🌟 नमस्कार! मी अक्षय वरक.
आपण सर्वांनी माझ्या पहिल्या कथेला – ‘सावध चाल: अज्ञात चोरांचा खेळ’ दिलेल्या भरघोस प्रतिसादाने माझं मन भरून आलं.
त्या कथेचे पुढील भाग तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील, हे वचन आहेच...
...पण त्याआधी, एक नवा प्रवास तुमच्यासमोर ठेवतोय
"पत्रकार धोंडीराम धोत्रे" —
थोडं हास्य, थोडं रहस्य, आणि खूप साऱ्या गोंधळाच्या गोष्टी घेऊन आलेली ही भन्नाट मालिका!
या कथेत प्रत्येक भाग वेगळा आहे. वेगळं प्रकरण, वेगळं गूढ, आणि त्यात धोंडीरामचा बिनधास्त अंदाज!
आजचा भाग 1 आहे – या प्रवासाची पहिली पायरी.
🙏 तुम्ही आजच्या भागावर खूप सखोल, भरगोस प्रेम केलंत,
तर मी अजून जोमाने पुढचे भाग घेऊन येईन.
तुमचं एक लाईक, एक शेअर, एक कमेंट आणि सरासरी रेटिंग… हेच माझं इंधन आहे!
चला तर मग, चला भेटूया… पत्रकार धोंडीराम धोत्रे यांना!
__________________________________
परिचय - धोंडीराम शांताराम धोत्रे
"मी धोंडीराम. धोंडीराम शांताराम धोत्रे."
नाव ऐकून वाटेल एखादा 'सप्तपदी' सिनेमातला साइड हिरो असेल...
पण स्वभाव? अगदी बुलेटवरून स्पीडने धावणारा स्फोटक स्कूप!
मी लिहतो. पण मोजकंच. दिसायला साधाच. केस थोडे पुढे गेलेत, पोट थोडं पुढे आलंय. पण डोळ्यात मात्र शंका भरलेली. एका वेळेस चार गोष्टींचा छडा लावतो. म्हणजे काहीतरी संशयास्पद दिसलं, की माझ्या मेंदूत लख्ख दिवा लागतो.आणि मग सुरू होतो शोध –कधी पायजमा चोराचा,कधी देवळातल्या उंदराचा, तर कधी स्वतःच्या भूतकाळाचा!
मी राहतो वाड्यात. जुन्या काळच्या भिंती, वय? ४२ पूर्ण. लग्न?अजून जमलं नाही. पण याला मी अपयश नाही म्हणत… स्वतंत्रता म्हणतो!
पण बातमी कुठे? ती कुठेही! त्यामुळे मी कधी पुण्यात, कधी दिल्लीच्या गल्लीमध्ये!
पत्रकारितेत आलो तेव्हा शपथ घेतली होती. "सत्याच्या मागे धावणार!"
पण आजकाल सत्यही एवढं फिट झालंय की ते 5G सारखं सुटतं,
आणि मी त्या जुन्या नेटवर्कवर उशिरा पोहोचतो.
तोवर 'व्हायरल' झालेलं असतं!
सध्या काम करतो "तोडफोड" नावाच्या एकमेव सडेतोड वृत्तपत्रात. हे नाव ऐकूनच लोक घाबरतात…
पण आमचं ब्रीदवाक्य आहे,
“फोडा खोटं, तोडा भ्रम, उघडा सत्य!”
हो, नाव ऐकून वाटतं काहीतरी ‘दंगलखोर’,
पण खरं सांगू? ऑफिसातली एकमेव ‘दंगल’ म्हणजे
केळीवरून होणारी भांडणं आणि चहाचा कप कोणाचा ते ठरवणं!
ऑफिस म्हणजे काहीतरी झगमगाट नाही… पण इथे एक वाक्य वारंवार ऐकू येतं. "धोंडीराम एकटा पुरतो!"
पाण्याचं बिल वाढलं, की धोंडीराम.
रस्त्यात खड्डा पडला, की धोंडीराम.
