There is no way back in Marathi Thriller by Akshay Varak books and stories PDF | परतीचा मार्ग नाही

Featured Books
Categories
Share

परतीचा मार्ग नाही

ही कथा एका अशा तरुणाची आहे, ज्याला एक जुना, रहस्यमयी बॉक्स सापडतो  आणि त्यातून उलगडतो एक काळाचा प्रवास, ज्यात त्याला स्वतःच्या आयुष्याच्या गाभ्यात लपवलेलं एक खोल कौटुंबिक रहस्य सापडतं.

समोरचं सत्य जितकं भावनिक, तितकंच धक्कादायक असतं. ५० वर्षांपूर्वीच्या जगात जाऊन, तो आपल्या आईच्या आयुष्यातलं एक वळण अनुभवतो  जे त्याच्या वर्तमानावर, अस्तित्वावर, आणि नात्यांवर कायमचा परिणाम करतं.

काळाच्या साखळीत अडकलेल्या या प्रवासात, तो एकच गोष्ट शिकतो –कधी कधी सत्य मिळवण्यासाठी, स्वतःला गमावावं लागतं.

📌 ही कथा पूर्णपणे कल्पनिक आहे.कथेत वर्णन केलेली ठिकाणं, व्यक्ती, घटना आणि संदर्भ यांचा वास्तवाशी थेट संबंध नाही.ही एक भावनात्मक, रहस्यमय आणि सर्जनशील कल्पनाशक्तीवर आधारित साहित्यकृती आहे

●जर ही कथा आवडलीच तर चांगला प्रतिसाद नक्कीच द्या.चांगली रेटिंग आणि आपला अभिप्राय नक्की कळवा.

__________________________________     

               समीरच्या बूटांचे टप्पटप्प आवाज जुन्या वाड्याच्या दारावर आदळत होते. पावसाने गचपणलेली माती त्याच्या सोलांखाली चिळपाखल होत होती. तो वाड्याच्या जुनाट दरवाज्याकडे पाहत होता .काहीसं विस्कटलेलं, धुळीच्या थराखाली गडप झालेलं. बाहेरून पाहिलं तर हे एक सामान्य, विस्मरणात गेलेलं घर वाटलं असतं. पण समीरच्या नजरेत त्याचं काहीतरी वेगळा अर्थ होता.

"आईने कधीच या वाड्याविषयी बोललं नाही... आणि बाबा तर या नावाचाही उल्लेख टाळायचे."एकटाच पुटपुटत म्हणू लागला.

त्याने टाळ्याची चावी फिरवली. खट् आवाज होताच दरवाजा किंचितशी चर्रर्र करत उघडला. समोर एक काळोखसा आला, जसे कोळ्यांच्या जाळ्यात वर्षं अडकलेली असावीत. तो संपूर्ण वाडा पाहता पाहतातिसऱ्या मजल्यावर, एका बंद खोलीत आला. तिथे त्याला  जुने लोखंडी कपाट दिसले. त्या कपाटाचा दरवाजा उघडताना काहीतरी खणखण करत समीरच्या पायावर आदळल.

एक लाकडी बॉक्स होता.नाजूक नक्षीकाम. सुबक पण धूळ भरलेलं. वर एक कोरलेलं चिन्ह – एक गोलामध्ये अर्धवट सूर्य आणि त्याखाली अंक कोरलेले – “1975”.

समीरने हलक्या हाताने त्या बॉक्सचा झाकण उघडलं.

आत होतं एक जुनं घड्याळ, ज्याची सुई उलटी फिरायची, आणि त्यासोबत एक काळसर रंगाची डायरी.

समिरने ती डायरी उघडली. आणि तो डायरी वाचू लागला. त्या डायरीत लिहिलं होतं की,

“तू हे वाचत असशील, तर आता वेळ तुझ्या पुढे नाही... मागे आहे.”

“हा बॉक्स तुला ५० वर्षांपूर्वी घेऊन जाईल. पण लक्षात ठेव भूतकाळ बदललास, तर वर्तमान ओळखीचं राहणार नाही...”

त्या वाक्याने समीरच्या शरीरात हुडहुडी भरली. तो घाबरला. तो विचार करू लागला. हे काय आहे. आणि ही डायरी कोणी लिहिली. तो अवाक झाला. पण त्याचे मन ऐकेना.

