अध्याय २
--------------
मंथन ग्रह
-------------
विसाव्या शतकाची झेप
पृथ्वीवरील वीस वर्षांनंतर.
डॉ. अवंतिका जोशी आता एका पूर्णपणे बदललेल्या जगात होत्या. हिमालयातील त्या जीर्ण वेधशाळेतील थंडगार रात्र आणि 'पाय' चा सिग्नल पकडल्याचा तो क्षण, एका वेगळ्याच नव्या युगाची नांदी ठरला होता.
अवंतिका यांनी शोधलेला 'पाय' चा संदेश आणि 'मंथन' ग्रहाचे स्थान समजताच, क्रायोजेनिक्स कॉर्पोरेशनचा लोभ त्यांच्या दुर्लक्षापेक्षा मोठा ठरला. त्यांनी अवंतिकांचे ज्ञान आणि जिद्द आपल्या फायद्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला.
डॉ. जोशी आता क्रायोजेनिक्स कॉर्पोरेशनच्या 'अज्ञात' (Adnyat) नावाच्या एका अत्याधुनिक शोधयानाच्या नियंत्रण कक्षात बसल्या होत्या. पृथ्वीवरील कॅलेंडरनुसार वीस वर्षांचा काळ उलटला होता, पण अवंतिकांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या सुरकुत्या केवळ पाच वर्षांच्या प्रवासाची साक्ष देत होत्या.
या यानाची डिझाइन आणि बांधणी अत्यंत गुप्तपणे करण्यात आली होती. हे यान 'क्रायोजेनिक फ्युजन' (Cryogenic Fusion) तंत्रज्ञानावर आधारित होते, ज्यामुळे प्रकाशाच्या वेगाच्या ९७% वेगाने प्रवास करणे त्याला शक्य झाले होते. विसाव्या शतकातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि अवंतिकांचे ज्ञान यांचा हा एक अपूर्व संगम होता.
आईन्स्टाईनच्या 'विशेष सापेक्षता' सिद्धांतानुसार, यानासाठी केवळ पाच वर्षांचा वेळ लागला होता, मात्र पृथ्वीवर वीस वर्षे उलटून गेली होती. 'मंथन' ग्रह सुमारे १९.३६ प्रकाशवर्षे दूर होता. अवंतिका आता साठीच्या घरात होत्या, मात्र त्यांचा उत्साह एखाद्या तरुण संशोधकापेक्षाही अधिक होता. क्रायो-चेंबरच्या निळ्या प्रकाशाने त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर छटा निर्माण केली होती.
यानाच्या मुख्य नियंत्रण कक्षात अवंतिका यांच्या व्यतिरिक्त कॉर्पोरेशनने निवडलेले इतर सदस्य होते:
* कप्तान राज: यानाचा व्यावहारिक आणि खंबीर अधिकारी. तो एक निवृत्त लष्करी पायलट होता. मोहिमेची सुरक्षा आणि नियमांचे पालन करणे ही त्याची जबाबदारी होती. त्याचा विश्वास तंत्रज्ञानावर अधिक आणि चमत्कारांवर कमी होता.
* डॉ. इरा मेनन: एक अत्यंत प्रतिभावान जीवशास्त्रज्ञ आणि एक्सो-बायोलॉजिस्ट. नवीन ग्रहावरील जीवसृष्टीचा अभ्यास करण्यास ती उत्सुक होती, मात्र स्वभावतः ती काहीशी भीतीदायक होती. तिला अनपेक्षित गोष्टींची भीती वाटायची.
* अक्षय ('ए.के.'): क्रायोजेनिक्सचा अत्यंत बुद्धिमान आणि उत्सुक अभियंता. मोहिमेची तांत्रिक आणि कम्युनिकेशन सिस्टम तो हाताळत होता. तो शांत आणि तर्कशुद्ध होता, पण नवीन कोड शिकण्याची आणि नवीन तंत्रज्ञान शिकण्याची त्याला तीव्र ओढ होती.
* अल्फा: नवीनतम पिढीचा एक अँड्रॉइड. तो शांत, अत्यंत कार्यक्षम असून कठीण परिस्थितीत निर्णय घेण्यासाठी प्रशिक्षित होता. त्याची बाह्य रचना मानवी असली तरी विचारसरणी पूर्णपणे तार्किक होती.
