The masterminds behind the scenes - 3 in Marathi Science-Fiction by Ashish Devrukhkar books and stories PDF | पडद्याआडचे सूत्रधार - 3 - मंगळाचे चंद्र आणि बंडखोरी

Featured Books
Categories
Share

पडद्याआडचे सूत्रधार - 3 - मंगळाचे चंद्र आणि बंडखोरी

मंगळाचे दोन चंद्र, त्यापैकी एक मंगळ ग्रहापासून कमी अंतरावर पण प्रचंड वेगाने फिरत होता तर दुसरा खूप लांबून आणि कमी वेगात फिरत होता. नव्याने आलेले शास्त्रज्ञ त्या चंद्रावर जाण्यास उत्सुक होते पण जवळच्या चंद्रावर जाणाऱ्या चमूत त्यांना स्थान नाही मिळालं. १० तबकड्यांचा समूह मंगळ ग्रहाच्या जवळच्या चंद्रावर फोबॉसवर जायला निघाल्या. 

वरिष्ठ शास्त्रज्ञांची मनमानी खूप झाली होती. सगळ्या ठिकाणी सगळ त्यांचेच ऐकायचे असा नियम त्यांनी बनवला होता. नव्याने आलेल्या शास्त्रज्ञांना काहीही करण्यापासून रोखले जात होते. त्यांची सतत अवहेलना आणि अपमान सुरू होते. युरोपावर जीवसृष्टी सापडल्याने वरिष्ठ शास्त्रज्ञांना अहमपणा आला होता. त्यांच्या अहंकारी वागण्याला हे नवीन शास्त्रज्ञ कंटाळले होते. त्यातच फोबॉस वर जायला सुद्धा नवीन शास्त्रज्ञांना बंदी घातल्याने बंडखोरीचा ज्वालामुखी केव्हाही फुटण्याची शक्यता होती. आता खदखद बाहेर पडण्यासाठी योग्य वेळेची वाट बघत होती. आपल्या शिक्षणाचा, हुशार असण्याचा गैरफायदा उठवला जात आहे असे त्यांना वाटू लागले. आपले तारुण्य त्यांनी यासाठी खर्ची घातले होते. आपली बुद्धी आपण यांच्यासाठी वाया घालवण्यापेक्षा यांच्यातून फुटून आपण आपल्या मार्गाने जावे असा ते विचार करू लागले. 

मंगळावर थांबलेल्या काही शास्त्रज्ञांनी आपला वेगळा समूह बनवला आणि इथून वरिष्ठांच्या तावडीतून सुटून अजून पुढे कसे आणि कुठे  जायचे यावर त्यांनी विचार विनियम सुरू केला. मंगळावर प्रयोगशाळा आणि तळ बनवण्यात त्यांचे आयुष्य त्यांना इथे खर्च करायचे नव्हते आणि त्यांना आपल्या ग्रहावर परत जायचे सुद्धा नव्हते. पुढचे पाऊल उचलण्यासाठी त्यांनी अगदी गुप्त पद्धतीने काम सुरू केले. त्यांनी बरोबर ५ तबकड्या एका बाजूला थोड्या दूर अंतरावर ठेवल्या. त्यातल्या एका तबकडीमध्ये त्यांनी गुपचूप आपले संशोधन सुरू ठेवले. त्यांच्यातल्या काही तबकड्या प्रयोगशाळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणायला आपल्या मूळ ग्रहावर निघून गेल्या आणि युरोपावर राहिलेल्या तबकड्या काही दिवसांनी मंगळावर येणार होत्या. 

ज्या तबकडीमध्ये गुपचूप संशोधन सुरू होते त्यांनी एक युक्ती केली होती. हे सगळे तरुण शास्त्रज्ञ मंगळाच्या दुसऱ्या चंद्रावर जाण्यासाठी वरिष्ठ शास्त्रज्ञांची मनधरणी करत होते आणि त्यांना एकदा का संधी मिळाली की तिकडून पळ काढायचा आणि पुढे निघून जायचे असे त्यांनी ठरवले. त्यांच्याकडे त्यांनी मोहिमेत लपवून आणलेले साहित्य, दुर्बिणी, रोबो हे खूप कमी क्षमता असलेले आणले होते. कारण त्यांना कमी जागेत खूप साहित्य आणायचे होते. 

तिकडे मंगळाच्या पहिल्या चंद्रावर गेलेल्या तबकड्या निराश होऊन परत आल्या. फोबॉस म्हणजे हवेत फिरणारा एक मोठा दगड आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. आणि इकडे तबकडीमध्ये अपुऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर संशोधन करणाऱ्या चमूने एका पांढऱ्या ग्रहाचा शोध लावला होता. हा ग्रह मंगळाच्या दुसऱ्या चंद्राच्या जवळ येत होता. काहीही झाले तरी मंगळाच्या दुसऱ्या चंद्रावर जायचे आणि तिकडून पळून जायचे असा त्यांनी पक्का प्लॅन बनवला. मंगळाच्या दुसऱ्या चंद्रावर डीमॉसवर जाण्याची तयारी सुरू होती. खूप गयावया केल्यावर त्या तरुण चमूला डीमॉसवर जाण्याची परवानगी मिळाली. अजून उड्डाण करण्यास काही दिवस होते तोपर्यंत या चमूने त्या पांढऱ्या ग्रहाकडे कधी उड्डाण करायचे आणि काय काय करायचे याची तयारी सुरू केली. 

