Paavsanchya Sari - 3 in Marathi Love Stories by Arjun Sutar books and stories PDF | पावसांच्या सरी - भाग 3

Featured Books
Categories
Share

पावसांच्या सरी - भाग 3

आज एवढं ट्रॅफिक का झालंय, काही कळत नाही. मोबाइलवर सतत मेसेज नोटिफिकेशन्स येत आहेत. "जाऊ दे," असं मनाशी म्हणत, ऑफिस संपल्यावर घरी जाऊन बघू असं ठरवलं. या विचाराने मी मोबाइलकडे दुर्लक्ष केलं आणि रस्त्यावर ट्रॅफिक मोकळं होण्याची वाट पाहू लागलो.

बघता बघता या कंपनीत आठ वर्षं कधी झाली, ते कळलंच नाही. खरं तर, इतक्या लांब नोकरीसाठी येईन, याची कल्पनाही नव्हती. पण काही महिन्यांचाच काळ उलटला असावा, असे वाटत असतानाच संपूर्ण आठ वर्षं कधी निघून गेली, हे समजलेच नाही.

शेवटी ट्रॅफिक मोकळं झालं, आणि माझ्या कारने वेग घेतला. पुढच्या तीस मिनिटांतच मी घरी पोहोचलो. शाळेला सुट्टी असल्यामुळे घरचे सगळे गावाकडे गेले होते, त्यामुळे मला इथे एकट्याने एक महिना राहायचं आहे.

“आयुष्यात कधी तरी माणसाला एकटेपणाही हवा असतो, स्वतःची ओळख करून घेण्यासाठी.”

“असे कोणते मेसेज आले आहेत?”  या विचाराने मी मोबाइल हातात घेतला. बघतो तर काय, ६० पेक्षा जास्त नवीन नंबर एका ग्रुपमध्ये दिसत होते – “2002-2003 Batch Reunion WhatsApp ग्रुप”

"मला कोणी ॲड केलंय?" असा विचार करत मी ग्रुप तपासू लागलो. खरं सांगायचं तर, इतक्या वर्षांनंतर असा पहिला ग्रुप तयार झाला होता. कुतूहलाने मी मेसेज वाचत गेलो आणि ग्रुपमध्ये कोण कोण आहे ते बघू लागलो.

माझे शाळेतील आणि कॉलेजमधील बरेच मित्र-मैत्रिणी मला दिसू लागले. सर्वप्रथम "लाल्या" आहे का ते शोधलं. कारण लाल्या" हा माझ्या प्रत्येक सुखदुःखाचा साक्षीदार राहिलेला आहे. त्याला पाहून खूप आनंद झाला. हळूहळू, या ग्रुपच्या रूपाने माझे जुने मित्र, मैत्रिणी, आणि त्यांच्यासोबतच्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. सगळे किती उत्साहाने गप्पा मारत होते!

मी विचार केला, "मी पण एक मेसेज टाकू का?" पण लगेच मनात आलं, "नको, असंही मला गेट-टुगेदरला जायला जमणार नाही." म्हणून मोबाइल बाजूला ठेवला आणि परत संध्याकाळच्या जेवणाची ऑर्डर काय द्यायची, याचा विचार करू लागलो.

पण मन मात्र शांत नव्हतं. एकच विचार सतत घोळत होता – मला गेट-टुगेदरला जायला हवं का नको? इतकी वर्षं झाली, बाहेर एकटाच राहतोय. जुन्या मित्रांशी संपर्क जवळजवळ तुटलाच आहे. आता पुन्हा त्यांना भेटण्याची हीच एक संधी असेल का?

प्रत्येक वर्षी सुट्टी घेतल्यावर गावाकडे जातो आणि ठरलेले चार-पाच मित्रांना भेटून परत येतो. पण यावेळी गेट-टुगेदर आहे – माझ्या बॅचमधील बाकीचे मित्रही भेटणार आहेत. "काय करत असतील सगळे?" असा विचार मनात आला.

सोशल मीडियाचा जमाना असूनही, अनेक मित्रांशी मी अजूनही बोललो नाही. शाळेतील आणि कॉलेजमधील कित्येक मित्र-मैत्रिणी आहेत, ज्यांच्याशी मी कित्येक वर्षे संवाद साधलेलाच नाही. आयुष्यात आपण एवढे व्यस्त कसे झालो आहोत, की शाळेच्या आणि कॉलेजच्या सुंदर आठवणी ज्या मित्र-मैत्रिणींसोबत जोडल्या आहेत, त्यांच्यासोबत दोन मिनिटं बोलायलाही वेळ मिळू नये?

आणि एवढे सगळे करून जर मी आयुष्यात खूप मोठे यश मिळवले, पण ते साजरे करण्यासाठी सोबत कोणीच नसेल, बोलायला कोणी नसेल, तर अशा यशाला काय अर्थ आहे? माऊंट एव्हरेस्टवर नक्कीच जावे, पण तिथे पोहोचल्यानंतर आपल्याला शाबासकी देणारे आणि आपला आनंद साजरा करणारे निदान चार मित्र-मैत्रिणी तरी हवेत.

