आता ते आयओच्या दिशेने जातं होते. हा गुरु ग्रहाचा तिसरा सर्वात मोठा चंद्र आहे. जसजसे त्याच्या जवळ ते जाऊ लागले त्यांना त्या चंद्राची जास्त ओढ वाटू लागली. आतापर्यंत सगळीकडे नुसता बर्फच त्यांना दिसला होता पण या चंद्रावर त्यांना फक्त आणि फक्त जागृत ज्वालामुखी दिसत होते. सतत त्याच्या पृष्ठभागावर ज्वालामुखी लावा औकात होते. ते आता आयओपासून ५०० किमी उंचीवर उडत होते. आणखी जवळ गेल्यावर त्यांच्या तबकडीच्या बाहेर असलेल्या तापमान मोजणाऱ्या यंत्रणांनी अचानक उच्च तापमान दाखवले. लगेचच दुसऱ्या यंत्रणाने विषारी वायू असल्याची माहिती दिली. शोध घेतल्यावर असे निदर्शनास आले की आयओच्या पृष्ठभागावरचे ज्वालामुखी ५०० किमी उंच लाव्हा, राख आणि विषारी वायू फेकत आहेत. त्यांनी ताबोडतोब आपले अंतर वाढवून १००० किमी केले.
तिथून त्यांनी आपले संशोधन सुरु केले. त्यांना आढळले की सततच्या ज्वालामुखी उद्रेकांमुळे आयओचा पृष्ठभाग सतत बदलत राहतो. आयओवरती ४०० पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी आहेत. या ज्वालामुखी उद्रेकांमुळे वितळलेली सिलिकेट खडकांची सामग्री पृष्ठभागावर येते. या उद्रेकांमधून प्रामुख्याने सल्फर आणि सल्फर डाय ऑक्साईड बाहेर पडतो. इथे उल्कावर्षाव सुद्धा सतत होत असतो आणि मोठ्या उल्कापिंडाने इथे मोठे मोठे खड्डे पडतात पण ज्वालामुखीतून येणाऱ्या लव्हामुळे ते पुन्हा भरले जातात आणि पृष्ठभाग नेहमी तरुण राहतो. इथले वातावरण अगदीच विरळ असून त्यात ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या सल्फर डाय-ऑक्साइडचे प्रमाण जास्त आहे. तसेच हा चंद्र गुरु ग्रहाच्या अतिप्रचंड शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रात फिरतो त्यामुळे तिथे प्रचंड रेडीएशनचा मारा होतो. या सगळ्या कारणांमुळे तिथे जिवसृष्टी असण्याची शक्यता मावळल्यामुळे त्यांनी आपला ताफा आता गुरुच्या चौथ्या मोठ्या चंद्राकडे म्हणजे युरोपाकडे.
आजवर पाहिलेल्या सर्व ग्रहांपेक्षा युरोपा सगळ्यात गुळगुळीत पृष्ठभाग असलेला होता. युरोपावर त्यांच्या तबकड्या उतरल्या. युरोपाचा पृष्ठभाग हा पाण्याच्या बर्फाने बनलेला होता. त्यांनी लगेच तिकडे संशोधन सुरु केले. त्यांना आढळले की युरोपावर अगदी विरळ वातावरण आहे पण जिवसृष्टीसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन पासून बनलेले ते वातावरण होते. त्यांनी त्या पाण्याचा बर्फापासून बनलेल्या पृष्ठभागाला होल मारायला सुरुवात केली. सुमारे १०० किमी आत गेल्यावर त्यांना तिथे खारे पाणी लागले. त्यांनी लागलीच आपले रोबोट तिकडे पाठवले. त्यांना त्या खाऱ्या पाण्यात कार्बन, नायट्रोजन आणि सल्फर सारखी खनिजे विरघळलेली सापडली. त्या खाऱ्या पाण्याच्या तळाशी त्यांना अनेक उष्ण पाण्याची छिद्र सापडली. या छिद्रातून येणाऱ्या रसायनांचा वापर करून रसायनसंश्लेषण करणारी जीवसृष्टी अस्तिवात असण्याची दाट शक्यता त्यांना वाटत होती. त्यांनी काही ठिकाणी पाण्याच्या बर्फाच्या पृष्ठभागावर मोठ्या मोठ्या भेगा आढळल्या. युरोपा गुरु ग्रहाच्या तीव्र अशा चुंबकीय क्षेत्रात फिरत असल्याने गुरूच्या किरणोत्सारमुळे पाण्याच्या बर्फाचे रेणू तुटतात आणि त्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे होतात. हायड्रोजन हा हलका असल्याने आणि युरोपाचे गुरुत्वाकर्षण बल खूपच कमी असल्याने हायड्रोजन अवकाशात फेकला जातो असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. पण पृष्ठभागावर तापमान -१६० अंश सेल्सिअस असल्याने इथे जीवसृष्टी असणे असंभव जरी असले तरी पाण्याच्या बर्फाच्या खाली जो खारा समुद्र आहे त्यात जीवसृष्टी असण्याचा संभव असल्याने काही तबकड्या तिथेच थांबून आणखी संशोधन करणार असा ठराव झाला. १० तबकड्या तिथेच थांबल्या आणि उरलेल्या सर्व तबकड्या आता पुन्हा अवकाशात आल्या.
