"आईचं प्रेम, हिशोबात नाही."
"माझी आई… शेवटीही माझीच होती!"
त्याची मनापासून इच्छा होती… आईच्या शेवटच्या प्रवासात सगळं स्वतःच्या हातांनी करावं. अगदी उरलेले क्षण तिच्या पायाशी बसून घालवावे. तिच्या मस्तकावर शेवटचा हात फिरवावा. पण घरच्यांनी त्याला थांबवलं.
"तू कुठे होतास तिच्या शेवटच्या क्षणी? दूर देशात, नोकरीच्या मागे धावत!"
"तुला काय हक्क आहे आता तिच्या शेवटचं करत बसण्याचा?"
"सगळी सेवा आम्हीच केली. रात्री रात्र जागून तिची काळजी घेतली आम्ही."
"आता प्रेम दाखवायचं? उशिर झाला रे!"
तो शांत होता… पण आतून मोडला होता.
त्याला ओरडून सांगावंसं वाटत होतं –
"तुम्ही तिची सेवा केली, शारीरिक… मी तिला आठवणीत ठेवत गेलो, दर क्षणाला.प्रत्येक श्वासाला,
तुम्ही तिचं औषध वेळेवर दिलं, मी तिचं नाव दिवसातून दहा वेळा घेतलं.
तुम्ही तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं असेल, पण माझ्या डोळ्यात ते कायम होतं."
हो… तो दूर होता. पण आई त्याच्या अगदी जवळ होती – मनात, आठवणीत, प्रत्येक श्वासात.
आईला माहीत होतं… तिचं पोरगं कुठेही असलं, ती त्याच्या मनाच्या उंबरठ्यावर राहतेय.
"तुम्ही प्रेम केलं, हो. त्याची सेवा करून दाखवलं.
पण मी? मी प्रेम जगलो… तिच्या आठवणींमध्ये, तिच्या पत्रांमध्ये, तिच्या शब्दांच्या स्पंदनात.
शेवटी मी तिचा मुलगा होतो… शेवटीही, शेवटच्या श्वासापर्यंत."
"तुमच्या हातात होती तिची सेवा, पण माझ्या अंतर्मनात होतं तिचं अस्तित्व."
"तुमची सेवा बोलली… माझं प्रेम गप्प बसलं."
"तुमची सेवा शब्दांत मांडता आली पण माझं प्रेम मला सिद्ध करता आलंच नाही.'"माझं प्रेम मोजता आलं असतं, तर कदाचित सिद्ध झालं असतं."
सेवा ‘दिसली’, म्हणून स्वीकारली गेली; प्रेम ‘जाणवलं’ नाही, म्हणून दुर्लक्षित झालं.
हाच तो हिशोब मला मांडता नाही आला.
आईचं प्रेम – हिशोबाच्या वहीत मावणं शक्यच नाही...
आईचं प्रेम म्हणजे उधारी नाही… ती तर कायमची ठेव आहे.
ती रक्कम नाही की जी वेळोवेळी तपासून बघावी लागते.
"जे हिशोब ठेवून जगतात, त्यांचं प्रेम कधीच 'पूर्ण' होत नाही."
"हे नातं नाळेच होतं… ते कधीच तुटत नाही! नाळेचं प्रेम कधीच मोजता येणार नाही.
"ती तशी तुमची आई होती, ती तशी माझी पण आई होती, असताना आणि नसताना, ती नेहमीच आईच राहणार आहे!"
"शेवटच्या क्षणी मी तिच्या पायाशी नव्हतो, पण आजही माझं मन तिच्या चरणांशीच लोटलेलं आहे."
"कारण ती आई होती… न सांगता समजून घेणारी, न जवळ असूनही जवळ असणारी!"
"आई आणि मुलाचं नातं हे जगा वेगळं असतं, एक न संपणारं धागा, जो जन्मभर जोडलेला राहतो."
"मला आयुष्यभर हीच खंत राहील… तिचा शेवट माझ्या हातून व्हायला हवा होता, पण तो ही अधिकारही नाकारला गेला. शेवटच्या क्षणी तिच्या पायाशी बसणं, तिच्या डोळ्यात डोळे मिळवणं, तिच्या श्वासावर माझा हात ठेवणं — काहीच शक्य झालं नाही. फक्त इतकंच राहिलं की, ती गेली… आणि माझ्या आत काहीतरी तुटून गेलं. तिच्या शेवटाचा भाग होणं माझं प्रेम होतं, जबाबदारी नव्हे… पण प्रेमावरही हक्क सिद्ध करावा लागतो, असं कळायला खूप उशीर झाला."
तू गेलीस… पण माझ्या जीवनात तुझ्या असण्याचं माप निश्चयच अजूनही आहे. शेवट कधीच नसतो, ते प्रेम हवं तेवढं असतं… फक्त कधीच सिद्ध होत नाही.""आईच्या जाण्याने एक जागा मोकळी झाली नाही… एक काळच संपला. जिथं आपले दुःख शब्दांशिवाय समजले जायचे, जिथं रागालाही माफ केलं जायचं, जिथं थकवा मिटायचा फक्त कुशीत शिरून… ती जागा आता फक्त आठवणीत राहिली. आई गेल्यावर घर तेच राहिलं, पण 'घरपण' हरवलं. तिच्या हातचं जेवण, तिच्या आठवणीने ओलावलेला पदर, आणि 'कधी आलास' असं विचारणारा आवाज… हे सगळं आता फक्त मनाच्या कोपऱ्यात उरलं. आई गेली नाही… ती अजूनही मनाच्या खोल कपाटात गंधासारखी दरवळते, पण आता ती मिठी पुन्हा कधीच मिळणार नाही, ही जाणीव आयुष्यभर टोचत राहणार."
धन्यवाद 🙏🏽
सौ तृप्ती श्रीकांत देव
भिलाई छत्तीसगड 11 /5/2025