metri la ling nst in Marathi Moral Stories by Trupti Deo books and stories PDF | मैत्रीला लिंग नसतं

Featured Books
Categories
Share

मैत्रीला लिंग नसतं





"मैत्रीला लिंग नसतं…"

आयुष्यात कधीतरी असा क्षण येतो…
जेव्हा आपल्याला फक्त कुणीतरी “ऐकणारं” हवं असतं.
सल्ला देणारं नाही…
उपदेश करणारा नाही…
फक्त शांतपणे आपल्यासोबत बसणारं कुणीतरी…

आणि त्या क्षणी,
आपण शोधत असतो — एक मित्र!

मग तो मित्र “मुलगा” असो की “मुलगी”…
मनाला काय फरक पडतो?

पण समाजाला पडतो…

आजही स्त्री–पुरुष मैत्रीकडे पाहताना
लोकांच्या नजरेत एक प्रश्न आधी येतो —
"खरंच फक्त मैत्री आहे का?"

आणि त्या एका प्रश्नाने
एक सुंदर नातं
संशयाच्या धुक्यात हरवायला लागतं…

शाळा आणि कॉलेजमध्ये…
हीच मैत्री किती सहज, किती निरागस वाटते…
एकत्र हसणं, भांडणं, नोट्स शेअर करणं,
कधीतरी डब्बा वाटून खाणं…शाळा- कॉलेजमधली मैत्री जी “निरागस” मानली जाते…
पण लग्नानंतर तीच मैत्री “संशयास्पद” का ठरते? 

तेव्हा कुणालाही प्रश्न पडत नाही —
"हे नातं योग्य आहे का?"

पण तेच लोक…
जेव्हा तीच मुलगी लग्न करते…
तेव्हा अचानक तिच्या आयुष्याला चौकट लावतात…

"आता तिला मित्र कशाला?"
"आता तिने मर्यादा पाळायला हव्यात!"

मर्यादा…
हा शब्द खूप सोपा आहे बोलायला,
पण त्याचा भार नेहमी स्त्रीलाच का उचलावा लागतो?

लग्न झालं म्हणजे…
ती फक्त “बायको” बनते का?
तिचं स्वतःचं अस्तित्व, तिचे मित्र, तिचं जग —
सगळं संपतं का?

खरं तर…
स्त्रीला सर्वात जास्त गरज असते त्या काळात
एका अशा मित्राची…
ज्याच्यासमोर ती निरागसपणे स्वतःसारखी राहू शकते…

जिथे ती “जबाबदाऱ्या” विसरून
थोडंसं मन मोकळं करू शकते…

पण ती प्रत्येक वेळी थांबते…
कारण तिच्या मनात सतत चालू असतं —
"घरच्यांना आवडेल का?"
"नवर्‍याला पटेल का?"
"लोक काय म्हणतील?"

आणि या सगळ्या प्रश्नांच्या गर्दीत…
ती स्वतःलाच हरवते…

खरं सांगायचं तर…
समाजाला मैत्रीचं वाईट वाटत नाही…
त्यांना भीती वाटते — विश्वास तुटण्याची!

कारण अनेकदा…
काही नात्यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत…
आणि त्या काही उदाहरणांनी
सगळ्याच नात्यांवर संशयाची सावली टाकली आहे…

पण याचा अर्थ असा नाही
की प्रत्येक मैत्री चुकीचीच असते…

मैत्री कधीच वाईट नसते…
वाईट असू शकतात ते लोक… किंवा त्यांचे हेतू!

जर दोन व्यक्तींमध्ये
नितळपणा असेल…
मोकळेपणा असेल…
एकमेकांच्या आयुष्याचा आदर असेल…
आणि सर्वात महत्त्वाचं — मर्यादांची जाणीव असेल…

तर ते नातं
कधीच चुकीच्या दिशेने जात नाही…

पण हे सगळं सांगणं जितकं सोपं आहे…
तितकंच ते जगणं कठीण आहे…

कारण स्त्रीला फक्त स्वतःचा विचार करून चालत नाही…
तिला प्रत्येक पाऊल टाकताना
घर, संसार, नातेसंबंध… सगळ्यांचा विचार करावा लागतो…

आणि मग…
ती एक निर्णय घेते —
तडजोडीचा!

