Patrakaar Ghondira Ghotre - 3 in Marathi Comedy stories by Akshay Varak books and stories PDF | पत्रकार धोंडीराम धोत्रे - 3

Featured Books
Categories
Share

पत्रकार धोंडीराम धोत्रे - 3

“कोण जातो इथे?” – त्या टॉर्चवाल्याने कडक आवाजात विचारलं.प्रकाशाचा झोत थेट माझ्या डोळ्यांवर आला, आणि काही क्षण मी गोंधळलो. पण त्या प्रकाशाआडून जेव्हा चेहरा स्पष्ट दिसू लागला, तेव्हा मी पटकन ओळखलं –तो गण्याचा मामेभाऊ संत्या होता.  “© 2025 Akshay Varak – All rights reserved”)

हो, हाच तो संत्या. जो लहानपणी संध्याकाळी भजन म्हणता म्हणता चुकून स्वतःलाच झपाटल्यासारखं वागायला लागला होता... आणि गावात त्याला तेव्हापासून "झपाटलेला संत्या" म्हणून ओळखू लागले.

त्याच्या हातात एक जुनी काळपट टॉर्च होती. जी चालू ठेवण्यासाठी मधेच झटकावी लागते.तो तीच टॉर्च शेजारच्या पायरीवर आपटत होता, कारण कधीकधी ती जास्त प्रकाश देण्याऐवजी धूर काढते.त्याच्या चेहऱ्यावर मात्र ती टॉर्च नव्हे तर जणू कोणत्यातरी ग्रामदेवतेच्या मूर्तीचा चेहरा चुकून त्याच्यावर चढवलाय असं वाटावं, इतका गडद, घाबरलेला, आणि थोडासा अतिरिक्त भक्तिभाव दाखवणारा भाव होता.

त्याच्या डोळ्यातल्या चमकणाऱ्या भीतीला मी ओळखलं.ती काही केवळ रात्रीचा काळोख वा माझं अचानक दर्शन नव्हतं…ती होती त्या विहिरीच्या आजुबाजूच्या अफवांची, श्रापांची आणि ऐकलेल्या कुजबुजींची सावली.

मी एक क्षण त्याच्याकडे बघितलं… आणि मनात म्हटलं,"भूत असो वा नसो, पण संभाच्या चेहऱ्यावरून कुठलंही पाणी स्वतःहून विहिरीत उडी मारेल!"

“मीच धोंडीराम. पत्रकार. आणि पोटधंद्यासाठी पोटशूळ सहन करणारा,” मी ओळखीच्या मिश्कील ढंगात म्हटलं. टॉर्चचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावरून सरकवत मी त्याच्याकडे पाहिलं, आणि एक हलकंसं हसू टाकून गमतीने मान हलवली.

पण त्या संत्याच्या चेहऱ्यावर हसण्याचा कणसुद्धा उमटला नाही.

त्याच्या चेहऱ्यावरचा गंभीर भाव अधिक गडद झाला.डोळ्यांत भीती नाही म्हणावी इतकी होती की, वाटावं. त्याने पाण्याआधीच मृत्यू बघितलाय.

तो एक पाऊल पुढे आला. टॉर्च अजून माझ्या छातीवर रोखली.आवाजात अंगावर शिरशिरी आणणारी थंडी होती.

“जा इकडून,” तो म्हणाला, थेट आणि निर्विवाद.

“वाड्याचा वास घ्यायला आलास तर... परत शुद्धीत जायचं नाही.”

मी क्षणभर गप्प झालो.ते बोलतानाही त्याची नजर चुकत नव्हती.जणू तो भीतीने नाही तर अनुभवाने बोलत होता.

“आमच्या गावातले काही लोक गेल्या वर्षभरात बेपत्ता झालेत,” तो पुढे म्हणाला.“ह्या विहिरीजवळ आलेले लोक... कुठे गेले, कुणाला माहित नाही".

त्या क्षणी रात्रीच्या निःशब्दतेत ती वाक्यं काठ्यांवरुन घासलेल्या नखांसारखी मनावर ओरखडे काढत गेली.

