प्रस्तुत स्तंभ लेखनात मी body shame म्हणजे, शारीरिक त्रुटींबाबत व्यंगभाव बाळगणे, आणि missing tile syndrome यावर भाष्य करणार आहे. अवजड वैज्ञानिक संकल्पनेचे मी माझ्या मती, अनुभूतीनुसार विवेचन करीत आहे. प्रारंभीची बोध कथा मनोरंजन हेतू साध्य करो.
सुसंपन्न राज्यात ,सुसंस्कारी राजा राणीला , कन्यारत्न प्राप्त होते. म्हणून जन्मसाफल्य झाल्याचा आनंद दोघांना होतो . चंद्रासमान सुंदर असणाऱ्या, राजकन्येच्या चेहऱ्यावर मोठा काळा तीळ असल्याने , तिचे नाव चंद्रिका ठेवले जाते. सुविद्य माता पिता तिला राजनीती , वेद यासोबत युद्ध ,संगीत आदी कलांचे यथोचित ज्ञान देऊन निपुण बनवतात. कन्या उपवर झाल्यावर , माता पित्याला तिच्या विवाहाची चिंता लागते . कारण त्या एका डागासोबत अनेक अंधश्रद्दधांचा डाग तिला लावून अशुभ ठरविलेले असते. माता पित्यांची चिंता ओळखून ,चंद्रिका त्यांची समजूत घालते. तिच्या गालावरील काळ्या डागाला महत्त्व न देता जो तिचा स्वीकार करेल, अशा निष्कलंक व्यक्तीचा मी स्वतः च शोध घेऊन वरण करेन, असे आश्वस्त करते. तिचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान पाहून हताश राजा राणीलाही हुरूप येतो . सुविद्य राणीवर राज्य कारभार सोपवून कन्यावत्सल राजा, चंद्रिका व एक अंगरक्षकांची तुकडी घेऊन वेष पालटून निघतो. माता निघताना तिला धनाढ्य किंवा वीर युवकाचे पती म्हणून चयन करण्यास सांगते.
नदी पलीकडील एक राज्याच्या सीमेवर दोन राज्याच्या सैन्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू असल्याचे ते पांथस्थ पाहतात . शत्रूपक्ष वरचढ होऊन एका राज्यात घुसून कत्तल करणार असे दिसताच , युध्दकुशल चंद्रिका शिरस्त्राण घालून ,घोड्यावर बसून आपल्या सैन्य तुकडीसह त्यांच्यावर तुटून पडते. युद्धनिपुण वीरांगना शत्रू सैन्याचा पाडाव करते . शत्रू राजा विरगतीस प्राप्त होतो . विजयी राजासमोर युद्ध कैदी प्रस्तुत केले जातात . युद्धकैदी आपला राजा मरण पावल्याने त्याचे मांडलिकत्व स्वीकारून प्राणदान मागतात. तरीही तो जेता आपले फर्मान रद्द न करता अडीग आहे असे पाहून ,रण आवेश शमलेली धीरोदात्त चंद्रिका त्यास सैनिकांस क्षमा करण्याचे आर्जव करते . तिच्या विरात्त्वाने प्रभावित झालेला तो विजेता भूपती(राजा) , तिच्या समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवून तिचे प्रियराधन करतो ." हे विरबाला आपल्या शौर्याने मी भारावून गेलो आहे .संकटसमयीं माझे राज्यरक्षण व हितासाठी सज्ज झालेल्या, हे सुमुखी आपला मुख चंद्रमा पाहण्यास मी अधीर आहे. सुंदर मनाच्या हे सुकांता , माझ्या विवाहाचा प्रस्ताव स्वीकार कर" यावर चंद्रिका आपले शिरस्त्राण काढून केश संभार बाजूला घेते . तिच्या चेहऱ्यावरील काळा डाग पाहून निराशेने चेहरा काळवंडलेल्या राजपुत्रास चंद्रिका स्वतः च म्हणते ,आपण काही निर्णय घेण्याआधी मी आपले पती म्हणून वरण करण्याची मनीषा बाळगत नाही .कारण शरणागताची हत्या करण्याची आज्ञा आपण दिलीत . क्षमा हे वीराचे भूषण आहे . दयेच्या अभावी विरत्त्व हे क्रौर्य ठरते . निर्णय देऊन ती निघून जाते. तिच्या वक्तव्याने आणि निर्णयाने लज्जित ,चेहरा म्लान पडलेला राजपुत्र तिला मूक राहून जाताना पाहत राहतो .
