झोपाळा
भाग २
दिवसभर सर्वकाही सामान्य होते, पण संध्याकाळी, 'घर भाड्याने देणे आहे' असा बोर्ड घराबाहेर लटकलेला पाहून नवीनने गोंधळलेल्या आवाजात बाबांना विचारले, "पप्पा, घर मोठे आहे हे मान्य, पण हे काय"?
"पुढच्या महिन्यात माझ्या स्टाफमधले मिस्टर गुप्ते सेवानिवृत्त होत आहेत, ते या घरात राहतील", त्यांनी शांतपणे उत्तर दिले.
"पण कुठे?"
"तुमच्या भागात", अशोकजींनी साध्या आवाजात उत्तर दिले.
"आणि आम्ही?"
"तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल इतके सक्षम तर मी तुम्हाला बनवलेच आहे. दोन तीन महिन्यांत तुम्ही दुसरा फ्लॅट पाहा किंवा कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी जा, जिथे तुम्ही तुमच्या वयाच्या लोकांबरोबर राहू शकाल!
आम्ही दोघेही आमच्या वयाच्या लोकांमध्ये राहू. तुमच्या आईचं संपूर्ण आयुष्य तुम्हा सर्वांची काळजी घेण्यात गेले. आता तुमच्याकडून शहाणपणाचे धडे शिकणे एवढंच बाकी होतं."
"बाबा, मला असे म्हणायचे नव्हते," नवीन हात जोडत म्हणाला.
"नाही बेटा, तुझ्या पिढीने आम्हालाही व्यावहारिक होण्याचा धडा दिला आहे. जर आम्ही दोघे तुम्हा दोघांना एकत्र पाहून आनंदीत होऊ शकतो तर मग तुम्हाला आमच्यापासून त्रास का होतो? हे घर तुझ्या आईने बांधले आहे, हे झाड, ही फुले तुमच्यासाठी भोगलेल्या अनंत कष्टांचे साक्षीदार आहेत, म्हणून मी कोणालाही तिचा हक्काचा कोपरा हिसकावण्याचा अधिकार देणार नाही."
"बाबा, तुम्ही गंभीर झालात", नवीनचा आवाज आता हळवा झाला होता.
"नाही बेटा ... तुझ्या आईने आजवर खूप त्याग करून, खूप दुःख सहन करून मला पाठिंबा दिला. आज तिच्या कृपेने माझ्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही. म्हणूनच फक्त हा कोपराच नाही, संपूर्ण घर तिचे ऋणी आहे. तुमच्यापेक्षा तिचा या घरावर अधिक हक्क आहे.
आमची मुलं असल्याचा फायदा जरूर घ्या. पण जर देव मंदिरात जोडीने शोभून दिसतात तर आईवडील का दिसू नये ?