कधीकाळी प्रेमात वेडावलेला राजवीर, आणि त्याला अर्ध्यावर सोडून गेलेली सरिता. ती आता नवऱ्यासोबत फिरायला आली होती, आणि पुन्हा एका अशा वळणावर भेटली…
जिथं आयुष्य आणि मृत्यूच्या सीमारेषा मिटलेल्या होत्या.
आतंकवाद्यांनी सर्वांना पकडलं.
ती असहाय… तो मात्र गुप्त मिशनवर.
एक फौजी, कैदी म्हणून पाठवलेला!
कोणालाही न सांगता, न आवाज करता,
तो एक एक करत सर्वांना वाचवण्याचा प्लान रचतो.
आणि शेवटी, जेव्हा त्याची ओळख उघड होते.
सर्वांनाच समजतं,
"तो प्रियकर नव्हता… तो फक्त देशासाठी झुंजणारा एक खरा योद्धा होता.
◆ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. यातील घटना, पात्रं आणि स्थळं केवळ मनोरंजनासाठी रचलेली असून, कोणत्याही प्रत्यक्ष व्यक्ती वा संस्थेशी यांचा संबंध नाही.
◆🙏 वाचकांनो, तुमचा प्रतिसाद अनमोल आहे!
ही कथा आवडल्यास, कृपया तुमचे विचार, प्रतिक्रिया आणि रेटिंग नक्की कळवा.
लवकरच पुढचे भाग येतील. आणखी थरारक, गूढ, आणि भावस्पर्शी.
✍️ लेखक – अक्षय वरक
___________________________________
“© 2025 Akshay Varak – All rights reserved”
हिमालयाच्या कुशीत विसावलेलं जम्मू. निसर्गाचं सौंदर्य जणू श्वास घेणाऱ्या पर्वतांच्या कुशीत वसलेलं होतं. सप्टेंबर महिन्याची थंडी आता हळूहळू खोलवर भिनू लागली होती. आभाळ निरभ्र होतं, तरीही हवेत एक गारवा दाटून होता. हवेतला तो सुस्कारा, पानांची सळसळ आणि कुठंतरी लांबून ऐकू येणाऱ्या पक्ष्यांच्या कुजनात काहीसं रहस्य दडलं होतं.
या निसर्गरम्य शांततेला हलकेच खोडकरपणे तोडणारा एक ग्रुप तिथं पोहोचला होता. १० जणांचा एकत्र आलेला तरुणांचा समूह. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, पाठीवर सॅक, हातात कॅमेरे आणि मनात केवळ मस्तीची लहर. ट्रेकिंग आणि अॅडव्हेंचर ट्रीपसाठी ते जम्मूच्या पर्वतरांगांमध्ये दाखल झाले होते.
जसं-जसं ते उंच उंच चढत गेले, तसंतसं निसर्ग अधिकच निखळ होऊन त्यांच्यासमोर उलगडत गेला. काही जण जोरजोरात बोलत होते, काही मोबाईलमधून फोटो काढण्यात व्यस्त, तर काही निवांत नजरेनं तो परिसर मनात साठवत होते. त्या सगळ्यांमध्ये सरिता आणि तिचा नवरा समीर हे नव्यानेच लग्न झालेलं जोडपंही होते. चेहऱ्यावर ताजेपणा आणि वागण्यात एक नवलाई होती.
पण त्या मस्तीत कुणालाच जाणवलेलं नव्हतं.
ते ज्या वाटेवर होते, ती वाट फक्त जंगलातली नव्हती... ती नियतीने आखलेली होती.
पर्वतरांगांत भटकंतीला निघालेल्या त्या समूहात प्रत्येकजण वेगळा होता, आणि तरीही एका अदृश्य धाग्याने सगळे एकमेकांशी जोडले गेले होते. या सहलीचं केवळ निमित्त होतं "ऍडव्हेंचर", पण नात्यांच्या गुंतवणुकीचा एक फार मोठा अध्याय त्यांच्या नकळत उलगडत होता.