मी विचारात पडलो –ही अफवा आहे? भीतीचं साचलेलं पाणी आहे?की खरंच... विहिरीत काहीतरी आहे?

माझं पोट मात्र त्या क्षणी फिस्सकन चुळबुळलं. नेहमीसारखं संकेत देत:“बातमी आहे, धोंडीराम... आणि यावेळी ती फार महाग पडू शकते.”

मी काहीच बोललो नाही.

संत्याच्या डोळ्यांमधली ती झिणझिणीत भीती, आणि त्याच्या शब्दांमागचा दृढ विश्वास. हे सगळं ऐकून, मी फक्त निःशब्द राहिलो.पण आतून... आतून माझ्या मनात बातमीची जळजळ पेटली होती.

जणू एखाद्या गुप्तशोधकाच्या कानशिलात कुणीतरी ‘भयानक सत्य इथंच लपलंय!’ असं कुजबडलं होतं.माझं पत्रकार मन म्हणत होतं. “धोंडीराम, जेवढं धडधडतंय, तेवढी बातमी मोठी आहे.”

दुसऱ्या दिवशी पहाटेच, मी फारशी चर्चा न करता थेट निघालो गावातल्या 'कट्ट्याच्या आखाड्यावर'.

गावातला तो एकमेव ठिकाण.जिथं चहाच्या कपात रबरमातीसारखे किस्से उकळतात,जिथं कुजबुज नाही, तर थेट बिनधास्त तोंडं चालतात,आणि जिथं गावातले म्हातारे. अनुभवाचे कडवे पाटील . आपली हुकूमी मते हाणतात...

तेही थोडंसं नाटक करत.

आखाडा म्हणजे काही कुस्तीचा नव्हे. हा तर गोष्टींचा आखाडा.मातीचा ओटा, आजूबाजूला वाळलेल्या चिंचेच्या शेंड्यांची सावली, एक कोपऱ्यात मोडकं रेडिओ. ज्यावर नेहमी 'अस्सल कोकणी गीते' लागलेली असतात. आणि त्या पारावर बसलेली अनुभवी टोळी.

कोणाच्या गळ्यात तुळशीचं माळ, कोणाच्या हातात तंबाखूचा बार, आणि सगळ्यांच्या ओठांवर 'त्या विहिरीबद्दल' काहीतरी नक्की सांगण्यासारखं.

मी चालत गेलो, टोपी थोडी सरळ केली, आणि पाठीवरचा कॅमेरा थोडा पुढे ढकलत त्यांच्या समोर उभा राहिलो.

एका आजोबांनी वाकून माझ्या पायाकडे पाहिलं आणि हसत विचारलं,“पत्रकार आहेस का? की फडशेरांचा नवा पंटर?”

मी हसून उत्तर दिलं –“पत्रकार आहे. पण बातमी घेतल्याशिवाय जात नाही.”

...आणि तेवढंच पुरेसं होतं. सगळ्यांचे डोळे एकमेकांकडे वळले. वातावरणात एक कुजबुज पसरली.

पण मला माहित होतं. काहीतरी बाहेर येणार आहे.फक्त ऐकण्याची कला हवी. आणि मी, धोंडीराम, त्यात माहीर होतो.

  म्हातारा भिकू काका.  ज्याचं वय त्यालाही लक्षात नाही, आणि जो कधीच चहा घेत नाही पण प्रत्येक कट्ट्यावर हजर असतो. अगदी वायफायसारखा. मी कट्ट्यावर पोहोचताच तो लगेच भसाभसा पिचकाऱ्यांनी पाण्यात शिंपडावं तसं बोलायला लागला.

“धोंडीराम, तू आलास म्हणजे आता त्या विहिरीचं भूत स्वतः पायऱ्या चढून बाहेर येईल, आणि म्हणेल – ‘अरे बाबा, माझं नाव क्लीन करत चला!’”

मी हसलो, “काका, पण भूत कुणाचं आहे? नाव, गाव, राशी काहीतरी माहिती द्या!”

