kenya mara safari in Marathi Travel stories by Supriya Joshi books and stories PDF | केनिया मारासफरी

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

केनिया मारासफरी

दोन वर्षांपूर्वी मावसजाऊ केनिया फिरायला आली होती, तेव्हा पहिल्यांदा केनिया सफारी केली. खूप सारे प्राणी, पक्षी, तानझानिया-केनिया बॉर्डर, आणि सगळ्यात जास्त पर्यटक जुलै-ऑगस्ट ह्या महिन्यात ज्यासाठी येतात ते वाईल्ड बीस्टचे रिव्हर क्रॉसिंग पण खूप छान बघायला मिळाले. वाईल्ड बीस्ट हे तानझानियाहुन अन्नाच्या शोधार्थ केनियाला येतात. इथे खाऊन पिऊन खुश होतात, समागम करतात आणि नंतर ते परत तानझानियाला जाऊन पिलांना जन्म देतात आणि ठरलेल्या वेळी परत पिलांना घेऊन केनियाला येतात.

केनियाच्या मारा ह्या जंगलामध्ये एक नदी आहे, नदी साधारण १०-२० फूट खाली आहे. हे बीस्ट त्यांच्याबरोबर काही झेब्रे व कॉब हेपण अन्नाच्या शोधार्थ ही नदी पार करतात. सगळेजण एकदम शिस्तीत एका रांगेत उभे असतात, कधी कधी सकाळपासून नुसतेच रांगेत उभे असतात. एका काठावरून उतारावरून खाली उतरून नदी पार करून परत तिकडून चढ चढून वर जावे लागते आणि त्यात मध्ये मगर/सिंह/चित्ता असे बरेच मांसाहारी प्राणी शिकार करायला टपून असतात. मुळातच हे खूप भित्रे, त्यात ही नदी पार करणे अवघड आणि जीव जायची भीती ह्यामुळे नदी क्रॉस करायला खूप वेळ लागतो. त्यातलाच मग एखादा तरुण बीस्ट जरा हिंमत करतो आणि एकदा एकाने खाली उतरायला सुरुवात केली की सगळेजण त्याच्यामागून पळत खाली उतरून पार करून, परत पळतच चढ चढून वर गेल्यावर सुद्धा कितीतरी वेळ ते नुसतेच जीवाच्या आकांताने पळत असतात. त्यांच्या मनाचा विचार करताना खरेच असे वाटते की इतकी भीती वाटत आहे तर का नदी पार करता, इथे जे मिळते ते खा ना! पण तो निसर्गनियम असल्यासारखाच आहे. जे देवाने त्यांना ठरवून दिले आहे त्याप्रमाणे ते वागत असतात. आणि हो समजा नदी पार करताना एखाद्याचे पिल्लू ह्या बाजूला राहिले असेलतर कितीही भीती वाटत असतानासुद्धा त्याची आई परत दुसऱ्या ग्रुप बरोबर तिकडून नदी पार करून इकडे येऊन पिल्लाला घेऊन परत नदी पार करून दुसरीकडे जाते. आईची ममता ही पिल्लाला एकटे ठेवू देत नाही. ह्या सगळ्यात बरेच प्राणी पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जातात, झुंड असल्यामुळे एखादा खाली पडला तर बाकीचे जोरात पळत असल्यामुळे तो त्यांच्या पायाखाली जाऊन चिरडला जातो, काहीजणांचे पाय मोडतात, काहीजण अचानक वर चढताना थांबतात आणि घाबरून वर चढता येत नसल्याने तिथेच अडकून बसतात. हे क्रॉसिंग बघून आपण खूप काही शिकून जातो.

आम्ही रिव्हरक्रॉसिंग साठी खूप वेळ उभे होतो पण बीस्ट काही रिव्हरक्रॉस करत नव्हते शेवटी आमच्या ड्राइवरने हॉटेलला जाण्यासाठी गाडी वळवली. बीस्टना बहुतेक आमची दया येऊन लाखोंच्या संख्येने त्यांनी रिव्हर क्रॉस करायला सुरुवात केली. सूर्यास्त वेळ, खूप सुंदर आकाश, त्याचे बदलणारे रंग आणि त्यात हे बीस्ट लाखोंच्या संख्येने पळतानाचे दृश्य आणि त्यांचे ओरडणारे आवाज, नदी पार करताना तो पाण्याचा आवाज, नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहचल्यानंतर जीवाच्या आकांताने पळताना उडणारी धूळ आणि त्यांच्या झुंडी, इतके अप्रतिम दृश्य होते! अगदी आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले आणि आमची ही ट्रिप सार्थकी झाली.

