mala spes habi parv 2 bhag 3 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व २ भाग ३

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३

मागील भागात आपण बघितलं की नेहा जॉईन झाली आणि लगेचच रमण शहा तिला भेटायला आला जे नेहाला अजिबात आवडलं नाही त्यामुळे पूर्ण दिवस ती जरा डिस्टर्ब होती. ताम्हाणे सरांच्या फोन मुळे ती भानावर आली.आता या भागात काय होतं बघू.


ऑफिस संपल्यावर नेहा आणि अपर्णा दोघीजणी ऑफिस बाहेर आल्या तेवढ्यात अपर्णाचे लक्ष गेलं. बाजूला रमण शहा गाडी घेऊन उभा होता. अपर्णाला त्याचा प्रचंड राग आला तिला कळंना हा मॅडमच्या मागे का येतोय? किती त्रास देतोय मॅडमना ? पण अपर्णा यावर काय करू शकणार होती ? तेवढ्यात नेहाचा फोन वाजला.

नेहाने फोन बघितला त्याच्यावर रमण शहाचं नाव वाचून तिने पटकन फोन कट केला. तिच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून अपर्णाला कळलं की हा फोन कोणाचा असेल ! नेहाने फोन कट करून पर्समध्ये टाकत असतानाच रमण शहा तिथे आला.

नेहा त्याचा आवाज ऐकून चमकली. तिने बघितलं तर समोर रमण शाह उभा होता. त्याला बघून नेहाला प्रचंड राग आला तिला पण ती काही बोलली नाही तर रमण शहा म्हणाला ,

“नेहा तू आज दिवसभर ऑफिसमध्ये थकली असशील तुला घरी सोडून देतो.’


त्याचा हा आगाऊपणा नेहाला अजिबात आवडला नाही. ती म्हणाली,

“ हे बघा मला अपर्णा सोडून देणार आहे.”

यावर लगेच अपर्णांनी मान हलवली आणि म्हणाली,

“हो सर मी सोडते आहे मॅडमना .”


त्यावर रमण शहा म्हणाला,

“ नाही. नेहा आज तू किती दिवसांनी ऑफिस जॉईन केलं आहेस. तू थकली असशील. तू टू व्हीलर वर कशी जाशील? मी तुला घरी सोडून देतो.”

यावर नेहा म्हणाली ,

“नको माझं आणि अपर्णाचं कालच ठरलंय. दोन चार दिवस तीच मला घरी सोडणार आहे. त्यानंतर अनुराधा सोडणार आहे. तुम्ही काळजी करू नका मी जाईन.”


एवढं बोलून नेहा अपर्णाच्या गाडीच्या दिशेने चालायला लागली. त्याबरोबर रमण शहा तिच्या मागे जायला लागला. अपर्णाला हे पाहिल्यावर प्रचंड राग आला. स्पष्ट सांगूनही हा माणूस का ऐकत नाही हाच विचार अपर्णाच्या मनात आला. अपर्णा तिच्या गाडीच्या दिशेने गेली.

नेहाला दहादा समजवत रमण शहा नेहाच्या मागून जात होता पण नेहा थांबली नाही. त्याबरोबर भरभर चालत जाऊन रमण शहा नेहाच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला,

“ नेहा का तू ऐकत नाहीयेस ?”

“रमण शहा तुम्हीच मला त्रास देत आहात. तुम्ही का माझ्या मागे लागला आहात? मी माझ्या तब्येतीची काळजी घेऊ शकते .”

रमण शहा म्हणाला,


“ मी तुझ्या प्रेमात वेडा झालोय. मला तुझी खुप काळजी वाटते म्हणून मी आलोय.”


तर नेहा म्हणाली ,

“तुम्ही माझ्या प्रेमात वेडे झालात. वेडं होताना माझी परवानगी घेतली होती का? नाही नं मग आता मी तुम्हाला परवानगी देत नाहीये मला घरी सोडण्याची. अपर्णा आहे ती मला सोडणार आहे. नंतर चार दिवस अनुराधा सोडणार आहे. त्यामुळे आता तुम्ही जा. रस्त्यावर मला तमाशे नको आहेत “


नेहाने रमणकडे जळजळीत नजरेने बघत म्हटलं. तोपर्यंत अपर्णाने आपली टू व्हीलर तिथे आणून उभी केली. नेहा टू व्हीलर वर बसली आणि अपर्णाने गाडी चालू करून दोघी निघाल्या. जरासं समोर गेल्यावर नेहा म्हणाली,

“ या माणसाचं काय करावं मला कळत नाही.”

