Jagrut Devsthan - 4 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | जागृत देवस्थानं - भाग 4

Featured Books
Categories
Share

जागृत देवस्थानं - भाग 4

पूर्ण विचार करता  कोर्टाचा बेलिफ़ नी  पोलिस पार्टी  आल्यावर  मिळकतीचा ताबा सोडावाच लागणार हे अटळ भवितव्य ध्यानी घेता  चारही  दांडेकर बंधूनी  सूज्ञ  विचार करून  रोकड आणि  सोने चांदी  असा महत्वाचा ऐवज  गुठाळून  दोन भाऊ  बायका माणसे नी  मुले याना घेवून  तत्काळ  पळसंब्यात  मामाकडे रवाना झाले. लिलावाला  अजून  चार दिवस अवधी होता. राहिलेल्या  दोन भावानी  गुरे ढोरे गावातल्या  कुळाना  वाटून टाकली. मोठी हांडी भांडी होती  ती   गावदेवीला   दान म्हणून देवून टाकली  आणि दुसरा  दिवस उजाडता उजाडता  वाड्यासमोर  उभे राहून  वास्तू देव आणि  ग्रामदेवी  काळकाई  यांची प्रार्थना करून  याचा फैसला तुम्ही करा. आम्ही  या मिळक्तीवर तुळशी पत्र ठेवून पाय नेतील तिथे परागंदा होवू. जिथे कुठे आम्ही  रहिवास करू तिथे  तुम्ही आमच्या पाठीशी राहून आम्हाला बरकत द्या. ज्या कोणामुळे आम्ही दरवेशी  बनून बाहेर पडलो त्याला ही मिळकत सुखाने पचायला देवू नको असे सांग़णे  करून बोंब मारली नी  दोघेही मागे  वळूनही न पाहता  निघून गेले.  रात्रभर विचार विनीमय करून गावातले  जाणते लोक समाचाराला आले तेंव्हा  दांडेकर बंधू घरादारवर तुळशीपत्र ठेवून बोंब मारून गाव सोडून गेल्याची  वार्ता घरगड्याने दिली. 

                    गावकरी ग्रामदेवी  काळकाई  मातेच्या  मंदिरात जमले.  गावातल्या बारा पाचानी  देवीला  जाब घातला. म्हाजनाने  मिळकतीचा  कबजा  घेतलाच  तरी  गावातल्या  एकाही  माणसाने  त्याला  सहकार्य करायचे नाही, त्याच्याकडे कामाधंद्याला  जाणे सोडाच त्याच्याशी  बोल भाषणही करायचे  नाही. अशी  शपथ सगळ्यानी  घेतली.  दादा महाजन  मिळकतीचा ताबा घ्यायला आला  तेंव्हा  पोलिस पाटील आणि चार ग्रामस्थ पंच म्हणून सरकारी  आज्ञा पाळण्यापुरतेच  उपस्थित होते. कबजेदार कोणीच उपस्थित नसल्यामुळे  घटकाभरातच सगळे कायदेशीर सोपस्कार उरकून लिलावातल्या मिळकतीचा  दादा  महाजनाला ताबा देवून  बेलिफ आणि पोलिस निघून गेले.  गावातले पंच नी पोलिस पाटील यांच्याशी  दादा बोलायला  गेल्यावर, “ सरकारी आज्ञा पाळायची  म्हणून आम्ही इथे आहोत. इत:पर गावतला एकही  माणूस तुला मदत करणे दूरच तुझ्याशी  भाषणही करणार नाही.  तू कोणा गाववाल्याशी बोलायचा प्रयत्न केलास तरी तो तुझ्या तोंडावर थुंकून बाजूला जाईल....” असे  पोलिसपाटलाने ठणकावून सांगितले आणि  पंच निघून गेले. दादा महाजन नी त्याच्या सोबत आलेली  सताठ  मंडळी  दिंडी दरवाजा उघडून वाड्यात शिरली. माणसं वाडाभर फिरली. हे  प्रकरण थंडावल्यावर  आपोआप गाववाले  ताळ्यावर येतील  असा  बरोबरच्या माणसानी  त्याला धीर दिला. 

