Paavsanchya Sari - 2 in Marathi Love Stories by Arjun Sutar books and stories PDF | पावसांच्या सरी - भाग 2

Featured Books
Categories
Share

पावसांच्या सरी - भाग 2

आज खूप दिवसांनी बाल्कनीत बसून चहा घेण्याचा योग आला आहे. रोजच्या ऑफिसच्या कामामुळे आणि मुलांच्या शाळेच्या धावपळीत वेळ मिळत नाही. जर स्वतःच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळच नसेल, तर त्याला खऱ्या अर्थाने आयुष्य म्हणता येईल का? की स्त्रीचा जन्म फक्त इतरांसाठीच जगण्यासाठी झाला आहे? बाहेर एवढं सुंदर वातावरण आहे, आणि मी काय विचार करत आहे! त्या सुंदर निसर्गाचं, ढगांचं आणि एकूणच वातावरणाचं चहा घेत आनंद घेतला पाहिजे. पण आज हे ढग मला ओळखीचे का वाटत आहेत? असं वाटतंय, जणू काही यांची आणि माझी खूप जुनी ओळख आहे. त्यांना पाहून मनात एक वेगळीच चलबिचल आणि ओढ निर्माण झाली, जणू मीच त्यांची वाट पाहत होते. असं विचार करत असताना हवेत एक गारवा जाणवू लागला. जे ढग मला पाहून हसत होते, तेच आता मला पाहून आनंदाश्रू ढाळत आहेत असं वाटलं, आणि अचानक पाऊस सुरू झाला. जणू काही ते मला काहीतरी सांगू इच्छित आहेत.

त्या पावसाच्या सरी मला हळुवार विचारू लागल्या, 'विसरली आहेस का त्या गोड दिवसांना? कधी काळी याच पावसात मनसोक्त भिजून तू निखळ आनंदाचा वर्षाव अनुभवला होतास. वयाने मोठं झालं म्हणून मनाच्या आनंदाला का अडवतेस? आनंद देणाऱ्या गोष्टी कधीच विसरायच्या नसतात. आणि आठवतंय का, माझ्यामुळेच तुला तो पहिल्यांदा दिसला होता.

नाही, कसं विसरेन मी त्या ढगांना, पावसाच्या सरींना आणि त्या जादुई नजरेला! तसेच माझ्या महाविद्यालयातील अनमोल दिवसांना, जे मनाला गारवा देणारे आणि आनंद गगनाला भिडवणारे होते. ते दिवस म्हणजे मनाला सतत हुरहूर लावणारे, मंतरलेले क्षण होते. आज मी वैभवाच्या सुखात लोळत आहे, तरीही माझं मन जुन्या आठवणी का उकरून काढत आहे? जे काही राहून गेलं, त्याची आठवण आज तुझ्या रूपाने जागी झाली आहे. सुख केवळ बाह्य गोष्टींवर नसतं, तर मनाचं समाधानही तेवढंच महत्त्वाचं असतं, ही जाणीव आज नव्याने होत आहे.

२१ वर्षे उलटली, तरीही तो पाऊस, ते कॉलेज, आणि तो—सगळं अधूनमधून आठवत राहातं, जणू आयुष्याच्या सुंदर पुस्तकातील काही सोनेरी पानेच. आणि तो? तो तर माझ्या कल्पनेतील तेजस्वी राजकुमार होता, ज्याने माझ्या त्या तरल, तरुण मनावर एक अशी छाप सोडली, जी कधीच पुसली जाऊ शकत नाही  महाविद्यालयात जाण्यासाठी त्या वेळी मी जितकी उत्साही होते, तितकीच मनात थोडी भीतीही होती. मी लाजाळू स्वभावाची आणि फारशी बोलणारी नव्हते, त्यामुळे माझी पटकन कोणाशी मैत्री होत नसे. मात्र, मला माझ्या स्वतःच्या विश्वात रमून राहायला खूप आवडायचं. महाविद्यालयात नवीन मैत्रिणी कशा असतील आणि मुले कशी असतील, याचंही खूप आकर्षण होतं. आणि का नसावं? दहावीपर्यंत मी फक्त मुलींच्या शाळेत शिकले होते, त्यामुळे मुलांशी कधीच संपर्क आला नव्हता.