“मॅडम तुम्ही फार काळजी करू नका.जर त्यांनी फार त्रास दिला तर ताम्हाणे साहेबांना सांगू.”

“ अगं हा विषय ताम्हाणे साहेबांना कसा सांगणार? तो माणूस माझ्या प्रेमात वेडा झालाय. तेव्हा माझी परवानगी घेतली का त्यांनी आणि मला नको असं हे काही प्रेम प्रकरण. मी इथे त्यासाठी आलेली नाही. मला माझ्या कामातील हुशारी दाखवायची आहे .स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स रमणच्या जाहिरात कंपनीवर अवलंबून आहे हेच माझं दुर्दैव आहे”

बराच वेळ दोघी काही बोलल्या नाही. अपर्णाला नेहाची परिस्थिती बघून खूप वाईट वाटलं. कारण नेहाच्या आजारपणात अपर्णाला नेहाचा स्वभाव कळला होता. इतर बायकांसारखी नेहा रमणच्या रूपडं बघून भाळणारी नाही हे अपर्णाच्या लक्षात आलं होतं.

नेहा सारख्या क्रिएटिव्ह माईंडच्या स्त्रीला हा त्रास व्हावा याचं अपर्णाला वाईट वाटलं. अचानक अपर्णा नेहाला म्हणाली,

“ मॅडम मी रमण शहाला चांगली ओळखते. आत्ता पर्यंत त्यांचं रूप बघून खूप बायका त्यांच्या मागे मागे करायच्या. पण तुम्ही तसं केलं नाही.”

अपर्णाला मध्येच थांबवत नेहा म्हणाली

“ अगं अपर्णा मी असं का करू? मी इथे प्रेम करायला आले नाही.”

“ मी कुठं म्हणतेय असं पण आजपर्यंत बायका आपल्या मागे असतात याची रमण शहांना गुर्मी होती पण तुम्ही आलात आणि त्यांचा भ्रम तुटला. तुम्ही कामाव्यतिरिक्त त्यांच्याशी काहीच बोलला नाहीत. बहुदा यामुळे त्यांचा अहंकार दुखावला गेला असेल.”



“ अहंकार ! अपर्णा आपण काय कॉलेजमधील आहोत का? मी कशासाठी इथे आले ?मी काय डोळ्यात स्वप्न घेऊन इथे आले आणि हा माणूस असा विचित्र वागतोय की मी आता गोंधळून गेले आहे. काय करायचं आता कळत नाही. मला खूप कंटाळा आलाय या सगळ्याचा.’

नेहाच बोलणं ऐकून अपर्णाही विचारत पडली.

अपर्णा नेहाला म्हणाली ,

“मॅडम मला वाटतं पंधरा एक दिवस तुम्ही तुमच्या घरी जाऊन येता का? इथे तीन-चार महिन्यात तुम्हाला प्रचंड मनस्ताप झालाय. कदाचित घरी गेल्यावर तुम्हाला त्यातून शांतता मिळेल.”

नेहा काहीच बोलली नाही.

“ तुम्ही एकदा घरी जाऊन याव मॅडम असं मला वाटतं.”

अपर्णांनी जोर देत म्हटलं. अपर्णा आणि नेहा दोघीजणी रमण शहाबद्दल बोलत बोलत नेहाच्या घरापाशी पोचल्या. गाडीवरून खाली उतरत नेहा अपर्णाला म्हणाली,

“ अपर्णा मघाशी मी रमणसमोर म्हटलं की तू मला रोज घरी सोडून देणार आहेस पण तझी खूप धावपळ होईल.”

“ मॅडम धावपळ काय म्हणता? झाली जरी थोडी धावपळ तरी तेवढं चालतं. तुम्ही आजच ऑफिसला आलात. एवढी दगदग सहन होणार नाही आणि कॅबमध्ये काही त्रास झाला तर कसं कराल? सध्या काही दिवस मी आणि अनुराधा तुम्हाला”

नेहाने अपर्णाचं बोलणं मध्येच तोडत म्हटलं.


“ तुम्हाला? मघाशी आपलं काय ठरलं? तू आणि अनुराधा मला ऑफीस व्यतिरिक्त अगं तुगं करत बोलणार. विसरलीस?”

यावर अपर्णा हसत म्हणाली,

“ साॅरी.सवय व्हायला वेळ लागेल.”

“ लक्षात ठेऊन म्हण मग सवय होईल. आता येतेस काॅफी करते.”

“ नको. ऊशीर होईल. हवतर मी तुला काॅफी करून देते”

“ अगं मी करेन. तुला उशीर होणार नसेल तर आपण आपल्या मैत्रीची सुरुवात काॅफीने करू.”

