त्या बंडखोर चमूच्या ५ तबकड्या आता हळूहळू त्या निळ्या हिरव्या ग्रहाच्या जवळ जाऊ लागल्या. त्यांच्या दुर्बिणीतून त्यांनी एक दृश्य पाहिले आणि त्यांच्या आनंदाला उधाण आले. जो निळा रंग त्यांना अवकाशातून दिसत होता तो रंग म्हणजे पाणी होते. पाणी आले म्हणजे जीवसृष्टी आली. त्यांना आता आणखीन उत्सुकता लागून राहिली होती. पण त्याहून जास्त आनंद त्यांना या गोष्टीचा होता की या ग्रहावर पाणी होत. कारण हे लोक पाण्यात राहू शकत होते. यांचा स्वतःचा ग्रहच ९०% पाण्याने बनलेला होता. हे प्रगत लोक जलचर नाही तर उभयचर होते. या ग्रहावर पाणी आहे ते ही विपुल प्रमाणात त्यामुळे यांना फायदाच फायदा होता.
थोडे आणखी जवळ गेल्यावर त्यांना हिरव्या रंगाच्या आसपास तपकिरी तर काही ठिकाणी लाल काही ठिकाणी काळी छटा दिसली. काही ठिकाणी पांढरा रंग दिसला. पांढऱ्या रंगामुळे त्यांना त्या पांढऱ्या ग्रहाची आठवण झाली. हा तसाच काहीसा प्रकार असावा असे त्यांना वाटले. ढगांच्या आवरणातून जाताना त्यांना काही ठिकाणी काळे ढग लागले तर काही ठिकाणी विजा चमकताना दिसल्या. आणखी जवळ गेल्यावर त्यांना दिसले की तो पांढरा रंग हा बर्फ होता आणि तो ही पाण्याचा. उंच उंच शिखरे होते त्यावर तो बर्फ होता. हिरवा रंग झाडांचा होता. अशी झाडे त्यांच्या ग्रहावर फार कमी प्रमाणात होती.
ते अजूनही घिरट्या मारत माहिती गोळा करत होते. झाडे आहेत म्हणजे जीवसृष्टी आहे यावर शिक्कामोर्तब झाले. आता आपण परत गेलो तरी आपल्याला कोणतीही शिक्षा होणार नाही याबद्दल त्यांना खात्री पटली. आपली बंडखोरी यशस्वी झाली याचा त्यांना आनंद झाला होता. ते अजूनही माहिती गोळा करत होते. वेगवेगळे संदेश ते या ग्रहावर पाठवत होते. पण त्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळत नव्हते.
त्यांनी आपला घिरट्या घालायचा वेग आता खूप कमी केला होता. ते अजून थोडे जवळ गेले असता त्यांना आकाशात काहीतरी उडताना दिसले. त्यांनी लगेच हल्ला करण्याचा पावित्रा घेतला पण आकाशात उडणारी गोष्ट आपल्या रडारवर का दिसत नाही याचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी लगेच आपल्या तबकडी बाहेरचे सेन्सर सुरू केले. त्यातून मिळालेल्या डेटा मधून उडणारी वस्तू ही या ग्रहावरचा सजीव आहे हे त्यांना कळले. इथले सजीव हवेत उडू शकतात याचे त्यांना आश्चर्य वाटले कारण त्यांच्या ग्रहावर जे प्राणी आहेत ते फक्त पाण्याखाली राहणारे होते आणि जमिनीवर सरपटणारे काही प्राणी होते पण ते उभयचर होते. उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकणारे. त्यांनी बर्फाळ प्रदेशाकडे कूच केले. बर्फात त्यांना फिरणारे सजीव दिसले. मग त्यांनी मोर्चा वळवला जंगलाकडे, तिकडेही त्यांना अनेक सजीव दिसले.
