Share Market Basics - 5 in Marathi Short Stories by Mahadeva Academy books and stories PDF | शेअर मार्केट बेसिक्स - भाग 5

Featured Books
Categories
Share

शेअर मार्केट बेसिक्स - भाग 5

शेअर मार्केट बेसिक्स – भाग ५

 

प्री-मार्केट सेशन:


इक्विटि प्रकारातील ट्रेडिंगसाठी सकाळी ९ ते ९:१५ ही वेळ प्री-मार्केट सेशनसाठी निश्चित केलेली आहे. रेग्युलर मार्केट ओपन होण्याआधी या वेळेत ट्रेडिंग होते; कारण या वेळेत झालेल्या ट्रेडिंगच्या आधारावर रेग्युलर मार्केटची ओपन प्राइस ठरते. प्री-मार्केट सेशन ३ सेशनमध्ये विभागले आहे; ९ ते ९:०७ या सेशनमध्ये आपण शेअर्सच्या खरेदी-विक्रीची ऑर्डर प्लेस करू शकतो, ९:०८ ते ९:१२ या सेशनमध्ये पहिल्या सेशनमध्ये घेतलेल्या ऑर्डर्सची खरेदी-विक्री पार पडते, या सेशनमध्ये आपण नवीन ऑर्डर्स प्लेस करू शकत नाही आणि ९:१२ ते ९:१५ या सेशनमध्ये कोणत्याही ऑर्डर घेतल्या जात नाहीत व कोणताही व्यवहार पार पडत नाही, हा सेशन रेग्युलर मार्केटच्या ओपन प्राइसचे कॅलक्युलेशन करतो व त्यानुसार रेग्युलर सेशनची ओपन प्राइस निश्चित होते. प्री-मार्केट सेशनमध्ये फक्त इक्विटि शेअर्सची खरेदी-विक्री होऊ शकते, त्यात फ्युचर व ऑप्शनचा व्यवहार करता येत नाही.

पोस्ट-मार्केट सेशन:


इक्विटि प्रकारातील ट्रेडिंगसाठी दुपारी ३:३० ते ४ या वेळेत पोस्ट-मार्केट सेशन असते, हे २ सेशनमध्ये विभागले आहे. ३:३० ते ३:४० या वेळेत रेग्युलर मार्केटची क्लोज प्राइस निश्चित होते. निश्चित झालेल्या क्लोज प्राइसनुसार ३:४० ते ४ या वेळेत शेअर्सची खरेदी-विक्री केली जाऊ शकते.


शेअरची क्लोज प्राइस निश्चित करणे हा पोस्ट-मार्केट सेशनचा मुख्य उद्देश असतो, पण जे लोक ३:३० पर्यन्त डिलीवरीमध्ये व्यवहार करू शकले नाहीत, त्यांना ३:४० ते ४ या वेळेत डिलीवरीमध्ये शेअरची खरेदी-विक्री करण्याची एक संधीही उपलब्ध असते, मात्र त्यावेळी खूप कमी प्रमाणात ट्रेडिंग पार पडते व शेअर्स कमी प्रमाणात उपलब्ध असतात. पोस्ट-मार्केट सेशनमध्ये फक्त इक्विटि शेअर्सची खरेदी-विक्री होऊ शकते, त्यात फ्युचर व ऑप्शनचा व्यवहार करता येत नाही. तसेच फक्त डेलीवरी प्रकारातील शेअर्सची खरेदी-विक्री करता येते, त्यात इंट्राडे ऑर्डरद्वारे व्यवहार करता येत नाही.

शेअर / रोखे बाजारात गुंतवणूक कशासाठी?


मित्रांनो, अनेकांना असे वाटत असेल, की रोखे बाजार हा इतका अवघड व रिस्की विषय असताना डायरेक्ट रोखे बाजारात किंवा त्याच्याशी संबंधित आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक कशासाठी करायची? फिक्स्ड डिपॉजिट, रिकरिंग डिपॉजिट, सोने, रियल इस्टेट अशी गुंतवणुकीची इतर साधने उपलब्ध आहेत, मग रोखे बाजारात गुंतवणुकीचा काय वेगळा फायदा? या सगळ्यांची उत्तरे आपण सविस्तर पाहू.

