Exciting Journey in Marathi Travel stories by Supriya Joshi books and stories PDF | रोमांचक प्रवास - East Africa

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

रोमांचक प्रवास - East Africa

माझा सगळ्यात पहिला परदेशप्रवास - घाना (East Africa). खूप छान देश आहे हा. छान infrastructure आणि लोकपण खूप चांगली आहेत. नशिबाने तिथे पोहोचलो आणी 2 ते 3 दिवसात ७-८ कुटुंब असलेल्यांच्या छान ग्रुप मिळाला.

आमच्या ग्रुपने ख्रिसमसच्या सुट्टीत काकुम नॅशनल पार्कला फिरायला जायचे ठरवले. हे ठिकाण झुलता पूल व घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. त्या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे ७ पूल ८ झाडांमध्ये विभागले गेले आहेत आणि 2 झाडांमधले अंतर (म्हणजे १ पूल) जवळ जवळ ७ ते ८ फुटाचे आहे. जमिनीपासून १३० फूट उंचीवर बांधलेले आहे. एकूण ७ पुलांचा walkway १००० फूट एवढा आहे. पुलावरून खाली फक्त घनदाट जंगल दिसते. पूल लाकडी फळीनी दोन जाडजूड दोऱ्याने बांधलेला होता. महत्वाचे म्हणजे एकदा पूल चालायला सुरुवात केले की पूर्ण 7 पूल पार करावेच लागतात, परतीचा मार्ग नाही.

आम्ही सगळेजण Hans Cottage Botel म्हणून जवळच असलेल्या रिसॉर्टमध्ये उतरलो होतो. जवळपास सगळेजण शाकाहारी असल्याने आणि त्यावेळी तिथे शाकाहारी जेवण खूपच क्वचित मिळायचे त्यात भारतीय जेवण मिळणे तर खूपच दुर्मिळ असायचे त्यामुळे आम्ही खूपसारे टिकणारे पदार्थ करून घेतले होते. प्रत्येकजण आपापल्या गाडीने निघालो होतो. त्यामुळे प्रवासात खायला म्हणून मी अजून काही पदार्थ करून घेतले होते. जाताजाता आम्ही वाटेत २-३ दा थांबून सगळ्यांनी मिळून नाश्ता, चहा घेण्यासाठी म्हणून थांबलो. संध्याकाळी हॉटेलमध्ये पोहचलो आणि सगळी मुलं फ्रेश होऊन खेळायला लगेच बाहेर पडली. आमच्या ग्रुपमधली रश्मी मुलांबरोबर खूप छान खेळायची आणि मुलंपण तिच्याबरोबर खुश असायची. जशी मुलं बाहेर पडली तशी तीपण तिच्या २ मुलींना घेऊन सगळ्या मुलांबरोबर छान वेगवेगळे खेळ खेळत होती. आम्ही थोडे फ्रेश होऊन त्यांना जॉईन झालो आणि सगळ्यांनी मिळून रुमालपणी, आंधळी कोशिंबीर, साखळी असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळलो. खूप मज्जा आली.

रात्री मस्त जेवून सगळ्यांनी मिळून पोहायला जायचे ठरवले. सगळी लहान मुलं बेबी पूलमध्ये आणि मोठे डीप मध्ये गेले होते. मला एकतर पोहता येत नव्हते आणि आर्या लहान असल्याने मी आपली तिच्याबरोबर बेबीपूलमध्ये सगळ्या मुलांबरोबर राहणार म्हणून सांगितल्यावर बाकीचे सगळे निर्धास्तपणे डीपपूलमध्ये पोहायला गेले. सगळी मुलं व मी आम्ही पूलमध्ये एकमेकांवर पाणी उडवणे, बॉल खेळणे, कॉइन आत टाकून शोधणे असे काही खूप वेगवेगळे प्रकार करून खूप मज्जा केली. थोड्यावेळाने सगळ्या मुलांना बाहेर काढून अंघोळ घालून सगळ्यांना २ खोल्यांमध्ये झोपवून मीपण मोठ्यांबरोबर जॉईन झाले. खूपजणींना पोहता येत नसल्याने आम्ही खूप खोलात न जातापण सगळे मिळून बॉल खेळलो. थोड्यावेळाने सगळे बाहेर येऊन मस्त जुनी गाणी लावून बसलो होतो. खूप छान वाटले.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून हॉटेलमधलाच नाश्ता (ब्रेड, जूस आणि भरपूर फळे) करून आम्ही झुलत्या पुलाचा अनुभव घ्यायचा म्हणून उत्साहाने निघालो.

जान्हवी ह्यांच्याबरोबर व आर्या सव्वा वर्षाची असल्याकारणाने मी तिला पुढे घेऊन कपड्याने घट्ट अंगाभोवती गुंडाळले (इथे लोकल बायका लहान मुलांना पाठीवर घेऊन अश्याप्रकारे गुंडाळून सर्व कामे करतात) आणि प्रवास सुरु केला. पुढचा माणूस माझ्या ग्रुपमधलाच एक होता, तो अर्ध्या रस्त्यापर्यंत गेल्यावर मी आर्याला घेऊन पुलावर पाय ठेवला . थोडेसे चालून गेल्यावर जाणवले की पूल हलत आहे. वाचाच बसली, काय करावे सुचत नव्हते. नशीब! आर्या झोपली होती.