त्यांनी एक समतल जागा बघून एका पठारावर आपल्या तबकड्या उतरवल्या. त्यांनी तिथे खोदकाम केले आणि मातीचे पृथक्करण केले. त्यांना मातीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, क्षार, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आढळून आले. लोह, मँगॅनीज, झिंक, तांबे आढळून आले. खनिजांनी संपन्न अशी जमीन त्यांना मिळाली होती. त्यांच्यातली एक तबकडी आता पाण्यात उतरली. पाण्याचे तापमान अगदी सामान्य होते त्यामुळे इथेही जीवसृष्टी असणार यावर ते ठाम होते. त्यांना पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन, नायट्रोजन, लोह, शिसे, पारा इत्याही मिळाले. त्यांची बंडखोरी पूर्णपणे यशस्वी झाली होती. सगळी माहिती एकत्रित करून आपण आपल्या ग्रहावर परत जायचे असे त्यांनी ठरवले. एकेठिकाणी त्या सगळ्या तबकड्या एकत्र झाल्या आणि गोळा केलेल्या माहितीची देवाणघेवाण आणि काही प्रयोग त्यातल्या त्या एका तबकडीमध्ये सुरू झाले.
पहिले ४ भाग आणि आता हा पाचवा भाग वाचताना वाचकांना कल्पना आली असेलच की मागच्या भागातला पांढरा ग्रह आणि हा आताचा निळा हिरवा ग्रह कोणता असेल ते. बरोबर...... तो पांढरा ग्रह म्हणजे आपला चंद्र आणि हिरवा निळा ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. जेव्हा या तबकड्या इथे उतरल्या होत्या त्यावेळी मनुष्यप्राणी पृथ्वीवर अस्तित्वात नव्हता, म्हणून कदाचित त्यांना मातीत आणि पाण्यात एवढी खनिज आणि संयुगे मिळाली. आता पुन्हा मूळ जागी येऊया.
तर त्या एका तबकडीत निरनिराळे प्रयोग आणि रासायनिक पृथक्करण चालूच होते. पृथ्वीवरची झाडे प्रकाश संस्लेषण करून कसे अन्न बनवतात यावर ते अभ्यास करत होते. इथल्या हवेत नायट्रोजन मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्या खालोखाल ऑक्सिजन आहे हे निरिक्षण त्यांनी नोंदवले. खरेतर हे लोक त्यांच्या ग्रहावर पाण्यात राहत होते तिथे पाण्यात ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात आणि पाण्याबाहेर सुद्धा ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात होता. पण हे उभयचर तर होतेच पण त्यांना जगायला ऑक्सिजन पेक्षा नायट्रोजन लागत होता. ते नायट्रोजन शरीरात घेत असत. पृथ्वीवर नायट्रोजन मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे हाच ग्रह आपली वसाहत आणि प्रयोगशाळा दोन्ही गोष्टींसाठी अगदी योग्य होती असे त्यांना वाटू लागले. पाण्याच्या पृथक्करण वेळीसुद्धा पाण्यात नायट्रोजन मोठ्या प्रमाणात आहे हे त्यानं कळले. त्यांनी सगळा डेटा एकत्र केला आणि ते आता आपल्या ग्राहाकडे जाण्यासाठी सज्ज झाले.
इतक्यात अचानक त्यांच्या रडारवर जोरात बिप वाजू लागला. त्यांनी पटकन अवकाशात झेप घेतली. रडारवर त्यांच्याकडे येणाऱ्या वास्तूची दिशा त्यांना कळली पण त्याचा वेग पाहून त्यांचे डोळे गरगरले. इतक्या वेगाने आपल्याकडे काय येत असेल हेच त्यांना कळत नव्हते. शक्य तितक्या वेगाने त्यांच्याकडे येणाऱ्या वास्तूच्या उलट्या दिशेला त्यांनी तबकड्या पळवल्या पण ती उडणारी वस्तू त्यांच्या मागेमागे येत होती. या परिस्थितीत काय करायचे त्यांना कळत नव्हते. ज्या तबकडीत या बंडखोर चमूंनी प्रयोगशाळा उभारली होती त्यांनी एक संदेश उरलेल्या चार तबकड्यांवर पाठवला. तो असा होता, "सगळ्यांनी वेगवेगळ्या दिशांना उडा. जेव्हढे लांब जाता येईल तेव्हढे जा. आपण सर्व पुन्हा त्या पांढऱ्या ग्रहावर भेटू." सगळ्या तबकड्या वेगवेगळ्या दिशांना उडाल्या. पण काही केल्या त्यांच्या रडारवरचा बिप वाजतच होता.