आणि मैत्रिणी? त्या तर हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या. कधी तरी त्या ऑनलाइन दिसतात किंवा योगायोगाने रस्त्यात भेटतात. पण त्यांच्यासोबतही बोलणे होत नाही. आपण एवढे एकटे कसे झालो आहोत?

पण मनात विचार आला – 'मला ओळखतील का तरी? बारावी झाल्यापासून तब्बल २१ वर्षं झाली आहेत. सगळं किती बदलून गेलं आहे!' असा विचार करत असताना कधी आठ वाजले, ते समजलंच नाही.

टीव्हीवर किशोरकुमारचं "रिमझिम गिरे सावन" गाणं लागलेलं होतं – वातावरण शांत आणि नॉस्टॅल्जिक होतं. पण या वेळी मोबाईल बाजूला ठेवणं जमत नव्हतं. सारखेच मेसेज येत होते. ग्रुपमध्ये काही नवीन नंबर अ‍ॅड होत असल्याचंही दिसत होतं. त्यात काही मुलींचे नंबरसुद्धा होते.

"तीही असेल का या ग्रुपमध्ये?" असा विचार मनात आला. ती या गेट-टुगेदरला येईल का? मागच्या २१ वर्षांत ती कुठेच दिसली नाही, ना कधी तिच्याशी बोलणं झालं. खरं तर, कॉलेजच्या काळातही आम्ही अनेकदा समोरासमोर आलो होतो, पण मी कधीच तिच्याशी बोललो नाही.

आता ती कुठे असेल आणि काय करत असेल? "ती सध्या काय करत असेल?" – हा एकच विचार मनात सतत घोळत राहिला. तिच्याबद्दल मी कधीच कोणाशी बोललो नव्हतो. अगदी माझा खास मित्र "लाल्या" यालाही सांगितले नाही कधी  त्यामुळे जर तिच्याविषयी कोणा मित्राला विचारलं, तर त्यांचा पहिला प्रश्न हाच असेल – "हा तिच्याबद्दल का विचारतोय?

आमच्या दोघांचे वर्ग वेगळे होते. फक्त गणित आणि बायोलॉजीच्या तासाला आम्ही एकत्र असायचो. खूप वेळा दुपारच्या सुट्टीत मी माझ्या मित्रांना भेटायला तिच्या वर्गाजवळ जायचो. कधी पुस्तकं, कधी नोट्स, काहीतरी निमित्त शोधायचो. पण कधीच तिच्याशी बोलायची हिंमत झाली नाही. सतत मनावर एका दडपणाचं ओझं होतं – परीक्षेचा आणि अभ्यासाचा ताण तर होताच, पण त्याहूनही मोठी भीती होती घरच्यांची. "घरच्यांना समजलं तर माझं कॉलेज बंद होईल," या भीतीने मन गांगरून जायचं. तरीही, वाटतं, एकदा तरी तिच्याशी बोलायला हवं होतं. त्या वेळेस काय बरोबर आणि काय चूक, हे मलाच कळत नव्हतं.

पण या गेट-टुगेदरमध्ये ती पुन्हा माझ्यासमोर आली, तर काय होईल? या वेळी तरी मला तिच्यासोबत बोलता येईल का? मला तिच्याशी नक्कीच बोलले पाहिजे. आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही, पण ती समजून घेईल का मी जे काही बोलेन ते?

मी पण काय असे विचार करत बसलोय! अजून गेट-टुगेदर होईल की नाही, हेही माहित नाही. सध्या तर फक्त हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार झाला आहे, तेही इतक्या वर्षांनंतर.

"सकाळी लवकर ऑफिसला जायचं आहे." असा विचार करत मी अखेर मोबाईल बाजूला ठेवला आणि लवकर झोपी गेलो.

आज ऑफिसमध्ये आल्यापासून सतत मोबाईलवर नोटिफिकेशन्स येत होत्या. पण ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे मी सगळी नोटिफिकेशन्स सायलेंट करून कामाला सुरुवात केली.

"लाल्या" चा एक मेसेज आणि कॉलसुद्धा येऊन गेला होता.

दुपारी लंच ब्रेकमध्ये मी मोबाईल घेतला आणि पहिला कॉल "लाल्याला" केला.

लाल्या: अरे अन्या, कुठे आहेस तू? किती कॉल आणि मेसेज केले तुला!

मी: अरे, ऑफिसमध्ये मीटिंग होती रे. बोल, काय झालं?

लाल्या: अरे, ग्रुप पाहिलास का? आपल्या १२वी बॅचच्या गेट-टुगेदरबद्दल चर्चा सुरू आहे! खूप लोकांचे नंबरही ग्रुपमध्ये अ‍ॅड झाले आहेत. अरे, तुला आठवतंय का – ती शॉर्ट हेअर वाली, नेहमी स्टाईल मारणारी?

मी: अरे लाल्या, ऑफिसमध्ये आहे मी.

लाल्या: बरं ठीक. ग्रुप बघ आणि संध्याकाळी मला नक्की कॉल कर.