                     चार दिवसानी  थोरला मुलगा हरी , साताठ गडी  आणि  रांधपी  घेवून  दादा महाजन  वाड्यात रहायला आला.  ते वाटेने येत असता  त्याना बघितल्यावर  माणसे  तोंड फिरवून  बाजुला  जायची. वाड्यात आल्यावर  महाजनाच्या मुलाने आंघोळ करून सोवळे नेसले  आणि  आगरात फिरून फुले काढून ताजी पाण्याचे कळशी घेवून तो देवघरात शिरला. शिसवी  देव्हाऱ्यात  गंगाजलाचा  लोटा, उजव्या  सोंडेचा चांदिचा  गणपती  मुठी एवढा  गोल शाळिग्राम, विष्णू  लक्ष्मी , बाळकृष्ण, अन्नपूर्णा, उभा मारुती  पांढरा नर शंख, घंटा, कोंबडीच्या अंड्याएवढा स्फटिक, पितळी  गरुडाच्या  पाठीशी स्तंभावर उघडमीट करायच्या  कमळात  पितळी  आसनावर ठेवलेला ब्रह्मदेव  असे देव होते. देव्हाऱ्याच्या बाजुला  जाडजूड भले भक्कम चांदीचे ताम्हन, चांदीचा गडवा, पळी पंचपात्री, नैवेद्याची वाटी नी  दुधासाठीचे छोटे  फुलपात्र  आणि  दोन तांब्याची  ताम्हने होती. दीड वीत  घेराची  मुटकाभर  जाड  सहाण नी त्यावर मनगटा एवढे चंदनाचे खोड, दोन पितळी  आणि दोन  चांदीची निरांजने  , लामण दिवा . हळद पिंजरीच्या  दोन कुयऱ्या आणि  दोन हात उंच चांदीची  समई असा  ऐवज होता. हरीने समई लावून गंध उगाळले. देव ताम्हनात ठेकून  स्वच्छ धुतले. देव वस्त्राने पुसून देव्हाऱ्यात मांडीत असता  ते पूर्वी  कोणत्या क्रमाने ठेवले होते ? हे त्याला आठवेना . त्याने बापाला हाक मारली  असता तो बाहेर गेल्याचे गड्याने सांगितले. तेंव्हा आपल्याला सुचेल त्या क्रमाने  देव मांडून तो चंदन लावायला  लागला  त्यावेळी  वरून काहीतरी जडशीळ  पण नरम वस्तू  त्याच्या मस्तकावर पडली. त्याने दचकून  उजव्या हाताने झटकल्यावर हाततली गंधाची थाटली   बाजुला पडली   देव धुतलेल्या  ताम्हनातल्या पाण्यात पांढरी  टचटचीत माजलेली  पाल पडली . ती पुष्ट पोसलेली   पाळ बघून त्याची  भीतीने गाळण  उडाली.   त्याने  देव्हाऱ्याजवळची  पळी  उचलून ती  ताम्हनावर वाजवून पालीला  हुसकायचा  प्रयत्न केल्यावर अंग मारून राहिलेली पाल चाळवायलाच तयार होईना. त्याने  जरा धीर   पालीच्या  पाठीवर हलका फटका मारल्यावर शेपूट  तुटल्या अवस्थेतली भुंडी पाल सरसरत देव्हाऱ्याखाली   नाहिशी झाली.   गर्भगळीत झालेल्या हरीने  परडीतली फुले  जमतील तशी देवांवर विस्करून अगरबती लावायची विसरून, नैवेद्य न दाखवताच तो उठला. 

                   ताम्हनातले  पाणी   पाठीमागच्या अंगणात लांबूनच  उडवून  देव्हाऱ्या समोरचा  पसारा  आवरून  सोवळे  सोडून  धोतर गुठाळीत तो बाहेर येवून झोपाळ्यावर टेकला . त्याने निग्रहपूर्वक विसरायचा प्रयत्न करूनही  ताम्हनात चिपकून राहिलेली ती  घाणेरडी  पाल नी  पळी मारल्यावर तुटून वळवणारे तिचे शेपूट त्याच्या नजरे समोरून काही केल्या  जाईना. तो सैरभैर होवून अंगणात फेऱ्या मारीत राहिला. मुळात  खोतांचा वाडा  थोडा एकवशी  होता. नी  लिलावाच्या  प्रकरणामुळे  गावाने  त्या वाड्यावर  ठरवून बहिष्कार  टाकल्यामुळे  लोक  मळ्यात जाताना  वाड्यासमोरून न जाता  लांबच्या वाटेने  जायला लागलेले असल्यामुळे नजरेच्या टप्प्यातही  कोणी  माणूस नजरेला पडत नव्हते. तेवढ्यात  दुकानावर सामान आणायला  गेलेला  वासू  बाईत  रडव्या चेहेऱ्याने  परत आला. एकतर कोणीही माणूस त्याला दुकानाची वाट दाखवायला  तयार होईना. अंदाजा अंदाजाने  घटकाभर  भोवडून  दुकान दिसले पण  दुकानदाराने  सामान द्यायला नकार देला. मात्र त्या भल्या गृहस्थाने त्याला  बजावले की , दादा म्हजनाचा  गडी म्हणून मी तुला   सामान देवू शकणार नाही. गावातला कोणी  माणूस तुझ्याशी  भाषणही  करणार नाही. कोसभर अंतरावर बाजुच्या गावात  दुकान आहे तिथे  जा. 

                           सदरा घावून सामान आणायला हरी वासुच्या सोबत निघाला.  वाटेने जाताना  हरीने  एकादोघांशी  बोलायचा प्रयत्न केला. पण एव्हाना  दादा महाजन  गडी माणसे घेवून दांडेकरांच्या  वाड्यात  रहायला आल्याची बातमी गावभर झालेली असल्यामुळे  जो तो तोंड फिरवून ठुंके नी निघून जाई. बऱ्याच वेळाने  परगावचे दोन इसम येताना दिसल्यावर त्यानी  पृच्छा करताच  त्या माणसानी  दुकानाकडे जायच्या  खाणाखुणा  सांगितल्या. दुकान  गाठून सामान घेवून  वाड्यावर जाईतो  मध्यान्ह  होत आली . वाड्यापासून हाकेच्या अंतरावर पोचल्यावर  दादा महाजनाच्या  शिव्यांचा  पट्टा कानावर आला. ते ओसरीवर गेल्यावर  गडी सांगायला लागले.  (क्रमश:)