आम्हाला चित्तीण आणि तिची पिल्ले, सिंहाचे कुटुंब, बिबट्या (जो खूप क्वचित दिसतो. त्याला एकांतात, झाडात राहायला जास्त आवडते. भूक लागल्यावर शिकार शोधताना, करताना किंवा शिकार झाल्यावर जेव्हा झाडावर शिकार ठेवून बसलेला असतो तेव्हाच तो दिसतो. पण आमचे नशीब खूप चांगले असल्याने आम्हाला तो झाडावर बसलेला मस्त जवळून दिसला), तिथे एक का दोनच गेंडे आहेत त्यामुळे तेपण खूप क्वचित दिसतात पण अगदी परत जायच्यावेळी आम्हाला गेंड्याचे दर्शन झाले. पाणघोडे आणि मगर पाण्यात डुंबलेल्या आणि काठावरपण भरपूर दिसले. हत्ती, जिराफ, झेब्रे, कॉब, वन्य पशु (वाईल्ड बीस्ट) ह्यांचे भरपूर व खूप मोठे कळप, खूप सारे वेगळे पक्षी, असे सगळेच्या सगळे प्राणी व पक्षी दिसल्यामुळे तसा आमचा प्रवास यशस्वी झाला होता पण शिकार बघायला मिळाली असती तर चार चांद झाले असते. बहुतेक नंतरच्या सहलीत ती इच्छा पूर्ण होणार होती म्हणून ह्यावेळी झाली नसेल.

कोरोनामुळे ह्यावर्षी बाहेरच्या देशातून येणारे पर्यटक नव्हते. केनियामध्ये कोरोनाची खूप भीती नसल्याने आणि हॉटेलचे दर एकदम कमी असल्याने इथे राहणारी लोक सगळ्या पर्यटनस्थळी फिरत होते. आमच्या एक खूप जवळचे कौटुंबिक मित्र देशपांडेनी ह्यांना फोन केला व हॉटेलचे चांगले दर मिळत आहेत तर आपण जाऊयात का म्हणून विचारले. मग मुलींचे परीक्षेचे वेळापत्रक बघून आम्ही दोन दिवसांनी लगेच निघालो. खाणे प्रिय असल्याने दोघींनीमिळून ठरवून भरपूर खायचे पदार्थ घेतले. हॉटेलमध्ये सगळे मिळणार होते पण वाटेत खायला म्हणून भरपूर पदार्थ घेतले होते.

सकाळी ६.३० वाजताच घरून निघालो. आदिती व आर्या जवळपास एकाच वयाच्या असल्याने त्या दोघींचे पण छान जमते आणि अनन्या सगळ्यात लहान असल्याने आमचे सगळ्यांचेच शेंडेफळ. त्यामुळे सगळे तिचे भरपूर लाड करत होते. पण जान्हवीला मात्र ह्या ट्रिपमध्ये आम्ही सगळेच खूप मिस करत होतो. गाडीत बसल्यावर गप्पांना ऊत आला. हसून हसून सगळ्यांचे पोट दुखायला लागले इतकी मज्जा केली. अधूनमधून खाणेपिणे होत होतेच. रस्ता खूप छान असल्याने आणि खूप मज्जा करत असल्याने मसाईमारा कधी आले हे कळलेच नाही इतका छान वेळ गेला. प्रवेशद्वारावर तुम्हाला चेकिंग आणि पैसे भरण्यासाठी थांबावे लागते. तिथूनच आमचे फोटोशूट सुरु झाले.