आता, महाविद्यालयात दोन वर्षं त्यांच्यासोबत शिकायचं होतं, याचा थोडा दबावही होता आणि थोडी उत्सुकताही. पण या सगळ्या भावना मला व्यक्त करण्याचं फारसं स्वातंत्र्य नव्हतं. समाजात असा भेदभाव का आहे, हे मला कळत नव्हतं त्यावेळी. यौवन म्हणजे जणू आमच्यासाठी दुसऱ्या जन्मासारखं, एका वेगळ्या जगात प्रवेश केल्यासारखं वाटत होतं. शारीरिक, मानसिक, आणि भावनिकदृष्ट्या मोठ्या बदलांचा अनुभव घेण्याचं हे वय होतं.

त्या वयात मी खूप भावनिक आणि संवेदनशील होते. प्रेम, आपुलकी, आणि नात्यांच्या जाणीवा या वयात अधिक तीव्रतेने अनुभवायला मिळतात. 'माझं रूप कसं असेल?' 'लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील?' अशा विचारांनी मन भरलेलं असायचं. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा आणि स्वतःला समजून घेण्याचा हा काळ म्हणजे यौवन. जणू फुलपाखरांसारखं मन बागडत होतं, प्रत्येक क्षणात आनंद शोधत होतं. पण दुसऱ्या बाजूला, समाजाच्या दृष्टिकोनातून हे वय म्हणजे मुलींच्या पायांना बेड्या घालण्याचा काळ वाटत होता मला. जणू हवेत मुक्तपणे उडणाऱ्या पक्ष्याला पिंजऱ्यात बंद केल्यासारखं. नियम, बंधनं, आणि वयाचं कारण सांगत आम्हाला मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता, असंही वाटत होतं.

आईच्या वागण्यात अचानक बदल दिसू लागले. तिच्या वर्तनावरून मला जाणवलं की, मी आता मोठी झाले आहे. पण माझं मोठं होणं हे त्यांचे काळजीचे कारण का असावे, एवढं. असे अनेक प्रश्न मनात असायचे, 'कदाचित माझ्या काळजी पोटी आणि प्रेमापोटी हे असे विचार करत असतील.' खरे तर अशा वेळी, आयुष्यात एक मोठी बहीण असणे किंवा चांगली मैत्रिण असणे, हे किती गरजेचे आहे याची जाणीव झाली होती.

अशा वयात, माझा महाविद्यालयीन शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. मी मुळातच अभ्यासू असल्याने, बाबांनी माझ्यासाठी विज्ञान शाखेचा पर्याय निवडला होता. बाबांना तर माझं खूप कौतुक वाटायचं. अभ्यासाशिवाय, मला कविता आणि चारोळी वाचनाची खूप आवड होती. रात्री जागून, कधी कधी मी कविता आणि चारोळींची पुस्तके वाचायची, जणू त्या माझ्या मैत्रिणीच होत्या. त्या पुस्तकांनीच माझ्या कल्पनांना पंख दिले आणि मला भरारी घ्यायला शिकवले होते.

कॉलेज सुरू होऊन तीन महिने कधी संपले, हे मला कळलेच नाही. गणिताचा जादा तास आणि रविवार असल्याने, मी वेगळा ड्रेस घालून कॉलेजला जाणार या विचाराने मी खूप आनंदी होते. बरेच दिवसांनी, स्वतःला एका वेगळ्या रूपात पाहणार होते. आईने कौतुकाने म्हटलं, 'आज खूप गोड आणि सुंदर दिसतेस.' तिच्या त्या शब्दांनी आणि डोक्यावरून फिरवलेल्या हाताने मी अजूनच आनंदित झाले.

