त्या दिवशी मी तिच्याकडे पाहिले आणि स्तब्ध होऊन गेले होते . आईच एक वेगळंच रूप बघायला मिळाले मला .माझी आई जी एरवी कुणी अनोळखी व्यक्ती जरी वारला तरी खूप रडायची .वर्तमानपत्रात जर तीने वाचलं कि कोणाचा मृत्यू झाला आहे ,तर आईचे लगेच डोळे पाणावतात ती व्यक्ती मग ओळखीची असो किंवा नसो. इतकी हळवी आहे माझी आई.
त्या दिवशी, म्हणजे ११ सप्टेंबर २०२०रोजी, चार - साडेचार वाजेच्या सुमारास जेव्हा आईला फोन आला की तिचे जीवनदाते वडील, म्हणजेच माझे आजोबा वारलेत असा निरोप आला. तेव्हा मात्र तिने डोळ्यातून एकही अश्रू येऊ दिला नव्हता. तिच्या अशा वागण्यामागे एक कारणं होत. ती रडत नव्हते कारण दुसर्या दिवशी तिच्या मुलाची ,म्हणजेच माझ्या दादाची खूप महत्त्वाची परीक्षा होती. ती परीक्षा ज्याच्यासाठी तो दोन वर्षांपासून खूप मेहनत करत होता. ती परीक्षा जी त्याला त्याच्या ड्रीम कॉलेजमध्ये ऍडमिशन देणार होती आणि खास म्हणजे अण्णांची फार इच्छा होती की त्यांच्या नातवाने खूप शिकावं .आम्ही आमच्या आजोबांना अण्णा म्हणायचो . अण्णांना नेहमी वाटायचे कि त्यांच्या काळी त्यांना शिक्षण करण्यासारखी परिस्थिती नव्हती पण त्यांनी त्यांच्या मुलीला खूप शिकवले आणि आता त्यांची इच्छा होती की त्यांच्या नात - नातूंनी खूप शिकाव .ते सगळ्यांना खूप अभिमानाने सांगत की त्यांचा नातू फार हुशार आहे नेहमी प्रथम क्रमांकाने पास होतो. त्यामुळे दादाची १२ तारखेची परीक्षा चांगली जायलाच हवी होती. म्हणूनच आई रडत नव्हती, तिच्या भावना मनातल्या मनात दाबत होती कारण तिला माहिती होतं की ती रडली तर दादाच अभ्यासात लक्ष लागणार नाही .उलट दादा आणि मी रडत होतो तर ,आई आम्हाला समजावत होती रडू नका आपल्या रडण्याने आपले अण्णा काही परत येणार नाही. ते तर देव बाप्पा कडे रहायला गेले. देव जसा आपल्यासाठी संकटात धावून येतो ना तसेच आता आपले अण्णा देवबाप्पा सोबत येत जातील वेळोवेळी आपल्या मदतीला. आई हे बोलत होती खरी पण आतुन ती फार खचली असेल हे मला कळत होते .कारण आई,अण्णांची फार लाडाची मुलगी होती. मला आईने एकदा सांगितले होते की तिच्या लहानपणी जर आजीने तिला काही घर काम करायला सांगितले तर अण्णा ,आजीला बोलायचे कि "माझ्या लेकीला घर काम सांगायची नाही ,तिला अभ्यास करू दे तिचं कामाचं वय नाही हे,तिला जसं जगायचे तसे जगु दे तिला,मोठी झाली की तिला सवय होईल बरोबर सगळ्या कामाची". आईचं तिच्या आई पेक्षा अण्णांसोबत चांगलं जमायचं. बर्याच मुलींना त्यांच्या आई पेक्षा वडील जास्त जवळचे असतात. आई त्यातलीच एक.
आईला नक्कीच अण्णांसोबतच्या असंख्य आठवणी आठवत असतील त्या क्षणी तरी ती मात्र तिच्या सर्व भावना मनातल्या मनात दाबत होती ते फक्त तिच्या मुलाच्या भविष्यासाठी .१२ तारीख आली, दादा सकाळी पाच वाजेच्या सुमारास परीक्षेसाठी गेला .तेव्हा मात्र आईच्या मनात दाबून ठेवलेल्या भावनांचा बांध फुटला. आई जोर जोरात रडु लागली. काल पासून दाबून ठेवलेला भावना एक - एक करून बाहेर येत होत्या. "माझे अण्णा गेले गं, मला सोडून" असे वारंवार म्हणत होती आई.
थोड्यावेळने आईची एक मैत्रीण आली आईला समजवायला , आधार देण्यासाठी. तेव्हा मी घरातील एका कोपर्यातून स्तब्ध होऊन आईला बघत होते. मला आईचे वेगळेच रूप बघायला मिळत होते. आई नेहमी तिच्या पहिले, मुलांबद्दल कसा काय विचार करू शकते. एवढी शक्ती आई कडे कुठून येते . आपल्या मुला मुलींसाठी किती विचार करते एक आई .
आपल्या मुलासाठी तिने जीवनदात्या वडिलांचे दुःख ती लपवत राहिली. आई खरंच खूप महान आहेस गं तु . तुझ्या सारखं दुसर कोणी नाही गं ह्या जगात.