Meteor - Today's crisis is tomorrow's opportunity in Marathi Motivational Stories by पूर्णा गंधर्व books and stories PDF | उल्का - आजचे संकट उद्याची संधी

Featured Books
Categories
Share

उल्का - आजचे संकट उद्याची संधी

संकटावर खंबीरपणे मात केल्याने ,आजचे संकट उद्याच्या संधीमध्ये आपण प्रवर्तित करु शकतो ,ही सकारात्मकता आणि शुभता या लेखातून प्रक्षेपित (project) करण्याचा माझा उद्देश आहे .

पलायन ,आत्मघात, समाजघात , एखाद्या समूहाप्रति दूषित दृष्टिकोन ठेवणे ,उन्माद, वैफल्य या अशुभाला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी वाचकांस स्वयं प्रेरणा ,आत्म शक्ती मिळावी याचसाठी, हा लेखन प्रपंच, मी केवळ वाचकांच्या समंजसपणावर भिस्त(विश्वास) ठेवून मांडला आहे .


अव्याहत सुरू असलेल्या सृष्टी चक्रातील एक नेहमीची रात्र. रडणारी लेकरे ,चिवचिवणारी पाखरे आणि समईच्या वाती सारेच दमून विझून गेले होते .एका मोठया राज्यातील शेवटच्या ध्रुवावरचे छोटेसे गाव . त्या गावावर अचानक एका काळरात्री संकट ओढवले . भयानक कर्णकर्कश्य आवाज होऊन ,कंपनामुळे घरांची कौले फुटली ,मातीच्या भिंतींनाही तडे गेले . भयाने थरकाप उडाल्याने झोपलेले सारेच जीव जागे झाले, दुःखाने रडू विव्हळू लागले .बाहेर धुराचा नि राखेचा कल्लोळ ! पण आग कुठे दिसेना . दूरच्या रानात सूर्य उगवावा तसा प्रकाश दिसत होता .इंद्राचा वज्रप्रपात झाला जणू!! बोंब उठली . वैयक्तिक विवेक मागे पडून समूहमन कार्यरत झाले. गावकरी तसे विवेकी आणि पापभिरु. "ठेविले अनंते तैसेचि" राहिले . पोटापूरते धान्य ,अब्रू झाकायला वस्त्र . सणावाराला त्यात फक्त , पानात गोडाची नि मनात हौसेची भर .

नाही म्हणता गावात पाण्याची समस्या पुराणापेक्षा जुनी ! तशा चार -दोन विहिरी पिण्याची तहान भागवायच्या . बाकी पाण्याची गरज बाया बापड्या जंगलाकडे कोसभर चालून, घड्यांची चळत डोईवर वाहून भागवायच्या. इतर कामना ,विकार ,व्याधींवर सहनशक्तीची मात्रा चपखल लागू पडायची . गावात पाणी नसले तरी माळरानापलीकडे विशाल जंगल होते . त्यातुन लाकडे ,मध, डिंक,रानभाज्या असे बरेच काही , बाया नि बापे वन्यजीवांच्या अधिवासातुन हक्काने आणायच्या ; म्हणून तिकडचे वन्य जीव, मानवाच्या वस्तीतली चार- दोन जनावरे खाण्यासाठी यायचे . अशी अनोळखी पाहुण्यांची ये जा सोडली, तर बाकी सारे आलबेल!

तर ...तर अशा या सामान्य गावावर असामान्य संकट कोसळते . त्याचा स्रोत शोधायला माळरानावर धावलेल्या गावकऱ्यांना अवकाशातून खाली कोसळलेली ती प्रचंड शिळा (उल्का)दिसली. तो अजस्त्र पाषाणखंड जमिनीखाली पार पाताळपर्यंत गेला असावा .आजूबाजूची झाडे आणि जमीनही होरपळून, करपून गेली होती. जंगलाकडे जायला मार्ग नाही म्हणून पाणी , उपजीविका बंद हे पाहून अश्रूंचा बांध फुटला,धीर सुटला, विषाद पसरला.

जुन्या जाणत्या माडळींपैकी एक म्हातार बाबा पुढे आला .पुराणकाळात आपल्या पापाची शिक्षा म्हणून ,आपल्या गावचे पाणी एका ऋषीने शाप देऊन आटवून टाकले आणि आता परत पाप वाढल्यामुळे इंद्राने वज्रप्रहार केला आहे. असे म्हणत जिव्हा प्रहार करत राहिला . सरल्या पिढीचा भरला उत्साह पाहून तरणा मांत्रिक पुढे होतो. तंत्र विद्या आणि काळी जादू यामुळे विषाद आणखी काळा कुट्ट आणि घट्ट होतो . दिवसागणिक अफवांचे पीक आल्याने बाजूच्या गावातही चिंता, भीती पसरते . तिकडूनही काम, मदत मिळेनासे होते .लग्न करुन सुखी संसाराची स्वप्नं पाहणारा शंकरू एका रात्री हताश होऊन कुठेतरी पळून जातो. गावावर शोक पसरतो. आपण हिम्मत खचू द्यायची नाही, असे ठरवून दुसऱ्या रात्री हणमंत आवेगात (उन्माद) एकटाच पाषाणाशी लढा द्यायला जातो. पहार घेऊन ऊर फुटेस्तोवर प्रहार करूनही त्या दगडाची छाती फुटत नाही. हनमा मात्र रक्ताची उलटी होऊन गतप्राण होतो . सकाळी त्याचा रक्ताळलेला देह पाहून त्याची विधवा टाहो फोडते. शेवटचा निर्णय म्हणून गावकरी गाव खाली करून मिळेल त्या गावात आश्रय घेण्याचे ठरवितात. वाडावडिलांचे गाव सोडून विस्थापिताचे जीवन जगावे लागणार म्हणून हळहळतात .

