प्रेरणा ही व्यापक संकल्पना स्पष्ट करताना स्तंभलेखन प्रदीर्घ म्हणूनच रटाळ होऊ नये यासाठी आणि उद्बोधनासोबतच रंजन होण्यासाठी साहित्याच्या नवरसातील श्रुंगाररसाचे , आरंभ कथेसाठी चयन करीत आहे. या आधीच्या (उल्का-करूण रस, सुखी भव -शांत रस) कथांप्रमाणेच ,केवळ साहित्यप्रवाहातील रसानुभूती म्हणून गुणीजनांनी पाहावे , हा अनुरोध.
नदी तटावरील सुजल , सुपीक अशी दोन गावे. नदीमुळे जलसंपन्न झालेली. खळाळत येणारी ती अवखळ तटीनी (नदी) ,गावामधून वाहताना मात्र आज्ञाकारी सुकन्येप्रमाणे वागायची. पण ऋतू आला. तिच्या सौंदर्यावर अनुरक्त सखा पयोद (ढग) वर्षाकाली बेधुंद बरसला. ऋतूस्नात प्रवाहिनी (नदी) कामार्त होऊन , तटांची मर्यादा लांघून जलपती (समुद्र) कडे निघाली. निघताना ती रतीमग्न अभिसारिणी धरणी मातेच्या काळजावर पाय देऊन गेली. तृषार्त जलधारा स्वैर सोडून , प्रवाह विस्तारून ती उन्मत्त रमणी उन्नयनास्तव निघाली . स्वतनू विलोपनानंतर ती स्वैरगा पुन्हा शांत, शुद्ध भावी स्थिर झाली . पण त्या तारिणीने तटावरची दोन्ही गावे बुडविली. मोडलेल्या वास्तू , निश्चल देह , वाहून गेलेले संसार अशी त्या प्रणयकुपितेची रतीचिन्हे मागे राहिली . दुर्दैवाची ती भयंकर चित्रलिपी पाहत दोन्ही गावातले गावकरी हातधैर्य बसून राहिले. नदीचा पूर आणि दुःखाचा आवेग शमल्यावर गाव लांघून देशाटनास निघालेला एक विचारवंत आपल्या अनुयायांसमवेत किनाऱ्यावरील एका गावी थांबला . गावातील आर्त आणि दीन भाव पाहून , उध्वस्त गाव पाहून गावकऱ्यांना एकत्र करून , पुन्हा नव्याने घरे , वास्तू उभारा. शेती आणि उद्योगाची नवीन पायाभरणी करा . अशी प्रेरणा दिली. गावाची पुनर्रचना व्हावी यासाठी ईश्वराने हे दैवी संकट आणलं आहे. ईश्वरी ईच्छा मानून त्याचा आदर करून ,स्वीकार करून कार्यप्रवण झाल्यास उचित कृपाप्रसाद आणि कार्यफल ईश्वर निश्चित प्रदान करेल, असे कार्यप्रेरण देतो. प्रवासी विचारवंतांचा अनुभव व ज्ञान थोर मानून त्याच्या प्रेरक वाचनांनी हतभाग्य गावकरी उत्स्फूर्त होऊन कार्यप्रवृत्त होतात. त्या अभिनव ऊर्जेने उत्प्रेरित झालेला तो समूह नव्या ऊर्मिने कार्यरत होतो. नदीच्या गाळाने भरलेला तो सुतल पुन्हा सुपिक होतो. सुस्नात क्षिप्रा पिकांच्या रुपात प्रसवते. उंच जोत्यांची घरे ,उत्तम मजबूत बांधणी ,सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी पन्हळी , धान्याच्या साठवणुकीची कोठारे अशी अद्ययावत सोय करून भविष्यासाठी सुद्धा गावकरी तयार होतात. काळ सरतो तसे स्वयंस्फूर्ती ने प्रेरीत गावकरी कष्ट करून गावाचे रूप आधीपेक्षा मोहक ,अद्ययावत बनवतात. परतीच्या प्रवासात पुन्हा त्याच गावातून परतणारा तो सुविद्य सज्जन विचारवंत गावकऱ्यांनी आग्रह केल्याने गावाच्या पाहणीसाठी थांबतो. त्यांच्या अविश्रांत परिश्रमाचे कौतुक करतो . गावाची टेहळणी करण्यासाठी उंच वास्तूवरल्या झरोक्यातून पाहणाऱ्या त्या विचारवंताला नदीपालिकडील ,पुरामध्ये उन्मळून पडलेल्या दुसऱ्या गावातील दयनीय अवस्था दृष्टीस पडते. दैन्य आणि विषदाने भरलेल्या त्या गावविषयी पृच्छा केल्यावर हतबल झालेले त्या गावाचे गावकरी त्या आपत्तीनंतर ओज गमावल्याने पुन्हा कार्यसिद्ध होऊच शकले नाहीत , असे विचारवंतास समजते.
