दुपारच्या रणरणत्या उन्हात अन्नाचा वेध घेणारी गरीब मुले पाहिले की समजते उन्हाच्या चटक्यां पेक्षा रिकाम्या पोटाच्या वेदना जास्त त्रास देतात. जेव्हा पण गरीब मुलांना रणरणत्या उन्हात पोटाच्या भुकेसाठी फिरताना बघावं तेव्हा दर वेळेस माझे मन सुन्न होऊन जाते. काय करावं काही सुचत नाही .असं वाटतं देव यांच्याच सोबत इतका कठोर का वागतो .
दहावीत असताना मी एक दृष्य बघितले ते आठवले की आता देखील अंगाला काटा येतो .मी माझ्या दहावीच्या परीक्षेस जात असतांना, मी असं काही पाहिले की पेपर मध्ये लक्षच लागले नाही. फेब्रुवारीच्या कडक उन्हात , दुपारी बारा - एक वाजेच्या सुमारास गाडीवरून वडिलांसोबत जात होते मी. मी पाहिले की दोन अगदी छोटी मुले ,छोटी म्हणजे तो मुलगा तर एक दीड वर्षांचाच असावा आणि ती मुलगी तीन-चार वर्षांची असावी बहुधा, पायात चप्पल नाही ,अंगावर एकही वस्त्र नाही, वरून कडक उन्हाचा वर्षाव होत होता ,खाली पायाला काटे रुतत होते. तरी मात्र या दोघांना भीक मागत फिरावे लागत होते ,कोणी जेवायला देईल व ही पोटाची आग कमी होईल या आशेने ते कडक उन्हात दारोदारी फिरत होती. त्यांची अशी अवस्था पाहून सगळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती. एका दुकानदाराने मात्र त्यांना काही चॉकलेटी दिल्या चॉकलेट मिळताच त्या दोघी बालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. एखाद्या गरीब माणसाला जर अचानक करोडोची लॉटरी लागली तर त्याला जितका आनंद होईल ना काहीसा तसाच आनंद या बालकांना झाला दोन रुपयांच्या चॉकलेटी मिळाताच. आमची गाडी तर तिथून चालली गेली .मी शाळेतून घरी येईपर्यंत ती मुलं त्या भागातून चालली गेली होती पण, एक विचार माझ्या मनाला खात होता तो म्हणजे आपण श्रीमंतांची मुल ज्या वयात आईच्या हातांनी जेवण करतो, दिवसभर खेळणे खेळत असतो, पण त्याच वयात या मुलांना मात्र एक वेळचे जेवायला देईल का कोण्ही हा मोठा प्रश्न असतो .दारोदारी फिरावं लागतं त्यांना ,असं का. आपण चांगल्या घरात जन्माला आलो म्हणून आपण सगळ्या सुखसोयीं मध्ये राहतो. पण गरिब मुलांच्या नशीबी का हे वणवण भटकण. ही मुलं गरीबg घरात जन्माला आली यात त्यांची काय बरं चुक? हा प्रश्न माझ्या डोळ्यांसमोर वारंवार घुमत होता.
२०११ च्या जनगणनेनुसार आपल्या देशात तीन लाखांहून अधिक लहान मुलं वणवण फिरतात, भीक मागून जीवन जगत आहेत. कधी कधी तर उपाशीपोटीच झोपावे लागत असेल त्यांना .
एकीकडे हे दृश्य दिसते तर एकीकडे मात्र बेधुंद अन्न कचरापेटीत जाताना, वाया जाताना बघायला मिळते. अनेक कार्यक्रमात, हॉटेल्समध्ये रोज कितीतरी प्लेट अन्न वाया जात.जर आपण सगळ्यांनी जेवढ लागतं तेवढंच अन्न ताटात घेतलं तर बऱ्याच गरीब लोकांना जेवन भेटू शकते.
मी बर्याच लोकांकडून ऐकले आहे . "आपण एकट्याने अन्न वाचवून गरीब मुलांना मदत करून काय होणार आहे. आपणच कशाला मदत करायची बर , बाकीचे लोक करतील ना मदत. आपणच काय सगळ्या गोष्टींचा ठेका घेतला" . हे वाक्य अनेक वेळा ऐकली आहे मी, आणि काही शिक्षित लोकांकडून देखील. फार वाईट वाटते हे ऐकून खरंच शिक्षणाचा काय फायदा असा प्रश्न पडतो .
पहिला माणूस म्हणतो दुसरा मदत करेल त्यांना आणि दुसरा म्हणतो पहिला करेल मदत . यात कोणीच मदत करत नाही . हीच मानसिकता तर आपल्या सगळ्यांना मिळून बदलायला हवी. आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यात अगदी छोटे छोटे बदल केले जसे की वाढदिवसाला केक अंगाला फासण्याण्या पेक्षा त्याच पैश्यांनी काही गरिब मुलांना जेवायला देणे. लग्नसमारंभात जेवढे लागेल तेवढेच अन्न ताटात घेणे .कार्यक्रमात जास्त अन्न तयार केले असतील आणि लोक कमी आले तर ते फेकून देण्यापेक्षा गरीब मुलांना वाटायला हवे .असे व अश्या प्रकारचे अनेक छोटे - छोटे बदल जर आपण सगळ्यांनीच आपल्या आयुष्यात केले तर मला वाटतं की रणरणत्या उन्हात अन्नाचा वेध घेणाऱ्या मुलांची संख्या नक्कीच थोड्या प्रमाणात का होईना पण घटेल.
धन्यवाद