फिक्स्ड व रिकरिंग डिपॉजिट:
या प्रकारातील गुंतवणुकीवर आजच्या घडीला देशातील टॉपच्या बँकांमध्ये ७.५ टक्के पर्यन्त वार्षिक व्याजदर मिळतो. १० हजारपेक्षा जास्त मिळालेल्या व्याजावर १० टक्के टॅक्सही द्यावा लागतो, म्हणजे ७.५ टक्के या व्याजदराने टॅक्स गृहीत धरून ६.७५ टक्के इतकेच निव्वळ उत्पन्न मिळते. आता आपल्या देशात सरासरी ५ टक्के इतका महागाई दर मानला तर हे निव्वळ उत्पन्न फक्त १.७५ टक्के इतकेच राहते. मित्रांनो, स्थानिक पातळीवरील खासगी व सहकारी संस्था जास्त व्याजदर देतात हे खरे असले, तरी अशा बँक बुडीत जाण्याचा धोकाही तेवढाच जास्त असतो, तशा अनेक बातम्या तुम्ही वाचल्या व ऐकल्या असतील.

सोने:
सोन्यातील गुंतवणूक ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. २००० ते २०१० या काळात सोन्याचा भाव सरासरी दरवर्षी १५ टक्के, २०१० ते २०२० या काळात सरासरी दरवर्षी १० टक्के, २०२० ते २०२४ या काळात सरासरी दरवर्षी १३ टक्के वाढल्याचे दिसून येते आणि ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबेर २०२५ या एकाच वर्षाच्या काळात हा भाव जवळपास ४४ टक्के वाढला आहे. इतक्या कमी वेळात इतका जास्त भाव वाढण्याला विविध कारणे जबाबदार आहेत; जसे की, जागतिक अशांतता, युद्धजन्य स्थिती, जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता वगैरे. जेव्हा ही कारणे संपुष्टात येऊन जगात सर्व बाबतीत स्थैर्य निर्माण होईल, तेव्हा हा भाव वाढीचा दर टिकेल की नाही अशी शंका निर्माण होते. म्हणून लॉन्गटर्म गुंतवणूकीचा विचार केला तर २०२४ पूर्वी सोन्याने जी भाववाढ दाखवली आहे त्या पटीतच जागतिक शांततेनंतरची सोन्याची भाववाढ होण्याची शक्यता गृहीत धरून चालू. म्हणजे सरासरी दरवर्षी १३ टक्के सोन्याची भाववाढ होईल असे मानू. आता तुम्ही स्वतः जवळ ठेवण्यासाठी अंगठी वगैरे असे फिजिकल सोने खरेदी केले तर त्यावर ३ टक्के जीएसटी द्यावा लागतो व ३ ते ५ टक्के मेकिंग चार्जेसही द्यावे लागतात. म्हणजे प्रत्येकवेळी सोने खरेदी करताना सोन्याच्या भावापेक्षा कमीतकमी ५ टक्के जास्तीचे पैसे द्यावे लागतात, यानुसार एका वर्षी सोने खरेदी करून पुढच्या वर्षी विकले तर वार्षिक १३ टक्के ऐवजी ७ टक्केच निव्वळ नफा होईल. शिवाय ते सोने हरवण्याची, चोरी जाण्याची भीती सतत मनात असते. असे फिजिकल सोने खरेदी करण्यापेक्षा रोखे बाजारातून सरकारी गोल्ड बॉन्ड खरेदी केले तर अधिक लाभ होऊ शकतो, कारण सरकारकडून त्यावर दरवर्षी २.५ टक्के व्याज मिळते. या बॉन्ड बद्दल अधिक माहिती आपण नंतरच्या स्वतंत्र भागात घेणार आहोत.

मित्रांनो, पुढील सर्व भाग amazon वर ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. पुस्तकाचे नाव "शेअर मार्केट बेसिक्स" लेखक: "Mahadeva Academy"

शेअर मार्केट व्यवस्थित शिकायचे असेल तर https://t.me/mahadeva_academy1 या टेलेग्राम चॅनलला जॉइन करा. यासोबतच तुमच्या प्रतिक्रिया कळवा व पुढील संपूर्ण पुस्तक amazon वर नक्की वाचा, धन्यवाद!