The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
*?मराठी विज्ञान परिषदेचे?* ? कुतूहल ? *लेखांक- ३* *दिनांक- ३ जाने २०१९* *?मानवी उत्क्रांतीचा शोध* गेल्या पन्नास-शंभर वर्षांत, मानवी उत्क्रांतीची शृंखला सुस्पष्ट करण्यासाठी अनेक अभ्यासक झटत आहेत. त्यांना कधी मानवाच्या एखाद्या बोटाचे हाड मिळते, तर कधी एखादा दात. या अल्पशा अवशेषांवरून मानवी उत्क्रांतीचे चित्र उभे केले गेले आहे. या अवशेषांची वये नक्की करण्यासाठी रेडिओमेट्रिक डेटिंगची पद्धत वापरली जाते. या पद्धतीत, सापडलेल्या अवशेषांतील काही नैसर्गिक किरणोत्सारी समस्थानिकांचे प्रमाण, त्यांच्या किरणोत्साराच्या मापनाद्वारे काढले जाते व त्या अवशेषातील इतर समस्थानिकांच्या प्रमाणाशी त्याची तुलना करून त्या अवशेषाचे वय काढले जाते. ज्या खडकांच्या थरात हे अवशेष सापडले आहेत, त्या खडकांच्या वयावरूनही या अवशेषांच्या वयाचा अंदाज बांधण्यास मदत होते. मानवी उत्क्रांतीतील पहिला टप्पा म्हणजे ऑस्ट्रेलोपिथेकस – अर्थात दक्षिणेकडचा वानर! या मानवाचा शोध १९२४ साली दक्षिण आफ्रिकेतील ताऊंग येथे रेमंड डार्ट या ऑस्ट्रेलियातल्या संशोधकाने लावला. इथिओपियातील हादार गावाजवळ, डोनाल्ड जोहान्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सापडलेली सुप्रसिद्ध ‘ल्यूसी’ आणि झेरेसेने अलेमसेगेद यांना सापडलेली तीन वर्षांची ‘सेलाम’ हीसुद्धा याच प्रजातीची होती. ऑस्ट्रेलोपिथेकसनंतर होऊन गेलेल्या, होमो इरेक्टसचा शोध १८९१ साली, म्हणजे ऑस्ट्रेलोपिथेकसच्या शोधाच्या अगोदरच लागला होता. हे अवशेष डच संशोधक युजिन डुबॉइस यांना, आफ्रिकेपासून दूरवर इंडोनेशियातील ट्रिनिल येथे सापडले. आजच्या बिजिंगजवळील चाऊ कुतिएन येथील, १९२७ साली कॅनडाच्या डेव्हिडसन ब्लॅक यांनी शोधलेला ‘पेकिंग मॅन’ हासुद्धा होमो इरेक्टस याच प्रजातीचा होता. मानवी उत्क्रांतीतील चार महत्त्वाच्या प्रजातींपैकी, होमो इरेक्टस ही सर्वात दीर्घकाळ अस्तित्वात राहिलेली प्रजाती आहे. आधुनिक मानवाशी अगदी जवळीक दाखवणाऱ्या निअॅन्डरथल या प्रजातीचा शोध याही अगोदरचा – १८२९ सालचा. जर्मनीतील निन्डर खोऱ्यात सापडल्यामुळे या प्रजातीला निअॅन्डरथल या नावे ओळखले जाऊ लागले. निअॅन्डरथल हा अतिशय हुशार आणि सुदृढ असावा असा अंदाज त्याच्या कवटीच्या आणि हाडांच्या आकारावरून केला जातो. निअॅन्डरथलनंतर जन्माला आलेल्या, होमो सेपिअन्स (हुशार माणूस) या आधुनिक मानवाचे सर्वात जुने अवशेष १९६१ साली मोरोक्कोमधील एका खाणीत सापडले आहेत. हे अवशेष तब्बल तीन लाख वर्षे जुने असल्याचे अगदी अलीकडील संशोधनात स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ आधुनिक मानव जन्माला येऊन किमान तीन लाख वर्षे झाली आहेत! ✍ *डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख* office@mavipamumbai.org ================= कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! ! ? *जय विज्ञान*? संकलक - *नितीन खंडाळे* चाळीसगाव *#दै_लोकसत्ता * *#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान * *#माझीशाळामाझीभाषा *