जंगलात कुठेही डांबरी रस्ता नाही, सगळीकडे त्यांनी मातीचा कच्चा रस्ता केला आहे ज्यावरून आपल्याला जावे लागते. काहीकाही ठिकाणी रस्ता चांगला नाहीये त्यामुळे गाडी उड्या मारत जात असते अगदी काही काही ठिकाणी रोलरकोस्टरमध्ये बसल्याचासुद्धा अनुभव येतो. आमचे हॉटेल जंगलाच्या बरेच आत होते त्यामुळे आम्ही त्यावाटेने जायला लागलो तोपर्यंत ड्राइवरला वायरलेसवरून कुठेतरी चित्ता दिसल्याचा मेसेज आला. मग आम्ही वाकडी वाट करून चित्ता बघायला गेलो आणि अगदी एक फुटाच्या अंतरावर ५ भाऊ एका झाडाखाली आराम करताना दिसले. झाडाच्या बाजूला एक एक करून ते बसले होते. ते बघण्यासाठी आम्ही झाडाला पूर्ण प्रदक्षिणा घालत असतानाच एक चित्ता उठून उभा राहिला आणि आमच्याकडे बघायला लागला. २ मिनिट काळजात धस्स झाले. पण लगेच खाली बसून त्याने मस्त जांभई दिली. त्यामुळे आम्ही परत हुश्श करत हॉटेलचा रस्ता धरला.

अशक्य इतका खराब रस्ता असल्याने कधी एकदा हॉटेल येते असे झाले होते. १५ मिनिटाचा रस्ता १ तास झाला तरी पार होत नाही असे वाटत होते. एकदाचे २ वाजता हॉटेलमध्ये पोहचलो. जेवायची वेळ १ते३ असल्याने आम्हाला वेलकम ड्रिंक देऊन लगेच जेवायला सांगितले. आम्ही फ्रेश होऊन जेवलो. जेवण व्हायला ३.४०-३.५० झाले आणि सफारीला ४ वाजता जायचे असल्याने आम्ही खोलीत न जाता तिकडूनच सफारीला जायला निघालो.

हॉटेलच्या बाहेर पडलो आणि लगेच हत्तींचा झुंड दिसला. चला! सुरुवात छान झाली म्हणून आम्ही खुश झालो होतो. वाटेत जाताना जिकडे नजर जाईल तिकडे वाईल्ड बीस्टच दिसत होते. आम्ही रिव्हरक्रॉस बघायला म्हणून त्या वाटेने गेलो. बराच वेळ वाट बघितली पण त्यादिवशी काही त्यांनी नदी पार केली नाही. आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा हे क्रॉसिंग बघितले होते पण बरोबरच्या कुटुंबाला बघायला न मिळाल्यामुळे खूप साऱ्या आशा बाळगून होतो. उद्या सकाळी परत येता येईल असा विचार करून आम्ही बाकीचे प्राणी बघायला म्हणून गेलो. आम्हाला सिंहाचे कुटुंब दिसले. २सिंहीण, ४ पिल्ले आणि शिकार खात बसलेला सिंह. इथे मात्र आम्हाला एक नवीन गोष्ट कळली.

सिंह एकटाच खात बसला होता. एक सिंहीण मस्त पहुडली होती आणि पिल्ले तिच्या अंगावर खेळात होती. मध्येच ती त्या पिल्लाना चाटत होती. पिल्ले एकमेकांबरोबर पळापळी पण खेळत होती. एक सिंहीण तिथे नुसतीच उभी होती, मधूनच ती सिंह खात होता तिकडे जाऊन चक्कर मारून परत दुसरीकडे जाऊन शून्यात बघत उभी राहत होती. आम्ही आपला अंदाज बांधला की तिला बहुतेक भूक लागली असेल म्हणून ती सारखे शिकार करून ठेवली आहे तिथे चक्कर मारत असेल, मग ती खात का नसेल बरं! त्यावेळी आम्हाला खुलासा झाला की जेव्हा सिंहाचे कुटुंब असते तेव्हा प्रत्येकाच्या भूमिका ठरलेल्या असतात. त्या कुटुंबातल्या बायकांचे (सिंहीणींचे) काम मुलांना ते २ वर्षाचे होईपर्यंत सांभाळणे व कुटुंबाला खाणे पुरवणे असते. त्यामुळे सिंहीण ह्या शिकार करतात. सिंह हा कुटुंबप्रमुख असतो आणि कुटुंबाचे रक्षण करणे हे त्याचे काम असते. सिंहीण जेव्हा शिकार करतात तेव्हा त्यावर पहिला हक्क सिंहाचा असतो. एकदम फ्रेश केलेली शिकार पहिल्यांदा सिंह खातो, त्याचे पोट भरले की मग सिंहीण उरलेले खातात. खूपच आश्चर्य वाटले ऐकून. इतका मर्दगडी असतानासुद्धा आयते कसे खात असेल हा प्रश्न मात्र नक्कीच पडला.

