मंदिरात दर्शनाला आलेल्या एक दोघाना उसळलेल्या आग्या माशांची भिरी घंव घंव करीत येताना दिसल्यावर लोकानी हातातल्या पिशव्या वगैरे तिथेच टाकून “आग्यो माश्यो उसाळल्यो........ ” अशी बोंबाबोंब करीत गावाच्या दिशेने पळायला सुरुवात केली नी ते बचावले. डुक्कर नेणारे सात केरळी त्याना माशा डसायला लागल्यावर डुक्कर तिथेच टाकून सैरावैरा धावत सुटले. ते गैर माहितगार असल्यामुळे गावच्या दिशेने न जाता चढणीच्या दिशेने पळाले नी दमछाक होवून नेमके माशांच्या हल्ल्यात गावले. या सगळ्या गदारोळात भिकुभाऊनी शांत चित्ताने डोळे मिटून आवर्तनं सुरूच ठेवली. दोन तासानी वारा थांबला नी आग्यामाशा शांत झाल्या. मध्यान्ही नंतर एकादष्णी पुरी झाल्यावर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे भिकु भाऊनी वरण-भात रांधून देवाला नैवेद्य दाखवून शांतपणे जेवण केलं. रांधपाची भांडी चोळून उपडी घातली. मग प्रसादाची नारळाची कवड आणि तीर्थाची वाटी घेवून ते घराकडे गेले. दुसरे दिवशी मंदिराच्या मावळतकडच्या बाजूला खालच्या पडणात वाशाला बांधलेला डुकर आणि वरच्या पडणात दरडीच्या मुळाशी शिकारीला आलेल्या सातही केरळ्यांचे माशांच्या डंखांचे काळे निळे व्रण उठून सुजलेले मुडदे गावले.
धावडशीच्या मळ्यात दांडेकराचं काटंही दशक्रोशीत प्रख्यात आहे. मळ्याच्या दक्षिणेकडे विजयदूर्गच्या समुद्राकडून वर खारेपाटणच्या नदीच्या मुखापर्यंत गेलेल्या खाडीचा एक फाटा घोडेपोयीच्या उगवत अंगाला धावडशीपर्यंत गेलेला आहे. मळ्यात शेती करण्यासाठी चिखलाचा बांध घालून त्याच्या एका अंगाला भरती सुकतीला उघडझाप होणारा दरवाजा बसवून मळ्याचा खाऱ्या पाज्यापर्यंतचा भाग गोडा करून तिथे भातशेती करीत. मळ्याच्या गावदरीकडच्या बाजूला जवळ जवळ पंचवीस एकराचा भाग मळ्याच्या कडे पासून गावदरीकडे उंचावत गेलेला असल्यामुळे अगदी जोरगतीची भरती आली तरी त्या भागात खारे पाणी चढत नाही. त्या भागाला ‘दांडेकराचं काटं’ म्हणतात. धावडशीचे खोत दांडेकर हे जमिन जुमल्याने गब्बर होते. धावडशी अर्धी दांडेकरांची असं लोक म्हणत ते काय उगाच नव्हे. दर्याचं नस्त जवळच्या अंतरात असल्यामुळे पावसाळी संततधार वृष्टि होवून नदीला पूर यायचा त्या वेळी भरतीच्या सम्याला खाडीच्या पाण्याला फुग पडली की पाण्याची पातळी वाढून बांधाच्या माथ्यापर्यंत पाणी चढायचं काही वेळा तर निम्मे बांध पाण्याखाली जायचा नी बांधावरून व्हावटीचं पाणी मळ्यात तुंबायचं. त्यात भरीस भर म्हणजे धावडशीतले तीनही व्हाळ दुथडी भरून वहायचे नी मळ्यात छातीभर पाणी तुंबायचं.
संततधार पाऊस असेल तेंव्हा पाण्याच्या माराने बांधाचा एखादा भाग कोसळला तर भसा भसा पाणी आत यायला लागायचं नी फुटलेलं फाडं अती रुंदावण्या पूर्वी बुजवलं गेलं नाही तर बांधाला मोठा तडव जायचा त्याला ‘ख़ांड पडली ’ असं नी मग पाऊसकाळ सरे पर्यंत मळा बुडायचा. अशावेळी रुपयातले चार पैसे उत्पन्नही हाती लागत नसे. धावडशीतल्या मळे शेतीतली आणखी एक अडचण म्हणजे मळ्यात ढोपरभर पाणी तुंबण्या पूर्वी म्हणजे आषाढ्या पौर्णिमे पूर्वी लावण्या उरकाव्या लागत. त्यासाठी अर्धा वैशाख सरल्यावर शेळ पेरून अवेलीला तरवा/ लावणी योग्य भाताची रोपं तयार ठेवावी लागत. कारण आषाढ्या पौर्णिमे नंतर कायम जोराचा पाऊस सुरू झाल्यावर अगदी दसऱ्यापर्यंत मळ्यात कायम ढोपरभर पाणी तुंबून रहात असे नी अशा परिस्थितीत लावण्या करणं शक्यच होत नसे. भात कापणी म्हणजे भादवा संपायच्या आधीच अगदी गौरीचं मूळ संपल्यावर कधिही कमरभर पाण्यात वावरून फक्त भाताची केसरं कापून आणली जात. गवत कापणी सरत्या आश्विनात केली जायची. जमेची बाजू ही होती की, मिळणारं भाताचं उत्पन्न मात्र इतर गावांच्या तुलनेत सव्वापटीने जादा असायचं.