*?मराठी विज्ञान परिषदेचे?* ? कुतूहल ? *लेखांक-२* *दिनांक- २ जाने २०१९* ? *मानवी उत्क्रांतीची वाटचाल* मानवाची उत्क्रांती ही संपूर्ण पृथ्वीलाच बदलून टाकणाऱ्या प्रजातीची उत्क्रांती आहे. तिचा प्रवास समजून घ्यायचा तर तीन कोटी वर्षांपूर्वीपासून चालू असलेल्या घटनाक्रमाचा नेमका शोध घ्यायला हवा. तत्कालीन पृथ्वीवरील हवा हळूहळू थंड होत होती, कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होत होते, दाट जंगले कमी होऊन गवताळ प्रदेश वाढू लागले होते. १९७० च्या दशकाच्या अगोदरच्या शास्त्रज्ञांच्या मते, याच सुमारास वानरसदृश जातीपासून मानव उत्क्रांत होत गेला असावा; पण १९६८ सालच्या सुमारास, अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील व्हिन्सेन्ट सॅरीच आणि अॅलन विल्सन या संशोधकांनी वानर आणि नर यांच्या डीएनएचा अभ्यास करून असे ठाम प्रतिपादन केले की, वानर आणि नर दोन्ही समांतर, परंतु वेगवेगळे उत्क्रांत होत गेले. असे असले तरी मानव, चिम्पान्झी आणि गोरिला यांचा ऐंशी लाख वर्षांपूर्वीचा पूर्वज एकच. आधुनिक चिम्पान्झी आणि मानव यांच्या जीनोममध्ये म्हणजेच संपूर्ण जनुकीय आराखडय़ात आताही ९६ टक्के साम्य आहे. यावरून आपण एकाच पूर्वजाचे वंशज असल्याचे नक्की होते. पुढील संशोधनावरून असेही लक्षात आले की, आपल्या या वंशजांचे वास्तव्य आफ्रिका खंडात होते. मानवाच्या उत्क्रांतीतले चार महत्त्वाचे टप्पे आहेत – बेचाळीस लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला, दोन पायांवर चालू शकणारा ऑस्ट्रेलोपिथेकस; जमिनीवरच्या जीवनाला पूरक शरीर असणारा, आफ्रिकेच्या बाहेर पडलेला, सुमारे पंधरा लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला होमो इरेक्टस; आजच्या मानवाशी बऱ्याच अंशी साधम्र्य असलेला, तसेच हत्यारांचा, अग्नीचा, कपडय़ांचा वापर करणारा साडेतीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला निअॅन्डरथल मानव आणि सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला आजचा आधुनिक मानव – होमो सेपियन्स. होमो सेपियन्सच्या उदयाच्या काळातदेखील ‘होमिनीन’ गटातील तीसहून अधिक निरनिराळ्या मानवसदृश प्रजाती एकाच वेळी अस्तित्वात होत्या. आज मात्र फक्त होमो सेपियन्स ही एकमेव प्रजाती शिल्लक राहिली आहे. या होमो सेपियन्स प्रजातीतल्या, म्हणजे आपल्यापैकीच काही मानवांनी मानवाचा हा रंजक प्रवास जाणून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. यातले पहिले नाव म्हणजे इ.स.पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेला ग्रीकवंशीय हेरोडोटस. मानववंशशास्त्राचा जनक मानल्या गेलेल्या हेरोडोटसच्या काळापासून आतापर्यंत मानव उत्क्रांतीचे कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालूच आहेत आणि त्यातूनच मानवी उत्क्रांतीचे चित्र आपल्यापुढे उभे राहिले आहे. *✍डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख* office@mavipamumbai.org ================= कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! ! ? *जय विज्ञान*? संकलक - *नितीन खंडाळे* चाळीसगाव *#दै_लोकसत्ता * *#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान * *#माझीशाळामाझीभाषा *