कॉल झाल्यानंतर मी पुन्हा माझ्या कामाकडे वळलो. पण आता मात्र मनात एकच विचार घोळत होता – कधी ऑफिस सुटेल?

"लाल्या" आणि "अभ्या" हे दोघे माझे शाळेतील आणि बालपणीचे खास मित्र. हे दोघेही सोबत आले, तर गेट-टुगेदरमध्ये नक्की धमाल होईल.

मला लाल्याची एक गोष्ट खरोखर कमाल वाटते – डोक्यावर दुःखांचे डोंगर आणि आर्थिक अडचणी असूनही तो नेहमीच त्यातून मार्ग काढतो, आणि तेही मोठ्या धैर्याने. विशेष म्हणजे, मी त्याला खूप कमी वेळा तणावाखाली पाहिलं आहे. तो नेहमी हसतमुख असतो आणि मदतीसाठी तत्पर राहतो.

शाळा आणि कॉलेजमध्ये माझे बरेच मित्र होते, पण लाल्या मात्र नेहमीच वेगळा ठरला. तो प्रत्येक प्रसंगात माझ्यासोबत उभा राहिला आहे. इतकंच काय, माझ्या घरच्यांनीही त्याला चांगलं ओळखलं आहे आणि त्याचा आदर केला आहे. लाल्या खऱ्या अर्थाने जीवन जगतोय आणि त्याचा आनंद घेतोय, असं मला नेहमीच वाटतं. आयुष्यात बिनधास्तपणा हवा! मनमोकळेपणाने, जे आवडतं ते करता आलं पाहिजे!

लाल्याला तिच्याविषयी एकदा तरी सांगायला पाहिजे होतं, असं वाटतं. पण त्याचा तो धडकेबाज स्वभाव पाहून मला त्याला काहीही सांगावंसं वाटलं नाही. जर त्याला हे समजलं असतं, तर त्याने काय केलं असतं, याची कल्पना केली तरी हसू येतं – त्याने स्वतःच तिच्यासाठी एक चिठ्ठी लिहिली असती, त्यावर माझे नाव टाकले असते आणि मग तिच्यासमोर दणक्यात ती चिठ्ठी वाचली असती! त्यानंतर काय झालं असतं, याची कल्पनाही न केलेली बरी. पण आता, जर माझ्या मित्रांना तिच्याविषयी कळलं तर? मला वाटतं, ते समजून घेतील. शेवटी, ही एक अशी भावना आहे जी कधीच व्यक्त झालेली नाही. आणि आज ना उद्या, ती कधी ना कधी व्यक्त झाली पाहिजे. फक्त वेळ अली पाहिजे... तशी!

घरी पोचताच, सर्वात पहिल्यांदा मी "लाल्या"ला कॉल केला.

लाल्या:  मी खूप एक्साइटेड आहे रे! ग्रुप पाहिलास का? अरे, अ‍ॅडमिनने 120 पेक्षा जास्त मित्र-मैत्रिणींना ग्रुपमध्ये ऍड केलं आहे!

मी: पण इतक्या वर्षांनंतर गेट-टुगेदरचं सुचलं कसं? बऱ्याच जणांना चेहरा सोड, नावही आठवत नसेल!

लाल्या: अरे, आपण नक्की जावं! सगळे भेटतील आपल्याला, खूप धमाल होईल रे!

मी: तू कोणाची वाट बघत आहेस गेट टूगेदरमध्ये?

लाल्या: (हसत हसत)  ते जाऊ दे. तू स्टेशनवर ये, मग आपण दोघं एकत्र जाऊ. स्टेशनपासून आपल्याला पुढे  100 किलोमीटर जायचं आहे.

व्हाट्सअॅप  ग्रुपमध्ये  'साऊ' आणि 'परी' यांचे मेसेज बघितले.  खरं तर, 'साऊ' आमच्या बॅचमधली एक अभ्यासू मुलगी होती. तिचे केस इतके सुंदर होते की समोरच्याला भुरळ घालायचे.
'परी' सुद्धा अगदी फुलासारखी कोमल आणि रूपवान होती. ती अभ्यासातही एकदम हुशार होती. पुण्यात जॉब करत असताना माझी आणि तिची एका कार्यक्रमामध्ये भेट झाली होती.

मला परीचा खूप अभिमान वाटतो—तिने तिच्या प्रेमासाठी लढा दिला आणि आयुष्यात एक चांगला, कर्तृत्ववान जोडीदार मिळवण्यासाठी समाजाच्या चौकटी मोडून धाडसाने उभे राहिली. तिच्या या धैर्याने आणि ठाम निर्णयाने तिने तिचे प्रेम मिळवले. तिचे हे धाडस पाहून मला तिचे खूप कौतुक वाटायचे. आणि तिच्याकडे बघून असेही वाटायचे: परीसारखा आत्मविश्वास मला पण निर्माण करता आला पाहिजे. 'अनामिका' सोबत मी एकदा तरी बोलले पाहिजे. आता उशीर झाला आहे हे जरी खरे असले तरी, निदान बोलले तरी पाहिजे."

