उन्हाळी हापूस आंबा काढणी सुरू झाली की मुंबईला आंबा पेट्या नेणारे व्यापारी सीझनमध्ये आंबा पार्सल न्यायला दस्तुरी नाक्यावरून गुरववाडीपर्यंत ट्रक नेत असत.भाऊनी बांधलेला रस्ता अद्यापी सुस्थितीत होता. सुरेश मॅट्रिक झाला. त्यानंतर रत्नागिरीत संस्कृत पाठशाळेत राहून बी.कॉम. झाला. परीक्षा देवून गावी आल्यावर चार दिवसानी तो रखमाला भेटायला गेला होता. तेव्हा तिचा मुंबई पोलिसमध्ये असलेला भाऊ रामभाऊ बारस्कर आलेला होता. हा घाटेभाऊंचा मुलगा, म्हणून बळीने त्याची ओळख करून दिली. सुरेश रखमाला माहेरच्या नावाने आणि मावशीचं नातं लावून बोलत होता.म्हणून तिचा भाऊ बुचकळ्यात पडलेला होता. तो गेल्यावर त्याने बहिणीला विचारल्यावर तिने घाट्यांशी आपली सवगव कां नी कशी झाली हे सांगितल्यावर तो थक्कच झाला. रखमाने सुरेशला मुंबईत चांगली नोकरी मिळवून द्यायची भावाला गळ घातली. ब्राह्मण कुटूंबात तिचे इतके जिव्हाळ्याचे संबंध आहेत या गोष्टीचा मोठा अभिमान त्याला वाटला.सुरेशला आपल्या बरोबर मूंबईला नेवून त्याला पुढे शिकवून मार्गी लावून द्यायचा निर्धार त्याने बोलून दाखवला. संध्याकाळी रखमा त्याला आणि भावजयीला घेवून भाऊंच्या घरी गेली. गंगा वहिनीने रखमा आणि तिच्या भावजयीला माजघरातनेवून पाटावर बसवलं.
तो काळ असा होता की इतरेजनाना ब्राह्मणांच्या घरात प्रवेश मिळत नसे. पण भाऊंकदे झालेल्या आगत स्वागतामुळे रामभाऊ बारस्कर पुरता भारावून गेलेला होता. सुरेश फस्ट क्लास करियरचाआहे हे कळल्यावर हा मुलगा आपलं नाव काढील अशी त्याची खात्रीच झाली. तो भाऊना म्हणाला, “ ह्याची जबाबदारी आमच्या सखून माज्यावर सोपवलेली हाए. नोकरी म्हणशाल तर तेला आत्ता भेटेल. पन तो आजून फुडे शिकला तर लय मोटा साहेब होईल. माजी माटुंग्यात मोटी जागा हाए. मी तेला माज्याकडे सांबाळतो. तोआजून फुडे शिकूने . तेचा जिम्मा तुमी माज्यावर सोडा. मी माज्या कडे तेला सांबाळीन. तेला सवतंत्र रूम द्येईन मी. माजी चार मुला हाएत. त्यानला बी जरा शिस्त लागेल. मी ज्याम त्याम झोपन्या पुरता घरात आसतो. येकेकदादोन दोन दिवस पण डुटी आसली की मला घरी यायला बी भेटत नाय. मी नसलो काय पोरा आवशिला जुमानीत नाय. मुंबयला शेजार पाजारी पण सगळी बारबंड वसती.माजी मुला वायट संगतीला जावून तेंची बरबादी व्हईल ह्येची मला लय धास्तीवाटते. सुरेश माज्या घरी राहिला तर मुलाना बी धाक राहील. तुमी माला पाच पैशे पण देव नुको. मी माजो सख्खो भाचोसमजून सांबाळीन. तेच्यासाटना भटाकडसून जेवणाचा डबा मागवीन मी . आता तुमी नाय म्हणायचाच नाय. मी धा रोजान मुंबयला वापस जानार तवा तेला माज्याबरोबर घेवन् जानार मी.”