जसे जसे पुढे सरकत होते तसतशी भीती वाढतच होती, एकदम सावकाशीने पुढे पुढे जात होते, थोडा जरी तोल गेला असता तर खाली पडायची भीती!

कसेबसे अर्धे अंतर पार केले. मागे एक युरोपियन माणसाने चालायला सुरुवात केली. त्याला अजिबात भीती वाटत नव्हती, त्यामुळे तो पटापट मोठ्मोठ्या ढांगा टाकत चालायला लागला. पूल हलायलाच लागला. माझीतर पुढे पाउल टाकायची हिम्मतच होईना.

मी त्याला जोरात ओरडले की मला खूप भीती वाटतीये आणि माझ्याबरोबर लहान मुलगी आहे, please तू हळू चाल, तर त्याला आणखीनच चेव चढला आणी माझ्या ओरडण्याने आर्या उठली....

तिला अशी बांधून राहायची सवय नसल्याने रडायला लागली व जोरजोरात हलायला लागली आणि घाबरून तिच्याबरोबर मीपण रडायला लागले, कपडा सुटला तर .... तिला दोन्ही हाताने धरले आणि तोल गेला तर..... काहीच कळत नव्हते. एका हाताने आर्याला पकडले व एका हाताने दोरी.

शेवटी त्या माणसाच्या बायकोने त्याला मी पूल पार करेपर्यंत जागेवर थांबायला सांगितले.

पुढच्या झाडाच्या पारावर ग्रुपमधले दोघेजण होते, त्यांनी मला धीर दिला व सांगितले की आर्याला घट्ट बांधले आहे, ती पडणार नाही, तू दोन्हीही हात दोरीला धरून हळू हळू चालत ये.

सगळेजण घाबरले होते. देवाचे नाव घेत व आर्याशी गप्पा मारत मारत कशीबशी हळूहळू चालत एकदाचा पूल पार केला. (माझ्यासाठी पुढची दोन माणसेपण थांबली होती, मी पोहचल्यावर मग मात्र त्यांनी चालायला सुरुवात केली). जसे तिला ओढणीतून सोडले तश्या बाईसाहेब एकदम खुश झाल्या, तिथे बसून तिला खायला दिले तोपर्यंत हे व जान्हवी पूल पार करून आले. जान्हवीपण खूप घाबरली होती, मोठी माणसेपण घाबरत होती चालायला त्यामानाने हितर 5 वर्षाचीच होती, पण माझा व आर्याचा गोंधळ बघून बिचारी काहीही बोलली नाही, फक्त आल्याआल्या मला मिठी मारून 'आई मी एकटीने चालत पूल क्रॉस केला' एवढेच म्हणाली व आर्याला रडायचे नाही म्हणून समजवायला लागली.( खरेच देवाने नक्षत्रासारख्या मुली दिल्या आहेत).

आता परत तर जाता येणार नव्हते आणि अजून सहा पूल पार करायचे बाकी होते.

काय करावे काही कळत नव्हते. हे म्हणाले, मी आर्याला कडेवर घेऊन जातो, तू ताईला घेऊन ये. मी अगोदर साफ नकार दिला (कारण त्या पुलाची उंची साधारणतः ह्यांच्या कंबरेपर्यंत असेल) पण शेवटी दुसरा कुठलाच मार्ग न सुचल्याने मान्य करण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता.

आर्या एकदम fresh झाली होती. तिला आम्ही तिघांनीमिळून समजावून सांगितले की बाबा तुला कडेवर घेऊन चालणार आहेत, अजिबात हलायचे नाही आणि तिनेपण सगळे समजल्यासारखे अगदी हो हो म्हणून सांगितले.

आता ह्यांचा आर्याला घेऊन हा प्रवास सुरु झाला. हळूहळू चालत त्यांनी दुसरा पूल व्यवस्थितपणे पार केला आणि महत्वाचे म्हणजे आर्यापण शहाण्या बाळासारखी अजिबात न हलता बाबांच्या कडेवर बसून मजा करत होती. त्यांच्यामागोमाग आम्ही दोघींनी पण पूल पार केला.

दोन पूल पार केल्यानंतर भीती हळूहळू कमी होत गेली आणि शेवटचे 3-४ पूल तर आम्ही खूप मज्जा करत निसर्गसौंदर्य अनुभवत पार केले. खूप छान वाटत होते, पक्ष्यांचे खूप विविध आवाज ऐकायला मिळाले, वेगवेगळ्या प्रकारची झाडे, 130 फूट उंचीवर तो पूल बांधला होता पण त्याहीपेक्षा उंच झाडे होती. खूप छान वाटत होते.

शेवटचा पूल पार करून तिथे असलेल्या शेडमध्ये आम्ही पोहचलो तर तिथे असलेल्या सगळ्या लोकांनी आमचे उठून टाळ्या वाजवून स्वागत केले.

अश्याप्रकारे आमची रोमांचक व अविस्मरणीय ट्रिप सुफळ संपन्न झाली.

सुप्रिया