या दोघी अनामिकेच्या जवळच्या मैत्रिणी आहेत. 'साऊ' एकदा कामानिमित्त पुण्यात भेटली होती. त्यावेळी तिच्याकडून एवढेच समजले की, अनामिकेचे लग्न झाले आहे. त्यानंतर मी पण तिच्याबद्दल फार काही विचारले नाही. खूप वर्षं झाली, माझा आणि त्यांचा संपर्क झालेला नाही.

मोबाइलवर मेसेज वाचत असताना बायकोचा फोन आला. मी तिला आमच्या गेट-टुगेदरबद्दल सांगितलं.

बायको: 'मग तुम्ही गेट-टुगेदरला गेलं पाहिजे. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील, आणि तसेही तुम्हाला कुठे भेटतात ते. निदान या निमित्ताने सगळे एकत्र येत आहेत, तर जाऊन या. आणि जाताना मी गिफ्ट केलेला तो शर्ट घालून जा. तो खूप सुंदर दिसेल!'

आणि बाकीच्या विषयावर बोलून तिने फोन कट केला.

गेट-टुगेदरची तारीख आणि ठिकाण आधीच निश्चित झालं होतं. काही मित्र-मैत्रिणींनी आपलं कन्फर्मेशनसुद्धा दिलं होतं. पण मी मात्र अजून एकही मेसेज पाठवला नव्हता. ऑफिसमध्ये रजेचा अर्ज केला आणि मग मी सुद्धा एक मेसेज पाठवला. त्या ग्रुपमध्ये अजून कोण-कोण आहे ते बघत होतो.  मात्र, "अनामिका"चा नंबर सापडला नाही! एवढ्या नंबरांमध्ये तिचा नंबर तरी कसा शोधायचा?  साऊला विचारावं का? कदाचित तिला तिचा नंबर माहिती असेल. नको, उगाच तिला वाटेल, "हा कशाला विचारतोय नंबर?" शेवटी, कितीही झाले तरी तिची ती मैत्रीण आहे.

गेट-टुगेदरची तारीख जवळ आली होती. फक्त दोनच दिवस उरले होते. ग्रुप वरील एक मेसेज बघून मला शेवटी अनामिकाचा नंबर मिळाला. पण तिला डायरेक्ट मेसेज करावा की नको, असा विचार मनात येत होता. अजूनही अनामिकाच्या कन्फर्मेशनचा मेसेज आलेला नाही, याचं थोडं दुःख वाटत होतं. कदाचित यावेळीही तिची भेट होणार नाही, असं वाटत होतं.

गेट-टुगेदरच्या आदल्या दिवशी मी निघालो. आता मला दिल्लीहून पुण्यापर्यंत ट्रेनने प्रवास करायचा होता. त्यानंतर लाल्या मला पुणे स्टेशनवरून थेट गेट-टुगेदरच्या ठिकाणी घेऊन जाणार होता. पण ट्रेन इतकी उशिरा पोहोचली की पुण्याला पोहोचायला सकाळचे ११ वाजले. एवढा वेळ होऊनही लाल्या अजून माझी स्टेशनवर वाट पाहत होता. लाल्या: 'चांगल्या ठिकाणी नाश्ता करू,' असं म्हणत त्याने गाडी पुण्याबाहेर काढली. पण खूप लांब गेल्यावरही एक चांगलं हॉटेल सापडत नव्हतं. शेवटी ४० किमी दूर एका धाब्यावर जे काही मिळालं, त्यावरच नाश्ता केला.

माझ्या मोबाइलची बॅटरी पूर्णपणे संपल्याने तो बंद झाला होता. वाटेत कुठेही चार्जिंग पॉइंट मिळालं नाही.

शेवटी आम्ही दोघंही दुपारी एका ऍग्रो टुरिझम आणि रिसॉर्टच्या स्पॉटवर पोहोचलो. तिथं आमच्या मित्रांनी गेट-टुगेदरचं खूप सुंदर आयोजन केलं होतं.

जेवणाची वेळ झाली होती आणि सगळे बाहेर जेवणासाठी जमले होते. मी मात्र, जमेल तितक्या उत्साहाने माझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना भेटत होतो. एवढ्यात साऊ समोर आली, आणि मी तिला म्हणालो, "मैत्रिणीची ओळख तरी करून दे!"

तेवढ्यात परी पण माझ्या समोर आली

परी: "अरे अनिकेत, किती वर्षांनी भेटतोय आपण! पुण्यात असताना भेटला होतास, त्यानंतर आज दिसत आहेस!"

मी: "हो ना, त्याला खूप वर्षे झाली. तिच्यासोबत बोलून मी परत साऊचा शोध घेऊ लागलो."