त्याने ते घड्याळ हातात घेतले. ते घड्याळ हातात घेताच  क्षणभर सगळं थांबलेलं वाटल. हवेत कंपन सुरू झालीत. वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता, पण कुठून आवाज येतोय हे उमगत नव्हतं. पंख्याच्या वेगानं झरझर अंधार डोळ्यांसमोर  दाटत होता. आणि..तो बेशुद्ध झाला की अजून शुद्धीवर आहे हे त्याला कळत नव्हते. अचानक त्याच्या डोळ्यांवर दिव्या प्रकाश पडू लागला. त्याचे डोळे हळूहळू उघडत होते. पण आता तो जिथे डोळे उघडत आहे ती जागा तीच होती पण तो काळ तोच नव्हता

आकाश निळसर. समोरचा वाडा नवीन रंगाचा. पलीकडे गावातले लोक धोतर-कुर्त्यात. रस्त्यावर मोटारसायकली नाहीत ,सायकली आणि बैलगाड्या.

"कुठे आहे... मी... मी भूतकाळात आलो?" त्याला काहीच सुचेना आता काय करावे." खरच हा भुतकाळ असेल तर. तो विचारात पडला.

हातात असलेले घड्याळ आता टिक टिक करत होते ते चालू झाले होते . त्या घड्याळावर सण १९७५ दाखवत होत. आणि ज्या बॉक्स मधून ते घड्याळ भेटलं तो बॉक्स सुद्धा तिथेच बाजूला पडला होता.

त्याचं नाव कुणालाच माहीत नव्हतं. पण त्याचा चेहरा, त्याच्या पावलांची दिशा गावाच्या काही जुन्या माणसांना ओळखीची वाटू लागली.

"तू देशमुख वाड्यात राहतोस ?" एका आजीबाईने विचारलं.

"हो... माझं नाव... समीर..."

"देशमुखांच्या नंदूचा भाऊ वाटतोस... पण तसं कधी ऐकलं नाही. तू कुठून आलास?"

त्याने काही त्या आजीच्या या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. आधीच डोक्यात विचारांचे स्फोट होत होते.

पण एक नाव पुन्हा पुन्हा ऐकू येतं – "शरयू देशमुख."

शरयू... त्याची आई?

बालपणापासून त्याच्या मनात त्याच्या आई बद्दल एकच चित्र होतं सावरलेली, शांत, काळजीवाहू.

इथे मात्र तिच्याविषयी लोक कुजबुज करत होती. ती अचानक गायब झाली होती, असं म्हणत होती.

"ती गुप्तपणे काहीतरी करत होती. देशमुखांच्या वाड्याच्या तळघरात काहीतरी लपवलेल आहे असं लोक म्हणत होती.

समीरच्या मनात आवाज घुमला – “आई... तू काय लपवलं होतंस?” तो मनोमन विचार करू लागला.

तो शरयूचा शोध घेऊ लागला. त्याने लोकांना विचारले शरयूबद्दल पण कोणीच काही सांगायला तयार नव्हता. आपली आई अडचणीत आहे आपण तिची मदत केली पाहिजे. हाच विचार समीरच्या मनात घोंगावत होता.

एक दिवस समीरने शरयूला कुठे ठेवले आहे हे कळाले. तो तिला भेटला. पण काहीतरी अजिब घडलं गेलं होत. काळाच्या दोऱ्या अस्ताव्यस्त झाल्या होत्या हे त्याच्या लक्षात आलं नव्हतं.

त्याला परत जायचं होतं वर्तमान मध्ये पण त्याला काहीच सुचत नव्हतं जाऊ कस, त्याने ठरवलं आपण या वाड्यात शिरायचे. पण आता हा काळ बदलला आहे तर आपण सहजासहज आता मध्ये जाऊ शकणार नाही. तो विचारात पडला आता आत कस जायचं. त्याने ठरवलं रात्र होण्याची वाट पहायची. आजूबाजूला कोणी नसताना आज रात्री या वाड्यात शिरायचं. तो एका झाडाखाली थांबून रात्र होण्याची वाट पाहू लागला.

रात्र होताच त्याने हालचाल केली. काजवांच्या प्रकाशात तो देशमुख वाड्यात शिरला. दबक्या पावलांनी तो हळूच तळघरात गेला. त्याने आसपास पाहिलं त्याला भिंतींवर चित्रं दिसलीत, सूर्य, चंद्र, आणि एक वाक्य होत लिहिलेलं:

"काळ कधीच थांबत नाही. पण तो तुला थांबवू शकतो."