भिकू काकाच्या डोळ्यात अचानक गंभीरपणा उतरला. त्याने आपल्या कोरड्या टाळक्याला पांढरं रुमाल गुंडाळलं . अगदी एखाद्या स्थानिक भोंदू महाराजासारखा आणि संथ आवाजात म्हणाला:

“सांगतो... पण सांगितलं की कुणीही या गावात रात्री उघडं अंग ठेऊन भेळही खाणार नाही!”

“हा वाडा होता न,” भिकू काका गडगडाट आवाजात सुरू झाले. “पेशवाईच्या काळात बाजीराव नाईक यांचा. मोठा श्रीमंत, पण त्याहून मोठा हट्टी. म्हणायचा, ‘कोणी माझ्या बायकोकडे पाहिलं तरी डोळे फोडून टाकीन!’… आणि दुर्दैव बघ, त्यांच्या वाड्यातला नोकरच तिच्यावर लट्टू झाला!”

सगळे कट्ट्यावरचे उकडलेले कांदे जसं तोंड उघडून पाहतात तसं आम्ही सगळे त्याच्याकडे पाहायला लागलो.

“हो… ती रमाबाई होती फार सुंदर. पण अजूनही लोक म्हणतात की तिच्या चेहऱ्यावर कायम 'पार्लरमध्ये अपॉइंटमेंट मिळाली नाही' असा एक हळवा दु:खद भाव असायचा. आणि तेवढ्यात त्या नोकराचं तोंड तिच्याकडे फिरलं… म्हणजे लक्ष!”

“पण बाजीरावानं एक दिवस दोघांना विहिरीजवळ पाहिलं. आणि मग काय! नोकराला दटावलं नाही, थेट ढकललं विहिरीत! तो गेला, ‘गुळगुळगुळ… टप्प!’”

काकाचा आवाज इथं येऊन एकदम थरथरायला लागला… म्हणजे जणू हिवाळ्यात माशा फ्रीजमधून बाहेर निघाल्या असाव्यात इतका थरथराट.

“पण गंमत काय माहितेय?” काकानं मिशा फडफडवल्या, “रमाबाईने ते पाहिलं… आणि म्हणाली, ‘लव्ह मीन्स लव्ह!’, आणि थेट तीही उडी मारून गेली त्याच विहिरीत!”

आम्ही सगळे श्वास रोखून ऐकत होतो. काही जणांनी तर त्यांच्या चहाचा घोट अर्ध्यावरच थांबवला… इतकी उत्कंठा.

काका पुढे म्हणाले, “तेव्हापासून वाड्यात रात्री पाण्याचा आवाज यायला लागला. आणि रमाबाईचं सावत्र भूत. म्हणजे पतीला सोडून गेलंय म्हणून सावत्र. साडी ओलसर करत विहिरीच्या कड्यावर उभी राहते म्हणे!”

मी विचारलं, “काका, पण हे पाहिलंय कुणी प्रत्यक्ष?”

तेवढ्यात दुसरा म्हातारा उगाच काखेत हात घालून पुढे सरसावला. “माझ्या मामाने पाहिलं होतं! तो म्हणायचा, भूत पाय नसलं तरी फिनाइलचा वास यायचा तिच्या भोवती! आणि हो, सगळ्यात भयानक – ती विहिरीपाशी उभी राहून तिच्या कुंकवाचं पाणी ‘टप… टप…’ करत विहिरीत टाकायची! जणू मेकअप काढायचंही भूतपण विसरत नाही!”

सगळे एकमेकांकडे बघत हसत होते. कोणीतरी पुटपुटलं, “रमाबाई जिवंत असती तर ब्यूटी इन्फ्लुएन्सर झाली असती!”

  मला थोडीशी शंका आली, पण पोटातून पुन्हा एक जाडजूड कुरकुर झाली.  म्हणजे बातमीच असणार! 'जिथं पोट खवखवतं, तिथं स्कूप लपलेलाच असतो,' असं माझं स्वतःचं तत्वज्ञान आहे.

मी विचारलं, “कुणीतरी त्या विहिरीत उतरायचं धाडस केलंय का कधी?”