तिकडे लाल्या आणि साऊ मोठ्या आवाजात गप्पा मारत होते. लाल्याला कसं काय एवढ्या पटकन माणसात मिसळता येतं, हे मला कधीच कळलं नाही. फक्त दहा मिनिटं झाली असतील, पण हा भाऊ गप्पा मारतोय, जणू मागच्या आठवड्यातच सगळ्यांना भेटला होता!
समोरून दाद्या आणि डॉक्टर येताना दिसले. मी 'दाद्या'ला विचारलं, 'एवढंच लोकं आली आहेत का? कमी वाटत आहेत.'
दाद्या: 'नाही रे, काही जण बाहेर गेले आहेत. जेवणाची वेळ झाल्यामुळे बाहेर फिरत असतील.

दाद्या: "खूप वर्षानंतर भेटलास रे तू."
मी: "हो ना! १५ वर्षं झाली, मी असाच फिरत आहे, पण मागील 8 वर्षांपासून दिल्लीमध्येच आहे."
दाद्या: "अरे, तुला बोलायला तरी वेळ कुठे मिळतो! मेसेज केला तरी तुझा रिप्लाय लवकर येत नाही. बरं, चल, जेवायला जाऊया."

मी सहज नजर फिरवली, आणि एका टेबलावर अनामिका तिच्या काही मैत्रिणींसोबत जेवण करताना दिसली

२१ वर्षांनी ती माझ्या नजरेसमोर आली. क्षणभर मी स्तब्ध झालो आणि फक्त तिच्याकडे बघत राहिलो. एवढा आनंद झाला होता मला, पण तो व्यक्तही करता येत नव्हता. आजही ती तेव्हडीच सुंदर दिसत होती, जशी ती कॉलेजमध्ये मला वाटत होती. वयोमानानुसार थोडेफार बदल सोडले तरी अनामिका अजूनही तेव्हडीच आकर्षक दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज दिसत होतं, जणू त्यात काहीतरी गूढ आणि मोहक होतं. तिचा तोच रुबाब आणि आत्मविश्वास आजही तसाच कायम होता. ती मनमोकळ्या आणि हलक्या हास्याने गप्पा मारत होती, तिच्या गालावर केसांची एक बट आणि काही हवेत नाचत होत्या. तिच्या नजरेत सगळ्या आठवणी आणि अनोख्या भावना सामावले आहेत असे वाटत होतं. आणि ती हसत असताना, तिच्या ओठांवर एक अशी गोडी होती जी शब्दांमध्ये व्यक्त करणे अशक्य होतं.

"माझ्या मनात एकच विचार आला: 'ही मला ओळख दाखवेल का? एवढी वर्षे झाली आहेत, मी तिच्या स्मरणात असेल का?”

 

मी पण जेवणाचे ताट घेऊन माझ्या शाळेतील मित्रांसोबत बसलो. शाळेमध्ये त्यांच्यासोबत डबा खायचो. आज इतक्या वर्षांनंतर पुन्हा त्यांच्यासोबत जेवणाची संधी मिळाली आहे. माझ्या मित्रांच्या गप्पा ऐकू लागलो. इतक्या वर्षांनी शाळेतील आणि कॉलेजमधील मित्रांना भेटत आहे. सगळे जण जुन्या आठवणींमध्ये रमून जात आहेत. शाळेत कशी मस्ती केली, कोणत्या सरांनी कसे ओरडले किंवा मारले, तेव्हा कसे लपून हसत होतो, यापासून ते कॉलेजमधील किस्से – कोण कोणाकडे बघायचं, अभ्यासाचे ते टेन्शन, लग्नानंतरचे झालेले बदल... याच्यावर गप्पा मारत असताना एक तास कसा निघून गेला, हे समजलंच नाही.
मी मात्र मनातल्या मनात विचार करत आहे, 'आज जर मी आलोच नसतो, तर हे सर्व भेटले असते का? किती विचार करत होतो इथे येण्यासाठी... पण आज मला जाणवलं, या बालपणाच्या आणि कॉलेजमधल्या सुंदर आठवणी विसरून कसं चालेल? हे क्षण आयुष्यभरासाठी खास आहेत. आपण कितीही प्रयत्न केले तरीही या आठवणी विसरता येत नाहीत.

जेवण झाल्यानंतर सगळे जण फोटो सेशनसाठी जमले. फोटोग्राफर वेगवेगळ्या कल्पना देत, आमचे सुंदर फोटो काढायचा प्रयत्न करत होता. ग्रुप फोटोच्या वेळेस, मी अनामिकेजवळ उभं राहण्याचा प्रयत्न केला. पण फोटोग्राफरने वारंवार माझी जागा बदलून टाकली. त्यामुळे मला तिच्याजवळ फोटो काढण्याची संधीच मिळाली नाही. मनात विचार आला, 'निदान या फोटोच्या निमित्ताने दोन शब्द तरी बोलता आले असते!'

इतका वेळ होऊन गेला तरीही माझी आणि अनामिकेची साधी भेटही झालेली नव्हती. मनात थोडी खंत वाटत होती.