सिंह हा कुटुंबवत्सल प्राणी आहे. जेव्हा त्यांची पिल्लं २ वर्षाची होतात तेव्हा मग त्यांच्यात सगळ्यात जो ताकदवर असतो तो कळप शोधून सिंहिणीबरोबर राहायला लागतो आणि आपले कुटुंब तयार करतो. बाकीचे मात्र मग भाऊभाऊ एकत्र राहतात. दुसऱ्या कळपातल्या सिंहीणी शोधतात आणि त्यांच्यात जो ताकतवर ठरतो तो त्याचे कुटुंब तयार करतो. म्हातारा झालेल्या सिंहालापण त्या कळपातून ते हाकलून देतात. मग म्हातारे सिंह वेगळे राहतात.

त्याउलट चित्ता फक्त समागम करण्यासाठी चित्तिणीकडे जातो आणि परत निघून येतो. चित्तीण तिच्या मुलांना घेऊन राहत असते. त्यामुळे तिला पिल्लांचे रक्षण आणि त्यांची व स्वतःची खायची जबाबदारी तिच्यावरच असते. पिल्लांना सुखरूप ठेवून तिला शिकार शोधून ती स्वतःच करावी लागते. (ही सगळी माहिती आम्हाला आमच्या ड्रायव्हरने सांगितली आहे)

ह्या जंगलात आम्ही ५ चित्ता (भाऊ) आणि २ चित्ता असे वेगवेगळे भाऊ एकत्र राहताना बघितले. ह्यावेळी चित्तीण बघायला नाही मिळाली (मागच्या वेळेस मुलांसकट बघायला मिळाली होती).

जोपर्यंत तुम्ही हत्तींच्या नादी लागत नाही तोपर्यंत हत्ती काही करत नाही. हत्ती पूर्ण शाकाहारी असूनही हा ताकदवर प्राणी आहे. अगदी सिंह, चित्ते वगैरेपण त्यांना घाबरतात. आम्ही फिरत असताना कळपातून बाहेर पडलेला एक म्हातारा जर्जर हत्ती झाडाच्या इथे उभा होता. ड्राइवरने चुकून गाडी त्या हत्तीच्या थोडीशी जवळून घेतली तर तो हत्ती एकदम जोरात आवाज काढून आमच्या गाडीवर हल्ला करणार तोपर्यंत ड्राइवर खूप जोरात गाडी मागे घेऊन जाऊ लागला. तो गाडीच्या दिशेने पळता पळता आम्ही त्याच्यावर हल्ला करणार नाही हे उमजून आल्यामुळे एकदम जागेवर थबकला. आम्ही बराच वेळ तिथे गाडी बंद करून उभे राहिलो आणि तो आमच्याकडे एकटक बघत उभा होता. ज्यावेळी त्याने आमच्यावरून नजर हलवली तेव्हाच आम्ही गाडी सुरु केली. खरेच सांगते खूप फाटली होती आमची तेव्हा! थोडे पुढे जाऊन ड्राइवर २ मिनिट एका जागी शांत उभा राहिला.