सरिता
ती आदित्यची पत्नी होती. चेहऱ्यावर शांततेचा पडदा असला, तरी डोळ्यांत काहीसं हरवलेपण होतं. सरिता म्हणजे कविता होती... कुणाच्या तरी आयुष्यातली. जिचं नाव घेतलं गेलं नाही, पण आठवण मात्र अजूनही कुणाच्या काळजात धडधडत होती. ती हसत होती, बोलत होती, पण हसण्यात काहीतरी उरलेलं, न बोललेलं होतं. तिच्या अंतर्मनात अजूनही काही न मिटलेले प्रश्न झुलत होते.
आदित्य
शहरातला, यशस्वी IT इंजिनिअर. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, व्यवस्थित केसांचा स्टाईलिश कट, आणि ब्रँडेड गॉगल लावलेला चेहरा. तो थोडा अहंकारी वाटावा असा, पण मनाने तितकासा वाईट नव्हता. सरितावर त्याचं प्रेम होतं, पण ते प्रेमही थोडं 'बॉसिंग' वाटावं असं. त्याचं बोलणं. सरळ, काहीसा काटेकोर, आणि कधी कधी सरिताला गोंधळवणारं होत.
श्रुती
सरिताची छोटी बहीण. उत्साही, बोलकी, आणि कायम सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी. गालावर खळी असलेली, आणि हसण्यावर मरमूडलेली. ती या ट्रिपला केवळ मजेसाठी आली होती, पण तिच्या हसण्यामागेही एक वेगळं भान होतं – जणू काहीतरी नवीन जाणवण्याची आतुरता.
पूजा, रोहित, सचिन, वैशाली, अमेय, प्रतीक, मानसी
हे कॉलेजचे जुने मित्र. काहीजण फार वर्षांनी भेटले होते, काही नुकतेच ओळखीचे झाले होते.
सगळ्यांच्या हसण्यात, गप्पांमध्ये आणि पाठीवर झुलणाऱ्या सॅकमध्ये काही ना काही आठवणी भरलेल्या होत्या. कॅमेऱ्यातून फोटो टिपले जात होते, गाणी गुणगुणली जात होती, आणि वाटचाल सुरू होती…
पण कुणालाच कल्पना नव्हती की या वाटचालीत त्यांचं भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांचा एक अदृश्य संगम घडणार होता.
कोणी यावर हसणार होतं… कोणी थरथरणार, तर कोणी आपलं खऱ्याखुऱ्या ओळखीचं मुखवटा टाकून पुढं जाणार होतं.
पर्वताच्या कुशीत वाऱ्याची गार झुळूक घोंघावत होती. उन्हं फार तीव्र नव्हती, आणि आकाशाच्या निळ्याभोर कॅनव्हासवर ढगांचे हलके ब्रश स्ट्रोक्स फिरत होते. एकामागून एक वळणं घेत, ट्रेकिंग ग्रुप उंचीच्या दिशेने मार्गक्रमण करत होता.
ते सगळे हसत होते. हात हवेत उंचावले, सेल्फींसाठी अँगल शोधत, गाणी गुणगुणत. काहीजण गडगडून हसत होते, काहींनी डोंगरकड्यांवर आरडाओरड करत 'प्रतिध्वनी' पकडण्याचा खेळ सुरू केला होता. श्रुती आणि वैशालीने एकमेकींचा हात धरून ‘झिंगाट’ गात नाचायला सुरुवात केली, तर अमेय आणि प्रतीकने त्यांचा व्हिडीओ काढायला फोन पुढे केला.
सरिताही हसत होती.
तिच्या चेहऱ्यावर एक सौम्य, छानसं हसू उमटलं होतं. बाहेरून पाहिलं तर ती त्या क्षणाचा आनंद घेत होती. ओठ हलत होते, डोळे अधूनमधून प्रकाशात चमकत होते. पण... ते डोळे खोल पाहिल्यास, तिथं एक पुसट थर होता. आठवणींचा, किंवा कदाचित विसरण्याच्या प्रयत्नांचा.
जणू काही त्या निळसर ढगांपलीकडे तिच्या मनाच्या आभाळात काहीसं धूसर होत चाललेलं होतं…
तिच्या मनात एखादं मागं राहिलेलं गाणं वाजत होतं.