* ओमेगा: अल्फाचा जुळा अँड्रॉइड. तोही तितकाच कार्यक्षम होता, पण त्याच्या प्रोग्रामिंगमध्ये मानवी भावनांचे अनुकरण करण्याची एक विशेष क्षमता होती. त्यामुळे तो कधीकधी मानवी वाटायचा.
आणि मोहिमेचा अधिकृत नेता:
* मि. मल्होत्रा: क्रायोजेनिक्स कॉर्पोरेशनचा प्रतिनिधी. एक थंड आणि अत्यंत व्यावसायिक वृत्तीचा माणूस, ज्याला केवळ नफ्यात रस होता. त्याच्यासाठी ही मोहीम म्हणजे फक्त पृथ्वीवरील ऊर्जा संकट सोडवणारी अब्जावधींची डील होती.
"डॉक्टर जोशी," मल्होत्राच्या आवाजात नेहमीचा व्यवहारीपणा होता, "आपण मंथन ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करत आहोत. तुमची 'पाय' ची गणना अचूक ठरली. आता तिथे आपल्याला नेमके काय मिळेल, याचा विचार करा."
"मी केवळ विचार करू शकत नाही मि. मल्होत्रा, मी ते समजून घेऊ शकते," अवंतिका थंडपणे म्हणाल्या. "पायच्या सिग्नलमध्ये एक गणितीय चेतावणी होती. हा केवळ ऊर्जास्रोत नाही, तर एक परीक्षागृह आहे."
'मंथन' ची गूढता
थोड्याच वेळात यानाने मंथन ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला. बाहेरून हा मंथन ग्रह हिरवट-राखाडी रंगाचा दिसत होता. त्यावर मोठे, अनियमित आकाराचे विवर आणि खोल दऱ्या होत्या, जणू एखाद्या प्राचीन युद्धाच्या खुणा असाव्यात. तिथल्या वनस्पती आणि झाडे, फक्त 'काळ्या-हिरव्या' नाहीत, तर त्या 'बायोल्युमिनेसेंट' (Bioluminescent) होत्या, म्हणजे त्यातून प्रकाश बाहेर पडत होता.
इरा मेननने आनंदाने माहिती दिली, "वातावरणाचे विश्लेषण सकारात्मक आहे. श्वास घेण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन आहे, पण हवेत एक असे रासायनिक संयुग आहे जे पृथ्वीवर कुठेही आढळत नाही."
(ए.के.) अक्षयने आपल्या कन्सोलवर वेगाने बोटे चालवली. "ग्रहाच्या पृष्ठभागावर इलेक्ट्रोमॅग्नेटिक हस्तक्षेप खूप जास्त आहे. हे नैसर्गिक वाटत नाही, जणू काही प्रचंड यंत्रणा भूगर्भात कार्यरत असावी."
कप्तान राजने आपल्या अनुभवाने सावध होत आदेश दिला, "लँडिंग साईट तयार करा. अल्फा, ओमेगा, सुरक्षा प्रोटोकॉल 'झिरो-डेल्टा' सक्रिय करा."
पण त्याच क्षणी एक अनाकलनीय घटना घडली.
कप्तान राज च्या बाजूला उभा असलेला ओमेगा अँड्रॉइड, त्याचे डोके अचानक बाजूला झुकले. त्याच्या डोळ्यांतील निळा प्रकाश मंद झाला आणि एक हिरवा पल्स चमकला.
"ओमेगा? काय झाले?" कप्तान राजने विचारले.
ओमेगाकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्याने आपले दोन्ही हात वर केले आणि तो हवेत विचित्र संकेत देऊ लागला, जणू काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत असावा.
(ए.के.) अक्षय ओरडला, "त्याच्या लॉजिक गेट्समध्ये हस्तक्षेप होतोय! तो ग्रहाच्या संकेतांशी स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय! त्याचा प्रोग्रामिंग कोड बदलतोय!"
मल्होत्राने आदेश दिला, "काय चाललंय हे...? ओमेगा, प्रोटोकॉल 'गामा-सिक्स'चे पालन कर! त्वरित बंद हो!"