यावर हसत अपर्णाने मान डोलावली. गाडीला स्टॅण्ड लाऊन अपर्णाने पर्समधील मोबाईल काढून घरी सासूबाईंना फोन करून घरी यायला उशीर होईल हे कळवलं.

नेहाने घराचं कुलूप उघडून अपर्णाचं स्वागत करत म्हटलं,

“ तू आज पहिल्यांदा येत नाहीस माझ्या घरी पण आज माझी मैत्रीण म्हणून पहिल्यांदा येतेय. माझ्या या नवीन मैत्रीणींचं माझ्या घरी स्वागत आहे “

नेहाचा हसरा चेहरा बघून अपर्णाला छान वाटलं पण त्याचबरोबर तिच्यासारखी चांगली मैत्रीण मिळाली या आनंदात तिचे डोळे भरून आले.

“ अपर्णा तुझ्या डोळ्यात पाणी?”

“ चांगली मैत्रीण मिळाल्याचा आनंद डोळे साजरा करतात आहे.”

अपर्णाने हळूच गालावर ओघळलेले अश्रू पुसले. अचानक नेहाने अपर्णाला मिठी मारली. अपर्णासाठी हा सुखद धक्का होता.


काॅफीचा आस्वाद घेत अपर्णा आणि नेहाचं संभाषण सुरू झालं.

“अपर्णां अनुराधा म्हणते तसं माझं तुमच्या दोघींशी मागच्या जन्मीचे काहीतरी कार्मिक रिलेशन आहे हे मला पटलंय. नाहीतर बघ नं मी पुण्याची. नोकरी निमित्त इथे आले. काही दिवसच झाले असतील आपली ओळख होऊन पण माझ्या आजारपणात तुम्ही दोघी किती चटकन माझ्या मदतीला धावून आलात. अनुराधा म्हणाली ते मला पटलं.”

नेहाने हसून काॅफीचा एक घोट घेतला.

“ मला वाटतं आपलं समोरच्या व्यक्तीशी जर विचारांचं आणि मनाचं गणीत जुळलं तर सगळं खूप सोपं होतं. मैत्रीही चटकन होते जशी आपली झाली.”

यावर दोघीही हसत काॅफीचा एकेक घोट चवीनं घेऊ लागल्या.

“ नेहा काॅफी खूप छान केली आहेस.”

अपर्णाने दाद दिली.

“ काॅफी छान होण्यात माझा सहभाग फार नाही कारण ती तयार होती. त्या काॅफीमध्ये आपल्या मैत्रीचा स्वाद मिसळला आहे त्यामुळे काॅफी छान वाटतेय.”

नेहा मिश्कीलपणे म्हणाली.

“ स्वतःकडे क्रेडिट न घेण्याची तुझी सवय या काही महिन्यांत मला कळली आहे. तरी मी तुला थॅंक्स म्हणीन. कारण तुझ्या मैत्रीचा आश्वासक गंध या काॅफीत मिसळला आहे.”

“ व्वा! अगदी अनुराधासारखी काव्यात्मक बोलायला लागलीस.”

“ छे: अनुराधा सारखं बोलायला कुठे जमतय ! मनातील खरी भावना ओठांवर आली एवढंच.”

“ अपर्णा योग्य वेळी योग्य भावना ओठांवर यायला हवी तरच त्याचं महत्त्व कळतं. वेळ खूप महत्वाची असते. कालपर्यंत मला बंगलोरला एकटं वाटायचं तुम्ही माझ्या आजारपणात माझी काळजी घ्यायला आलात तेव्हा तुम्हाला खूप त्रास देतेय ही भावना माझ्या मनात होती पण अचानक तुम्ही दोघींनी मैत्रीचा हात माझ्या पुढे केला आणि सगळं सोपं झालं. मैत्रिणीला मी एवढा त्रास देऊच शकते. हो नं?”

नेहाने हसत विचारलं.

“ हो तर! यालाच तर मैत्री म्हणतात. मैत्रीमध्ये नो थॅंक्स नो साॅरी असतं. म्हणून तर खरी मैत्री टिकते.”


“ अगदी खरं बोललीस. अपर्णा ऊद्या मी ऑफिसमध्ये आले की लगेच आपण कामाचं बोलू. आजच बोललो असतो पण त्या रमण शहाने सगळा गोंधळ केला.”

“ हो खरंच. पण पुढे त्यांना तू अडवणार कसं? स्वस्तिक टूर्स तर त्यांच्याकडेच देणार जाहीरात करायला.”

अपर्णाने साशंकपणे विचारलं.

“ बघू काही दिवस. त्यांना मी समजावून सांगते.तरी त्यांच्या वागण्यात बदल झाला नाही तर काय करता येईल ते बघू. अपर्णा पूर्वी तू जायचीस नं कामाने त्यांच्या कडे तेव्हा तुला असा त्रास झाला नाही?”

अचानक नेहाने अपर्णाला विचारलं.

“ सुरवातीला वागले ते. पण मी काही दाद दिली नाही. त्यांच्या मैत्रिणी इतक्या स्मार्ट आणि फॅशनेबल होत्या की नंतर त्यांना माझ्यात काही रस वाटला नाही “

हसतच अपर्णा शेवटचं वाक्य म्हणाली.

“ तुझे साहेब एकदाही तुझ्या बरोबर आले नाही?”

“ नाही. रमण साहेबांना पण त्यांना भेटण्यात इंटरेस्ट नव्हता. एकदा त्यांचं वागणं मला पटलं नाही तेव्हा मी साहेबांना सांगीतलं की मला रमण शहांना नीट सांगता येत नाही तुम्हीच जा. तेव्हा ते गेले होते. नंतर रमण शहांकडे मी गेले तेव्हा ते सरळ म्हणाले तुम्हाला माझा काही त्रास होतो का? तुमच्याशी मी कामाबद्दलच बोलतो. यानंतर त्या कंटाळवाण्या व्यक्तीला एन्टरटेन्ट करण्यात मला इंटरेस्ट नाही.”

“ काय! असं सरळ म्हणाले?”


“ हो.”

“ रमण शहांना बाई हवी. त्याला पुरुष कंटाळवाणाच वाटणार.”

नेहा त्राग्याने म्हणाली.

काॅफी संपताच अपर्णा ने कप ठेवून म्हटलं,

“ मी निघते. “

“ हो चालेल. उद्या भेटू”

“ हो. ऊद्या मी येऊ का घ्यायला?”

“ नकोस. तुझं घर कुठे माझं घर कुठे. नको एवढी धावपळ करू. मी ऊद्या ऑफिसमध्ये कॅबने येईन.आता मी ठीक आहे.”

“ जशी तुझी इच्छा.बरं मी निघते.”

अपर्णा गाडी सुरू करून आपल्या घराच्या दिशेने निघाली.

नेहा घरात शिरली तर तिचा फोन वाजत होता. फोनवर सुधीरचं नाव झळकलं. नेहाने तत्परतेने फोन घेतला.

“ हॅलो आई तू तती आय?”

ऋषीची गोड आवाजातील बोबडे बोल ऐकताच नेहाचे डोळे आठवणींचा मळा फुलवत ओसंडून वाहू लागले.

“आई बोलत ता नाय?”

“ पिल्लू तुझा गोड आवाज ऐकला नं म्हणून मला सुचत नाही काही. आठवण येते तुझी.”

“ तू ललू नतो. तू श्टाॅंग आहे नं. मी येऊ तितडे?”

“ शाळा आहे नं बाळा तुझी?”

तेवढ्यात सुधीरने ऋषीच्या हातून फोन घेतला आणि म्हणाला,

“ नेहा कसं वाटतंय?”

सुधीरचा आश्वासक स्वर ऐकताच नेहाला उमाळा आवरता आला नाही.


“ नेहा…नेहा..”

सुधीरचा आवाज फोन वर किती तरी वेळ येत होता. नेहा मात्र काहीच बोलू शकली नाही. ब- याचं वेळाने सुधीरने फोन कट केला. नेहा आपल्या भावना कशा आवराव्या या गोंधळात अडकली.

रमण शहाचा नकोसा सहवास कुठवर झेलायचा तिला कळत नव्हतं. सुधीर माझ्या आयुष्यात आलेलं हे रमण नावाचं वादळ समजून घेईल का? या प्रश्न सर्पाने तिच्या मनाला वेढा घातला.


थोड्यावेळाने नेहाचा फोन वाजला. नेहाला फोनवर सुधीरचं नाव दिसलं. काय करू? फोन घेऊ का? सगळं भडभड बोलून मोकळी होऊ का? सुधीर मला समजून घेईल का?

विचारांच्या आवर्तनात अडकलेली नेहा अस्वस्थ नजरेने फोन कडे बघत होती. फोन बंद झाला पुन्हा आला असं दोनतीनदा झाल्यावर नेहाने फोन घेतला.

“ हॅलो..”

_________________________________
क्रमशः