"तुला विसरणं हेच जास्त आठवण्यासारखं आहे..."
कुठेतरी खोल आत, त्या आवाजांमधून, हसण्यातून, गोंधळातून, एक चेहरा पुन्हा पुन्हा तिच्या मनाच्या भिंतीवर उमटत होता.
राजवीर.
किती वर्षं झाली? तीच आठवत नव्हती. पण आठवण फक्त तारखा आणि ठिकाणांनी ठरत नाही. काही भावनांच्या मागं काळ हरवून जातो. आणि इथे, या गार वाऱ्यात, त्याच्या हसण्याची जाणीव तिच्या आजूबाजूला पसरू लागली होती.
“हसणं हे प्रेम विसरण्यासाठी फार छान मुखवटा असतं...”
– ती मनाशी म्हणाली.
क्षणभर तिचा हात जमिनीवर टेकला. डोंगरकड्यावर बसून पाण्याची बाटली उघडत असताना तिची नजर क्षणभर हरवली. आदित्य तिच्या मागे आला, त्याने तिच्या खांद्यावर हलकासा हात ठेवला.
"थकलेस का?" – त्याने विचारलं.
ती पटकन हसली. नेहमीसारखं.
"नाही रे… एकदम फ्रेश वाटतंय," – तिने उत्तर दिलं.
आणि परत ओठांवर हसू लावलं.
पण त्या हसण्याच्या आतून एक शून्य सरकत होतं. एक अंश, जो फक्त तिला दिसत होता. ज्याचं नाव तिने कधीही पुन्हा घेतलं नव्हतं… पण त्या नावाच्या आठवणी अजून तिला विसरू देत नव्हत्या.
ती पुन्हा ग्रुपमध्ये मिसळली. त्यांचं हसणं, फोटो काढणं, आणि सहलीचा हलकासा गोंधळ. या सगळ्यात तिनं पुन्हा एकदा स्वतःचा आवाज हरवून दिला.
पण कुठेतरी, त्या पर्वताच्या कुशीत, राजवीरचं नाव वाऱ्यावरून कुणाला ऐकू न येईल अशा स्वरात तिच्या मनात कुजबुजत होतं…
दुपारी सुमारे. साधारण साडेतीन वाजले होते. जमीन ओलसर, वाऱ्याने झाडांच्या फांद्या मंद हलत होत्या. जंगल अगदीच विरळ होतं. थोडंसं पुढे गेल्यावर उजवीकडं झुडपांमागे एक छोटं चढावासारखं उताराचं स्थान होतं, जिथं एक-दोन लाकडी बाकं आणि अर्धवट कोसळलेलं शेड दिसत होतं. हे ठिकाण "रेस्ट पॉइंट" म्हणून गाईडने सांगितलेलं होतं. जेथून थोडी विश्रांती घेत पुढचा ट्रेकिंग मार्ग सुरू होतो.
सर्वजण मोकळ्या हवेत, दम खात होते.
कुणी पाणी पीत होतं, कुणी सेल्फी घेत होता, सरिता आणि श्रुती थोडं दूरवर गप्पा मारत होत्या. आदित्य आणि रोहित एका दगडावर बसून नकळत मोबाईल नेटवर्क तपासत होते.
तेवढ्यात…
"ठाठ्! ठाठ्!"
दोन गोळ्यांचे आवाज झाले.
धाडकन् काही तरी झाडांमधून ओरबाडल्यागत आवाज झाला.
सर्वजण जागच्याजागी स्तब्ध झाले.
कोणी काही समजून घेण्याआधीच, समोरच्या झुडपांतून आणि उतारावरून चार-पाच जण बाहेर आले. चेहऱ्यावर काळी कापडं, शरीरावर धूळ भरलेले जॅकेट्स, आणि हातात.
AK-47.
"चलो हमारे साथ... आवाज़ नहीं निकालना... वरना गोली खा जाओगे!"
एका मोठ्या माणसाने ओरडत सांगितलं.