पुढे जंगलातून जाताना , एकसद्गुणी व्यापारी विवाह योग्य असल्याचे त्यांना समजते. त्याच्या व्यवहार चतुर्याची परीक्षा पाहून , त्याचे वरण करावे असा निग्रह करून सारे व्यापाऱ्यांचा वेष घालून निघतात. त्यानुसार , चंद्रिकेला डोक्यावरून खाली पदर घ्यावा लागतो . व्यापारी रेशमी कापड ,मोती आदींची खरेदी- विक्री करून , आपल्या राज्यात परतत होता . सीमेजवळ सुवर्णाचे अलंकार विकणारे व्यापारी त्याला भेटतात . त्यांच्या जवळील सुवर्णालांकर बनावट असल्याचे चाणाक्ष चंद्रिका ओळखते. व्यापाऱ्याला त्याची खरेदी न करण्याचे सुचविते ,यावर तो तिला तसे सिद्ध करण्याचे आव्हान देतो. आव्हान स्वीकारून त्वरेने पुढे येऊन , ती काही कळायच्या आत ते सुवर्ण अलंकार समोरच्या अग्नीत फेकते अलंकार भस्मसात होतात . व्यापाऱ्याला चूक समजते .वाटेत पित्याजवळ तो कन्येशी लग्न करण्याची इच्छा दर्शवितो . पिता कन्येचा निर्णय सर्वोपरी असल्याचे सांगतो . राज्यात पाहोचल्यावर व्यापारी तांड्यासोबत असणारे भारवाहक त्यांचा मोबदला देऊन मुक्त करावे म्हणून येतात . यावर तो कमी मुद्रा देऊन त्यांची व्यवहारचातुर्याने बोळवण करतो . त्यानंतर चंद्रिका दिसल्यावर, चंद्रिकेच्या चतुराईने प्रभावीत झालेला, तो व्यापारी तिचे प्रिय राधन करू लागतो "हे सुवर्णासम कांती असणाऱ्या कांचनतनया, तुझे मुखकमल ही मोत्यासमान तेजस्वी असावे . तू माझ्या प्रेमाचा आणि विवाह प्रस्तावाचा स्वीकार कर." आपल्या चेहऱ्यावरील पदर बाजूला घेवून चंद्रिका त्याला काही नकार देणार , इतक्यात तिच्या चेहऱ्यावरील काळ्या डागाकडे पाहून व्यापाऱ्याचे मुख मलूल पडते. चंद्रिका सांगते , मी हा प्रस्ताव स्वीकारु शकत नाही . कारण धनाला दानाची जोड नसेल तर ते व्यर्थ ठरते ,शोषण ठरते . श्रमिकांना तुम्ही कामाचा योग्य मोबदला दिला नाहीत . या उत्तराने लज्जित धनवान निस्तेज होऊन मौन उभा राहतो.
सुयोग्य वर न मिळाल्याने हताश राजा राजकन्येसह राजधानीकडे परतत असताना, वाटेत वादळ येऊन नदीच्या डोहामध्ये एक वाटसरू तोल जाऊन पडतो . राजा व सैन्य तुकडी इतस्ततः विखुरते. चंद्रिका त्या वाटसरूला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेते . प्रवाहात वाटसरूला पकडून हेलकावे खाणाऱ्या चंद्रिकेला तीरावर परतता येत नाही . तेथून जाणारा एक तरुण त्या दोघांना पाहून एका वृक्षा वरील भली मोठी मजबूत वेल त्यांच्या दिशेने फेकतो. डोहात चंद्रिकेला वाचविण्यासाठी उडी घेणाऱ्या पिता आणि सैनिकांना थांबवतो. त्या मजबूत वेलीला पकडून दोघे सुखरूप बाहेर येतात. बाहेर आल्यावर सारे त्या तरुणाचे आभार मानतात. तरुण एक विद्वान असून त्यांच्याच राज्यात प्रधान पदासाठी जात असतो. तिला तो परिचय देऊन लग्नाची मागणी घालतो . यावर ती विनिता "माझ्या चेहऱ्यावरील काळा डाग आपणास दिसला नाही का?"असा प्रतिप्रश्न विचारते. तेव्हा तो ज्ञानी तिला आपल्याला तिचा कनवाळूपणा दिसला. वादळात स्वतः चा जीव धोक्यात घालून अपरिचितला वाचविण्यासाठी नदीच्या डोहात केवळ परोपकारास्तव उडी मारण्याचे शौर्य दिसले . वेल पकडून काठावर येतानाची लढाऊ वृत्ती दिसली . या तिच्या उज्ज्वल गुणांपुढे हा काळा डाग फिका आहे . असे तो तिला सांगतो . यावर चंद्रिकादेखिल पित्याकडे वळून त्याला रुकार देते . पित्याला सांगते , ज्या बुद्धीला विवेकाची जोड आहे , प्रसंगावधान राखून ज्याने सर्वांचे प्राण वाचविले व बाह्यरूपापेक्षा आंतरिक सद्गुण यांना महत्त्व दिले ,अशा ज्ञानी पुरुषाला मी विवाहासाठी योग्य समजते. पित्याची परवानगी मागितल्यावर "हे सुलक्षणे, क्षमाहिन विरापेक्षा , कृपाण (कंजूष) धनावंतापेक्षा विवेकी विद्वान हाच सर्व श्रेष्ठ होय . विरत्त्व आणि धन असा व्यक्ती सहज कमावू शकेल .असे सांगून त्या विद्वानाला आपण या राज्याचे नृप असून ,चंद्रिका युवराज्ञी असल्याचे सांगून ,राज्य आणि चंद्रिका दोघांचा स्वीकार करण्याची अनुमती देतो . चंद्रिकेची खरी ओळख आणि खरे सौंदर्य जाणणारा ज्ञानी व चंद्रिका दोघेही सुखावतात.