ती मैत्री सोडत नाही…
पण ती “दूर” ठेवते…
ती भावना मारत नाही…
पण ती “दाबून” ठेवते…

कारण तिला माहिती असतं —
तिचं एक पाऊल
अनेक नात्यांना प्रश्नचिन्ह लावू शकतं…

आजही…
आपल्या समाजात स्त्री-पुरुष नात्यांना
ठराविक नावं दिली जातात —
आई-वडील, भाऊ-बहीण, नवरा-बायको…

या चौकटीबाहेरचं नातं
लोकांना समजत नाही…

पण कधी कधी…
नात्यांना नाव नसणंच जास्त सुंदर असतं…

कारण तेव्हा त्या नात्यात
कोणताही “हक्क” नसतो…
कोणतीही “अपेक्षा” नसते…
फक्त एक निखळ साथ असते…

आपण म्हणतो —
“प्रेम सर्वात मोठं असतं…”

पण खरं सांगायचं तर…
प्रेम कधी कधी तुटतं…
अपेक्षांमुळे, अहंकारामुळे, गैरसमजांमुळे…

पण खरी मैत्री?
ती तुटली तरीही
मनात कुठेतरी जिवंत राहते…

ती कधीच “मालकी हक्क” मागत नाही…
ती फक्त सोबत मागते…

Radha आणि Krishna यांचं नातं नेमकं काय होतं —
याचं उत्तर आजही कुणाकडे नाही…

पण एक गोष्ट नक्की —
त्यांच्यात एक निर्मळ जुळलेपण होतं…
जिथे भावना होत्या… पण बंधनं नव्हती…

आणि कदाचित…
त्यामुळेच ते नातं इतकं “अमर” झालं…

आजच्या काळात…
आपल्याला फक्त इतकंच करायचं आहे —
थोडे जुने विचार Delete करायचे…
नवीन विचार Download करायचे…
आणि मनाचं एक छोटंसं Refresh करायचं…

कारण बदल एका दिवसात होणार नाही…
पण सुरुवात तरी होऊ शकते…

आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो —
की “मैत्री” ही फक्त एका लिंगापुरती मर्यादित नसते…
ती दोन “मनांमध्ये” होते…

आणि शेवटी…
प्रश्न समाजाचा नाही…
प्रश्न आपल्याच विचारांचा आहे…

कारण…
ज्यांना मनसोक्तपणे जगता येतं…
त्यांनाच खरं आयुष्य कळतं!
कारण खरं नातं तेच…
जे कुठल्याही नावाच्या, अपेक्षांच्या आणि शंकेच्या पलीकडे जाऊन
फक्त “मनाला” जोडतं…
अशी मैत्री मिळणं नशिबाची गोष्ट असते,
आणि ती टिकवणं — जबाबदारीची…
प्रत्येक नात्याला “स्पष्टीकरण” देण्यापेक्षा
कधी कधी ते “जपणं” जास्त महत्त्वाचं असतं…
विश्वास जर दोन्हीकडून प्रामाणिक असेल,
तर कोणतंही नातं समाजाच्या चौकटीत अडकत नाही…
कारण शेवटी…
लोक काय म्हणतात यापेक्षा
आपलं मन काय सांगतं — हे ऐकणं जास्त गरजेचं असतं…
आणि जिथे मन शांत असतं…
तिथेच नातं खरं असतं!


सौ तृप्ती देव 
भिलाई 

स्त्री–पुरुष मैत्री ही नक्कीच निर्मळ, सुंदर आणि सजीव असू शकते. पण समस्या मैत्रीत नसते… ती विश्वास, मर्यादा आणि पारदर्शकतेत असते.