सगळ्यांचं अंग थरथरायला लागलं. आवाज क्षणात दाटला. श्रुती किंचाळायला लागणार होती, पण वैशालीने तिचा हात घट्ट पकडला. पूजा मागे सरकू लागली, तेवढ्यात दुसऱ्या अज्ञात व्यक्तीने झाडाच्या बुंध्यावर गोळी झाडली.
"ठाठ्!"
शब्द नाही, फक्त एक भयप्रद सन्नाटा. झाडाच्या सालांवर गरम धूर निघत होता.
"मूव्ह करो... जलदी...!" – त्या दहशतवाद्यांनी सर्वांवर शस्त्र रोखले.
सर्वांचं सामान, फोन, कॅमेरे. जिथे होते तिथे टाकून द्यावं लागलं. हात वर करत सर्वजण एका ओळीत उभे राहिले. डोळ्यांत घाम, हृदय धडधडत होतं, आणि नशिब काय वळण घेणार हे कोणालाही माहीत नव्हतं.
आदित्यचा चेहरा काळवंडला होता.
सरिता भीतीने आदित्यच्या जवळ जाऊ पाहत होती, पण दोन बंदुकीधारी मध्ये आले.
"चलो… पथ से नीचे उतरो!"
एका पायवाटेने सगळ्यांना जंगलाच्या अजून खोल भागाकडे नेलं जात होतं.
प्रत्येक टाकलेलं पाऊल, धडधडत्या छातीसारखं वाटत होतं.
संध्याकाळची सावली झाडांखालून वाढत होती...
आणि त्या सावल्यांमध्ये या सहलीचा आनंद. एका दुःस्वप्नात बदलत चालला होता.
रात्र झाली होती. चांदणं नव्हतं, फक्त सर्वत्र काळोख पसरला होता. दहशतवाद्यांनी प्रत्येकाच्या डोळ्यांवर काळी, घट्ट पट्टी बांधली होती. हात बांधले नव्हते, पण डोळे उघडे नसल्याने कोणताही प्रतिकार अशक्य होता. एकामागोमाग एक सर्वजण एका जुनाट, उंच वाहनात ढकलले गेले. गाडीच्या आत धक्के बसत होते. धावतानाचा खडखडाट, अचानक वळणं, आणि मध्येच एखाद्याच्या तोंडून निघणारा घाबरलेला आवाज. हे सगळं काळजाचा ठोका चुकवत होतं.
"श्रुती... तू आहेस का...?"
सरिताचा आवाज थरथरत होता.
श्रुती काहीच बोलत नव्हती, पण कुठेतरी तिची रडण्याची किंचित सळसळ जाणवत होती.
गाडी ताशी ७०-८० च्या वेगाने भरकटत होती. डोंगर उतरत, रस्ते बदलत, आणि किती वेळ झाला हे कोणालाच समजत नव्हतं. काही वेळा झोप लागली पण तीही तणावाखाली. झोपेत धसक्याने जागं होणारी.
कधी गाडी थांबत होती, कधी भरधाव जात होती. रात्रभर…
आणि शेवटी, कोणत्यातरी सकाळी – थंड, गार वातावरणात, गाडी थांबली.
पट्ट्या काढण्यात आल्या.
प्रकाश न्हाल्याने डोळे क्षणभर झाकले गेले. पण तो प्रकाश नैसर्गिक नव्हता.
हा एक उदास, मिणमिणता बल्ब होता, जो एका लोखंडी अडकवलेल्या छपरावरून खाली लटकत होता.
सर्वजण एका बंदिस्त, ओलसर खोलीत होते.
छत कमी उंचीचं, भिंती काळसर, भिंतीवर जळलेल्या मेणबत्त्यांचे डाग. एका कोपऱ्यात एक पाण्याचा डबा, दुसऱ्या कोपऱ्यात अर्धवट मोडलेली पाईपची संडास व्यवस्था. जमिनीवर माती, धूळ, आणि काही ओलसर चिखलाचे डाग.
काही क्षण सर्वजण एकमेकांकडे फक्त पाहत राहिले.
