Share Market Basics - 4 in Marathi Short Stories by Mahadeva Academy books and stories PDF | शेअर मार्केट बेसिक्स - भाग 4

Featured Books
Categories
Share

शेअर मार्केट बेसिक्स - भाग 4

ट्रेडिंग सेटलमेंट सायकल

मित्रांनो, आपण आज एखादा शेअर डिलीवरी मध्ये म्हणजेच काही दिवस होल्ड करण्यासाठी खरेदी केला असेल तर तो आजच आपल्या डीमॅट अकाऊंट मध्ये जमा होत नाही, त्यासाठी एक दिवसाचा वेळ लागतो. यालाच t+1 ट्रेडिंग सायकल म्हटले जाते. T म्हणजे ज्या दिवशी ट्रेड / व्यवहार पार पडला तो दिवस आणि +1 म्हणजे व्यवहार झालेल्या दिवसाला वगळून पुढचा आणखी एक दिवस. म्हणजे एखाद्याने सोमवारी शेअर खरेदी केला तर तो मंगळवारी दिवसाअखेर त्याच्या डीमॅट अकाऊंटमध्ये जमा झालेला दिसेल. जर मंगळवारी सुट्टी असेल तर मग तो बुधवारी होईल. सध्या आपल्या देशात t+1 ट्रेडिंग सायकल लागू आहे. हे ट्रेडिंग सायकल t+0 करण्यासाठी सेक्यूरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड सकारात्मक असल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात; त्यामुळे भविष्यात ज्या दिवशी व्यवहार झाला, त्याच दिवशी शेअर्स आपल्या डीमॅट अकाऊंटमध्ये जमा होण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते.

 

मार्केटच्या कामकाजाचे दिवस व वेळ

सध्या आपल्या देशात वर्षभरात साधारणपणे २४० ते २५० दिवस शेअर बाजार व्यवहारासाठी ओपन असतो. सोमवार ते शुक्रवार असे आठवड्यातील ५ दिवस मार्केट ओपन असते. शनिवार, रविवार व एक्स्चेंजने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांदिवशी मार्केट बंद असते. इक्विटि प्रकारातले शेअर्स, ऑप्शन, फ्युचर कॉंट्रॅक्ट ट्रेड करण्यासाठी सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० हा वेळ आहे. कोमोडिटी प्रकारातले फ्युचर व ऑप्शन कॉंट्रॅक्ट ट्रेड करण्यासाठी सकाळी ९ ते रात्री ११:३० हा वेळ आहे. कॉर्पोरेट बॉन्ड सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ हा वेळ आहे. या उपलब्ध वेळेतच आपल्याला रोख्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार पार पाडायचा असतो.

 

मार्जिन मनी

इक्विटि प्रकारातील शेअर्स खरेदी करण्यासाठी तुमच्या ट्रेडिंग अकाऊंटमध्ये पुरेशी रक्कम असणे गरजेचे असते, यालाच मार्जिन मनी म्हटले जाते. डिलीवरी ऑर्डरमधून शेअर किंवा रोखे खरेदी करायचे असतील तर जेवढ्या किंमतीचे शेअर्स खरेदी करायचे आहेत तेवढे पैसे व त्यावर लागणारे टॅक्स, ब्रोकरेज व इतर चार्जेस असे अतिरिक्त पैसे ट्रेडिंग अकाऊंटमध्ये असणे आवश्यक असते. समजा १०० रु दराने १००० शेअर्स खरेदी करायचे आहेत, मग १ लाख रुपये निव्वळ त्या शेअरची खरेदी किंमत झाली, त्यावर ब्रोकरेज, ट्रान्जॅक्शन टॅक्स, टर्नओवर चार्ज, स्टॅम्प ड्यूटि, जीएसटी, डिपॉजिटरी चार्जेस असे चार्जेसही द्यावे लागतील, ते सर्व या उदाहरणात एकूण २०० रु आहेत असे मानू. म्हणजे, वरील व्यवहार पूर्ण करण्यासाठी किमान १ लाख २०० रुपये, ट्रेडिंग अकाऊंटमध्ये असणे गरजेचे आहे.

इक्विटि इंट्राडे प्रकारातील ट्रेडिंगसाठी मात्र, एकूण किंमतीच्या २० ते ५० टक्के इतके पैसे असले तरीसुद्धा ट्रेडिंग करता येते. इक्विटि इंट्राडे प्रकारातील मार्जिन मनी हा प्रत्येक शेअरसाठी वेगवेगळा असतो. अमुक एका शेअर साठी किती मार्जिन मनी आवश्यक असेल ते सेबी व एक्स्चेंज यांनी घालून दिलेल्या नियमानुसार तो ब्रोकर ठरवत असतो. एकाच कंपनीच्या शेअरसाठी एका ब्रोकरकडे २० टक्के मार्जिन मनीची अट तर दुसऱ्याकडे ३० टक्के मार्जिन मनीची अट असू शकते. त्या ब्रोकरला किती रिस्क घ्यायची आहे यावर ते अवलंबून आहे. याचप्रकारे फ्युचर प्रकारातील कॉंट्रॅक्टसाठीही त्या शेअरच्या एकूण किंमतीच्या २० ते ५० टक्के इतके मार्जिन आवश्यक असते.