गावात बोगस शौचालयाचं उद्घाटन झालं, आणि दुसऱ्याच दिवशी त्याच टॉयलेटला दरवाजा नाही, छत नाही. तर थेट बातमी 'धोंडीराम LIVE!'
कधी ग्रामपंचायतीच्या फाईल्समध्ये धूळ खात पडलेलं एखादं विसरलेलं टेंडरचं भूत उगाच जागं करतं. आणि मी त्या भुताला थेट समोर उभं करतो!
म्हटलं ना, इतर पत्रकार हेडलाइन शोधतात…
मी मात्र फाईलची पहिली पानं नाही, तर थेट शेवटची कागदं फाडतो. आणि तिथूनच सुरू होतो स्फोट!
माझ्या टेबलावर संगणक कमी चालतो आणि झापड जास्त बसतात… पण बातमी दाबली जाते म्हटलं, की धोंडीराम 'तोडफोड' करतोच करतो!
पण माझ्या या शोधयात्रेत… प्रत्येक गोष्ट केवळ बातमी म्हणून कधीच समोर येत नाही.
कधी एखादा प्रसंग माझ्या मनाच्या खोल गाभ्याला हलवून जातो.
कधी गावच्या जमिनीचा नुसता तुकडा नसलेला, तर त्याच्या काळजाचाच भाग वाटणारा एखादा मुद्दा समोर येतो. आणि त्यात मी केवळ पत्रकार राहात नाही, तर गावाचा माणूस होतो.
कधी बातमी हसवते, आणि माझ्याच लेखावर गावच्या चौकात माणसं फिदीफिदी हसतात…
तर कधी एखादं वाक्य झोप उडवून टाकत. कारण त्या बातमीतून उघडणारी गोष्ट असते, कुणाचंतरी दडपलेलं आयुष्य.
हो… ‘तोडफोड’ मध्ये मी बातम्या लिहितो, पण अनेक वेळा त्या बातम्या माझ्यातच खोलवर लिहिल्या जातात.
आणि आता…
पुढचं प्रकरण सुरू होतं एका जुनाट, धूळ भरलेल्या वाड्यापासून —
जिथं रात्री उगाच येतो एक आवाज…
ना तो माणसाचा वाटतो, ना प्राण्याचा… पण तरीही थेट मानगुटीवर येऊन बसतो.
काय आहे त्या आवाजाच्या मागे?
की कोण?
की काहीच नाही… पण का असं वाटतंय की आहे?
हे कळेलच…
गावकऱ्यांनी त्या वाड्याकडे पाहणंही बंद केलंय.
पावसाळ्यात त्या वाड्यावर सावल्यांची गर्दी होते म्हणे… पण माणसांची नाही.
रात्री जर कुणाची बैलजोडी चुकून तिकडे वळली, तर गावचा म्हातारा उठून म्हणतो. "त्याला वाचवायला माणूस नको... मनगट पाहिजे!"
पण मी? मी धोंडीराम शांताराम धोत्रे!
‘तोडफोड’ वृत्तपत्राचा सडेतोड प्रतिनिधी, आणि छापील सत्याचा बिनधास्त योद्धा!
माझ्या प्रेस आयडीवर 'डर' नावाचं प्रकरण अजूनपर्यंत नोंदलेलं नाही.
गावात दचकणारे अनेक असतील, पण धाडस करायला एकच पुरतो. तो म्हणजे मी.
तर वाचा. पहिलं प्रकरण: "वाड्याच्या विहिरीतला आवाज"
एक असा आवाज… जो फक्त रात्री ऐकू येतो,
ज्याचं कोणालाही मूळ कळलेलं नाही,
आणि ज्यामुळे त्या वाड्याच्या विहिरीकडे कुणी फिरकलं नाही.
हे खरंच एखाद्या आत्म्याचं सोंग आहे?
की कुणाचं हुशार बनावट खेळ?
की… अजून काही?
उत्तर मिळवायचं असेल,
तर या धोंडीरामसोबत वाड्यात यावं लागेल…
आणि त्या विहिरीतल्या आवाजाला थेट भिडावं लागेल!
तर भेटुयात आता लवकरच......