Quotes by Sadanand Chavare in Bitesapp read free

Sadanand Chavare

Sadanand Chavare

@chavaresadanandgmail


लोकशक्तीचा जागर
कर्तव्यासी तत्पर
मतदान करूया

जनह्दय सिंहासन
आकांक्षांचे राखे भान
मतदान तया करूया

म्हणो साव अथवा चोर
मति राखून स्थिर
आपण जागृत मतदार

पाच वर्षांचे वाण
निभावण्या समर्थ
निवड साक्षेपे करूया

टाकून सुखनिद्रा
झटकून निराशा
मतदान सारे करूया

सदानंद चावरे
२३-४-२०१९

Read More

वाद विवादांच्या गलबल्यात
मैत्रीचा सूर हरवू नये

गळसरीतले शुभ्र मोती
उगाच विखरुन हरपू नये

भूमीकांना जपता जपता
विवेकाचे भान विसरू नये

कोणाची तळी उचलताना
स्नेहाचा झरा आटू नये

औट घडीची करमणूक
विखार होऊन भाजू नये

सदानंद चावरे
६-३-२०१९

Read More

खेचराचियाही मना......

आपण सर्वांनीच लहानपणी ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलविले ही कथा ऐकली आहे. हे काहीतरी रूपक असावे असे वाटत होते पण त्याचा नेमका संदर्भ आज ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात ११५९ ओवीत मिळाला.

मूळ ओवी.
खेचराचियाही मना
आणि सात्विकाचा पान्हा
श्रवणासवे सुमना
समाधी जोडे

अर्थ:
( ज्ञानेश्वरीतील अमृत बोल किती प्रभावी आहेत तर- ते ऐकून ) अज्ञान्यांच्या ही मनास सात्विकतेचा पान्हा फुटेल, आणि जो अधिकारी आहे, त्याला तर ऐकण्या बरोबर समाधी लागेल.

इथे 'खेचर' या शब्दाचा वापर ज्ञानेश्वर अज्ञानी अशा अर्थाने वापरतात. हे लक्षात आले की रेडा ऊर्फ खेचराचे रुपक स्पष्ट होते.

अंत्यज, अज्ञानी, वेदपठणाचा अधिकारी नसलेलाही त्याला समजेल अशा प्राकृतात ज्ञान सांगितले म्हणून ज्ञानग्रहण करू शकला, त्याच्या रोजच्या आचार विचारात वेदोक्त ज्ञान कुठल्याही अवडंबराशिवाय सहज समाविष्ट झाले.

सदानंद चावरे
१-३-२०१९

Read More

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रवास

प्रवास मनातला
प्रवास जनातला

कधी ठेचकाळत
कधी उडत उडत

कधी सुसंवादी
कधी क्लेशकारी

कधी चिडचिडत
कधी हसत खेळत

सुजाण समन्वयी
कधी उखडलेला

प्रवास जगण्याचा
वहातं असण्याचा

सदानंद चावरे
२०-१२-२०१८

Read More

मनाचिया प्रांगणी
घालू चांदण-रांगोळी
चंद्र-सूर्य पणती
सुखे प्रकाशली

विचारांच्या चंद्र ज्योती
स्नेह-प्रेम पाझरती
दु:ख-दैन्य अवघे
सहजी निवारती

आप्त-स्वकीयांच्या भेटी
वाजो सौख्याच्या नौबती
गोड सौजन्याचे गीत
येवो सगळ्यांच्या ओठी

दीपावली शुभेच्छा.

डॉ सदानंद चावरे
डॉ. शुभदा चावरे
कल्याणी चावरे

Read More

सुरेल सकाळ
पहाट आणि सकाळच्या सीमा रेशेवरची वेळ . शांतता नुकतीच कूस बदलून आळोखे पिळोखे देत जागी होऊ लागलेली. लवकर लगबगीने बाहेर पडलेली पावले आवाज न करता झप झप निघालेली. मंदिरातून येणारे भजनाचे सूर हळू हळू जवळ येत चाललेले... विठ्ठल माझा माझा माझा मी विठ्ठलाचा.... त्या सुरांनी मंदिरात जवळ जवळ खेचून नेलं. खिळवून ठेवलं. कापायचं राहिलेलं अंतर, हातात असलेला वेळ , वेगाचं उद्दिष्ट सगळं सगळं विसरुन एका जागी पुतळा करणारे ते स्वर.... डोळ्यांचा कॅमेरा आणि कानांचं रेकॉर्डिंग डिव्हाइस करुन तो अनुभव मनात टिपून घेतला. बुवा स्वच्छ स्वरात गात होते. टाळकरी साथी, मृदंग, एकतारी सगळ्य़ांचा सुरेख मेळ जमला होता. भजनावर इतर संगीताचं आक्रमण नव्हतं. परंपरेने चालत आलेली चाल, बुवांचा अतिशय गोड आवाज आणि त्यांना सहकार्य़ांनी केलेली पूरक चाल असं सगळ6 फार छान जमून आलं होतं.
तुळशी माळ घातलेली विठ्ठल रखुमाईची मूर्ती, गाभार्य़ात भरुन राहिलेला मंडपात दरवळणारा फुला तुळशीचा , उदबत्ती धूपाचा सुगंध आणि हे गोड सुस्वर..... पावलं पुढे चालू लागली. पण मन मात्र त्या सुरांमधे, त्या परिमळात गुंतून राहिलं....
विठ्ठल माझा माझा.... मी विठ्ठलाचा
डॉ.सदानंद चावरे
27-10-2018

Read More

प्रतीक्षा आहे
अशा समाजाची(धृ)

शिस्त असेल
अंगी मुरलेली

सामाजिक जाणीव
पक्व झालेली (१ )

भेदभावांना असेल
तिलांजली लाभलेली

शोषणाची वाट
मिटून गेलेली (२)

शिक्षणाची गंगा
घरोघरी पोहोचलेली

संधीची फुले
मुक्त उमललेली (३)

विचारांना लाभेल
आचारांची साथ

स्त्रीत्वाला मिळेल
सन्मानाचा हात (४)

प्रतीक्षा आहे
अशा समाजाची...

डॉ.सदानंद चावरे
२३-१०-२०१८

Read More

1)
आयुष्य मिळाले
कितीक मजला
फिकीर त्याची
मुळी नसे

रंग अर्पुनी
जगास सगळ्या
सुंदर करणे
भाग्य असे

हिरवाईच्या कोंदणातुनी
गंधभरला जन्म मिळे
कुसुमित होता हरिचरणे
कृतार्थतेने नेत्र मिटे

2)
बाळ कोवळा
कृष्ण सावळा
पुष्प रूपी
स्पष्ट दिसे

पुष्प दळरे
सुशोभित सुंदर
कृष्णासम रे
मोहवितसे

नवथर हिरवळ
पर्णभार रे
मयूर मुकुटासम
भासतसे

सदानंद चावरे
१६-१०-२०१८

Read More

रवि बिंब ये क्षितिजावरती
रस रंगांची उधळण झाली
उजळून सारी अवनी गेली

चित्रकार जो अमूर्त
कोणी
संजीवन या जगण्या देई
वृक्षराज त्या नमन करी

अमृतमय सोहळा आभाळी
मन पाखरे पहा उडाली

सदानंद चावरे
१३-२०-२०१८

Read More