शब्द नव्हते. फक्त श्वास आणि डोळ्यांत भरलेला धक्का होता.
“हे… हे पाकिस्तान आहे का?” – रोहितच्या ओठांवरून शब्द निघाले.
कोणी काही उत्तर दिलं नाही.
फक्त वैशालीने गोंधळून एक कटाक्ष खिडकीसदृश जाळीकडे टाकला. जिथून एक कोल्ह्याची किंचाळी ऐकू आली.
त्यांच्या समोर एक छोटा लोखंडी दरवाजा होता. बंद. दरवाज्याच्या बाहेर कुणीतरी सावध हालचाल करत होतं. जड बूट जमिनीवर आपटत होते. कोणीतरी स्मोकिंग करत होतं. वास आत येत होता.
सरिता आणि आदित्य एकमेकांशी काहीच न बोलता फक्त शेजारी बसले.
श्रुती एका कोपऱ्यात शून्यात बघत होती, तिच्या चेहऱ्यावर एक थरथर स्पष्ट होती.
पूजाचा हात थोडा थरथरत होता.
सचिन जळजळीत नजरेने दरवाज्याकडे बघत होता, पण त्याच्याही डोळ्यांत असहायतेचा मळवट स्पष्ट होता.
सगळं विसरायला लावणारा क्षण होता हा.
पर्वतांमधील ट्रेकिंग, सेल्फी, हसणं – सगळं एका रात्रीत गडप झालं होतं.
या अंधाऱ्या कोठडीत फक्त एक गोष्ट जिवंत होती. ती फक्त भीती.
दिल्ली – लष्करी मुख्यालय.
नॅशनल सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर (NSOC), सकाळी ८:५५ ला, मुख्यालयाच्या भिंतीवर एक तीव्र लाल दिवा सतत झगमगत होता. त्यासोबतच एक गंभीर आणि खोल टोनमधला अलार्म अखंड वाजत होता.
हा अलार्म सामान्य घटनांसाठी नव्हता.
हे 'कोड गोल्ड' होतं. फक्त अत्यंत संवेदनशील राष्ट्रीय सुरक्षेच्या संकटासाठी.
NSOC च्या उच्चभ्रू कॉन्फरन्स रूममध्ये देशाच्या सर्वोच्च सुरक्षा यंत्रणांचा कौरवपांडव सभा उभी होती.
गृहमंत्री भानुप्रताप राठी, लष्करी प्रमुख जनरल अरोरा, राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका प्रेरणा शेखावत, तसेच RAW, IB आणि NIA चे वरिष्ठ अधिकारी होते.
सर्वांच्या चेहऱ्यावर गंभीरतेचा आणि तातडीचा स्फोट झाल्यासारखा भाव होता.
एक प्रोजेक्शन स्क्रीनवर जम्मूच्या डोंगराळ भागातील सॅटेलाईट फीड दिसत होतं.
त्यात एक ट्रेकिंग ग्रुप अचानकपणे गायब झाल्याचं स्पष्ट दिसत होतं.
कॉम्बॅट सॅटेलाईट्सच्या इमेजरीतून ते अपहरणाचं दृश्यमान सिद्ध झालं होतं. आणि... त्याच्या पार्श्वभूमीला काही धूसर आकृती AK-47 घेऊन दिसत होत्या.
गृहमंत्री राठी यांनी टेबलावरचा कागद खाली ठेवत, ठाम आणि थेट आवाजात म्हटलं –
“हे केवळ अपहरण नाही.
हे भारताच्या सार्वभौमत्वाला दिलेलं थेट आव्हान आहे.
शत्रू आमच्या तरुणांना केवळ पळवून नेतोय असं नाही. तो आपली प्रतिक्रिया तपासत आहे.
आणि आपल्याला ही परीक्षा पास व्हावी लागणार आहे... कोणतीही चूक न करता.”
त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हंटले –
"आपल्याकडे फक्त एक उपाय आहे... 'ऑपरेशन गुप्तम'."
“पाच जण – अत्यंत प्रशिक्षित, निष्णात कमांडो –जे जंगल, बर्फ, दहशत आणि मरण यांच्यातही अचूक कामगिरी करतात.