थोड्यावेळाने परत स्थिरस्थावर झाल्यावर त्याने आम्हाला हत्तीचा अजून एक किस्सा सांगितला. खूप वर्षांपूर्वी असेच एका फॅमिलीला घेऊन तो आला होता, तेव्हा पुढच्याच गाडीतून एक माणूस खाली उतरून हत्तीण तिच्या पिल्लाबरोबर उभी होती तिकडे गेला. त्यांच्या ड्रायव्हरचे लक्ष गेल्यावर त्याने लगेच त्याला हाक मारली आणि पुढे जाऊ नको म्हणून सांगितले आणि गाडी सुरु केली, त्या माणसाला हत्तीकडे जाताना बघून तिथे असलेल्या बाकीच्या सगळ्यांनी पण आपापल्या गाड्या सुरु केल्या. पण तोपर्यंत त्याचे ना ऐकता 'तुला काय कळते' ह्या अविर्भावाने कॅमेरा घेऊन पिल्लाच्या अगदी जवळ गेला. त्याला बघून हत्तीण पळत त्याच्याजवळ आली, त्याला सोंडेत उचलून खाली आपटले आणि त्याच्यावर पाय देऊन पायाखाली अगदी चिरडून टाकले. सगळेजण गाडी घेऊन हत्तीणीला घाबरावयाला पुढे जात होते पण तिच्या अंगात शक्ती संचारली होती. तो माणूस पिल्लाच्या जवळ गेल्याने पिल्लाला धोका आहे असे वाटून ती चवताळली होती. त्याला चिरडून ठार मारल्यावर ती गाडयांच्या दिशेने यायला लागली. सगळ्यांनी गाडी मागे घेऊन तिकडून पळ काढला. गाडीमध्ये त्याची बायको, मुलं जीवाच्या आकांताने ओरडत होते पण कोणी काहीच करू शकले नाही. तिथे govt च्या गाडया कोणी नियमाचे उल्लंघन करू नये म्हणून फिरत असतात. नेमके त्यावेळी ती गाडीपण तिथे नव्हती. थोड्यावेळाने वायरलेस वरून मेसेज मिळाल्यावर त्या माणसाला तिकडून उचलून आणण्यात तरी त्यांना यश मिळाले नाहीतर कधी कधी लांडगे येऊन ते खायची पण शक्यता असते. ऐकूनच अंगावर काटा उभा राहिला. काहीही चुकी नसताना त्या ड्रायव्हरचे लायसेन्स कायमचे जप्त केले गेले आणि त्या ट्रॅव्हल एजेन्सीला पण कायमचे बॅन केले.

अनन्याला जिराफ खूप आवडतात पण अगदी १-२ जिराफ बघायला मिळाले होते. पण हरिणींचे खूप सारे कळप खूप छान उड्या मारताना दिसले आणि हत्ती, सिंहाचे कुटुंब, चित्ता बघायला मिळाल्यामुळे खूप नाराज न होता उद्या रिव्हरक्रॉसिंग बघायला मिळेल ह्या आशेवर आम्ही परत हॉटेलमध्ये आलो. खूप दमल्याने रूममध्ये न जाता जेवून नंतरच जायचे असे ठरवले व तिथेच बसलो. खूप छान वातावरण होते, नंतर नंतर तर हवेत चांगलाच गारवा झाला होता. जिथे शेकोटी पेटवली होती तिथे आम्ही गुंडाळे करून बसलो आणि वेगवेगळे गेम खेळलो. जेवण सुरु झाल्यावर लगेच तिकडे गेलो. आम्ही दोन्ही कुटुंब शाकाहारी असल्याने बघूनच खावे लागणार होते. तिथे भारतीय व दुसरे पदार्थपण होते. आम्ही जिथे उतरलो होतो तिथे भारतीय जेवण खूप छान मिळते म्हणून उतरलो होतो पण नेमका त्याचवेळी त्यांचा स्वयंपाकी बदलल्याने आम्हाला तिथले जेवण इतके नव्हते आवडले पण पास्ता खूपच छान होता. मग आम्ही पास्ता, भरपूर फळे व डेझर्ट हे भरपूर प्रमाणात खाऊन पोट भरले. आम्ही बहुतेक नीट जेवलो नाही असे वाटून तिथल्या मॅनेजरने आमची काही फर्माईश असेलतर आम्ही त्याप्रमाणे डिश बनवून देऊ म्हणून सांगितले. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी लंचचा मेनू ठरवला व आम्हाला काय हवे ते सांगितले.

रूममध्ये गेलो. तर त्यांनी मच्छरदाणी घालून बेडवर हॉटबॅग ठेवून रूम छान तयार करून ठेवली होती. खूप दमलेलो असल्याने आणि सकाळी लवकर उठायचे असल्यामुळे लवकर झोपायला गेलो आणि पडल्यापडल्या झोप लागली.

आम्हाला २ ऑपशन होते - एकतर सकाळी ६-६.३० ला बाहेर पडून दुपारी ३.३० पर्यंत परत हॉटेलवर यायचे. हॉटेलमधून आम्हाला लंचबॉक्स मिळणार होते आणि जंगलात एकाठिकाणी थांबून आपण जेवूपण शकतो.