रतीपरिमल शमलेली धवलकांता सलीला(नदी) ,आता सवत्स वत्सल श्यामला झाल्यासारखी दिसत होती. नदीकाठी लहान लेकरे जलपान करीत क्रीडा करीत होती. प्रगाढ होऊन वाहणारी प्रौढ पुरंध्री सरिता, ओलांडून आपली चूक उमगलेला तो विचारवंत त्वरेने उध्वस्त गावाकडे निघतो.
प्रेरणा Motivation::
According to Woodworth "Motivation is the state of individual which disposes him to certain for seeking goal"
लक्ष्य साध्य करण्यासाठी एखाद्याला प्रेरित करणे ,मानसिक ऊर्जा प्रदान करणे म्हणजे प्रेरणा होय. शारीरिक वाढ आणि विकास होण्यासाठी आवश्यक गरजा , उदाहरण - तहान ,भूक, मलोत्सर्जन, निद्रा,लैंगिक तृप्ती ह्या मूलभूत गरजा आहेत . त्यांची पूर्तता व्हावी म्हणून प्रयत्न केला जातो , त्यास जैविक प्रेरण किंवा प्राथमिक प्रेरण म्हणतात. श्वसन प्रक्रियेमधून ऑक्सिजन कमी मिळत असल्यास व्यक्ती वेगाने श्वास घेते ,गुदमरल्याची जाणीव होते . पेशींमधील पाणी कमी झाल्यास आजूबाजूच्या पेशींमधून पाणी खेचुन घेतल्याने घसा कोरडा पडतो. तहान लागली म्हणून आपण पाणी पितो , ह्या मूलभूत शारीरिक गरजा शरीरास प्रवृत्त करतात. याच जैविक ,प्राथमिक प्रेरणा. अशा ह्या प्रेरणा सजीवाच्या जन्मापासून कार्यरत होतात.
सुसंपन्नता , मूल्य,विचार ,आदर्श ,श्रद्धा , स्वकर्तृत्व यांमुळे व्यक्तीस जो सामाजिक दर्जा प्राप्त होतो ,त्या दर्जाची प्रतिष्ठा राखण्यासाठी व्यक्ती प्रयत्न शील होऊन कार्य करते, त्यास सामाजिक दर्जा प्रेरणा म्हणतात. आशा या प्रेरणांचे विविध शास्त्रज्ञांनी विविध प्रकारे वर्णन ,वर्गीकरण केले असले, तरी एक सर्वसाधारण सोपा दृष्टीकोन मी मांडत आहे. प्रेरणा तत्त्वविषयी चिंतन ,अध्ययन करीत असताना , मानसशास्त्रीय व समाजशास्त्रीय सिध्दांताचा आधार घेऊन ,माझी आत्मानुभूती ,तन्मयता यांची तत्वजोड मी यास दिली आहे . वाचकांची प्रेरणा या संकल्पना प्राप्ती करिता सज्जता व्हावी , अभिरुची/ आवड निर्माण व्हावी आणि स्वदृष्टीकोन विकसनासाठी त्यांना हा लेख प्रारंभिक व प्रेरक ठरावा हाच उद्देश मी मनीमानसी बाळगत आहे.