चंद्रिकेच्या बोध कथे वरून body shame म्हणजे शारीरिक किंवा बाह्य स्वरूपा बद्दल ,त्रुटीं बद्दल हीन भाव बाळगणे ,एखादयाच्या बाह्यस्वरूपा वरून त्याच्या संपुर्ण व्यक्तीमत्वाविषयी कयास लावण्याचा प्रयत्न करणे ,या बाबी स्पष्ट होतात. स्वतः मधील एखाद्या शारीरिक कमतरतेबद्दल न्यून भाव बाळगला जातो. तेव्हा तो आत्मविश्वास दोलायमान करून ,खच्चीकरण करू शकतो. लोकांकडून तशा प्रतिक्रिया येतील , याबद्दल अनावश्यक भीती वा चिंतेने मन ग्रासून जाते. इतरांच्या शारीरिक दोषांचा त्यांच्यासमोर अथवा मागे उल्लेख करणे टीका, चेष्टा अथवा मूल्यमापन , त्या व्यक्तीला हीन लेखणे ,ह्या बाबी ज्या व्यक्तीत असा दोष आहे त्याच्या नैतिक पतनास कारणीभूत ठरू शकतात. सावळेपणा , लठ्ठपणा, तिरळेपणा, दिव्यांग असणे, तोतरेपणा ही कुरुपता असु शकत नाही . समाजानेही बाह्यसौंदर्याचे निकष बदलून कौशल्य, ज्ञान, उत्तम स्वभाव ह्या सद्गुणांचे मूल्य समजून , तद्अनुरूप सौंदर्यदृष्टी स्वीकार्य करावयास हवी . अपघात ,व्याधी, जन्मदोष अशा काही कारणांनी व्यक्तीला असे शारीरिक दोष उदभवू शकतात . बाह्यस्वरूपाबद्दल व्यंग करणे हे कधी नकळत ,अज्ञाना पोटी होऊ शकते ,तर कधी हेतू पुरस्सर असते. हेतूपूर्वक केली जाणारी चेष्टा ही मानसिक विकृती असते . अशा वर्तनाला कधीही खत पाणी घालू नये . रूपापेक्षा आंतरिक गुण , सामर्थ्य यांकडे पाहून कुणालाही सकारात्मक प्रेरित करावे. स्वतः मधील अशा त्रुटी दूर करण्यासाठी गुण ,कौशल्य विकासनावर भर द्यावा .आत्मविश्वास बाळगावा. कोणाही व्यक्तीच्या दिसण्यावरून पूर्व ग्रह करून न घेता त्या व्यक्तिला जाणून त्याच्याशी समर्पक वर्तन करावे. टीका करून न्यूनगंड वाढविण्यापेक्षा ,तो कमी करण्याचा प्रयत्न करावा. बाह्यस्वरूपाच्या या परिक्षणाला job interview , लग्नाच्या वेळी वधू /वर परीक्षण ,सौंदर्य स्पर्धा, चित्रपट/नाट्य क्षेत्रात सामोरे जावे लागते. खरं तर अंतः दृष्टीने कला ,गुणांच्याआधारे सौंदर्यातचे मूल्य मापन करावे.
मनात निर्मळ भाव असल्यास अंतर्गत गुण सुंदर दिसतात. बाह्यरूप उजळविण्यासाठी सौंदर्य प्रसाधने , बाह्य उपायांचा अवलंब केला जातो . त्याप्रमाणे मनाचे सुप्तसौंदर्य गुणांच्या रुपात उजळून टाकावे.
