले असायचे. जे नको होतं तेच झाले व आंबेगावाला १९७८ साली नजर लागली व तालुक्याचे नाव असलेले आंबेगाव व इतर अनेक गावे येथे होणा-या धरणामुळे स्थलांतर होऊ लागली.
आज आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणातील पाणीसाठा खूप कमी झाला असून पाण्याखाली गेलेले जुने आंबेगाव गावठाण व येथील जलसमाधिस्त झालेले प्रसिध्द जैन मंदिर पूर्णपणे उघडे पडले आहे. तब्बल वीस वर्ष पाण्याखाली राहूनही हे जैन मंदिर अजूनही सुस्थितीत असून मंदिरात आत-बाहेरून असलेली कलाकुसर, कोरीव काम व नक्षीकाम आजूनही जसेच्या तसे असलेले पाहायला मिळते. पाण्याखाली गेलेल्या आंबेगाव गावठाणातील घर व वाडे यांचे ढिगारे, पुर्वजांची थडगी, तेलाचे घाणे, मंदिर व जैन मंदिर पाहता त्याकाळचे महत्वाचे व्यापारी ठिकाण असलेले आंबेगाव किती समृद्ध आसेल याचा आजही तत्काळ अंदाज येतो.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर व शिरूर या तालुक्यांसह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील कर्माळा तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीक्षेत्र सिंचनाखाली आणण्यात व या भागातील अनेक गावांच्या पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या जल-अधिग्रहण क्षेत्रात तालुक्यातील अनेक गावे जलसमाधिस्त झाली. त्यात तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले व उत्तर पुणे जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ असलेले आंबेगाव हि जलसमाधिस्त झाले.
जलसमाधिस्त झालेल्या आंबेगाव या महत्वाच्या गावातून पूर्वी आंबेगाव तालुक्याच्या पूर्ण कारभार चालत असे. येथील बाजारपेठ मोठी होती व संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिध्द होती. आजूनही जुने लोक या गावाविषयी व येथील बाजाराविषयी भरभरून आठवणी सांगतात. मात्र डिंभे धरणात पाणी साठविण्यास सुरवात झाल्यानंतर हे गाव विस्तापित करावे लागले.
दगड विटात असलेल्या या जैन मंदिरात जैन धर्मातील गुणीजनांनी जिर्णोद्धाराकरीता दिलेल्या देणग्यांचा उल्लेख मंदिराच्या पुर्व भिंतीत संगमरवरी दगडावर कोरलेल्या शिलालेखात आढळून येतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गज लक्ष्मीचे कोरलेले शिल्प डोळ्यांचे पारणे फेडते तर मुख्य प्रवेशद्वाराच्या उंच माथ्यावरील माता सरस्वतीची मूर्ती पाहताच या परीसरात माता सरस्वती अवतरल्याचा भास होतो. खांबावरील कोरीव नक्षी, छताचे गोलाकार सुरेख वर्तुळे,गाभा-याच्या प्रवेशद्वारावर माता सरस्वती सोबत दोन मोरांना घेऊन विराजमान झाल्या असून जनू त्या सांगत आहे की भक्तांनो पक्षी प्राण्यांवर प्रेम करा असेच सांगत असल्याचा भास होतो.मंदिर वीस वर्षे पाण्याखाली राहूनही हि कलाकुसर आजूनही सुस्थितीत आहे.मंदिराच्या शेजारीच छोट्या परीघाची मात्र विटांमध्ये बांधकाम केलेली विहीर पाहायला मिळते. मंदिराच्या आजूबाजूला पडलेल्या घरांचे आवशेष, पडलेल्या मंदिरांचे आवशेष पाहयला मिळतात.मंदिराच्या जवळच गावाची चावडी असावी.येथे मोठ्या संखेने पाहायला मिळत असलेल्या दगडी तेलाच्या घाण्यांवरून येथील बाजारपेठेच्या विशालतेचा आजही अंदाज येतो.जैन मंदिराच्या समोरील एका पडलेल्या हिंदू मंदिरांच्या आवशेषांमध्ये ग्रामदेवता गज लक्ष्मीच्या दोन मूर्ती पडलेल्या पाहावयास मिळतात.१४-१५ व्या शतकातील मुर्ती हुबेहूब अशा मुर्ती आपणास शेजारीच असलेल्या जुन्नर तालुक्यातील नाणेघाट,निरगुडे,घंगाळदरे, शिरोली आणि किल्ले निमगिरी वर पहावयास मिळतात. जैन मंदिराच्या उत्तरेकडे महादेवाचे अर्धे पडझड झालेले विटांतील मंदिर शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसून येते.
येथून स्थलांतरित झालेले ग्रामस्थ जेव्हा या धरणालगत रस्त्याने आहुपेकडे प्रवास करतात तेव्हा,दूरवरून दिसणारे व पाण्याच्या घटलेल्या पातळीमुळे उघडे पडलेले हे जैन मंदिर पाहून ग्रामस्थांच्या जुडलेल्या भुतकाळातील आठवणी जाग्या होतात.
***** ***** *****
प्रस्तुत ः मच्छिंद्र माळी पडेगांव औरंगाबाद .