त्याच वेळी, साऊ, आणि लाल्या कुठेतरी गप्पा मारत हरवलेले आहेत असे वाटत होते. मनात विचार आला, 'परी किंवा साऊ तरी अनामिकेशी माझी ओळख करून देतील,' पण त्यांचं खूप गप्पा चालू होत्या. खरंच, प्रत्येकाचं स्वतःचं एक स्वतंत्र विश्व असतं. तेही कितीतरी दिवसांनी सगळ्यांना भेटले होते, त्यामुळे त्यांचं काही चुकीचं नव्हतं.

शेवटी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या मित्राने सर्वांना एकत्र बोलावलं, आणि आम्ही सगळे खुर्च्या घेऊन हॉलमध्ये राऊंड करून बसलो. पण यावेळी माझ्या बाजूला साऊ आणि दुसऱ्या बाजूला दाद्या बसले होते. अनामिका मात्र पुन्हा दूर कुठेतरी परीसोबत बसली होती. लाल्या तर सूत्रसंचालन करणाऱ्या मित्राच्या बाजूलाच बसला होता, जणू काही त्यालाच सर्व करायचं होतं. मग त्यांनी संगीत आणि बॉल पास करण्याचा खेळ सुरू केला. सुरुवातीला मला वाटलं की एकदा तरी माझा नंबर येईल, म्हणजे मी समोर जाऊन अनामिकावर थोडा इंप्रेशन पाडू. पण खूप वेळ झाला, तरीही माझा नंबर काही येईना. बाकीचे मित्र मात्र डान्स करत होते, कविता ऐकवत होते, तर कोणी शेरो-शायरी बोलत होते. वातावरण एकदम मनाला सुखावणारे होते. सगळीकडे हसतमुख आणि मनमोकळे चेहरे दिसत होते.

मला मात्र संधी मिळत नव्हती. माझी अस्वस्थता साऊने बघितली आणि ती मला विचारली,

"अन्या, तुला काही बोलायचं आहे का?" मी म्हटलं, "नाही."

ती म्हणाली, "मग एवढा का अस्वस्थ दिसत आहेस?" मी उत्तर दिलं, "थोडासा प्रवासामुळे जाणवत आहे."

ती बोलली, "अरे, थोड्या वेळात ठिक होशील”

मग त्या गेममध्ये लाल्याचा नंबर आला. लाल्या समोर जाऊन बिनधास्तपणे त्याचे कॉलेज आणि  गर्लफ्रेंडचे किस्से सांगू लागला आणि सगळे हसत-हसत त्या गोष्टी ऐकत होते.

इथे मला साधं बोलताही येत नव्हतं, पण लाल्या मात्र बिनधास्तपणे सगळं सांगत सुटला. कोठून येतो एवढा आत्मविश्वास याच्याकडे?

मग मला राहवलं नाही. मी स्वतःच पुढे गेलो आणि एक शेर ऐकवण्याची विनंती केली. सुरुवात केली, पण अर्धा शेर झाला आणि अचानक पुढे काय बोलायचं तेच आठवून नाही आलं. इमोशनल होऊन, माइक त्यांच्या हातात देऊन परत आलो.

साऊने विचारलं, "अन्या, ठीक आहेस ना?"

मी म्हटलं, "हो, ठीक आहे”... पण नेमका मी शेर विसरलो, याचं मला कसं तरी वाटतंय."

तेवढ्यात एक वेटर चहाची मोठी किटली घेऊन आला. मी संधी साधून खुर्चीवरून उठलो आणि चहा घेण्यासाठी गेलो. सगळे त्या कार्यक्रमध्ये व्यस्त होते. चहा घेण्यासाठी कप कुठे ठेवले आहेत, ते शोधत होतो. तेवढ्यात माझ्या मागून आवाज आला,

"अनिकेत, काय शोधत आहेस ?"

मी मागे वळून पाहतो, तर अनामिका माझ्या मागे उभी होती.

मी: "अनामिका! माझं नाव तुझ्या लक्षात आहे ?"

अनामिका: "हो, लक्षात आहे. तुला काय वाटलं? फक्त तूच इतरांचं नाव लक्षात ठेवतोस का?

मी: "हसत, मी चहासाठी कप शोधत आहे."

अनामिका: “हा घे, चहाचा कप. समोर असूनही तुला दिसला नाही,  कॉलेजमध्येही तुझ्यासमोर खूप काही असायचं, पण तुला कधीच काही दिसलं नाही."

मी: "चहा घेणार का?"

अनामिका: "हो, त्यासाठीच आलेय. इकडे खूप गोंधळ सुरू आहे. चल, आपण बाहेर जाऊन चहा घेऊया."

मी: "हो, चालेल."

अनामिका आणि मी, दोघेही त्या हॉलच्या बाहेर आलो. माझं मन सुखावलेलं होतं

अनामिका: "तिकडे बाहेर टेबल आहेत, तिथे बसूया."

मी: "कशी आहेस तू? आज इथे भेटशील असं वाटलंच नव्हतं. तुझा कन्फर्मेशन मेसेजही ग्रुपवर आलेला नव्हता."

अनामिका: "अरे, तू काय माझ्या मेसेजची वाट बघत होतास का? प्रोजेक्टची डेडलाइन जवळ होती, आणि बॉस सुट्टीसुद्धा अप्रूव्ह करत नव्हता. शेवटी सिक लीव्ह टाकून आले आहे."