मी कॉलेजला जायला निघाले, पण थोडं अंतर गेल्यावर आकाशात काळे ढग दाटून आले, आणि कधीही पाऊस येईल, असं वातावरण तयार झालं. मात्र, मला काळजी वाटण्याऐवजी त्या ढगांकडे पाहून खूप आनंद झाला. जणू ते मलाच बघायला आले होते. माझं रूप न्याहाळण्यासाठी इंद्रदेवाने त्यांना पाठवलं असावं, असा विचार मनात आला. जा, बघून या पृथ्वीतलावर कोणती सुंदरी अवतरली आहे. तिच्या सौंदर्याची चर्चा स्वर्गापर्यंत पोहोचली आहे. हे विचार मनात असतानाच, ढगांनी आपल्या थेंबांनी चिंब भिजवायला सुरुवात केली. कदाचित, त्यांना मला या रूपात पाहायचं असेल! कसेबसे मी स्टॅंडवर पोहोचले, पण रविवार असल्यामुळे बस लवकर आली नाही. तासाला उशीर होईल, या विचाराने अस्वस्थ वाटत होतं. माझ्यासोबत आणखी दोन मैत्रिणी होत्या. गप्पा मारताना आणि पावसाचा आनंद घेताना सगळा तणाव आम्ही विसरून गेलो.

गाडीत बसल्यानंतरही आमच्या एकमेकींनी घातलेल्या ड्रेसबद्दल चर्चा सुरूच होत्या. पण आज घातलेला शुभ्र पांढऱ्या रंगाचा ड्रेस मला खूपच शोभून दिसत होता. "आज तू पारिजातकाच्या फुलासारखी सुंदर आणि आकर्षक दिसत आहेस," असं कौतुक माझ्या मैत्रिणीने केलं आणि 'तुझ्या या रूपाने काय होणार आहे? त्या मुलांचे काय माहिती?' असं लाडिवळपणे ती मला चिडवू लागली. यामुळे माझा आत्मविश्वास अजूनच वाढला आणि तो माझ्या चेहऱ्यावर उमठला. “मनापासून केलेले कौतुक एखाद्याला किती आनंद देऊन जातं, याची मला जाणीव झाली”

अजूनही पावसाच्या बारीक सरी सुरू होत्या. पावसात भिजल्यामुळे माझे केस किंचित ओले झाले होते, आणि त्यातून गारवा जाणवत होता. मी वर्गात प्रवेश केला आणि बसायला जागा कुठे मिळतेय यासाठी मी नजर फिरवली. पण सगळे जण जणू काही माझ्याकडेच बघत असल्यासारखं वाटलं, त्यामुळे मी पटकन नजर खाली करून शेवटच्या बाकावर जाऊन बसले. आणि वही आणि पेन काढून फळ्यावर जे सुरू आहे ते लिहू लागले. पावसाच्या आवाजाने माझं लक्ष सहज खिडकीकडे वळलं. बाहेर हिरवागार निसर्ग आणि पावसाचं सौंदर्य पाहताना, लक्षात आलं की बाजूलाच बसलेला एक मुलगा माझ्याकडे पाहत आहे. मी क्षणातच नजर चुकवली आणि गणिताच्या पुस्तकात डोकं खुपसून सर काय शिकवत आहेत, ते वहीत लिहू लागले. पण मन काही तिथे रमेना. जरा वेळाने परत चोरून थोडंसं बघितलं, तर तो अजूनही माझ्याकडेच पाहत असल्यासारखं वाटलं. तो का बघत असेल?  मला खरेतर राग यायला हवा होता, पण त्याचं बघणं कुठेतरी मला आवडत होतं.

 'कोण आहे हा?' माझ्या बाजूला बसलेल्या मैत्रिणीकडे वळून मी हळूच विचारलं, 'ओळखतेस का याला?' ती हसत म्हणाली, 'नाही माहित गं. कदाचित दुसऱ्या तुकडी मधील असावा. आणि जरी आपल्या वर्गातला असला तरी कसं ओळखणार होतो आम्ही? कारण नुकताच कॉलेज सुरू झाले होते , आणि एवढा मोठा वर्ग होता आमचा. त्यामुळे लक्ष नव्हतं जात सर्वांकडे. शिक्षकाच्या तोंडी पण ठराविक मुलं आणि मुली यांचीच नावे असायची. त्यामुळे नावं आणि चेहरे लक्षात येत नव्हते. मग ती खट्याळपणे म्हणाली, 'तो तुझ्याकडेच बघत होता.' हे ऐकून मात्र माझं मन अधिकच अस्वस्थ झालं. का, कोणास ठाऊक, पण नकळत मी गालावर आलेली केसांची बट कानामागे सरकवली. त्याचवेळी, स्वतःला सावरत मी पुन्हा पुस्तकात डोकं खुपसून गणित समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. पण मनाचा ताबा घेणं कठीण झालं. एक विचार सतत मनात येत होता—'हे गणित सोडवणार कोण? आणि कोण आहे तो मुलगा?  