किंवा सकाळी ८-९ च्या दरम्यान हॉटेलमधून निघून १ पर्यंत जेवायला हॉटेलमध्ये येऊन परत चहा पिऊन ४ ते ६.३० ह्या वेळात सफारी ला जायचे.

आम्ही दुसरा ऑपशन निवडला होता.

सकाळी उठून तयार होऊन पोटभर नाश्ता करून निघालो. अनन्याला जिराफ बघायचे असल्यामुळे अगोदर आम्ही जिराफाच्या शोधात निघालो. जिराफ, हरीण, काळवीट, झेब्रा, वाईल्ड बीस्ट असे बरेच प्राणी बघून आम्ही रिव्हरक्रॉसिंग बघायला गेलो, बराचवेळ वाट बघत थांबलो होतो. खुपसाऱ्या गाड्या वाट बघत होत्या. तर एक छोटा झुंड पुढे येऊन त्यांनी रिव्हरक्रॉस केले. थोड्यावेळाने थोड्या मोठ्या कळपाने क्रॉस केले. असे १-२ कळप क्रॉस करताना बघत असताना आमच्या छोट्या अनन्याला १ नंबर आली म्हणून मग तिथे ठरवून दिलेल्या जागी जाऊन सगळेच फ्रेश व्हायला उतरलो. तिथे खूप साऱ्या प्राण्यांची विष्ठा बघून असे वाटले की त्यांना पण इथे होऊनच मोकळे व्हायचे हा नियम माहित असावा की काय! तिथे उतरून भरपूर फोटो काढले. परत दुसरीकडे खूप मोठा कळप क्रॉसिंग करत आहे हे ऐकून तिकडे गेलो. तिकडे गेलो आणि तिथेच पण २-३ ठिकाणाहून बीस्ट नदी पार करत होते आणि दुसऱ्याबाजूला ३ सिंह शिकार करायला टपून बसले होते. कळप इतक्या जोरात पळत असतो की शिकार करणे अशक्य असते. त्यामुळे कळपातून बाजूला झालेला एखादा प्राणी बघून त्याची शिकार करतात. असेच एक झेब्रा कळपातून सुटला आणि त्याची शिकार केली. बाजूला खूप साऱ्या गाड्या असल्याने इतके स्पष्ट आम्हाला दिसले नाही. थोडे नाराज झालो होतो. ३ सिंहापेकी 2 सिंह ती शिकार खात होते. तिसरा सिंह अजून एक शिकार करण्यासाठी अगदी काठाच्याजवळ लपून बसला होता. नेमके एक बीस्ट कळपातून वेगळे झाले आणि सिंहाने त्याच्यावर हमला केला पण बीस्टने पण त्याच्यावर उलट हमला केला. शिंगाने हमला करून ते सिंहावर उलटून जात होते, इतके की सिंह परत मागे जात होता. पण सिंह त्याला सोडतपण नव्हता. ते पळायला लागले की लगेच पुढे जाऊन त्याला पकडायचा प्रयत्न करायचा. बीस्ट अजिबात हार न मानता एकदम जोरदार टक्कर देत होता. प्राणपणाला लावून ठरवल्याप्रमाणे बिस्ट सिंहाला असा भिडला होता कि लढता लढता एकदा सिंह नदीच्या इतक्या काठावर आला की बिस्टची शिकार करता करता स्वतःच नदीत पडून त्याचाच प्राण जातो की काय असे वाटले! सिंह हरलाच होता पण तोपर्यंत दुसरा सिंह मागून आला आणि दोघांनी त्याला मध्ये घेतले तेव्हा मात्र त्याने हार मानली. एका सिंहाने त्याची मान पकडली आणि दुसर्याने दोन पाय घट्ट पकडले. जवळपास ४-५ मिनिट लागली त्यांना त्याला मारायला. हळूहळू प्राण जाईपर्यंत एका सिंहाने त्याची मान पकडून धरून ठेवली होती व दुसर्याने पाय पकडले होते. त्याचा प्राण शरीरातून निघून गेल्यावर मग एक सिंह ती शिकार खाऊ लागला आणि दुसरा सिंह अगोदरची शिकार असलेल्या ठिकाणी गेला व तिकडे खात असलेल्या सिंहाबरोबर ती शिकार दोघेमिळून खायला लागले. खूपच वाईट वाटले बघून, उगाचच बघितले असे झाले पण हे म्हणाले अरे हीच साखळी आहे, ते मांसाहारी आहेत तर ते शिकार करून आपले पोट भरणारच ना! हा सारा प्रकार बघून एक मात्र नक्कीच शिकायला मिळाले की तुम्ही स्वतःला कधीही कमजोर समजले की तुमची शिकार सहज होऊ शकेल, पण तेच पुढचा कितीही ताकतवर असू दे न घाबरता जर तुम्ही त्याला भिडला तर तुम्ही नक्कीच जिंकू शकता! नाहीच जिंकलात तरी निदान तुम्ही त्याचा मुकाबला केला आणि हातात नसल्याने हत्यार खाली टाकायला लागले ह्याचे तरी समाधान मिळेल!