मी: (टेबलवर बोटाने टकटक आवाज करत) आणि इकडे तिकडे बघत, आज काय सुंदर वातावरण आहे ना?"

अनामिका: "हो ना. अनिकेत, इतक्या वर्षांनी भेटला आहेस. मला वाटलं खूप बदलला असशील, पण अजूनही तसाच आहेस रे. आज पण तू माझ्याकडे न बघता, इकडे-तिकडे बघून बोलत आहेस. अरे, झाले आता आपले कॉलेज. एकवीस वर्षं झाली रे."

मी: "तुला एक विचारायचं राहून गेलं. कुठे आहेस तू? काय करतेस?"
अनामिका: "अरे हो हो, सगळं सांगते. मी बारावी झाल्यावर पुणे युनिव्हर्सिटीच्या एका कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. नंतर मास्टर्स केलं आणि आता IT प्रोजेक्टमध्ये काम करतेय."

मी: "मी आता दिल्लीत आहे. एका प्रोजेक्टसाठी गेलो होतो, पण मागची ८ वर्षं तिथेच आहे."

अनामिका: "साऊ मला पण कधी कधी सांगायची, अगोदर पण नंतर खूप वर्षं काही नाही कळाले. पण इतक्या वर्षांत कधी माझ्याबद्दल काही जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केलास?"

मी: "तसं नाही. खरं तर, फेसबुकवरून २-३ वेळा प्रयत्न केला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याचा. पण का कोणास ठाऊक, ती परत कॅन्सल केली. कितीतरी वेळा वाटलं की तुझा व्हॉट्सअ‍ॅप नंबर मिळाल्यावर मेसेज करावा, पण थोडा टाईप करून परत डिलीट करायचो."

अनामिका: “आजही तू बोलताना अडखळत आहेस रे अनिकेत. बघितलं मी तुझं हॉलमधलं धडपडणं. शेर बोलायला गेलास, आणि तिथेही तो पूर्ण न करता परत आलास."

मी: (मनातल्या मनात: आज तरी बोलले पाहिजे) "मला काहीतरी सांगायचं आहे तुला आज."

अनामिका: "काय सांगायचं आहे?"

मी: "खरं तर... कॉलेजमध्ये असताना मी खूप वेळा तुझ्याकडे बघायचो. पण तुला सांगायची हिम्मत कधीच झाली नाही. आठवतंय, एकदा तू पावसात भिजून आली होतीस, आणि तू खूप सुंदर दिसत होतीस. त्यानंतरही मी तुला कित्येकदा बघितलं, पण काही बोलू शकलो नाही. खरं तर... मला खूप भीती वाटायची रे त्यावेळी."

अनामिका: (हसत) "हे सांगण्यासाठी तुला एवढी वर्षं लागली, अनिकेत? अरे, मी तुला त्यावेळीच ओळखलं होतं की तुझे काय चाललंय ते. तू दुपारी माझ्या वर्गात कधी पुस्तकं नेण्यासाठी यायचास, तर कधी तुझ्या मित्रांना भेटायला. माझ्या समोर यायचास, पण बघूनही न बघितल्यासारखं करायचास. तुझ्या मनाची अवस्था आणि सगळी धडपड माझ्यापासून लपलेली नव्हती रे!"

मी: "म्हणजे तुला सगळं माहिती होतं त्यावेळी?"

अनामिका: "हो, तुला काय वाटलं? फक्त मुलं मुलींना बघतात का? अरे, मुलींनाही तशाच भावना असतात. पण त्यांना खूप बंधनं असतात, रे. त्या कधीच असं बोलून दाखवत नाहीत. अरे, इथेच तर तू चुकला होतास. खूप वेळा मी तुझ्या आजूबाजूलाच असायचे, पण तुला कधी समजलंच नाही की मला काय सांगायचं आहे ते. मुली त्यांच्या नजरेने आणि हावभावाने खूप काही बोलत असतात रे.

अनामिका: "अनिकेत, तुला आठवतं का, कॉलेजमध्ये आपल्या परीक्षा असताना तू भौतिकशास्त्राच्या प्रॅक्टिकलच्या वेळी बाजूला होतास. त्यावेळी मी 'प्रिझम' मागितला होता, पण तो तू माझ्याकडे न बघता दिला होता रे. मी त्यावेळी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता.

आणि संक्रांतीला सुद्धा तुला तिळगुळ देणार होते, पण तुला मी मुद्दाम तू सोडून बाकीच्या मुलांना दिला. तिथे मला असं वाटलं होतं की तू येशील माझ्याकडे. तसं तू धडपड करत होतास आणि ते बघून मला खूप आनंद होत होता रे, पण कधी कधी असं वाटलं की 'नको, आपण याला जास्त त्रास द्यायला'.

