Marathi Quote in Motivational by Chandrakant More

Motivational quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

*?मराठी विज्ञान परिषदेचे?*
? कुतूहल ?

*लेखांक- ३*
*दिनांक- ३ जाने २०१९*

*?मानवी उत्क्रांतीचा शोध*

गेल्या पन्नास-शंभर वर्षांत, मानवी उत्क्रांतीची शृंखला सुस्पष्ट करण्यासाठी अनेक अभ्यासक झटत आहेत. त्यांना कधी मानवाच्या एखाद्या बोटाचे हाड मिळते, तर कधी एखादा दात. या अल्पशा अवशेषांवरून मानवी उत्क्रांतीचे चित्र उभे केले गेले आहे. या अवशेषांची वये नक्की करण्यासाठी रेडिओमेट्रिक डेटिंगची पद्धत वापरली जाते. या पद्धतीत, सापडलेल्या अवशेषांतील काही नैसर्गिक किरणोत्सारी समस्थानिकांचे प्रमाण, त्यांच्या किरणोत्साराच्या मापनाद्वारे काढले जाते व त्या अवशेषातील इतर समस्थानिकांच्या प्रमाणाशी त्याची तुलना करून त्या अवशेषाचे वय काढले जाते. ज्या खडकांच्या थरात हे अवशेष सापडले आहेत, त्या खडकांच्या वयावरूनही या अवशेषांच्या वयाचा अंदाज बांधण्यास मदत होते.
मानवी उत्क्रांतीतील पहिला टप्पा म्हणजे ऑस्ट्रेलोपिथेकस – अर्थात दक्षिणेकडचा वानर! या मानवाचा शोध १९२४ साली दक्षिण आफ्रिकेतील ताऊंग येथे रेमंड डार्ट या ऑस्ट्रेलियातल्या संशोधकाने लावला. इथिओपियातील हादार गावाजवळ, डोनाल्ड जोहान्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सापडलेली सुप्रसिद्ध ‘ल्यूसी’ आणि झेरेसेने अलेमसेगेद यांना सापडलेली तीन वर्षांची ‘सेलाम’ हीसुद्धा याच प्रजातीची होती. ऑस्ट्रेलोपिथेकसनंतर होऊन गेलेल्या, होमो इरेक्टसचा शोध १८९१ साली, म्हणजे ऑस्ट्रेलोपिथेकसच्या शोधाच्या अगोदरच लागला होता. हे अवशेष डच संशोधक युजिन डुबॉइस यांना, आफ्रिकेपासून दूरवर इंडोनेशियातील ट्रिनिल येथे सापडले. आजच्या बिजिंगजवळील चाऊ कुतिएन येथील, १९२७ साली कॅनडाच्या डेव्हिडसन ब्लॅक यांनी शोधलेला ‘पेकिंग मॅन’ हासुद्धा होमो इरेक्टस याच प्रजातीचा होता. मानवी उत्क्रांतीतील चार महत्त्वाच्या प्रजातींपैकी, होमो इरेक्टस ही सर्वात दीर्घकाळ अस्तित्वात राहिलेली प्रजाती आहे.
आधुनिक मानवाशी अगदी जवळीक दाखवणाऱ्या निअ‍ॅन्डरथल या प्रजातीचा शोध याही अगोदरचा – १८२९ सालचा. जर्मनीतील निन्डर खोऱ्यात सापडल्यामुळे या प्रजातीला निअ‍ॅन्डरथल या नावे ओळखले जाऊ लागले. निअ‍ॅन्डरथल हा अतिशय हुशार आणि सुदृढ असावा असा अंदाज त्याच्या कवटीच्या आणि हाडांच्या आकारावरून केला जातो. निअ‍ॅन्डरथलनंतर जन्माला आलेल्या, होमो सेपिअन्स (हुशार माणूस) या आधुनिक मानवाचे सर्वात जुने अवशेष १९६१ साली मोरोक्कोमधील एका खाणीत सापडले आहेत. हे अवशेष तब्बल तीन लाख वर्षे जुने असल्याचे अगदी अलीकडील संशोधनात स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ आधुनिक मानव जन्माला येऊन किमान तीन लाख वर्षे झाली आहेत!

✍ *डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
? *जय विज्ञान*?
संकलक - *नितीन खंडाळे*
चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता *
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान *
*#माझीशाळामाझीभाषा *

Marathi Motivational by Chandrakant More : 111070260

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now