एखाद्या काठीणतम कार्यासाठी आणि त्याची फलश्रुती करून घेण्यासाठी व्यक्ती जेव्हा स्वयंस्फुर्त होते तेव्हा त्यास आंतरिक प्रेरणा म्हणतात. आणि कार्यसिद्धीसाठी प्रलोभने, स्तुती, शिक्षा ,पारितोषिक यांचा आधार घेऊन प्रोत्साहित करणे , म्हणजे बाह्य प्रेरणा होय . जिज्ञासा आणि कुतूहल ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे . जाणून घेण्याच्या या ध्यासाने व्यक्ती कार्यवप्रवण होते आणि त्या मागील कारणांचा शोध घेऊन ,आपल्याला पडलेल्या प्रश्नांचे निराकरण करते ,कुतूहलशमन करते . वैज्ञानिक आणि योगी यांच्या कार्य सिद्धी मागे हे जिज्ञासा प्रेरण कार्य करते.
एखाद्या गोष्टीची उणीव असल्याची जाणीव निर्माण होते , अस्वस्थता वाटून मार्ग शोधनासाठी प्रयत्न सुरू होतात . विविध स्त्रोतांचे आयोजन करून कार्य सिद्धी केली जाते . अशाप्रकारे हे प्रेरणाचक्र कार्यान्वित होते . कार्यक्षमता व साधने उपलब्ध नसतानाही केवळ आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रोत्साहनामुळे असाध्य लक्ष्य पूर्ती करता येऊ शकते. ह्या आंतरिक प्रेरणेने झपाटून उत्तुंग पद , प्रतिष्ठा ,धन, ज्ञान यांची प्राप्ती केल्याची अनेक उदाहरणे आहेत . लक्ष्यप्राप्तीसाठी नियम योजना आखल्या जातात ,नवीन वाट बनवली जाते. ही स्वयं प्रेरणा कार्यमान (performance) वृद्धिंगत करते. एखाद्या द्विधा मनः स्थितीत मिळालेले सकारात्मक बाह्यप्रेरण , प्रोत्साहन, मानसिक आधार व्यक्तीचे जीवन आणि कर्तृत्व उजळवून टाकतात. समर्थांचा उपदेश महाराजांना वेळोवेळी प्रेरणादायी ठरला. पुस्तकांमधून प्राप्त झालेली ज्ञानप्रेरणा बाबासाहेबांना मोठ्या सामाजिक उत्क्रांतीकडे घेऊन गेली . म्हणूनच आपल्याकडून दिली आणि स्विकारली जाणारी प्रेरणा ही स्वतः ला आणि समाजाला पूरक, समर्पक असावी. केवळ उद्दीपक् नसून अर्थपूर्ण व दिशादर्शक असावी. स्तुती आणि दूषणांचा योग्य , यथार्थ वापर करावा . प्रशंसा ही वर्तन दृढ करते. तर दूषणे चुकीचे वर्तन खंडित करून ,आव्हान स्वीकारून कार्य प्रवण करतात . पारितोषिके आणि प्राप्तीचे समाधान हे कार्य करण्यास प्रवृत्त करतात, ऊर्जा देतात.
ऊर्जा म्हणजे सजीवाच्या शरीरात गरज पूर्ती साठी इच्छा निर्माण होणे व त्या गरजांच्या आपुर्तीसाठी शरीर कृती करते अशी कृती करण्यास चालना (drive) आदी देण्याऱ्या चेतकास ऊर्जा म्हणतात . मानवाबाबत प्रतिष्ठा वगैरे या देखील मानसिक गरजा असतात.
प्रेरणा ही वर्तनाला चालना देणारी आंतरिक शक्ती आहे. ही शून्यातून विश्व निर्मिती करवते , विश्वरूपातून आत्मरुपी केंद्राकडे आणते. सुक्ष्मता आणि विश्वात्मकता यांना एकरूप , चेतन आणि अचेतन यांना समरूप करू शकते ( आपल्या ठायी असणाऱ्या ऊर्जेचे विस्थापन निर्जीव भिंतीवर करून श्री ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली). हि प्रेरणा पतनाकडून उत्थानाकडे , उदंडतेकडून लिनतेकडे नेऊ शकते . विरातला आवेश ,ज्योतीमधील तेज बनून प्रकटते . ही प्रेरणा ,स्फुर्ती, ऊर्जा ,उर्मी नसेल तर फक्त कोमेजणे ,विझणे उरेल . सकारात्मकतेने परिपूर्ण होऊन स्वयं प्रेरित होणे हेंच इष्टकर, श्रेयस्कर होय . प्रेरणारुपी ज्योतीकडे नित्य जावे "ज्योतिर्गमय".
© पूर्णा गंधर्व