मित्रांनो, इक्विटि इंट्राडे व फ्युचर प्रकारातील ट्रेडिंगमध्ये कमी पैशात अधिक शेअर्सची संख्या ट्रेड करता येते यामुळे कमी गुंतवणुकीवर जास्त परतावा कमावण्यासाठी ही सोय किती चांगली आहे असे तुम्हाला वाटू शकते; परंतु नुकसानही तितक्याच जास्त पटीने होणार आहे, ही नुकसानाची सोय किती वाईट आहे हे आधी लक्षात यायला हवे. म्हणून शेअरच्या किंमतीतील बदलांचे सत्य माहितीवर आधारित ठोस कारण तुमच्याकडे नसेल तर केवळ अंदाज बांधून, नशिबाच्या भरवशावर इक्विटि इंट्राडे व फ्युचर प्रकारातील ट्रेडिंग करणे टाळलेच पाहिजे.

        

शेअरची किंमत म्हणजे कशाची किंमत?

आपण दुकानातून एखादा बिस्किटचा पुडा आणतो आणि त्याची काही किंमत दुकानदाराला देतो. समजा ती किंमत ५ रुपये आहे. आता असे गृहीत धरू की तुमचे नाव A आहे. दुकानदार हा B आहे. तो ज्या मोठ्या दुकानदाराकडून ती वस्तु विकत घेतो तो C आहे. तो मोठा दुकानदार ज्या कंपनीतून ती वस्तु विकत घेतो ती D आहे. समजा ते बिस्किट गव्हाच्या पिठापासून बनले आहे. ते पीठ ज्या गव्हापसून बनले आहे ते एका शेतकर्‍याने त्या कंपनीला विकले होते व समजा तो शेतकरी E आहे. A, B, C, D, E पैकी प्रत्येकजण त्याला आलेल्या खर्चावर काही नफ्याचा टक्का जोडूनच ती वस्तू पुढे विकतो. (शेअर बाजार हा अपवाद सोडला तर शक्यतो कोणी घाट्याचा सौदा करत नाही) आता हे विकणे म्हणजे नेमकं काय? विकणे म्हणजेच त्या वस्तूचा मालकी हक्क खरेदी करणार्‍या व्यक्तिला देणे! मग आपण पैसे त्या वस्तूला देतो की तिच्यावर आपला मालकी हक्क सांगणार्‍याला? मालकी हक्क सांगणार्‍यालाच आपण पैसे देतो! म्हणजे वस्तूची किंमत ही मुळात त्या वस्तूच्या मालकी हक्काची किंमत असते. येथे गव्हाचा मालकी हक्क E ने D ला दिला, D ने त्यापासून बिस्किट बनवले व तयार बिस्किटच्या पुड्याचा मालकी हक्क C ला विकला, C ने B ला, व B ने A ला म्हणजेच तुम्हाला! अशा प्रकारे प्रत्येक वस्तूच्या बाबतीत घडते. वस्तू स्वतः कधीच किंमत मागत नाही, तर त्या वस्तूवर मालकी हक्क सांगून ती विकणारा त्या वस्तूची किंमत मागतो. समजा, तुम्हाला रस्त्यावर एक तोळ्याची सोन्याची अंगठी सापडली तर मग ती अंगठी तुम्हाला १ लाख रुपये मागते काय? नाहीच! ती एक निर्जीव वस्तू आहे. यावरून असे कळते की सजीव पैसे मागतात मग यातही समजा तुम्हाला रस्त्यावर कोणाची मालकी नसलेली गाय दिसली व तुम्ही तिचे एक लीटर दूध काढले तर ती गाय तुम्हाला ४० ते ५० रुपये मागते काय? नाहीच! म्हणजे सजीवातही फक्त माणूसच मालकी हक्काचे पैसे मागतो. याच प्रकारे एखाद्या कंपनीच्या एका शेअरची किंमत ही त्या संपूर्ण कंपनीच्या काही टक्के मालकी हक्काची किंमत असते.

 

शेअर विकून कंपनीला फायदा काय?