त्याने भिंतीच्या जवळ जाऊन पाहिल,तो त्या भीतीना हात लाऊन चाचपत होता. भिंत हळूहळू सरकत होती. ते पाहून समीर जाग्यावरच स्तब्ध झाला. त्याने कसलीच पर्वा न करता ती भिंत बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला. भिंत सरकली पण पाहतो तर काय त्या भिंतीमागे एक गुप्त दरवाजा होता. समीरने तो उघडला आणि दरवाजा उघडताच क्षणी त्याला.. दुसरा बॉक्स दिसला. अगदी तसाच जसा आधी त्याला भेटला होता. आणि या १९७५ या काळात त्यासोबत तो बॉक्स आला होता त्याच्यासारखाच.

पण इथे जरा वेगळंच होत, कारण या बॉक्स वर कोरलेलं होत– “शरयू – १९७५”. त्याने तो बॉक्स उघडण्याचा निर्धार केला. मनात असंख्य विचारांचा काहूर माजला होता. काय घडत आहे हे सर्व. आणि या बॉक्स वर आईच नाव का लिहिलंय. आपण आताच आईला वाचवलं आहे. अखेर त्याने ठरवले हा बॉक्स उघडून पहायचाच. त्याने तो बॉक्स उघडला आणि पाहतो तर,तेच घड्याळ, तीच डायरी, पण यावेळेस आत एक फोटो होता.

त्या फोटो  मध्ये शरयू आणि... एक मूल होत.

त्या फोटोत जो मुलगा होता तो दिसायला समीर सारखाच होता.

समीरचा श्वास कोंडत आला होता. काय करावं काय नाही त्याला काहीच उमगत नव्हत. त्याने त्या बॉक्स मधील त्याच्या आईची असलेली डायरी वाचण्यास सुरुवात केली त्या डायरीत लिहिलं होतं,

"माझं मूल जगायला हवं. पण मी त्याला या काळात ठेऊ शकत नाही. मी  या बॉक्समधून त्याला पुढच्या काळात पाठवत आहे."

हे वाचून समीरचं डोकं गरगरायला लागल.

"मी... मी या काळात जन्मलो?"

"मी... मीच ते मूल?"

त्याच्या मनात असंख्य कोडी उभी राहिलीत. पण त्याच उत्तर कसे आणि कुठे शोधू या प्रश्नांची त्याचा अजून गोंधळ उडाला. त्याने ती डायरी त्याच्याकडेच ठेवली. त्याने पुन्हा परतण्याचा  विचार केला.समीरने ती डायरी पुन्हा वाचायला सुरुवात केली पण त्या डायरीत एक वाक्य अस लिहिलं होतं,

"तू परत येऊ शकतोस, पण मागे काहीतरी सोडावं लागेल – काहीतरी महत्त्वाचं."

त्याने झटकन त्या बॉक्स मध्ये त्याच्या आईचा फोटो पुन्हा तिथेच ठेवून दिला.आणि हातातलं घड्याळ सेट केलं.घड्याळ सेट करताच तोच अंधार झाला. त्याच्या डोळ्यांवर प्रकाश चमकत होता डोळे उघडले. पाहतो तर तो पुन्हा वर्तमानात आला होता. पण इथे सुद्धा सर्वकाही बदलून गेलं होतं.

ज्या वर्तमानात वाडा बंद होता. तोच वाडा त्याच वर्तमानात उघडा होता. समीर हे पाहून अवाक झाला. पण मनात खुश झाला होता."आपण पुन्हा आपल्या काळात आलो".याच विचाराने तो मनातल्या मनात हसत होता.पण जरा वेगळंच काहीसं त्याला दिसत होतं.

आता गाव बदललेलं होतं. वाडा उघडाच होता, तो आत गेला. आत मध्ये पाहतो तर, आधुनिक डिझाइनमध्ये. फर्निचर झगमगत होतं. जिन्याच्या गॅलरीवर CCTV लावले होते. पलीकडच्या शेतांवर आता मोठे कन्स्ट्रक्शन बोर्ड लावलेले होते – “देशमुख इन्फ्रास्ट्रक्चर – एक वारसा जगण्यासाठी.”

समीर वाड्याच्या आता आला. त्याची आई शरयू जिन्यात उभी होती.ती सुंदर तरुनी दिसत होती. डोळ्यांत तेजस्वीपणा आणि चेहऱ्यात चमक दिसत होती. पण ती समीरला ओळखू शकली नाही.

"तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखत नाही..."

तीने विचारले, अगदी सौम्य पण दुरावलेल्या आवाजात.

समीर हळूच उत्तरला, “मी... मी समीर आहे... तुमचा मुलगा.”        हे ऐकताच,             शरयू काही क्षण स्तब्ध झाली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव वळत होते, .. पण तिला समीर कोण हे उमगत नव्हतं.

        काहीही वेडयासारखा बडबडू नकोस. माझं अजून लग्न झालेले नाही. शरयू रागाने म्हणू लागली.

तिने समीरला वाड्याच्या बाहेर काढले. आणि पुन्हा येते न येण्याची सक्त ताकीद दिली

__________________________________                         अस्तित्वहरण...     

   समोरच संपूर्ण अस्तित्व बदलून गेले होत. त्याने नकळत १९७५ मध्ये त्याच्या आईच्या जीवनाचा मार्गच बदलला होता. समीर जेव्हा १९७५ मध्ये पोहचला तेव्हा त्याने त्याच्या आईला एका गंभीर संकटातून वाचवलं होत.

शरयूच्या मामाने तिचे अपहरण करून तिला एक बंदिस्त घरात बंद केली होती. जेव्हा समीर १९७५ साली कालच्या ओघात  या काळात आला तेव्हा त्याने खबर ऐकली होती की शरयू गायब आहे. तेव्हा समीर तिचा शोध घेता घेता त्या बंद खोलीपर्यंत पोहचला . आणि शरयूला त्या जीवघेण्या धोख्यापासून वाचवले. समीरची ही कृती त्याला त्याचे वर्तमान विसरावे लागणार होते. हे त्याला माहीतच नव्हते.

जर समीरने शरयूचा शोध नसता घेतला,तर काळाचे चक्र बिघडले नसते. कारण तिथे कृती दुसऱ्याच मानवाची होती पण ती केली समीरने. यामुळे समोरच वर्तमान आता धोख्यात होत.

शरयूचं लग्न आणि आयुष्य आता मात्र वेगळ्या मार्गावर गेलं.मूळ इतिहासात, ती जिच्याशी लग्न करून समीरचा जन्म झाला होता, तो मार्ग आता बदललेला होता.तिने वेगळा निर्णय घेतला, वेगळ्या माणसाला आयुष्यात सामावलं – त्या नवीन आयुष्यात समीरचा काहीही संबंध नव्हता.

समीरचा जन्मच ‘कधीच घडलेला नव्हता’तिच्या नव्या आयुष्यामुळे समीरचं जन्म घेणं ही गोष्टच इतिहासातून पुसली गेली.त्याचा शरीररूपात अस्तित्व असूनही, कागदोपत्री, आठवणीत, नात्यांमध्ये – तो “कोणीच” नव्हता.

गावात, वाड्यात, आईकडे – कुणालाही त्याचं अस्तित्व माहीत नव्हतं. त्याच्या आईने  सुद्धा त्याला ओळखलंच नाही.तिच्यासाठी तो एक अपरिचित माणूसच होता.

"मी तुला वाचवलं, पण त्याच्या बदल्यात तू मला विसरलीस..."समीर उदास होऊन मनातच पुटपुटू लागला.

कुटुंब, आठवणी, इतिहास – काहीही त्याचं राहिलं नव्हतं.त्याचं बालपण, शिक्षण, आईबरोबरचे क्षण – हे सर्व घडलेच नाहीत, कारण आईचं आयुष्य आता वेगळ्या दिशेने गेलं होत.जणू समीरने स्वतःचा इतिहास संपवला होता.

समीर आता सध्यातरी जिवंत आहे, चालतोय, श्वास घेतोय – पण तो कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात नाही.

तो काळाच्या एका तुटलेल्या कडेला लोंबकळणारा सावलीसारखा आहे ,त्यामुळं उगमाला परत जोडता येत नाही.

त्याने मनात असंख्य विचार केले, आणि शेवटी पुन्हा त्याच्याकडे एकच पर्याय उरला."तो रहस्यमयी बॉक्स".

समीर पुन्हा त्या बॉक्सच्या शोधात गेला.समीरला वाटल,कदाचित वाड्याच्या तळघरात तो बॉक्स अजूनही सापडेल. या विचारानेतो तिथे गेला आणी त्याला एक वृद्ध व्यक्ती दिसला. पांढरे केस, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा, आणि हातात तीच डायरी.