माझा हात सतत माझ्या केसांकडे जात होता, आणि मनात एक चलबिचल सुरू झाली होती. आवाज पण थोडासा वेगळा झाला आहे असे वाटत होते. पायाचे वळवळ वाढली होती, जणू माझं शरीर रोमांचित झालं होतं त्या नजरेने. देवाने प्रत्येक मनुष्याला कवीमन दिले आहे, रसिकतेची जाण दिली आहे. पण त्या भावना उमलायला योग्य वेळ यावी लागते. कदाचित ते कवीमन माझ्यातही डोकावू लागले असावे. त्या क्षणी, गणिताच्या आकड्यांपेक्षा त्याच्या नजरेतच मला जास्त रस वाटत होता. खरं तर, त्याच्या बघण्याचा मला राग यायला हवा होता. पण का, कोणास ठाऊक, आज मला एक वेगळाच आनंद वाटत होता. "कोणी तरी आपल्याकडे बघतंय," ही भावना मुलींना कधी कधी आनंददायी वाटते. मनात आनंद असेल, तर तो चेहऱ्यावरही उमठतोच. माझ्या चेहऱ्यावर एक गोड स्मितहास्य उमटलं होतं, आणि गालावर एक वेगळीच लाली आली होती. कवीमन काहीतरी सांगू पाहत होतं—एक गूढ आणि गोड भावना माझ्या मनात घर करू लागली होती. 'हा कोण असेल?' माझ्या मनात विचार सुरू झाला. 'याला कोणत्या नावाने हाक मारू मी?

आकाशी नभ दाटून आले,
थंडगार वारे वाहून आले.
शिरशिरी शरीरात भरली,
यौवनात मी नाहून गेली

बाणासारखी नजर तुझी,
मोहित मजला फार करते.
माझं मन का गं बरे,
असे व्याकुळ खूप होते

रूप तुझे अनोखं आणि सुंदर,
जणू मज भासे तू एक स्वप्नसुंदर.
काही केल्या तरी नजर हटेना,
तुझ्या शिवाय मज चैनच पडेना

नाव तुझे मजला ना ठाऊक,
तरीही माझ्या जीवा लागे तगमग.
पावसाच्या सरीत चिंब मी भिजले,
तुझ्या नजरेच्या खेळात हरवून गेले

तो नेमका कोण आहे, हे जाणून घ्यायची उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या महाविद्यालयातील एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये एका मुलाचं नाव ओळखायचं तरी कसं? विचारांच्या त्या गोंधळातच मी त्याला एक नाव देऊन टाकायचं ठरवलं. तेवढ्यात, माझ्या मैत्रिणीने माझ्या चेहऱ्यावरचं स्मित आणि मनाची चलबिचल ओळखली असावी. तिने माझ्या हाताला हलकासा चिमटा काढला आणि खट्याळपणे हसत म्हणाली, 'काय चाललंय ग, काय गुपित आहे?' तिचं बोलणं ऐकून, मी ते हसून टाळलं. गणिताचा तास कधी संपला, हेही मला कळलं नाही. मी वर्गात असूनही, माझं मन मात्र कुठेतरी दूर भटकत होतं त्या मुलाच्या नजरेत हरवून गेले होते.