ते आता मंगळ ग्रहाच्या दिशेने निघाले होते. काही दिवसांनी त्यांना लालसर नारंगी रंगाचा मंगळ ग्रह दिसू लागला. जसजसे सूर्याच्या जवळ जात आहोत तसे ग्रहांवर तापमान वाढत आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. युरोपावर जीवसृष्टी असल्याचे संकेत मिळाल्यामुळे ते आता मंगळ ग्रहाबाबत जास्त उत्सुक होते. मंगळ ग्रहावर उतरण्या आधी ते त्याच्याभोवती घिरट्या घालू लागले. जीवसृष्टी असेल आणि जर प्रगत असेल तर आपल्यावर हल्ला होईल या भावनेने ते मंगळ ग्रहाभोवती फिरून आढावा घेत होते. हा आढावा घेताना त्यांना बऱ्याच गोष्टी कळल्या. मंगळ ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती गुरु ग्रहाच्या मानाने कमी आहे. त्यांना मंगळावर आजवर पाहिलेला सगळ्यात मोठा ज्वालामुखी दिसला ज्याचे नाव ऑलिंपस मोंस आहे. त्याची उंची जवळपास २२ किमी आहे. ५ तबकड्या त्या ज्वालमुखीपासून १०० किमी अंतरावर उतरल्या. एकंदरीत हा ज्वालामुखी सध्यातरी जागृत नाही हे त्यांना कळले. त्यांनी आपले संशोधन सुरू केले. ज्वालामुखीचा व्यास जवळपास ६२४ किमी आहे. याचा लाव्हा पातळ आणि प्रवाही असल्यामुळे त्याचा आकार ढालीसारखा झाला आहे. त्यांनी अजून ४ ज्वालामुखींचा तिकडे शोध लावला.
मंगळाचे वातावरण खूप विरळ असून त्यात मुख्यत्वे कार्बन डायऑक्साइड आहे असे त्यांनी निरिक्षण नोंदवले. ५ तबकड्या उत्तर ध्रुवाकडे आणि ५ तबकड्या दक्षिण ध्रुवाकडे निघून गेल्या. त्या तबकड्या त्या त्या ध्रुवावर उतरल्या. त्यांना तिकडे गोठलेल्या स्वरूपात कार्बन डायऑक्साइड सापडला ज्याला आपण शुष्क बर्फ (dry ice) म्हणतो. त्यांनी त्याच्यात आपली ड्रिल मशीन सोडली. काही किलोमीटर ड्रिल मारल्यावर त्यांना तिथे पाण्याचा बर्फ सापडला. दक्षिण ध्रुवावर त्यांना पाण्याच्या बर्फाचा साठा मोठ्या प्रमाणावर सापडला. पण मंगळावरील तापमान खूप कमी असल्याने वातावरणातील कार्बन डायऑक्साइड गोठून त्याचा शुष्क बर्फ बनतो आणि मग तो पाण्याच्या बर्फावर साठतो. तो पाण्याच्या बर्फाला टोपीसारखे झाकून टाकतो. त्यांनी हे निरिक्षण नोंदवले. त्यांचे तिथे जीवसृष्टी शोधण्याचे काम अगदी जोरात सुरू होते.
वरती घिरट्या घालणाऱ्या तबकड्यांना आता एक प्रचंड मोठी दरी दिसली. ५ तबकड्या त्या दिशेने निघून गेल्या. ती प्रचंड दरी जवळपास ४००० किमी लांब पसरलेली आहे आणि त्याची खोली ७ किलोमीटर आहे. कधीकाळी मंगळावर पाणी द्रवरूपात असावे आणि त्याच्या वाहण्याने ही दरी निर्माण झाली असावी असा त्यांनी कयास बांधला. त्या तबकड्यांमधील काही जण त्या खोल दरीत अभ्यासासाठी उतरले. ह्या दऱ्या म्हणजे आपल्याला लपायला आणि आपले इकडे एक तळ बनवायला अत्यंत उपयोगाचे आहे असे त्यांच्यातल्या काहींचे म्हणणे होते. त्यांनी हवेत घिरट्या घालणाऱ्या आपल्या बाकीच्या सर्व तबकड्यांना दरी जवळ उतरण्यास सांगितले.
प्रयोगशाळा आणि तळ बनवण्यासाठी संशोधन सुरू झाले. त्यांनी तिथे मंगळाच्या दोन चंद्राचा शोध लावला. अचानक तिकडे जोरात वारे वाहू लागले आणि धुळीची मोठी वादळे होऊ लागली. कित्येक महिने ती वादळ सुरूच होती. तापमान बदल होत असताना वायू दाब बदलल्यामुळे मंगळावर धुळीची वादळ होतात हा निष्कर्ष त्यांनी नोंदवला.
त्यांच्यातल्या काही जणांना मंगळावर थांबलेले अजिबात आवडले नव्हते. ते सगळे नव्याने मोहिमेत जोडले गेले होते. त्यांची ही पहिलीच मोहीम होती आणि ते आणखी पुढे जाण्यास उत्सुक होते. मंगळाचे दोन चंद्र शोधल्यामुळे ते तिकडे जाण्यास खूप उत्सुक होते. पण त्यांना या मोहिमेपासून लांब ठेवण्याचे ठरवले गेले. त्यांच्या बुद्धिमतेचा वापर त्यांनी मंगळावर प्रयोगशाळा बनवायला वापरावा अशी वरिष्ठ शास्त्रज्ञांची इच्छा होती.