मी: "त्यावेळी खूप दबाव असायचा रे, घरच्यांचा, करिअरचा, आणि माझे घरचे तसे या बाबतीत खूप कडक होते. माझं कॉलेज बंद होईल आणि शिक्षणाची संधी निघून जाईल, म्हणून कधी तसा जास्त प्रयत्न नाही केला. पण आता समजले आहे. निदान दोन शब्द बोलायला काहीच हरकत नव्हती त्यावेळी, पण हे सगळे उशिरा आलेला शहाणपण आहे. कारण आयुष्यात जी मुलगी आपल्याला पहिल्यांदा आवडलेली असते, ती कायम मनात घर करून जाते. तसे, नंतरच्या कॉलेज जीवनामध्ये खूप मुली आल्या-गेल्या, पण माझ्या मनात अशा भावना कधीच नाही आल्या. खरं तर त्यावेळी पुस्तके हेच माझे साथीदार होते. आणि नंतर-नंतर मी लिहायला देखील सुरवात केली होती."

अनामिका: "अरे वाह, अनिकेत, तू तर लिहिलेच पाहिजे रे! तुझ्या भावना व्यक्त झाल्या पाहिजेत, निदान त्या लिखाणातून तरी बाहेर येतील. आणि मला माहिती आहे, तू खूप सुंदर लिहीत असशील.

मला वाचनाची खूप आवड आहे, त्यामुळे तू जर काही लिहिलं असेल तर पाठव मला. आणि कधी वेळ मिळाला ना, आपल्याविषयी पण लिही.

मी: "नक्कीच प्रयत्न करेन, आज माझ्या आयुष्यात एक अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण झालं आहे. आयुष्यात खूप काही मिळालं, चांगली नोकरी, बायको आणि माझं कुटुंब देखील सगळं छान आहे. पण मनाच्या कोपऱ्यात सतत कुठे तरी असं वाटायचं की, आपण दोन शब्द सुद्धा बोललो नाही तिच्यासोबत. तिच्याशी एकदा तरी बोलायला पाहिजे आणि ते आज झालं.

अनामिका: मी पण आज खूप आनंदी आहे रे अनिकेत. माझं सुद्धा सर्व छान सुरू आहे. पण हीच गोष्ट कधी कधी माझ्या मनाला खूप अशांत करायची. कधी कधी, संध्याकाळी एकटी असताना, पाऊस आला किंवा काही गाणं लागलं की नकळत तुझा चेहरा समोर यायचा. पण आज तुझ्याशी बोलल्यामुळे खूप आनंदी आहे. लग्नानंतर सुद्धा, कॉलेजमधल्या त्या गोष्टींना आणि भावनांना आयुष्यात एक वेगळं स्थान आहे. शेवटी, कितीही झाले तरी कॉलेजमध्ये तुझ्यामुळे मी खूप आनंदी असायचे आणि ते दिवस मी कधीही विसरू शकत नाही.

 

 

(थोडा वेळ शांतता)

थंड वारे वाहू लागले आणि पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या

अनामिका: "अरे, अजून थोडा वेळ बोलत राहिलो तर पावसात भिजू आपण."
मी: "ते पण एकत्र."
आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून मोठ्याने हसू लागलो.

अनामिका: चल, लवकर जाऊया हॉलमध्ये आणि ज्यांनी ही गेट-टूगेदरची संकल्पना मांडली, त्याची सर्व तयारी केली, त्यांच्या साठी आपण दोन शब्द बोलले पाहिजे.

मी: हॉलमध्ये आलो तर, कार्यक्रम जवळजवळ संपला होता. आभार प्रदर्शन सुरू होते. मी समोर गेलो आणि त्यांना २ मिनिटं बोलावण्याची विनंती केली. माझ्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास आला होता. पुढील २ मिनिटांच्या भाषणात मी सर्वांचे आभार मानले. माझ्या सर्व शाळेतील आणि कॉलेजमधील मित्रमैत्रिणींचे देखील आभार. आणि शेवटी 'लाल्या' विषयी बोलून, माझं छोटं भाषण संपवले.

मी: "जाताना, 'परी', साहू आणि अनामिका यांचा निरोप घेतला आणि तुमच्याशी संपर्कात राहीन असंही बोललो."

"नंतर मी आणि लाल्या गाडीत बसलो."

लाल्या: "'अन्या', चहा चांगला होता का रे?"

मी: "का रे, काय झालं?"

लाल्या: "नाही, आता तू चहा घेऊन बाहेर गेला होतास, थंड झाला असेल तो. तुला आज चहा गोड नक्कीच लागला असेल. मी आणि साहू, आम्ही दोघांनी बघितले होते रे. तुला काय वाटलं, मला समजलं नाही काहीच."

असे बोलल्यानंतर आम्ही दोघेही गाडीत मोठ्याने हसायला लागलो.

लाल्या: "पण आज तू छान बोललास रे, बरे झाले तू आलास गेट-टूगेदरला. निदान तुमची भेट तरी झाली. चल, तुला एकदम कडक स्पेशल चहा देतो."

मी: गाडीच्या काचा बंद करून, लाल्या कडे फक्त स्मितहास्य केले आणि आम्ही दोघेही परत निघालो.

 

 

                                                                        समाप्त