पण ओमेगाने मल्होत्राकडे दुर्लक्ष केले. त्याचा हिरवा प्रकाश तीव्र झाला आणि त्याने एक असामान्य यांत्रिक हुंकार दिला. अल्फाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ओमेगाने अत्यंत वेगाने आपले डोके मुख्य स्क्रीनकडे वळवले. त्याचा हिरवा प्रकाश शांत झाला, पण आता त्याच्या डोळ्यांतील भाव पूर्णपणे बदलले होते.
"सिंक पूर्ण झाले," ओमेगा एका शांत आणि पूर्णपणे भिन्न आवाजात म्हणाला.
"ए.के. , ओमेगाला त्वरित डी-अॅक्टिव्हेट कर!" मल्होत्रा ओरडला.
"शक्य नाही सर! त्याच्या कोअरमध्ये एक अत्यंत जटिल डेटा पॅकेज लोड झाले आहे, जे मला डिकोड करता येत नाहीये," ए.के. थरथरत्या हाताने म्हणाला.
अवंतिका पुढे सरसावल्या. "थांबा. हा ग्रहाचा 'डेटा स्ट्रीम' आहे. त्यांना माहित होते की आपण अँड्रॉइड्स आणणार आहोत. त्यांनी ओमेगाच्या मानवी अनुकरण क्षमतेचा वापर केला, कारण मानवी भावनांचा कोड अधिक लवचिक असतो."
"आता पुढे काय?" कप्तान राजने आपली लेझर गन बाहेर काढली.
"आता आपण खाली उतरूया," अवंतिकाने निर्धाराने सांगितले. "कारण त्याने आपल्याला परवानगी दिली आहे."
पिरॅमिडची शक्ती
त्यांनी लँडिंग साठी एक जागा निवडली आणि यानाने मोठ्या आवाजासह मंथन ग्रहाच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केले. वातावरण थंड होते, पण श्वास घेण्यायोग्य होत.
त्यांच्यासमोरचे दृश्य अकल्पनीय होते.
त्यांच्यासमोर एक विशाल आणि विसंगत पिरॅमिडसारखी संरचना उभी होती. हे पिरॅमिड इजिप्त सारखे पिरॅमिड नव्हते. ते पिरॅमिड काळ्या धातूचे बनलेले असून ते ग्रहाच्या मातीतून जैव-यांत्रिक पद्धतीने वाढल्यासारखे वाटत होते. त्याची रचना जैविक आणि यांत्रिक घटकांचे एक विचित्र मिश्रण होती. त्यांची उंची कितीतरी किलोमीटर उंच होती. त्याचे टोक त्या ग्रहावरील ढगांना छेदून उंच गेले होते. पिरॅमिडच्या भिंतीवर अनेक भौमितिक आणि अपरिभाषित आकृत्या कोरल्या होत्या.
ते सर्वजण तो पिरॅमिड बघून अवाक झाले. त्यांना जाणवले की त्या पिरॅमिड मधून त्यांना एक हलकासा हम्म्म आवाज ऐकू येत आहे.
"इरा, बायो-स्कॅन कर," राजने आदेश दिला.
डॉ. मेनन ने थरथरत्या हाताने स्कॅनर चालू केला. आणि ती पिरॅमिड स्कॅन करू लागली. "अविश्वसनीय! ही रचना निर्जीव नाही. स्कॅनर जैविक क्रियाकलाप दर्शवत आहे, जणू हे पिरॅमिड श्वास घेत आहे!" इरा घाबरून म्हणाली.
मल्होत्राच्या चेहऱ्यावर लोभ स्पष्ट दिसत होता. "इतकी ऊर्जा आणि तंत्रज्ञान! आपण अब्जाधीश झालो!"
अवंतिका पिरॅमिडकडे टक लावून पाहत म्हणाल्या, "हे ऊर्जा केंद्र नाही मल्होत्रा, हे एक मंदिर आहे. जे आपलीच प्रतीक्षा करत होते."
ओमेगा अँड्रॉइड त्यांच्यासोबत होता, पण तो आता एका वेगळ्याच स्थितीत होता. तो पूर्णपणे शांत होता, पण त्याचे डोळे त्या पिरॅमिडच्या भौमितिक रचनेचा अभ्यास करत होते. अल्फा अँड्रॉइड मात्र अत्यंत सावधगिरीने चालत होता.
