Blackmail in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | ब्लॅकमेल - प्रकरण 7

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

ब्लॅकमेल - प्रकरण 7

प्रकरण ७
“ एवढे सांगण्यासाठी तुम्ही रीवावरून एवढे लांब इथे आलात?”
“ काय चूक आहे त्यात?”
“ कारण पैसे कुठे गेले ते आम्हाला माहित नाहीये अजून.आम्हाला एवढंच माहित झालाय की रोख रकमेत तूट आली आहे.”
“ खात्री आहे तुमची?” पाणिनीने विचारलं.
“ अर्थात.वीस लाख तूट आहे.” धारवाडकर म्हणाला.
“ एवढी मोठी रक्कम रोख स्वरूपात तुम्ही कंपनीत ठेवता?” पाणिनीने विचारलं.
“ त्यापेक्षा खूप मोठ्या रकमा ठेवतो आम्ही. बरेचसे व्यवहार रोखीत करून आम्ही डिस्काउंट मिळवतो. विशेषतः बँका बंद असतात त्या आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही मोठी रक्कम ठेवतो.”
“ आणि त्याच्या हिशोब पुस्तकातील नोंदी बद्दल तुम्ही फारसे जागरूक नसता? सोयीस्कर पणे?” पाणिनीने विचारलं.
“ मी असं म्हणेन की जुन्या पुरातन कलाकृती खरेदी विक्री करायचा आमचा धंदा आहे.जास्त धंदा हा परदेशात करतो.अशा कलाकृतींना आम्ही सांगू ती किंमत देणारे रसिक असतात.कायदेशीर बाबत आम्ही फार प्रश्न विचारले नाहीत तर रोख रक्कमच बरेचसे काम करते.” धारवाडकर म्हणाला.
“ मला नाही समजलं तुमचं म्हणण. तुम्हाला असं म्हणायचंय का की तुम्ही जुन्या मूर्ती, पुतळे किंवा कलाकृती, जेव्हा परदेशात नेता तेव्हा लाच देण्यासाठी तुम्हाला ही रोख रक्कम लागत असते? ” पाणिनीने विचारलं.
“ तुम्ही वकील आहात.लाच देणे घेणे हा गुन्हा आहे.मी सांगितलेल्या गोष्टींचा नेमका अर्थ तुम्ही लावू शकता पटवर्धन.”
“ याचा अर्थ धारवाडकर, कोर्टात तुम्हाला अगदी सविस्तर उत्तरं द्यायला खूप वाव आहे.” पाणिनी म्हणाला
“ थांबा, थांबा पटवर्धन, हा वाद कोर्टात नेण्याचं काहीच कारण नाहीये.”
पाणिनी काही न बोलता गप्प राहिला.
“ मी सांगतो सविस्तर. परदेशातील काही बंदरामधून अशा पुरातन वस्तू बाहेर न्यायला बंदी आहे.पण काही मधून अशा वस्तू परदेशी न्यायला बंदी नाही. अशा वेळी जर एखादा व्यापारी गाडी घेऊन पुरातन मूर्ती घेऊन आमच्या दारात आला तर तो व्यवहार पूर्ण करणे आमच्या दृष्टीने महत्वाचे असते, या मूर्ती खऱ्या आहेत की डुप्लिकेट हा मुद्दा त्या क्षणी गौण ठरतो.तुम्हाला माहिती असेल ना की मद्स्का हे शहर जुन्या पुरातन मूर्ती चे डुप्लिकेट बनवणारे मोठे मार्केट आहे.या मूर्ती पर्यटकांना विकल्या जातात.ओरिजिनल म्हणून.”
“ तरी रोख व्यवहाराची गरज का लागते हे यातून स्पष्ट होत नाहीये.” पाणिनी म्हणाला
“ ट्रक भरून अशा मूर्ती घेऊन येणाऱ्या माणसाच्या भूमिकेत स्वत:ला ठेऊन विचार करा पटवर्धन.या माणसाकडे ओरिजिनल आणि डुप्लिकेट दोन्ही मूर्ती असतात.किती ते त्याला माहिती असते.त्याची किंमत ही त्याला माहिती असते दोन नंबरचे हे व्यवहार कोणीच रोख शिवाय अन्य प्रकारे करणार नाही.” धारवाडकर म्हणाला.
“ याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून डुप्लिकेट मूर्ती खरेदी करून आणि विकून चक्क फसवणूक करता ग्राहकांची.” पाणिनी म्हणाला
“ तसं नसत. एकूण मालात खोट्या आणि खऱ्या किती हे आम्हाला माहित नसत कारण तेवढे बघायला,तपासायला वेळ नसतो.आम्ही विकतांना मात्र तपासून खऱ्या मूर्तीच विकतो. थोडक्यात खरेदी करतांना खोट्या मूर्तींची किंमत आम्हाला द्यावीच लागते.कधी या व्यवहारात तोटा होतो कधी फायदा.”
पाणिनी काहीतरी बोलणार तेवढ्यात केबिनचं दार उघडून शुक्लेंदू धारवाडकर ची सेक्रेटरी आत आली.
“ सर, शाल्व साहेब अत्ताच आलेत.”
“ त्यांना येऊ दे आत.त्यांना सांग की रीवा शहरातले प्रसिद्ध अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन आलेत इथे,आणि ते ज्या विषयासाठी आलेत,तो विषय आपल्याला आपल्या लीगल डिपार्टमेंट शी बोलूनच हाताळावा लागणार आहे. ”
“ मला तर हे एकदम पटलंय. तुम्ही तुमच्या वकिलांना बोलावून घ्या पटकन.” पाणिनी म्हणाला
“ नाही नाही तशी घाई नका करू शाल्व म्हणजे माझे काका आहेत..मला फक्त शाल्व ना तशी कल्पना द्यायची होती.” शुक्लेंदू म्हणाला.
“ हे बघा आलेच काका.”
पाणिनीने वळून पाहिलं तर दारात एक उंचपुरा ,देखणा आणि करारी माणूस उभा होता.चेहेऱ्यावर हास्य होतं पण त्याचे डोळे मात्र कोरडे होते त्यात हास्य नव्हत.ते गोल गरगरीत होते आणि दुसऱ्यावर वचक बसवणारे होते.
शुक्लेंदू ने दोघांची ओळख करून दिली.पाणिनीने उभं राहून त्याच्याशी शेकहँड केला. त्याचे हात गुबगुबित होते.
“ मी तुमचं नाव ऐकून आहे.फक्त रीवा या शहरापुरते ते मर्यादित नाही.इकडे सुद्धा तुम्ही तेवढेच प्रसिद्ध आहात. बोला काय करू शकतो मी?” –शाल्व म्हणाला.
पाणिनीने उत्तरं द्यायच्या आधीच घाई घाईत शुक्लेंदू म्हणाला, “ पटवर्धन इथे प्रचिती च्या संदर्भात आलेत.तुम्हाला माहित्ये गेली तीन –चार दिवस ती ऑफिसला येत नाहीये.तिचा भाऊ अपघातात गंभीर जखमी झालाय, मीच तिला रजा दिली.”
“ मला कळलेल्या बातमी नुसार आज पहाटे तो गेला.” पाणिनी म्हणाला
काका पुतण्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि सहानुभूती व्यक्त केली. प्रचिती ला हवं नको ते सर्व मदत करायची सूचना शाल्व ने शुक्लेंदू ला दिली. “ आपण तिच्याशी थेट संपर्क करू नये असं अॅडव्होकेट पटवर्धन यांचं म्हणणे आहे.आणि त्यांची हरकत नसती तरी सुद्धा आपण आपल्या वकिलांच्या सल्ल्यानुसार वागणेच योग्य आहे असं माझं मत आहे. ” शुक्लेंदू म्हणाला.
“ वकील कशाला हवेत मधे?” शाल्व म्हणाला. “ माणुसकीच्या दृष्टीने आपण तिला कधीही मदत करू शकतो.भेटू शकतो.”
“ पटवर्धन काय म्हणतात ते आपण नीट ऐकून घ्यावं.” शुक्लेंदू म्हणाला.
“ काय फरक पडणार आहे?”-शाल्व म्हणाला
“काका, ऐका,ऐका. आपल्याला कंपनीत २० लाखाची रोख तूट आली आणि त्याच वेळी प्रचिती पारसनीस जी भावासाठी रजा घेऊन हॉस्पिटलात बसणे अपेक्षित होतं,ती अचानक रीवाला गेली आणि खोट्या नावाने तिथल्या हॉटेलात राहिली.हा योगायोग नाही वाटला मला म्हणून मी इथल्या पोलिसांना सांगून रीवाशहरातल्या पोलिसांतर्फे तिची चौकशी करवली.याचा अर्थ पाणिनी पटवर्धन असा घेतायत की आपण तिच्यावर चोरीचा आरोप केलाय.” शुक्लेंदू म्हणाला.
“ त्यात त्यांची काय चूक आहे?तू फार घाई घाईत निष्कर्ष काढलास.आपल्या कंपनीत बरेच जण रोख रक्कम हाताळतात.आता हेच बघ मलाच स्वत:ला एका व्यवहारासाठी दहा लाख हवे होते.मी ते घेतले,दुर्दैवाने तो व्यवहार पूर्ण झाला नाही.मी ती रक्कम पुन्हा तिजोरीत ठेवली, अत्ताच. ” शाल्व म्हणाला.
“ म्हणजे आता तूट वीस लाखावरून दहा लाखावर आली.” शुक्लेंदू म्हणाला.
“ अजूनही ती तूट आहे असं नाही म्हणता येणार.अगदी माझ्यासकट बरेच एक्झिक्युटिव्ह तिजोरीतून रोख रक्कम काढतात, काढताना त्यांनी तिथे रक्कम घेतल्याची चिट्ठी ठेवणे अपेक्षित असते पण घाई असेल तर ते राहून जाते.अत्ता माझ्याही हातून तशी चिट्ठी ठेवली गेली नव्हती.पण ठीक आहे आता मी उचललेली रक्कम पुन्हा ठेवल्ये. असो पण आपण एकत्र येऊन बोलण्यापूर्वी तू ही अॅक्शन घ्यायला नको होतीस.” शाल्व म्हणाला.
“ सॉरी ” शुक्लेंदू नाराज होऊन म्हणाला.
“ पण तुला कळलच कसं की कॅश कमी आहे? ”
“ मला सुद्धा एका कामासाठी पैसे हवे होते म्हणून मी तिला विचारायला गेलो पण ती नव्हती आणि तिजोरीत फार रक्कम दिसत नव्हती.माझ्या पोलिसातल्या एका मित्राला मी विचारलं की मला एका मुलीचा ठाव ठिकाण काढायचा आहे, तर काय करता येईल,त्याला मी तिच्या भावा बद्दल माहिती सांगितली.कुठल्या हॉस्पिटलात त्याला ठेवलंय ते सांगितलं.त्याने त्याचं बुद्धी चातुर्य वापरलं आणि हॉस्पिटल मधे जाऊन टेलेफोन ऑपरेटर ची झाडा झडती घेतली. पारसनीस नावाच्या पेशंट साठी कुणाकुणाचे फोन येतात याची चौकशी केली.सर्वात जास्त फोन प्रचिती चे होते असं निष्पन्न झालं. प्रचितीने तिचा नंबर टेलेफोन ऑपरेटर कडे देऊन ठेवला होता, काही इमर्जन्सी आली तर कळवावे म्हणून, तो नंबर रीवामधील डेल्मन हॉटेलचा असल्याचं त्याच्या लक्षात आलं.म्हणून त्याने तिथले स्थानिक पोलीस चौकशीला पाठवले. ” शुक्लेंदू म्हणाला पण त्याच्या खुलाशाने शाल्वचं समाधान झालं नाही. तो म्हणाला, “ ते काही असलं तरी तू प्रचितीवर संशय घेण्यात घाई केलीस असं वाटतंय मला.ती कामात किती चोख आहे आणि प्रामाणिक आहे हे आपल्या दोघांनाही माहिती आहे.” तो पाणिनीला उद्देशून म्हणाला, “ पटवर्धन सर, अत्ता ती भावाच्या निधनाच्या गडबडीत आहे, त्याचे अंत्य संस्कार वगैरे करायचेत.माझी वैयक्तिक पातळीवर आणि कंपनीच्या वतीने तुम्हाला विनंती आहे की काही दिवस हे प्रकरण तुम्ही जरा थांबवलं तर बर होईल. शुक्लेंदू, तू तिला फोन करून काही मदत हवी आणि पैसे हवेत का ते विचार.”-शाल्व म्हणाला.
“ आज नका फोन करू.मी इला फोन बंद करून ठेवायला आणि औषध घेऊन झोपायला सांगितलंय.” पाणिनी म्हणाला
“ ठीक ठीक, बरोबर आहे तुमचा सल्ला पटवर्धन.तसं आज शनिवारच आहे.सोमवार पर्यंत तिला त्रास नाही देत आम्ही. शुक्लेंदू, तू तिच्या ऑफिस मधील एखाद्या मैत्रिणीला सांग तिला फोन करायला आणि आपल्या वतीने सांत्वन करायला.” शाल्व म्हणाला.
“ ते नाही शक्य.कारण तशी प्रचिती एकलकोंडी आहे.तिला मैत्रीण वगैरे नाहीये. तरीपण मी बघतो काय करता येईल ते.”-शुक्लेंदू”
शाल्वने उठून पाणिनीला शेक हँड केला. “ तुमच्या मनात काय आहे याची तुम्ही मला पूर्व कल्पना दिलीत या बद्दल आभारी आहे.मला खात्री आहे की एकमेकांविरुद्ध कायदेशीर लढाई करायची वेल आपल्यात येणार नाही.आपण परस्पर समझोत्याने काहीतरी मार्ग काढू.” शाल्व म्हणाला. “ आणखी एक, कृपा करून अशी समजूत करून घेऊ नका की आम्ही कुठल्या अवैध धंद्यात गुंतलो आहोत.आयात-निर्यात करतांना सगळ्यांनाच अडचणी असतात.पण प्रत्येकाचे काहीतरी संपर्क असतात.”
“ संपर्क ? म्हणजे? ” पाणिनीने विचारलं.
“ ब्रोकर्स म्हणा हवं तर.एक लक्षात घ्या पटवर्धन, कोणीही आला आणि आम्हाला माल विकायला लागला तर आम्ही त्याच्या कडून माल घेत नाही.काही ठराविक लोकांशीच आम्ही व्यवहार करतो.आणि ते लोक त्यांच्या संपर्कातील इतर लोकांशी व्यवहार करतात. मी मगाशी सांगितल्यानुसार आमच्या कडे आलेला माल, म्हणजे पुरातन मूर्ती, हस्तिदंत, किंवा रत्न, हे ओरिजिनल आणि डुप्लिकेट असं एकत्र असतं आम्ही घेताना याची जाणीव ठेऊनच आणि तेवढा धोका स्वीकारुनच एक रकमी किंमत बोलून खरेदी करतो.त्यासाठी रोख रक्कम मोजतो.त्यानंतर प्रत्येक वस्तू ओरिजिनल की डुप्लिकेट हे त्या -त्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणसाकडून तपासून घेतो. आणि फक्त ओरिजिनल असेल तेच विकायला ठेवतो. खरेदी करतांना तपासणी करणे शक्य नसत.”
“ पण तुम्ही न तपासता खरेदी करताय म्हंटल्यावर ब्रोकर ने सर्वच माल डुप्लिकेट विकला तर? ” पाणिनीने विचारलं.
“ तर त्या ब्रोकर ची पत बाजारात रहात नाही.त्याच्या कडून कोणीच खरेदी करणार नाही तेव्हा ते व्यवधान त्याला संभाळावेच लागते.” –शाल्व म्हणाला.
“ अच्छा.” पाणिनी म्हणाला आणि त्याने शाल्व च्या हातात हात देऊन निघायची तयारी केली. शुक्लेंदू ने मात्र शेक हँड करणे टाळले.
“ आम्हाला समजावून घेतल्या बद्दल आभार. आपण लौकरच प्रचिती च्या विषयात तोडगा काढायचा प्रयत्न करू.” शाल्व म्हणाला.
“ ठीक आहे, निघतो मी ” पाणिनी म्हणाला बाहेर पडतांना काउंटर वर ठेवलेल्या सुंदर हस्तिदंती कलाकृतीकडे त्याचे लक्ष गेलं.त्या कलाकृतीच्या शेजारीच एक चिट्ठी ठेवलेली त्याला दिसली.त्यावर त्याचं नाव लिहिलं होतं.कलाकृती बघता बघता त्याने कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने ती चिट्ठी आपल्या खिशात टाकली आणि बाहेर आला. चिट्ठी उघडून वाचली.
‘ ते तुमच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत.इथे काही गोष्टी अशा घडत आहेत की त्या तुम्हाला कळू नयेत असा प्रयत्न केला जातोय. प्रचिती ला तुमच्या संरक्षणाची गरज आहे.’
चिट्ठी खाली कुणाचीही सही नव्हती किंवा नाव नव्हतं. सर्व चिट्ठी टाइप केलेली होती. पाणिनीने कागद खिशात टाकला.आपल्या हॉटेलवर आला आणि बिल पे करून चेक आउट केलं.
( प्रकरण ७ समाप्त.)