त्यांच्यापैकी एक नाव – एक ज्याचं साहस युद्धकथा बनलंय...
राजवीर सिंग राठोड.”
सगळं सभागृह काही क्षण स्तब्ध झालं.
राजवीर – एक काळचा धाडसी पण आता हरवलेला योद्धा – जो युद्धातून बाहेर पडला होता, पण अजूनही प्रत्येकाच्या मनात जिवंत होता.
आता त्याचं नाव पुन्हा ऐकताना, प्रत्येक अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर आशा आणि काळजी एकत्र चमकली.
गृहमंत्री खुर्चीत मागे झुकले,
“त्याला परत बोलवायची वेळ आली आहे...”
“हे केवळ मिशन नाही, ही देशाची प्रतिष्ठा आहे.”
धुक्याच्या पडद्यामधून उगवती सकाळ डोंगरदऱ्यांवर हलकेच उतरली होती. मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेला एक तरुण, गालावर ओल्या वाऱ्याच्या स्पर्शानेही ढळत नव्हता. त्याच्या भोवतालच्या वातावरणात एक अनामिक शांती होती. ती शांती केवळ शरीराची नव्हे, तर अंतर्मनाची होती.
तो तरुण होता – राजवीर सिंग राठोड.
एकेकाळी भारतीय लष्कराच्या गुप्त पथकात अग्रस्थानी असलेला, अनेक मोहिमा गुपचूप पार पाडलेला एक प्रखर कमांडो. सध्या मात्र, तो गावात परतला होता. सुट्टीवर. गावकऱ्यांसाठी तो फक्त "राजा" होता. साधा, नम्र, आणि देवभोळा. पण देशाच्या संरक्षण खात्याच्या नजरेत तो एक हत्यार होता. शांत, पण प्रभावी.
त्या शांततेतच मंदिराच्या बाहेर एक आर्मीची जीप थांबली. धुळीच्या वर्तुळात एक अधिकृत अधिकारी खाली उतरला. चेहऱ्यावर तातडी आणि हातात काळी फाईल होती. त्याने मंदिराच्या ओसरीवर पाऊल टाकलं आणि आवाज दिला –
“राजवीर!”
राजवीरने डोळे उघडले. चेहऱ्यावर प्रश्न नव्हता, फक्त समज आणि संयम दिसत होता.
अधिकाऱ्याने त्याच्यासमोर ती फाईल उघडली. आतमध्ये काही छायाचित्रं होती.
जम्मूच्या डोंगरात हरवलेले, दहशतवाद्यांकडून अपहरण झालेल्या सामान्य नागरिकांचे.
काहीजण कॉलेज तरुण, काही स्त्रिया – निःशस्त्र, निरपराध.
“हे फक्त अपहरण नाही, राजवीर. हे आपल्या देशाला दिलेलं थेट आव्हान आहे.
आम्हाला ‘ऑपरेशन गुप्तम’ पुन्हा सुरू करायचं आहे. आणि त्याच्या नेतृत्वासाठी तुझ्याशिवाय दुसरं नाव नाही.”
त्या एका क्षणात मंदिरातील शांततेत एक अनाहूत गर्जा उमटली होती.
राजवीर उठला. पायात बूट चढवले. शंकराच्या पिंडीपुढे एक क्षण डोळे मिटून नतमस्तक झाला.
“मी सुट्टीवर होतो, हो.
पण जेव्हा देश माझ्या दारात येतो. तेव्हा सुट्टी संपते.
हे अपहरण नाही, ही जबाबदारी आहे. आणि ती मी स्वीकारतो.”
त्या दिवशी, गावातून एक माणूस पुन्हा लढाईसाठी निघाला.
आपल्या जुन्या ओळखीला पुन्हा स्वीकारत. एक शांत सैनिक पुन्हा रणात उतरत होता.