Missing tile syndrome - Dennis Pragner यांनी या उपपत्ती /सिध्दांत मध्ये , आयुष्य हे बऱ्यापैकी परिपूर्ण अथवा सुखी असले तरी काही उणीवा ,अभाव हे असतात ,त्यांनाच missing tile म्हंटले आहे . प्रयोग करण्यासाठी वैज्ञानिकानी एका वास्तू मधील सुंदर टाईल्स असणारी एक भिंत निवडली ,त्या भिंती वरील एक टाइल निखळली ,तुटली होती . सुंदर अशा बाकीच्या टाईल्सकडे न पाहता बऱ्याच जणांनी तुटलेल्या टाइलबद्दल हळहळ व्यक्त केली . अतिरीक्त /जास्त प्राप्त करण्याचा मोह ,अज्ञातामागे धावण्याची मानवी वृत्ती, परिपूर्णतेचा अट्टाहास ह्या missing tile syndrome च्या मागे असतो . जीवनातील काही उणीवा ,गरजा यांचे मन चिंतन करू लागते ,याचा सकारात्मक परिणाम म्हणजे त्या उणीवा भरून काढण्यासाठी आपण प्रयत्न करतो ,उपाय शोधतो. आणि वाईट बाजू अशी की उणीवांचे सल मनाला बोचते, नसलेपण माणसाला दुःख देते . अपूर्णता वाटते . आत्मविश्वास ,जीवनातला रस जाऊन मन असमाधानी राहते .जीवनात इतर जमेच्या बाजू असूनही त्या एका अभावामूळे रितेपण वाटते .
म्हणून सतत या missing tile बद्दल विचार करण्या पेक्षा ,जीवनात जे सकारात्मक आहे , सुखाच्या संधी आहेत त्यांची जाणीव ठेवली तर अनेक उपलब्धी ,घटना सापडतील , ज्यांसाठी आपण सुख आणि समाधान बाळगू शकतो . याउलट , केवळ दुःखाची ओझी वाहण्यात व सहानुभूती मिळविण्यात धन्यता वाटत असेल तर अशा missing tile अनेक सापडतील .
या उणिवांकडे अतिलक्ष दिल्याने जगण्यातले सुख नाहीसे होते. यासाठी स्वतः व इतरांमधील उणीवा न शोधता , जे प्राप्त आहे त्यात समाधान मानण्यास शिकावे. ( 'सुखी भव' या आधीच्या माझ्या स्तंभ लेखनात मी प्राप्त आहे त्यात सुख शोधण्याची एक नव मर्मदृष्टी प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे)
या रिक्त पणा च्या भावनेवर मत करण्यासाठी या उणेपणावर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करावा . नकारात्मक विचारांचे जाणीवपूर्वक दमन, विस्थापन अथवा विस्मरणात टाकावेत . विस्मरण हा एक उत्तम उपाय यावर आहे . (विस्मरणाचे फायदे या लेखनात मी यावर सविस्तर उहापोह केला आहे)
आपल्या जीवनातील या missng टाईल्स म्हणजे, अप्राप्त गोष्टी मिळविण्यास अशक्य असेल तेव्हा दुसरा समर्पक उपाय शोधून आनंदी राहावे. थोडक्यांत ,दुधाची तहान ताकावर भागवावी . उदा - एखादयाला अंतर राष्ट्रीय कीर्तीचा गायक होणे शक्य नसेल ,तेव्हा त्याने आपल्या विभागातील समारंभात गायन करावे .
एकूणच या सर्वांचे सार म्हणजे ,ह्या missing टाईल्स मिळविण्यासाठी धडपड आणि अस्वस्थता अनुभवण्यापेक्षा ,जे प्राप्त झाले आहे , त्यात समाधानी राहावे. Self accepetance (स्व स्वीकृती) म्हणजे उणिवांसह स्वतः चा स्वीकार करावा. इतरांशी तुलना टाळावी. स्वतः च्या क्षमता आणि मर्यादांचे ज्ञान ठेवून , स्व भान राखावे . समाधान ही मनाची उच्चतम् सकारात्मक अवस्था आहे . समाधान म्हणजे प्रगतीला विराम नव्हे . जे प्राप्त आहे ,ते पर्याप्त समजणे , हेच सर्व गुण दोषांचे परिमार्जन होय .
अशा प्रकारे , मनाच्या अंतरंगातील सौंदर्यानुभूती मजला करून देणाऱ्या ,माझे मनतरंग अविचल ठेवण्याची ऊर्जा देणाऱ्या, ज्ञानियांचा राजा (श्री ज्ञानेश्वर) यांनी कोणत्याही शास्त्रीय सिध्दांत रचनेच्या आधी ,जे तत्वज्ञान सांगितले त्यातून ही सत प्रेरणा मला लाभली .
" चंद्रमे जे अलांछन , मार्तंड जे तापहीन ।
ते सदाही सर्व सज्जन । सोयरे होती।।" (पसायदान):श्री ज्ञानेश्वर
© पूर्णा गंधर्व