गावातल्या दुःखद वार्ता राजधानीत राजापर्यंत पोहोचल्यावर, भला राजा चतुरस्त्र मंडळ गावाकडे रवाना करतो. ते चार विद्वान (ज्योतीशाचार्य , इतिहासकार ,तत्वज्ञानी , सल्लागार ) मिळून हे इंद्राचे वज्र नसून ,एक अजस्त्र उल्कापिंड अवकाशातून दुर्दैवाने आपल्या गावावर येऊन आदळला असल्याचे , स्पष्ट करतात .आणि याचे निराकरण म्हणजे सर्वांनी एकजूट होऊन तो उल्कापिंड फोडून बाजूला काढावा ,तेव्हा जंगलाकडे नि पाण्याकडे जाण्याचा रस्ता मोकळा होईल , असे ठरते. योग्य आणि उचित सल्ल्यामुळे लोकांमधले भय आणि मरगळ जाऊन हुरूप चढतो . शेजारील गावकरी त्यांचा निर्धार , उत्साह पाहून जमेल ती मदत पुरवतात. गावकऱ्यांच्या एकीपुढे तो उल्का पाषाण खंड-खंड होऊन दुभंगतो. राख आणि दगडांचा भुगा बाजूला काढल्यावर ,मनातील मळभ दूर केल्यावर निर्मळता पसरते. संकट टळते , जंगलाकडची वाट मोकळी होते . लेकरांचे श्रम आणि जिद्द पाहून धारणीमातेला पान्हा फुटतो . खोल खंदकातुन पाण्याचे झरे खुले होतात. आता तो भीमकाय विघ्नकारक खड्डा संकटमोचक पाझर तलाव बनतो . मनाच्या डोहावर आनंदाचे तरंग उठतात. गावकरी आनंदाने नाचू लागतात. शंकरची माय आणि हनमाची विधवा मात्र भरल्या डोळ्यातल्या अश्रूंना थांबवायला डोळ्यांकडे पदर नेतात .

खरतर अनावश्यक वाद , तणाव ,वैषम्य , संदिग्धता, संकटे यांपासून शक्य असल्यास स्वतःला दूर ठेवणेच योग्य ! परंतु संकट टाळता येण्याजोगे नसेल तर आपल्या अंतः शक्तीने ,एकजुटीने त्यावर मात करणे योग्य ठरते .

वैयक्तिक समस्या ,सामूहिक आपत्ती ,त्याच्याशी निगडित माणसे परिस्थिती ह्या बाह्य चलांवर आपले नियंत्रण नसते परंतु आंतरिक चले म्हणजे आपले मन, इच्छा शक्ति , सामर्थ्य यावर आपण संकटावर मत करू शकतो व बाह्यचले ही अनुकूल करू शकतो ,भविष्यात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात हे स्वकृत कथेद्वारे स्पष्ट होते.

संकट निवारण ,समस्या निवारण करण्यासाठी लागणारे प्रयत्न आपल्याला अनुभव संपन्न करतात . आपली बुद्धी, संयम परखला जातो . अग्नीकसोटीमधून गेल्यावरच सुवर्णाला प्रतिष्ठा, राजधातूचा दर्जा प्राप्त होतो .

संकट किती भयानक आहे ,त्याचे कारण काय,भविष्यात त्यामुळे काय/ किती तोटा होणार आहे ; यावर काथ्याकूट न करता केवळ समस्येची उकल ,शमन करण्यावर भर द्यावा .हेच खरे आपत्ती व्यवस्थापन होय.

आपत्तीला घाबरून व तर्क - कुतर्कांमूळे , अफवांमुळे जी नकारात्मकता ,विषाद (पॅनिक) पसरते, त्यामुळे निष्पाप बळी गेल्याचे निदर्शनास येते. अति उत्साह ,उत्तेजना यांमुळे उन्मादावस्थेत विघातक कृत्यही होऊ शकते . आपत्ती समयी (महामारी, भूकंप,पूर,स्फोट, हल्ला आदी) वैचारिक गोंधळ ,संभ्रम, अनावश्यक बघ्यांची गर्दी, समस्या चर्वण (वारंवार उल्लेख), धावपळ यांमुळे आधीची समस्या आणखीन गंभीर होते. इतरांमध्येही नकळत तो विषाद संक्रमित होण्याचा धोका उद्भवतो. म्हणून स्व नियंत्रण ,समाजभान राखावे .

वैयक्तिक निराकरणाचा उपाय न मिळाल्यास कुटुंब, मित्र परिवार ज्यांची आपल्याप्रति सहसंवेदना असते ;अशांची मदत घ्यावी. असंबद्ध दिशादर्शन ,संकट समयीं उठणाऱ्या वदंता /अफवा ,खच्चीकरण टाळण्यासाठी सुजाण, तज्ज्ञांचा सल्ला बुद्धीच्या कसोटीवर पारखून स्वीकारावेत .

समस्या ,आपत्ती विविधांगी आणि ती उत्पन्न होण्याचे स्रोत अनेक ; म्हणून निवारणाचा सार्वत्रिक उपाय असू शकत नाही .म्हणून इच्छा शक्ती ,स्वयं प्रेरणा आणि समूह सहकार्याने त्यावर मात करण्याची क्षमता वाचकांठायी उत्पन्न होवो ही सदिच्छा.

किमानपक्षी साहित्याच्या आस्वादानामूळे भावनिक आंदोलन शमून ,चित्तवृत्ती शांत व्हाव्यात चार घटिका रंजन व्हावे !!!

© पूर्णा गंधर्व