घरी पोचल्यानंतरही माझ्या मनात सतत कॉलेजचा आणि त्या नजरेचा विचार चालू होता. 'पुन्हा कधी कॉलेजला जाईन? आणि त्याच्या नावाच्या गणिताचे कोडे कधी सोडवीन?' या विचारात मी रमले होते. ज्या ज्या वेळी आमचा एकत्र तास असेल, तेव्हा माझी नजर नकळत त्याचा शोध घेई. एकदा-दोनदा तो माझ्या समोरून गेला, तेव्हा मनात आनंदाची एक लहर उसळली. पण दुसऱ्याच क्षणी त्याने मला बघूनही दुर्लक्ष केलं, हे पाहून रागही आला. 'तो असं का वागतो?' हा प्रश्न सतत माझ्या मनाला सतावत राहिला. मी खूप वेळा त्याच्याकडे पाहिलं, पण त्याचं असं वागणं मला काही केल्या समजलं नाही. त्याचा रागही यायचा अश्या वागण्याचा.

देवाने मुलींना अधिक संवेदनशीलता दिली आहे, त्यामुळे त्या शब्दांशिवायही अनेक गोष्टी समजू शकतात; अंतर्मनातून संकेत ओळखू शकतात. त्याच्या वागण्यावरून एवढं मात्र समजलं की, तो एका विवंचनेत आहे. कदाचित, त्याला माझ्या मनात फुटलेल्या प्रेमाच्या अंकुरांची जाणीव झाली असावी. आणि म्हणूनच, तो माझ्या पासून लांब राहून स्वतःला सावरण्याचा, त्या गोंधळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या मनात सुरू असलेल्या घुसमटीची कल्पना करून नकळत दयाही वाटायची.  

खूप वेळा मी त्याला दुपारच्या सुट्टीत बघायचे. तो नेहमी कधी त्याच्या पुस्तकांसोबत दिसायचा, तर कधी त्याच्या मित्रांसोबत. काही वेळा तो माझ्या वर्गातही दिसायचा, त्याच्या मित्रांसोबत येत-जात असायचा. त्याच्या वागणुकीवरून मला एवढं मात्र समजलं की, तो अभ्यासाबाबत खूपच गंभीर आहे. कदाचित त्यालाही त्याच्या भविष्याची काळजी अधिक असेल. तो कधीच कुठे वायफळ गप्पा मारताना किंवा उगाच वेळ वाया घालवताना दिसला नव्हता. त्यामुळे त्याच्याबद्दलचं माझं आकर्षण अजूनच वाढत गेलं, आणि तो हसताना तर मला अगदी लहान मुलांसारखा आहे असा भास होई. खूप निर्मळ मनाचा आणि साधा असेल असं वाटायचं त्याच्याकडे बघून. काही तरी कारण काढून त्याच्याशी दोन शब्द बोलावेत असा मी विचार केला, पण मनाला जणू माझ्या संस्कार आणि भीती या अदृश्य दोरीने अडवून ठेवलं होतं. 'स्वतःहून बोलायला गेलीस, तर तो तुझ्याबद्दल काय विचार करेल?' हा प्रश्न माझ्या मनात वारंवार घोंगावत राहायचा.  विशेष म्हणजे त्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असायची. त्याचं नावही फारसं कोणाच्या तोंडून ऐकू यायचं नाही. ना कधी कोणत्या सरांनी त्याला बोलावलं, ना कधी मॅडमने त्याचा उल्लेख केला. जणू तो वर्गात असूनही, एका गूढ सावल्यासारखा राहत होता.  जर कधी तो समोर आला, तर तो माझ्याकडे बघून नजर खाली घालून जात असे, आणि रस्ता बदलण्याचाही प्रयत्न करत असे. त्याचं असं वागणं मला खूप गोंधळात टाकायचं. कदाचित त्याचं हे वागणे मला त्याच्याकडे अधिक ओढत होतं.

मी थोडीशी लाजाळू असले तरी, माझ्या स्वप्नांसाठी धडपड करणारी आणि माझ्या घरच्यांचा अभिमान जपणारी एक कणखर युवती होते. म्हणूनच मी माझं संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं होतं. मेहनत करून त्यांचं नाव मोठं करायचं आणि मोहाच्या क्षणांना बळी पडायचं नाही, असं मी ठरवलं होतं.
कारण शेवटी, हे माझ्या वयाचं आणि परिस्थितीचं एक आकर्षण असू शकतं, याची मला जाणीव होती.
अशा मोहाला न जुमानता माझ्या ध्येयाच्या दिशेने पुढे जाणं, हेच मला महत्त्वाचं वाटत होतं.