शेवटी तो दिवस उजाडला. वरिष्ठ शास्त्रज्ञांना कंटाळलेले आणि आपले स्वतंत्र संशोधन करणारा तो चमू आपल्या स्पेशल बाहेरून साध्या पण आतून प्रयोगशाळा असणाऱ्या ५ तबकड्या घेऊन मंगळाच्या दुसऱ्या चंद्रावर जाणाऱ्या ग्रूपमध्ये सामील झाल्या. हा १० तबकड्यांचा समूह आता अवकाशात उडाला. मंगळावर असलेल्या एका तबकडीशी त्या दहाही तबकड्या संपर्क ठेवून होत्या. आता त्या डीमॉसच्या दिशेने उड्डाण करू लागल्या. लवकरच त्या डीमॉस भोवती घिरट्या मारू लागले. 

डीमॉस मंगळाचा दुसरा चंद्र. मंगळापासून लांब असल्याने याच्यावर जास्त वेळ काढून आपल्या योग्य वेळेला इथून पळून जायचे असा प्लॅन त्या बंडखोरी करायच्या बेतात असलेल्या शास्त्रज्ञांनी बनवला होता. त्यातच त्यांनी शोधलेला पांढरा ग्रह सुद्धा हळूहळू जवळ येत होता. त्या १० तबकड्या आता डीमॉसवर उतरल्या. तिथे वातावरण हे जवळपास नव्हतेच. त्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली. पण बंडखोरी करायच्या तयारीत असणाऱ्या पाच तबकड्या मात्र आपला प्लॅन काहीही करून पूर्णत्वास न्यायचा होता. तिथेही त्यांचे संशोधन सुरूच होते. त्यांनी शोधलेला पांढरा ग्रह आता खूप जवळ आला होता. मंगळावरील मुख्य तबकडीतून या १० तबकड्यांना परत येण्याचा संदेश आला.

बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या चमूने उड्डाण करण्यास नकार दिला. एका तबकडीत खराबी आल्याने उड्डाण करू शकत नाही असा खोटा संदेश त्यांनी दिला. खरेतर ते त्यांनी शोधलेला पांढरा ग्रह जवळ यायची वाट पाहत होते. त्यांच्या ते स्पेशल तबकडी मधली दुर्बीण त्या पांढऱ्या ग्रहावर नजर ठेऊन होती. त्या तरुण चमूने केलेला प्लॅन आणि पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची वेळ जवळ आली होती. त्यांनी तबकडी दुरुस्त झाल्याची आणि उड्डाणास तयार असल्याचा संदेश दिला. खरेतर त्यांचा प्लॅन वेगळाच होता. मंगळावरील तबकडीतून उड्डाणाचा संदेश मिळाल्यावर १० तबकड्या एकदम अवकाशात उडाल्या आणि मंगळाच्या दिशेने त्यांनी आपला ताफा वळवला, पण.........

बंडखोरी करायच्या तयारीत असलेल्या ५ तबकड्या ज्यात तो तरुण शास्त्रज्ञांचा चमू होता त्यांनी अचानक आपला रस्ता बदलला आणि काळ्याकुट्ट अवकाशात एका दिशेने त्यांनी उड्डाण केले. मंगळावरील तबकडीने त्यांना परत फिरायचा संदेश दिला पण त्या चमूने त्यांच्या तबकड्यांची संदेश वहन करणारी यंत्रणाच बंद करून टाकली. पुढे उडणाऱ्या ५ तबकड्यांना काही कळायच्या आता मागच्या ५ तबकड्या अगदी वेगाने त्यांच्यापासून लांब निघून गेल्या. मंगळावरील मुख्य तबकडीतल्या शास्त्रज्ञांनी पळून गेलेल्या तबकड्यांचा पाठलाग करायला सांगितले पण पळून गेलेल्या तबकड्यांनी आपले प्लॅन आधीच बनवून ठेवले होते. त्या पाचही तबकड्या अवकाशात न जाता डीमॉसच्या अंधाऱ्या भागात उतरल्या. त्यांनी आपली पूर्ण यंत्रणा बंद करून टाकली. त्यांना शोधायला आलेल्या पाचही तबकड्या डीमॉस वरून उडाल्या पण एकही तबकडी खाली उतरली नाही. थोड्या वेळाने शोधकार्य करणाऱ्या पाचही तबकड्या मंगळावर परतल्या. इकडे डीमॉसवर बंडखोरी केलेला चमू आपल्या पाच तबकड्यांसहीत अजूनही तिथेच सगळी यंत्रणा बंद करून होता. आपल्या मिशन बंडखोरी मधली पहिली पायरी यशस्वी झाल्याने ते खूप आनंदात होते.