ते बघून झालेच तोपर्यंत पाण्यात २ मगरी होत्या त्यातल्या एका मगरीने वाहत जात असलेल्या एका बीस्टला पटकन तोंडात पकडून खाण्यासाठी बाजूला घेऊन जाताना बघितले.

हे रिव्हरक्रॉसिंग खूपकाही शिकवून गेले. तिथे एक बीस्ट वर चढताना एकदम थांबले, मग वर जायला त्याला भीती वाटायला लागली. त्याच्यामागून बरेच प्राणी वर चढून गेले पण हे तिथेच थांबले होते. एकाचा पाय मोडल्यामुळे त्याला वर चढताच आले नाही, तर अजून २-३ जण पायाला लागलेले असतानासुद्धा तसेच लंगडत लंगडत वर चढले, बरेचजण पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. एक बीस्टतर पाण्यात मध्येच थांबली होती आणि तिच्या बाळाला बोलावत होती. बाळ येईपर्यंत ती जागेवरून हलली नाही, जेव्हा पिल्लू आले तेव्हा त्याला पुढेकरून मग त्या दोघांनी दुसरीकडे चढ पार केला. हे सगळे बघून झाल्यावर प्रत्येकजण गाडीत शांत बसून होता आणि ड्रायव्हरने पण शांतपणे गाडी हॉटेलला जायला वळवली.

संध्याकाळी परत आम्ही सफारी ला निघालो तेव्हा खूप सारे लांडगे, जंगली मांजर, मुंगूस, आणि बाकीचे सगळे प्राणी बघायला मिळाले. आमच्या गाडीचा चालक गाडी घेऊन दुसरीकडे घेऊन गेला होता आणि बाकीच्या गाड्या दुसरीकडे गेल्या होत्या. त्या गाड्या ज्या दिशेला गेल्या तिथे त्यांना बिबट्या बघायला मिळाला पण आम्ही दुसरीकडे गेल्यामुळे ह्यावेळी मात्र आम्हाला बिबट्या बघायला नाही मिळाला म्हणून खूप वाईट वाटत असताना बाकीचे प्राणी बघायला मिळाले असे मनाला सांगून स्वतःचे समाधान करून घेतले.

त्यादिवशी रात्री आम्ही पिझ्झा सांगितला होता. खूप छान पिझ्झा, पास्ता, फळे आणि भरपूर गोड खाऊन थोडावेळ शेकोटीजवळ बसून नंतर आदिती आणि आर्या पत्ते खेळायचे म्हणून मागे लागल्या म्हणून रूममध्ये गेलो. फ्रेश होऊन बाहेर येईपर्यंत दोघी गाढ झोपून गेल्या होत्या. आम्हीपण कंटाळलेलो असल्यामुळे लगेच झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचे असल्याने सगळ्या बॅग्स वगैरे आवरून आम्ही रिसॉर्टवर फोटोसेशन करत असतानाच एक सुंदर छोटे हरीण तिथे उड्या मारत आले. खरेच तो सोनेरी रंग आणि त्यावर तपकिरी, पांढरे ठिपके बघून एकदम हर्षभरित व्हायला झाले आणि सीतेला त्या हरणाचा मोह का पडला असावा हे उमगले!

भरपेट नाश्ता करून जाताना एकदा परत जंगलात हिंडून गेटच्या बाहेर पडलो. आणि आता छान ब्रेक मिळाला असल्यामुळे एकदम फ्रेश होऊन रोजचे रुटीन आनंदाने सुरु करायचा हा निर्धार करून परतीचा प्रवास सुरु केला!

सुप्रिया