धावडशी आणि आजुबाजुच्या मेरवी, खाजणतड, तळेकोंड या गावानीही शेतीची अवस्था थोड्याफार फरकाने अशीच होती. देवगड तालुक्यातल्या खाडी काठच्या आणखीही काही गावानी मळे शेती ही अशी बेभरवशी असल्यामुळे ब्रिटिशांच्या काळात त्यावेळच्या कोणी ब्रिटिश अधिकाऱ्याने जातीनिशी वस्तुस्थितीची छाननी करून बांध घालून मळेशेती करीत अशा गावाना शेत सारा पूर्णपणे माफ केलेला होता. त्यामुळे इतर गावातले महाजन लोक सारामाफी केलेल्या गावांवर खार खात. पण त्यावेळी मामलेदार कुणीना कुणी ब्रिटीश अंमलदारच असे. इंग़्लिश अंमलदाराचे कान भरण्या एवढी सलगी स्थानिक माणसं करू धजावत नसत. तसेच क्वचित एखाद्या वजनदार स्थानिकाने तसा प्रयत्न केलाच तरी रुजू असलेला ब्रिटिश अधिकारी मूळ तरतुदीशी संबंधित कागदपत्रांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय आणि जातीनिशी खातरजमा केल्याशिवाय रूढ असलेली तरतूद सहसा बदलू धजावत नसे.
अठराव्या शतकाच्या अखेरीस कुणी कुणी एतद्देशीय व्यक्ती मामलेदार म्हणून यायला लागल्या. देवगडमध्ये असा देशी अंमलदार नोकरीत रुजू झाल्यावर सारामाफीच्या गावांवर जळफळणाऱ्या काही उचापती मंडळीनी त्याचे कान भरून सारामाफी रद्द करायच्या खटपटी सुरू केल्या. हा मुलकी अधिकारी घमेंडखोर आणि अधिकाराचा माज चढलेल्यांपैकी होता. त्याने मागचा पुढचा विचार न करता सारामाफीची सवलत रद्द करून सहा महिन्यात दस्ताची रक्कम भरण्याची नोटिस जारी केली. सारा माफी असलेल्या गावातल्या मंडळीनी पाटणकर वकिलांचा सल्ला घेतल्यावर त्यानी वर्मी तोडगा सांगितला. साऱ्याची रक्कम भरणा केली नाही तर अंमलदार करून करून काय करणार? त्याने संबंधित मिळकतींचा लिलाव करून त्यातून साऱ्याची रक्कम भरणा करून घ्यायची कार्यवाही केली असती. अर्थात ग्रामस्थानी एकजूट करून लिलावावर बहिष्कार टाकला असता तर लिलाव आपसूकच रद्द झाला असता. यापलिकडे अंमलदार फार काही करूच शकत नव्हता.
सारा माफी मिळालेल्या गावांमधल्या लोकानी एकदिलाने राहून लिलावावर बहिष्कार टाकायचा मार्ग पत्करला. धावडशीतल्या दांडेकराच्या काट्यावर केळशीतल्या दादा महाजनाचा डोळा होता. त्याने तालुक्यातल्या बऱ्याच गावांमध्ये सावकारी करून व्याज बट्ट्याने रक्कमा देवून गहाणवटीत मोठ्या मिळकती पैदा करून ठेवलेल्या होत्या. धावडशीतल्या लिलावाच्या दिवशी आतून पूर्ण माहिती काढून रक्कम बांधून तो हजर राहिला. कचेरी उघडली आणि अंमलदारसाहेब आल्यावर लिलावाची कारवाई सुरू झाली. दांडेकर गावातला मोठा मिळकतदार असल्यामुळे सलामीलाच त्याच्या मिळकतीची पुकारणी झाल्यावर दादा महाजनाने बोली केली.चढाओढीला कोणी प्रतिस्पर्धीच नसल्यामुळे दंडासह सारा एवढी रक्कम भरून घेवून सरकारी निर्धारित दराप्रमाणे दांडेकराचं काटं आणि घरभाटासह रहाता चौसोपी वाडा एवढी मिळकत दादा महाजनाच्या पदरात पडली. अंमलदाराने मिळकतीचा कबजा लिलाव घेणाऱ्या दादा महाजनाला देण्याचे समन्स दांडेकराच्या नावाने काढले. समन्स मिळाले नी दांडेकरांच्या घरातील सर्वेसर्वा दत्तूकाका मटकन् खाली बसले. आग्या मधमाशांचे मोहोळ फुटावे तद्वत गावभर वार्ता फुटल्यावर लोक वाड्यावर जमले. परक्या गावचा दादा महाजन भले केवढाही मोठा तालेवार असला तरी सगळा गाव त्याला विरोध करील अशी भाषा गाववाले करायला लागले. (क्रमश:)