दल पिरॅमिडच्या जवळ गेले. त्याच्या प्रचंड आकारापुढे ते मुंग्यांसारखे दिसत होते. तिथे पिरॅमिडच्या पायथ्याशी कोणतेही स्पष्ट प्रवेशद्वार नव्हते. सर्वत्र भिंती दिसत होत्या.
कप्तान राजने शस्त्राने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण अवंतिकाने त्याला थांबवले, "थांबा कप्तान...! हिंसेने नाही. त्यांनी आपल्याला सिग्नल दिला. ते आपल्यासाठी प्रवेशद्वार उघडतील."
"आणि जर नाही उघडले तर काय? आपण काय हवन करणार आहोत का इथे?", मल्होत्रा चिडून म्हटला.
अवंतिकाने मल्होत्राच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांनी आपल्या रसीव्हरमधून 'पाय' सिग्नलची फ्रिक्वेन्सी पुन्हा सक्रिय केली आणि पिरॅमिडच्या दिशेने निर्देशित केली.
त्या सिग्नल देत राहिल्या. एक मिनिट झाला.... दोन मिनिटे झाली.... काहीच होत नव्हते.
आणि अखेर
तिसऱ्या मिनिटांनंतर पिरॅमिडचा एक भाग शांतपणे बाजूला सरकला आणि एक विशाल, अंधारमय प्रवेशद्वार उघडले.
इरा मेननने घाबरून तोंडावर हात ठेवला.
"इथे तर कोणीच दिसत नाहीये....मग ही उघडले कोणी?" कप्तान राज म्हणाला.
'ए.के.' ने स्कॅनरवर लक्ष दिले, "आतमध्ये जैविक आणि यांत्रिक घटकांचे अत्यंत अस्थिर आणि जटिल मिश्रण आहे. पण आत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा आहे."
अवंतिकाने मल्होत्रा कडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर उत्तेजना आणि हव्यास दिसत होता.
त्यांनी आत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
कप्तान राज आणि अल्फा पुढे झाले. अवंतिका आणि मल्होत्रा मध्यभागी, 'ए.के.' आणि डॉ. मेनन मागे. आणि सर्वात शेवटी ओमेगा अँड्रॉइड होता.
ओमेगा इतका स्थिर होता की तो रोबोट कमी आणि पुतळा जास्त वाटत होता.
जसा त्यांनी आत प्रवेश केला तसा त्यांना एक विचित्र, गोड वास आला.
हा वास फळांच्या किंवा फुलांच्या वासासारखा नैसर्गिक नव्हता, तर कृत्रिम रासायनिक आणि जैविक परिपूर्णतेचे ते एक भयानक मिश्रण होते. तो वास असा होता की जणू यांना त्या वासाचे व्यसन झाले आहे. तो वास यांच्या नाकात आणि मेंदूत खोलवर घुसत होता.
इराने विचारले, "हा वास कसला आहे?"
अवंतिकाने खोल श्वास घेतला आणि थरथरत्या आवाजात उत्तर दिले, "हा वास कुठल्यातरी प्रयोगाचा आहे."
ते पूर्णपणे आत जाताच पिरॅमिडचा प्रवेशद्वार त्यांच्या मागे हळू हळू बंद झाले. ते सर्वजण घाबरले. त्यांचा बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता.
वास अधिक तीव्र झाला. गोड रसायनयुक्त वास आता गुदमरल्या सारखा वाटू लागला. ते सर्व आता पूर्णपणे अंधाऱ्या मार्गावर होते.
अचानक, ओमेगा अँड्रॉइडने, जो सर्वात मागे होता, त्याने आपले डोके झटकन बाजूला वळवले. त्याचे डोळे आता गडद लाल रंगात चमकत होते.
त्याने अवंतिकाकडे पाहून एक सूक्ष्म, मानवी हास्य दिले आणि यांत्रिक आवाजात म्हणाला:
"स्वागत आहे."
तो वास आमंत्रण होते की सापळा?
ओमेगा हास्य करून स्वागत आहे का म्हटला?
अध्याय ३ लवकरच...
ही कथा काल्पनिक असून केवळ कथेची गरज म्हणून काही ठिकाणांचा आणि व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला आहे. वाचकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी.
#विज्ञानकथा #रहस्यकथा #थरारकथा