शेअर बाजारातील मजेशीर गोष्ट अशी की कंपनी तिचे शेअर IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरवेळी एकवेळ विकून टाकते व पुढे आपण लोक सेकंडरी मार्केटमध्ये आपसांत ते शेअर विकत-खरेदी करत बसतो. हे समजून घेण्यासाठी उदाहरण पाहू:

समजा एक कंपनी आहे. जिचा सचिन नावाचा मालक आहे. ती कंपनी वर्षाला एक हजार लिटर दुधाचे उत्पादन करते व बाजार भावाने तिचे वार्षिक उत्पन्न ५० रुपये लिटर प्रमाणे ५० हजार आहे. दूध देणाऱ्या दोन गायी कंपनीकडे आहेत व एका गायीची किंमत १० हजार रुपये आहे. त्यासोबतच त्याने बांधलेल्या गायीच्या गोठ्याची किंमत २० हजार रुपये आहे असे मानू. म्हणजे कंपनीची एकूण संपत्ती ९० हजार रुपये असे मानू. मग सचिनला आणखी १० हजार रुपये हवे आहेत ज्यामुळे तो आणखी एक गाय विकत घेऊ शकेल. म्हणून मग तो १ रुपया प्रती शेअर प्रमाणे १० हजार शेअर पब्लिकला IPO काढून विकून टाकतो व ८० हजार शेअर स्वतः जवळ ठेवतो. अशाप्रकारे ९० हजाराच्या संपत्तीचे मालकी हक्कांमध्ये वितरण झाले. आता सचिनने १० हजार शेअर विकल्याने त्याच्याकडे १० हजार रुपये आले व त्याची एक नवीन गाय विकत घेतली. ती गाय वर्षाला ५०० लिटर दूध देऊ लागली यामुळे सचिनच्या कंपनीचे वार्षिक २५  हजाराने उत्पन्न वाढले व त्याच्या कंपनीची एकूण संपत्ती ३ गायी १० हजार प्रमाणे व ७५ हजार वार्षिक उत्पादन, गोठ्याची किंमत २० हजार म्हणजे १ लाख २५ हजार झाली यामुळे लोकं खूप खुश झाली की कंपनीचा व्यवसाय वाढत आहे व त्या शेअरची किंमतसुद्धा दुप्पट झाली; पण लोकांना वाटू लागलं की सचिन झालेल्या नफ्यातून आणखी गायी आणेल व आणखी व्यवसाय वाढवेल; म्हणून लोकांनी शेअरची किंमत ट्रेडिंग करून-करून चार रूपयावर नेऊन ठेवली! या उदाहरणात सचिनने त्याच्याकडील एकही शेअर विकला नाही, लोकच आपसात त्यांच्याकडील दहा हजार शेअर खरेदी-विक्री करत बसले. सचिन आपला निवांत व्यवसाय करत बसला, अन लोक शेअरची किंमत वर-वर नेत राहिले. अशाप्रकारे किंमत काही वर्षात २० रुपये झाली अन सचिनकडील ८० हजार शेअरचे बाजार भावाने १६ लाख रुपये झाले. म्हणजे सचिनने व्यवसाय वाढीसाठी पैसे पब्लिककडून घेतले, त्याने त्याचा व्यवसाय वाढवला, नफ्याचा सर्वाधिक हिस्साही तोच खातोय अन त्याच्या सुरुवातीच्या ९० हजाराच्या संपत्तीचे १८ लाख झाले! तुम्ही बाजारात पहाल तर बघून थक्क व्हाल की लोकांनी जिथे कंपनीच्या संपत्ती प्रमाणे शेअरची किंमत शंभर रुपये असायला हवी तिथे ती दोन हजारावर नेऊन ठेवली आहे! बहुतेक सर्वच कंपन्याच्या बाबतीत तुम्हाला शेअरचा भाव तिच्या खऱ्या संपत्तीपेक्षा अनेक पटीने जास्त दिसेल.  जगातील बहुतेक धनदांडगे लोक असेच श्रीमंत झाले आहेत. त्यांची श्रीमंती बँकेतील पैशामुळे नाही तर त्यांच्याकडील असलेल्या शेअरच्या किंमतीच्या रूपात मोजली जाते. अर्थात ते त्या संपूर्ण संपत्तीचा कधीच उपभोग घेऊ शकत नाहीत. मित्रांनो, यावरून तुम्हाला शेअर विकून कंपनीला काय फायदा होऊ शकतो हे समजले असेलच.


मित्रांनो, शेअर मार्केट व्यवस्थित शिकायचे असेल तर https://t.me/mahadeva_academy1 या टेलेग्राम चॅनलला जॉइन करा. यासोबतच तुमच्या प्रतिक्रिया 9890830741 या व्हॉट्सअप नंबरवर कळवा व पुढील भाग नक्की वाचा, धन्यवाद!