पण दुसरीकडे, असंही वाटायचं की त्याने स्वतःहून माझ्याशी बोलावं, माझ्या भावनांना समजून घ्यावं.
तो माझ्या आयुष्यातला पहिला पाऊस होता, ज्याने माझ्या मनात प्रेमाचा ओलावा आणला होता.
तो माझ्या आयुष्यातून निघून गेला, तर काय होईल? या विचारांनी मनात सतत वादळ उठायचं.
मात्र, माझ्या वडिलांच्या अपेक्षा आणि मिळालेली शिक्षणाची संधी यामुळे मी अशा विचारांना बळी पडणं योग्य नव्हतं.  घरच्यांना माझा अभिमान वाटत होता, आणि तो कायम राखणं हेच माझं कर्तव्य होतं.
यालाच कदाचित म्हणतात, प्रत्येकाच्या मनात दोन विरोधी विचार असतात.एक ज्याला भावना म्हणतात आणि दुसरं ज्याला कर्तव्य म्हणतात.

जसं अर्जुनाने मत्स्याच्या डोळ्यावर नेम धरून लक्ष्य साधलं होतं, तसंच त्यालाही संयम आणि कठोर परिश्रम करत माझं मन जिंकायचं आहे. रणांगणात लढणं सोपं असतं, पण मनाचं युद्ध जिंकणं खूप कठीण असतं. कधी कधी त्याच्या संयमाला पाहून वाटायचं, की मीच त्याचं मन जिंकायचा प्रयत्न करावा.  पण नाही—"ही लढाई त्याची आहे आणि त्यालाच जिंकायची आहे".

त्याने माझ्या हृदयाचा ठाव घेतला आणि आनंदाचा झरा सुरू केला होता. त्याच्या नजरेतून त्याच्या भावना मला स्पष्ट दिसल्या होत्या. मात्र, काही भावना प्रत्यक्ष शब्दांतून ऐकायला मिळाल्या, तर त्या अधिक आनंददायी आणि अनमोल वाटतात.

त्या आनंदाच्या क्षणी मी स्वतःवर संयम ठेवला आणि निर्णय घेतला की त्याची तपश्चर्या भंग करायची नाही. माझं वागणं आणि भावना त्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा ठरू नयेत, यासाठी मी काळजी घेत होती. कारण त्याच्या भविष्याचा विचार करताना, त्याचं यश मला जास्त महत्त्वाचं वाटत होतं आणि ते माझ्या आनंदापेक्षा मोठं आहे, असं मला जाणवले. मुली मुलांपेक्षा लवकर प्रगल्भ होतात. कदाचित हीच माझ्या प्रगल्भतेची खरी कसोटी असेल. मला त्याच्या अपयशाचे कारण होणे अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे त्याच्यापासून लांब राहणे हेच योग्य ठरले.

जर नियतीच्या मनात असेल, तर त्याच्याशी पुन्हा भेट होईल आणि तो कधी तरी वेगळ्या रूपात समोर येईल. आज तो माझ्यापासून दूर गेला असला, तरी मला खात्री आहे की त्याच्या नावाची कीर्ती आणि यशाचा डंका कुठे तरी वाजत असेल. मला विश्वास आहे की एक दिवस त्याचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचेल.

अशा विचारांत मी गुंग होते, तेवढ्यात अचानक दरवाज्याची बेल वाजली. त्या आवाजाने मी दचकून भानावर आले. दरवाजा उघडल्यावर माझी छोटी मुलगी शाळेतून परत आलेली होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी स्पष्ट दिसत होता. ती उत्साहाने म्हणाली, 'आई, आज शाळेत आम्हाला "माझे बाबा" या विषयावर निबंध लिहायला सांगितला आहे. 

                                                       समाप्त.