"ऑपरेशन गुप्तम" सुरू झालं होतं. राजवीर सिंग राठोड. आणि त्याच्यासोबत चार सर्वोच्च प्रशिक्षित कमांडो. मिशनसाठी निघाले होते. पण या मोहिमेचा खरा गाभा गुप्त होता. एक अशी योजना जी केवळ गृहमंत्री, गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि राजवीर यांनाच माहीत होती.
एका बंद खोलीत अंतिम सूचना देताना अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं:
“राजवीर... तू कैदी म्हणून आत जाणार.
हे अपहरण केलेले लोक एका दहशतवादी गटाच्या ताब्यात आहेत. ते तुला ओळखणार नाहीत.
तू त्यांच्यातच एक बनून आत प्रवेश करायचा आहे. एकदा आत गेलास, तर तूच त्यांचं एकमात्र आशास्थान असशील...”
राजवीरने शांतपणे मान हलवली.
“हो. आणि... मी कोण आहे हे शेवटीच समजेल... जेव्हा वेळ येईल.”
त्या रात्री, उत्तर काश्मीरच्या एका अज्ञात भागातील तंबूस राखाडी तुरुंगात...
ते सर्वजण भुयारी कोठडीत शांत बसले होते.
जागा घाणेरडी होती, भिंतींतून ओलसरपणा झिरपत होता, आणि कोपऱ्यात उंदीर खसफसत होते. त्या कैद्यांच्या चेहऱ्यावर दडपण, थकवा आणि हतबलतेचं सावट होतं.
आणि तेव्हाच...
लोखंडी दरवाज्यातून एक आवाज घुमला – “धक्के मारो!”
दोन दहशतवाद्यांनी एका नव्या कैद्याला आत ढकललं.
तो जमिनीवर कोसळला. धूळ उडाली.
कोणीही काही बोललं नाही.
त्या नव्या कैद्याचा चेहरा मळलेला होता. गालावर खरचटलेली जखम, कपडे फाटलेले. पण डोळे... त्या डोळ्यांत काही तरी अस्वस्थ निखारा होता – स्थिर, जागृत, सजग.
त्याने मान वर केली... आणि क्षणभर खोलीत शांतता पसरली.
सरिताचं लक्ष त्याच्यावर गेलं.
ती काही क्षण नुसती त्याच्याकडे पाहत राहिली.
हळूहळू तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. डोळ्यांत एक ओळखीची झलक चमकली.
“हा... हा... राजवीर?” – तिच्या मनात क्षणभर शंका चमकली.
ती हलकेच पुढे सरकली, पण तो न बोलता उठला.
डोळे तिच्याकडे थांबले एक क्षण. न पाहिल्यासारखे, पण थेट नजर भिडवले.
आणि मग... त्याने नजर वळवली.
त्या एका क्षणात खूप काही घडलं.
पण कोणालाच त्याचा अर्थ समजला नाही.
केवळ एक व्यक्ती.राजवीर सिंग राठोड. आता शत्रूच्या गडात होता...
आपल्या लोकांमध्ये, पण परक्यासारखा.
कारण त्याचं खरं रूप उघड होणं बाकी होतं. योग्य वेळेची वाट पाहत...
◆ पुढील भागात : कैदगृहात पहाटेचा काळोख,दहशतवाद्यांचा नवा छळ आणि गुप्त हालचाली पाहणार आहोत. पुढील भागाची उत्सुकता असेल तर कृपया follow करा.
◆ 💥 कथा अजून रंगत जाणार आहे... पण तुमचं लक्ष, प्रतिक्रिया आणि प्रेमच आम्हाला पुढे जायला बळ देतं!
🖤 हा भाग तुम्हाला थरारक, भावनात्मक आणि उत्कंठावर्धक वाटला असेल, तर तुमचा एक छोटासा प्रतिसादही माझ्यासाठी खूप मोठा आहे.
✍️ कमेंट करा, शेअर करा – आणि सांगा... 'राजवीर'च्या या गुप्त मिशनचं पुढचं पाऊल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
👉 "हा भाग आवडला!" – एवढंच लिहिलंत तरी चालेल. पण लिहा... कारण ही फक्त कथा नाही, हे तुमचंही मिशन आहे!
“© 2025 Akshay Varak – All rights reserved”