“काळाची दिशा बदलली आहे, बाळा.”त्या माणसाने म्हटलं.

“तूम्ही मला ओळखता?” समीरने विचारलं.

“मीच तो... ज्याने हा बॉक्स बनवला होता. काळ हे साधं घड्याळ नाही. ते एक सजीव यंत्र आहे – ज्याला वेदना होतात.”त्या वृद्ध माणसाचा आवाज धीमा पण स्पष्ट.

“तू काहीतरी मोठं बदललं आहेस. शरयूला वाचवलं आहेस. पण त्याचं मूल्य तुझ्या अस्तित्वानं तुला चुकवावं लागलं.”

“म्हणजे मी...?”समीरचं मन कोसळल.

“तू आता त्या वर्तमानात राहू शकत नाहीस. पण तुला दोन मार्ग आहेत...”वृद्धाच्या डोळ्यांत काळ दिसत होता.

१. भूतकाळात परत जा पण काहीही बदलू नको.शरयू गायब होईल, वर्तमान पूर्वीसारखं होईल, आणि त्या परत तुज्या ‘आई' जवळ जाशील. पण पुन्हा आईला वाचवायच नाही.

२. या नवीन वर्तमानातच नव्याने उभं राहा.तू,कोणालाही ओळखत नसला तरीही, पुढे जाऊ शकतोस. शरयू जिवंत आहे, पण तुला ओळखत नाही. तरीही तू तिच्या आजूबाजूला राहून तिच्या आयुष्यातील एक छाया बनून राहू शकतोस.

“तुला निवड करावी लागेल, समीर. तू वेळेला स्पर्श केलाय... आता वेळ तुला उत्तर मागतेय.”

समीर खिडकीबाहेर पाहिले. आकाशात लालसर प्रकाश पसरलेला. एक पक्षी क्षितिजावर उडत होता तोही एकटाच.

"आई जरी मला विसरली असली, तरी मी तिला विसरणार नाही."तो शांतपणे म्हनाला.

"मी नवीन वर्तमान स्वीकारतो."

अखेर समीर त्याच गावात राहिला. एका जुन्या ग्रंथालयात कामाला लागला. त्याच्या खोलीत अजूनही ती डायरी होती, पण आता ती त्याने बंद करून ठेवली होती.

तो रोज शरयूला पाहायचा. ती आता गावात एक शाळा चालवतेय. ती लहान मुलांन हसवून खेळवून शिकवत होती. तिची नजर चुकून समीरकडे गेली. तिला काहीतरी वेगळंच  जाणवल. ओळखीचं नाही, पण एक आतून उगमलेली ओढ.

                 दिवसांमागून दिवस सरून जात होते. अशातच एक दिवस.शरयू समीरच्या समोर आली.

“तुमचं नाव?” तीने समीरला विचारले.

“समीर,” हसून उत्तरला.

“छान नाव आहे,” शरयू, हळू हसत म्हंटली.

दोघं काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. काळाला कुठेतरी ओळख पटेल या आशेने समीर तिथेच थांबला.

रात्री, समीर आपल्या खोलीत आला. त्याने तो बॉक्स पुन्हा उघडला.घड्याळ अजूनही  तसच होत पण त्याची सुई थांबली होती.

"तू तुझा वेळ जगलास, समीर. आता काळाने तुला स्वीकारलं आहे."त्या वृद्ध माणसाचा आवाज आला पण तो वृद्ध माणूस कुठे दिसला नाही.

समीरला वाटले भास असेल कदाचित,त्याने दुर्लक्ष केले. त्याने ती डायरी पुन्हा काढली,त्या डायरीत त्याला एक नविन ओळ दिसली,

“प्रत्येकाला भूतकाळ सापडतो, पण फार थोड्यांना वर्तमान साकारता येतो.”

समीरने ती डायरी बंद केली. आणि कायमची मातीत उरली. त्याच्याकडे असणारे ते घड्याळही त्याने कायमचे बंद करून ठेवले.

दूरवर एक घंटा वाजली. गाव झोपलेलं होत,पण समीर जागा होता त्याच्या डोळ्यात अखंड शांतता होती. काळाच्या दोरीत अडकलेला समीर कायमचाच शांत बसला

______________समाप्त_________________

लेखक

अक्षय वरक.