वसुरेश रामभाऊ बारस्करांसोबत मुंबईला गेला.बी.कॉम. चा रिझल्ट लागला.सुरेशला फर्स्ट क्लास मिळाला. त्याने बी. कॉमला युनिव्हर्सिटीतच अॅडमिशन घेतली.रोज माटुंगा ते बोरीबंदर ट्रामने अप डाऊन करावे लागे. परत यायला संध्याकाळ होई. संध्याकाळी तो चारही मुलांचा अभ्यास घेई. तिन्हीसांजेला रामरक्षा, मारुती स्तोत्र शिकवी. तो रहायला गेल्या पासून रामभाऊनी तो घरात असताना मांसाहार रांधणे बंदच केलेले होते. बुधवार, रविवार सगळीहॉटेलात जावून मांसाहार करीत. रामभाऊ ड्युटी नसली की इंग्लिश दारू घ्यायचे . अधून मधून मित्र मंडळी जमवून घरी पार्टी व्हायची. पण सुरेशरहायला आला नी त्यानी तो नाद पूर्ण बंद केला. कुठेतरी पार्ट टाईम जॉब करायचा सुरेशचा विचार होता. पण रामभाऊ आणि मामीनी विरोध केला. त्याने एकमार्गी एम. कॉम. पूर्ण करावे करावे, ते केल्यावर चांगल्या नोकऱ्या चालत येतील .असा रास्त सल्ला त्यानी दिला. दोन वर्षात त्याला आपल्याकडचे पाच पैसेही रामभाऊनी खर्च करू दिले नाहीत. सुरेश सकाळी आंघोळ उरकल्यावर अथर्वशीर्ष, महिम्न, त्रिसूपर्ण म्हणत असे. सुरुवातीला तो अगदी हळू आवाजात म्हणता ऐकल्यावर बारस्कर म्हणाले, “द्येवाचे मंत्र मोट्यान म्हण आमका काय येयत नाय पण द्येवाचा नाव कानार पडॉने आमच्या पन.” मग तो मोठ्याने म्हणू लागला. रामभाऊ घरात असले की सुरेशचं म्हणणं संपेतो डोळे मिटून हात जोडून भक्तिभावाने ऐकत असत.
सुरेशने गुरूवारी संध्याकाळी आरत्या करायचा प्रघात सुरू केला. शेजारच्या बिऱ्हाडांमध्ये देवगड, मालवण, वेंगुर्लाअशा कोकणातल्या गावांमधली माणसं रहायची. दोन तीन रविवार गेल्यावर हळू हळू शेजारची मंडळी जमायला लागली. मग कोण कोण योजून पेढे, बर्फी प्रसादाला आणू लागली. बारस्करांकडची गुरूवारची आरती हा एक समारंभच बनला. मामी कौतुकाने म्हणायची सुरेश इलो नी आमच्याघराचा देवाळ झाला. पुढे सचिवालयात नोकरीला लागल्यावर सुरेश स्वतंत्र बिऱ्हाड करून रहायला लागल्यावरही आरतींची प्रथा सुरूच राहिली. सुरेश नी त्याची बायको दर गुरूवारी आवर्जून आरतीला हजररहात. एकदा रामभाऊ रात्रीच्याबंदोबस्तावरून जग्रणाचे येवून दिवाणखान्यात झोपले. त्या दिवशी आंघोळ करून आल्यावर त्यांची झोपमोड होवू नये म्हणून मनातल्या मनात म्हणत होता. त्याचा पायरव लागल्यावए बारस्कर उठून बसले. सुरेशला म्हणाले, “ तू आय मंतर नाय म्हणत?”त्यावर सुरेश बोलला. तुमची झोपमोड होईल म्हणून मी मनातल्या मनात म्हणतोय. त्यावर ते हसतबोलले, “ तरीच.... असा नुको करू, झोपोन मानसाचा अर्धा अयुक्ष्य गेला..... आमची पोलिसाची नोकरी. आमी कायम पापच करतंव, तुज्या निमित्तान देवाचा नाव कानार पडता. माका तेकडाच बरांवाटता. ह्या फुडे कदीव तू माज्या झोपेची काळजी करू नुको नी तुजो प्रघात मोडू नुको. ” (क्रमश:)