*?मराठी विज्ञान परिषदेचे?* ? कुतूहल ? *लेखांक- १* *दिनांक- १जाने.२०१९* ? *शोधांचा मागोवा* विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीचा पाया म्हणजे शोध. विविध शोधांद्वारेच विज्ञान-तंत्रज्ञानाची वाटचाल सुरू असते. यातील काही शोध एखाद्या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा केल्यावर लागतात; तर काही शोध हे इतर काही संशोधन चालू असताना अनपेक्षितपणे लागतात. शोध पाठपुरावा करून लागलेला असो वा अनपेक्षितपणे लागलेला असो- प्रत्येक शोधाला इतिहास असतोच. शोधांमागचा हा इतिहासही वाचनीय असतो. अनेक शोधांच्या बाबतीत हा इतिहास, शोधाचा ‘इतिहास’ म्हणूनच फक्त महत्त्वाचा असतो असे नव्हे, तर त्या शोधामागचे तर्कशास्त्र समजून घेण्याच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा ठरतो. सन २०१९ च्या कुतूहल सदराचा उद्देश हा, विज्ञान-तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या शोधांचा याच दृष्टीने मागोवा घेणे हा आहे. हा मागोवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित इत्यादी विषयांपासून ते अगदी तंत्रज्ञानापर्यंत अनेक विषयांचा असेल. विज्ञान-तंत्रज्ञानातील ज्या शोधांनी विज्ञानाच्या इतिहासाला नवे वळण दिले, जे शोध क्रांतिकारी ठरले किंवा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीत ज्या शोधांनी महत्त्वाची भूमिका बजावली, अशा शोधांची संख्या अक्षरश: असंख्य आहे. या सर्वच शोधांचा मागोवा या वर्षभरातील सुमारे अडीचशे लेखांच्या मालिकेत घेता येणे शक्य नाही. त्यामुळे काही मोजक्या शोधांचाच या मालिकेत परामर्श घेतला जाईल. मुख्य म्हणजे, हा परामर्श ‘संशोधक केंद्रित’ नसून तो ‘संशोधन केंद्रित’ असणार आहे. त्यात संशोधकांच्या चरित्रापेक्षा वा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांपेक्षा, त्यांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले जाईल. एखादे संशोधन विकसित कसे झाले, याचा परामर्श घेताना त्यामागचे विज्ञान समजणे, हेही गरजेचे असते. त्यामुळे जिथे जिथे शक्य असेल तिथे या शोधांच्या वैज्ञानिक पार्श्वभूमीचाही आढावा घेतला जाईल. या सदरातील लेख हे अर्थातच त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून लिहून घेतले जाणार आहेत. तरीही मोजक्या शब्दसंख्येत, सोप्या भाषेत शोधांचे वर्णन करणे, त्या मागचे विज्ञान स्पष्ट करणे हे या तज्ज्ञ-लेखकांच्या दृष्टीने एक आव्हानात्मक काम असणार आहे. सर्वच संशोधन काही अगदी सोप्या भाषेत मांडणे, शक्य असतेच असे नाही. परंतु या सदरात तसा प्रयत्न सतत असणार आहे. या प्रयत्नात ‘कुतूहल’चे लेखक पूर्ण यशस्वी ठरतील असा मराठी विज्ञान परिषदेला विश्वास आहे. त्यामुळे, शोधांचा मागोवा घेणारे या वर्षीचे हे ‘कुतूहल’सुद्धा, नेहमीप्रमाणेच लोकप्रिय ठरेल याची परिषदेला खात्री वाटते. ✍ *डॉ. राजीव चिटणीस* office@mavipamumbai.org ================= कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! ! ? *जय विज्ञान*? संकलक - *नितीन खंडाळे* चाळीसगाव *#दै_लोकसत्ता * *#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान * *#माझीशाळामाझीभाषा *
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser