Sumantanchya Vaadyaat - 5 in Marathi Detective stories by Dilip Bhide books and stories PDF | सुमंतांच्या वाड्यात - भाग ५

Featured Books
  • انکہی محبت

    ️ نورِ حیاتحصہ اول: الماس… خاموش محبت کا آئینہکالج کی پہلی ص...

  • شور

    شاعری کا سفر شاعری کے سفر میں شاعر چاند ستاروں سے آگے نکل گی...

  • Murda Khat

    صبح کے پانچ بج رہے تھے۔ سفید دیوار پر لگی گھڑی کی سوئیاں تھک...

  • پاپا کی سیٹی

    پاپا کی سیٹییہ کہانی میں نے اُس لمحے شروع کی تھی،جب ایک ورکش...

  • Khak O Khwab

    خاک و خواب"(خواب جو خاک میں ملے، اور خاک سے جنم لینے والی نئ...

Categories
Share

सुमंतांच्या वाड्यात - भाग ५

सुमंतांच्या वाड्यात

पात्र परिचय

दिनेश सुमंत                               मोठा भाऊ .

विशाल सुमंत                 धाकटा भाऊ.

शलाका                      दिनेशची बायको.

विदिशा                      विशालची बायको.

आश्विन आणि विशाखा          दिनेशची मुलं

प्रिया                       विशालची मुलगी

केशवराव                    शेजारी.

प्रदीप                       केशवरावांचा मुलगा.  

गोविंदराव                    विदिशाचे वडील. (वकील)

प्रभावतीबाई                  विदिशाची आई.

राधास्वामी                   मंत्र तंत्रा मधे अधिकारी माणूस.

निशांत                      शोधकर्ता (डिटेक्टिव)

भाग  ५  

भाग ४ वरुन  पुढे  वाचा .......

“अहो, तुम्ही असे विचित्र का वागत आहात?” विदिशाच्या आईने गोविंदरावांना विचारलं? “तिकडे आपली मुलगी संकटात सापडली आहे आणि तुम्ही इथे नागपुरात बसून फुकटचे सल्ले देता आहात. काही हृदय नावाची चीज आहे की नाही या माणसाच्या शरीरात?” विदीशाची आई खूप संतापली होती. “उद्याच्या उद्या आपण बार्शीला जातो आहोत. सगळी कामं बाजूला सारा.” प्रभावतीबाईंनी निर्वाणीचं सांगीतलं.

विशालने फोन बंद केला. पण हॉल मधून लहान मुलांचे भेसूर रडण्याचे आवाज येतच होते. थोड्या वेळाने आवाज बंद झाला. दिनेश आणि विशाल हळू हळू हॉल मधे आले. कोणीच नव्हतं. हॉल रिकामा होता. आवाज आला कोठून? दोघांची तर बुद्धीच चालेना. शलाका आणि विदिशा पण आल्या. सर्व जण आता प्रचंड घाबरले होते. शलाका म्हणाली “ते स्वामी म्हणाले त्या प्रमाणे, अघोरी शक्ति त्यांचं रक्षा कवच तोडून आत आली आहे. आता आपल्यापैकी कोणावर तरी वीज पडणार. आणि ती रडायलाच लागली. विदिशाला पण रडू फुटलं. दिनेश आणि विशाल खूप घाबरले होते. त्यांना काय करावं हेच कळेना. ते फक्त रडत नव्हते इतकंच.

दुसऱ्या दिवशी गोविंदरावांनी मुंबईची तिकीटं काढली आणि विशालला तसं कळवून टाकलं. विदिशाला जरा हायसं वाटलं. तसं तिने बोलून पण दाखवलं. दिनेश आणि विशाल ला पण बरं वाटलं कोणी मोठं माणूस असलं की जरा धीर येतो. तसंच झालं होतं.

गोविंदराव आणि प्रभावतीबाई येऊन सुद्धा चांगले आठ दिवस राहिले. हे आठ दिवस मजेत गेले. वडीलधारी मंडळी घरात असल्याने कोणाच्याच डोक्यावर टेंशन नव्हतं. या आठ दिवसांत काहीच घडलं नाही. आता त्यांच्या जायचा दिवस आला. गोविंदराव म्हणाले, “तुम्ही कसलंही टेंशन घेऊ नका. माझा विश्वास नव्हता, पण त्या स्वामींनी केलेल्या यज्ञा मुळे संकट टळलेलं दिसतंय. चांगली गोष्ट आहे. चला येतो आम्ही.”

पुढचे पंधरा दिवस सदधा काहीही विपरीत न घडता छान गेले. सर्वांच्या चेहऱ्यावर आता भीतीचा आणि दडपणाचा लवलेशही नव्हता. पण हे सुख काही फार काळ त्यांना लाभलं नाही. त्यादिवशी नेहमी प्रमाणे शलाका सकाळी उठली आणि स्वयंपाकघरात चहा करण्यासाठी गेली, आणि तिथलं दृश्य पाहून तिला चक्करच  आली. दाराला पकडून तिने कसे बसे स्वत:ला सावरले आणि दिनेशला ओरडून हाक मारली. तिचा आवाज एवढा विचित्र होता, की दिनेश चा थरकांप उडाला. तो किचन मधे धावला. विशाल पण त्यांच्या मागोमाग पोचला. किचन मधे सगळीकडे रक्त सांडलं होतं ओट्यावर पण रक्त होतं. तिघांचीही वाचा बसली होती आणि एकमेकांचा हात घट्ट धरून ते उभे होते. डोळे विस्फारून त्या रक्ता कडे बघत होते.

“आता काय झालं? तुम्ही असे का उभे आहात?” विदिशा पाठीमागून म्हणाली आणि तिघांच्याही तोंडून किंचाळी निघाली. तिघंही जाम घाबरले होते. विदीशाला बघून त्यांच्या जीवात जीव आला. ते बाजूला सरकले आणि विदिशाने ते दृश्य पाहिलं, आणि आता तिला घेरी आली. ती पडणारच होती पण विशालने तिला सावरलं. “तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारा.” – दिनेश म्हणाला. आता आली का पंचाईत. पाण्याचा नळ आणि माठ, ओट्याच्या पलीकडच्या कोपऱ्यात, किचन मधे, पूर्ण किचन ओलांडून तिथे कोण जाणार? मग विशाल म्हणाला, शलाका तू दुसऱ्या बाजूने हिला धर, आपण बेडरूम हिला घेऊन जाऊ. तिथे पाण्याची बाटली आहे. पाण्याचे हबके मारल्यावर विदिशा शुद्धीवर आली. “हे काय चाललं आहे हो आपल्या घरात?” असं म्हणाली आणि पुन्हा रडायला लागली. तिला शांत करण्याचं बळ कोणांतही नव्हतं. बराच  वेळ तसाच गेला. दारावरची बेल वाजली तेंव्हा सर्वांना शुद्ध आली. दिनेश दार उघडायला गेला. हॉल मधलं दृश्य पाहून तो ओरडला “विशाल, लवकर इकडे ये.”  विशाल धावला. हॉल मधे पण रक्ताचा सडा पडला होता. इकडे त्यांचा आरडा ओरडा ऐकून बाहेर जो कोणी होता त्याने आता दार जोरजोरात ठोठावायला सुरवात केली होती. हा सगळा गलका ऐकून शेजारचे केशवराव आणि प्रदीप पण धावत आले. मोठ मोठ्याने दिनेशला हाक मारू लागले. शेवटी भानावर येऊन दिनेशने दार उघडले. समोर केशवराव, प्रदीप आणि इंदु उभे होते. दिनेश दरवाजातून बाजूला झाला. त्या लोकांनी दिनेश ला बाजूला सारलं आणि आत मधे पाऊल ठेवलं आणि तिघांचही काळीज थिजूनच गेलं. त्यांची दांतखिळच बसली. कोणाच्याही तोंडातून शब्द फुटेनासा झाला.

“हे काय अघटित झालं रे दिनेश?” केशवराव पण भांबावले होते, त्यांनी आयुष्यात पूर्वी कधी असा रक्ताचा सडा बघितला नव्हता. त्यांनी चांचरत चांचरत दिनेशला प्रश्न केला. उत्तरा दाखल दिनेशने कपाळाला हात लावला. “काय लिहिलं आहे नशीबात देव जाणे” असं म्हणून भकास नजरेने केशवरावांकडे  कडे बघत राहिला. गोविंदराव इथे येऊन गेल्यानंतर त्यांनी एक प्रघात पाळला होता. ते रोज सकाळी फोन करायचे. आणि ख्याली खुशाली विचारायचे. तसा प्रभावतीबाईंनी त्यांना दमच दिला होता. आत्ता सुद्धा त्यांचाच विशालला फोन आला. विशालने घेतला. विशालच्या हॅलो म्हणण्या मधेच त्यांना संशय आला.

“काय रे विशाल? तुझा आवाज का असा येतो आहे? पुन्हा काही गडबड झालेली दिसतेय. काय झालं आहे?

मग विशालने सर्व सांगीतलं आणि रडवेल्या आवाजात म्हणाला की “बाबा जगणं मुश्किल झालं आहे हो, ही संकटांची मालिका केंव्हा संपणार आहे देव जाणे”

“मग आता करणार? त्या स्वामींनी सांगितल्या प्रमाणे, त्यांच्या गुरु कडे जाणार आहात का?” – गोविंदराव.

“दूसरा काही उपाय आम्हाला तरी सुचत नाहीये. बाबा, तुम्ही येता का? आम्हाला जरा आधार वाटेल.” – विशाल.

“हो नक्कीच येतो आहे. आजच निघतो. तुम्ही काळजी करू नका. तोपर्यंत तुम्ही स्वामींशी बोलून घ्या.”  गोविंदराव म्हणाले.

“हो त्यांना सर्व सांगावच लागेल मग ते काय म्हणतात त्या प्रमाणे पुढची हालचाल करू. पण बाबा मुख्य प्रश्न हा आहे की या रक्ताचं काय करायचं. याला साफ करण्यासाठी हात लावला, आणि काही विपरीत घडलं तर?” – विशाल.

“ते पण स्वामींनाच विचार. मी इथून काय सांगणार? पण जे काही होतं आहे ते भयंकर आहे, यात वाद नाही. पण तुम्ही धिराने घ्या. मी आजच निघतो आहे.” गोविंदराव.

गोविंदरावांच्या बोलण्याने सर्वांनाच जरा धीर आला. मग विशालने स्वामींना फोन लावला. सर्व कहाणी पुन्हा सांगितल्यावर ते म्हणाले, “मी लगेच येतो. मला बघू द्या काय गोंधळ घालून ठेवला आहे तो. तो पर्यंत तुम्ही शांत बसा.”

स्वामी आले आणि त्यांनी सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला. म्हणाले, “माझ्या अपेक्षेपेक्षा प्रबळ शक्ति दिसते आहे. आज जे काही घडलं आहे, याचा तर मी निपटारा करेन, पण पुढे काय होईल हे सांगता येणार नाही. माझ्या मर्यादे पलीकडचं  काम आहे हे.”

“मग स्वामी महाराज आता आम्ही काय करायचं?” – दिनेश.

“मला गुरुजींशी बोलावं लागेल.” – स्वामी.

“आपण आधी हे सर्व साफ करू. घर पूर्णं धुवून काढू, मग मी तुमच्यासमोरच गुरुजींशी बोलतो.” – स्वामी.

मग गुरुजींनी विभूति काढली आणि १० मिनिटं मंत्र म्हणून ती पसरलेल्या रक्तावर शिंपडली. “आता काही भीती नाही आता हे सर्व साफ करून टाका.” – स्वामी.

साफ करायच्या अगोदर दिनेशने फोटो काढले. म्हणाला “पोलिस स्टेशन मधे जाऊन अपडेट द्यावं लागेल.”  

मग इंदूच्या मदतीने सगळं घर साफ करण्यात जवळ जवळ तीन तास गेले. केशवराव आणि प्रदीप पण शेजारधर्माला जागून मदतीला आले. मधल्या वेळात स्वामींनी त्यांच्या गुरुजींना फोन लावण्याचा बराच प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. “त्यांच्याशी बोलणं झाल्यावर लगेच तुम्हाला कळवतो” असं सांगून स्वामी गेले. मग सर्व केशवरावांकडेच जेवायला गेले. केशवरावांची बायको आणि सून तत्परतेने सर्व विचारपूस करत होत्या. संध्याकाळ पर्यन्त वातावरण बरचसं निवळलं होतं. दिनेशने जे रक्ताळलेल्या फरशीचे आणि ओट्यांचे फोटो काढले होते, ते घेऊन तो पोलिस स्टेशनला गेला आणि त्यांना अपडेट दिलं. संध्याकाळी स्वामींचा फोन आला. त्यांनी सांगीतलं की “ते आणि गुरुजी उद्या सकाळी येणार आहेत, तेंव्हा तुम्ही काळजी करू नका.” दुसऱ्या दिवशी गोविंदराव आणि प्रभावतीबाई दोघंही आले. पण यावेळेस त्यांच्या बरोबर अजून एक माणूस होता.

“मी ओळख करून देतो. हे निशांत. हे शोधकर्ता आहेत. त्यांना मुद्दाम बरोबर घेऊन आलो आहे.” – गोविंदराव.

“हे काय करणार? कशाचा शोध लावणार? म्हणजे आपण आता स्वामींच्या गुरु कडे जायचं नाही का?” दिनेशने गोंधळून विचारले. “आम्ही तर स्वामींशी बोलून ठेवलं आहे, ते आत्ता येतच असतील.”

“एका अंगाने ते चालू द्या. दुसऱ्या अंगाने हे निशांत, त्यांच्या पद्धतीने शोध लावण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला काय? प्रश्नावर उपाय मिळण्याशी मतलब. तो कोणाच्याही पद्धतीने मिळाला तरी चालतो.” गोविंदराव म्हणाले. यावर दिनेश आणि विशालने मान डोलावली. थोड्याच वेळात स्वामी आले.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.