खरेतर पाठलाग करणारी गोष्ट दुसरी तिसरी नसून मदर स्पेसशिप होती हे तुम्हाला कळालेच असेल. मदर स्पेसशिपवर असणारी अद्यावत प्रणालीने या पाच तबकड्या बरोबर शोधून काढल्या होत्या. पण आता पाचही तबकड्या वेगवेगळ्या दिशेला उडाल्याने कोणाचा पाठलाग करायचा याच्या विचारात त्या स्पेशशिपचा पायलट पडला होता. इतक्यात त्या मदर स्पेसशिपमधल्या कॅप्टनने आपल्या सहकाऱ्यांना एक खूण केली. ताबडतोब तिथून एक संदेश पाचही तबकड्यांना गेला. तो मेसेज असा होता, "ताबडतोब सगळ्यांनी शरणागती पत्करा नाहीतर तुमच्या यानाचा कंट्रोल आम्ही आमच्याकडे घेऊ आणि मग होणाऱ्या विनाशास तुम्ही स्वतः जबाबदार राहाल." अर्थात हा संदेश त्यांच्या भाषेत होता, आपल्याला समजावा म्हणून मराठीत लिहितोय.
तर हा संदेश पाचही तबकड्यांच्या स्क्रीनवर दिसला. आपला पाठलाग करणारी वस्तू ही उडती तबकडी आहे आणि आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहे हे त्यांना कळून चुकले. आता काय करायचे याच्या ते विचारत पडले. त्याचा संदेश आपल्या स्क्रीनवर दिसतोय याचा अर्थ त्यांनी आपली सिस्टम हॅक केली याचा त्यांना अंदाज आला. त्यामुळे ते आपापसात सुद्धा संदेश पाठवू शकत नव्हते. सगळे हतबल झाले पण हा संदेश आपल्या भाषेत आहे म्हणजे आपल्याच ग्रहावरची तबकडी असणार याची पुसटशी कल्पना सुद्धा त्यांना नाही आली. सगळे प्रयत्न करून थकले. मदर स्पेसशिपमधील हॅकर्सनी या बंडखोर चमूंच्या तबकड्यांची सिस्टम हॅक करायला सुरुवात केली. या पाच तबकड्यांच्या स्क्रीनवर चित्रविचित्र गोष्टी दिसू लागल्या, सगळी यंत्रणा बंद चालू व्हायला लागली. काय होतंय हेच कळायचं बंद झालं त्यांना. पहिली तबकडी पूर्णपणे आता मदर स्पेसशिपवर असलेल्या हॅकर्सच्या ताब्यात होती. पहिली तीच आली कारण तिच्यावर सगळी प्रयोगशाळा बसलेली होती. हॅकर्स आता त्या तबकडीला मदर स्पेसशिपमध्ये बसून चालवत होते पण उरलेल्या चार तबकड्यांनी जी गोष्ट करायला नाही पाहिजे तेच केले. त्या चारही तबकड्यामधल्या चमूने सरळ सरळ आपल्या तबकडीमधली पॉवर बंद करून टाकली. त्यामुळे झाले असे की त्यांचा मदर स्पेसशिपशी संपर्क तुटला. हॅकर्स आता काहीच करु शकत नव्हते. एकदा का पॉवर गेली की कनेक्शन तुटेल आणि पुन्हा पॉवर ऑन करून आपण पळून जाऊ असे त्यांना वाटले होते पण झाले भलतेच.