भिकू काका मिशा कुरवाळत म्हणाले, “अरे, एक मास्तर आले होते काही वर्षांपूर्वी. नव्या नव्हत्या शाळेचे. नाकातले चष्मे, खांद्यावर झोळं, आणि पायात बाट्याचे बूट! म्हणाले, ‘मी सायन्सने भूत शोधणार!’… आणि रात्री ते सायन्ससकट गायब!”

“मग?” मी डोळे विस्फारून विचारलं.

“दुसऱ्या दिवशी फक्त त्यांच्या बूटाच्या फीत विहिरीत सापडली.”

“बाकी?”

“बाकी... नाही! ना चष्मा, ना झोळं, ना ‘सायन्स’!”

ते ऐकल्यावर माझ्या मनात उगाच एक विचार आला. इथं पाणी खेचणाऱ्या मोटारीच्या ऐवजी पाणीच माणसं खेचतं की काय! आणि मग दुसऱ्याच क्षणी वाटलं, हे भूत म्हणजे जणू बीएसएनएलचं इंटरनेट. दिसत नाही, पण तुमचं सगळं हरवतं! 😬

त्या रात्री मी गावच्या हरवलेल्या तलाठी कार्यालयात गेलो. हो हो, हरवलेलंच! कारण ते इतकं धुळीने भरलेलं होतं की, तिथं श्वास घ्यायला मास्क लागावा, आणि चावीऐवजी ‘छातीतला दम’ उघडायला लागतो. आत शिरलो आणि फाईल्सच्या ढिगाऱ्यात खोदकाम करत होतो.  एक वेळ तर वाटलं मी Archaeological Survey of India चाच प्रतिनिधी आहे!

अचानक एक बुरसटलेली फाईल सापडली. तिच्यात एक थोडंसं खवखवीत कागद नजरेस पडला.

त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं ."रमा – मृत्यू प्रमाणपत्र"

पण... मृत्यूचं कारण?

❓ "अननिश्चित"

म्हणजे काय? झटका आला? झोक्याला गेला? की झपाटून गेला?

पुढच्या ओळीत वाचलं ."नोकर – रामाजी" याचीही त्याच दिवशी विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यूची नोंद!

म्हणजे काय! दोन लोकं.  एकाच दिवशी. एकाच विहिरीत. आणि दोघांचंही नाव ‘राम’ पासून सुरु!

ही तर कोणती एक्सप्रेस होती का काय?

🧠 माझ्या मनात शंकेची पालगाडी वाजू लागली. डब्यात डबा आणि विचारांचा धडधडणारा इंजिन!इतकं मोठं प्रकरण... आणि अजूनही कुणीतरी ते ‘भूत’ जिवंत ठेवतंय का? की ही एखाद्या झपाटलेल्या दंतकथेची शेती आहे, ज्यात भूत पिकवलं जातंय, आणि गावकरी त्यावर चहा पिऊन चर्चा करतायत?

माझा ठाम निर्णय झाला!

मला स्वतः रात्री विहिरीपाशी थांबून, व्यवस्थित CSI-styled निरीक्षण करायचं आहे.

म्हटलं – आता पुरे झालं!

भूत असो की माणूस... की मोटार पंप... की रात्री सांडणाऱ्या टाकीचा आवाज... सत्य समोर यायलाच हवं!

त्यासाठी मी सगळी तयारी केली .एक टॉर्च, एक नोटबुक, एक भजनी मंडळाचं जड ' तेवढा’ कीर्तन CD, आणि पाठीवर मच्छरदानी. कारण भूत धडकीदायक असलं तरी मच्छर हे सर्वांत घातक जीव असतात, आणि त्यांना अजून कुठलंच प्रमाणपत्र लागत नाही!

“© 2025 Akshay Varak – All rights reserved”)

◆ (👉 पुढच्या भागात: भाग ३ – रात्रीची मोहीम – धोंडीराम एकटा वाड्यात थांबतो, आणि एक विचित्र दृश्य बघतो – जे त्याच्या संपूर्ण रिपोर्टिंग जीवनाला हादरवून टाकणारं ठरतं!)