Naatu majha bhala in Marathi Children Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | नातू माझा भला !

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

नातू माझा भला !




= नातू माझा भला! =
दुपारचे दोन वाजत होते. मे महिन्यातले ऊन प्रचंड आग ओकत होते. सर्वत्र हाहाकार माजला होता. 'सूर्यकिरण' या वसाहतीत असलेल्या एका सदनिकेत ओंकार मस्तपैकी खेळत होता. ओंकारचे खेळणे म्हणजे नुसता धिंगाणाच धिंगाणा! नुकतीच त्याची पाचव्या वर्गाची परीक्षा संपली होती. पोहणे, क्रिकेट, हस्ताक्षर सुधार अशा विविध कार्यक्रमांना आठ-दहा दिवस सुट्टी असल्यामुळे ओंकारजवळ भरपूर वेळ होता. त्यामुळे त्याचा मनसोक्त धिंगाणा सुरु असे. दिवाणखान्यात खेळणाऱ्या ओंकारला अचानक काही तरी आठवले आणि त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल भावनांनी गर्दी केली. मांजराच्या पावलाने तो आजीच्या खोलीजवळ पोहोचला. त्याने सावधपणे आत डोकावले. ओंकारचे आईबाबा सकाळीच कंपनीत गेल्यापासून ओंकारच्या मागे धावताना, त्याने केलेला पसारा सतत आवरून दमलेली आजी दोन क्षण विसावा घ्यावा म्हणून खोलीतल्या पलंगावर पहुडली होती. प्रचंड थकवा आल्यामुळे दुसऱ्याच क्षणी आजीचा डोळा लागला होता. ते पाहून ओंकारच्या डोळ्यात वेगळीच चमक आल. नेहमीप्रमाणे आजीची गंमत करावी या विचाराने तो पुन्हा हलकेच दिवाणखान्यात पोहोचला. दिवाणखान्याच्या मधोमध जमिनीवर अलगद झोपता झोपता ओंकार ओरडला,
" आssजी, ए, आss जीss..."
त्याच्या तशा ओरडण्यामुळे आजीची झोप चाळवली. आजीची गंमत करण्याची लहर आली की, ओंकार मुद्दामहून तसा ओरडत असे. अनेकदा तसा प्रकार झाला. ओंकारचा 'लांडगा आला रे, लांडगा आला', हा खेळ आजीच्या लक्षात आला. पण तो प्रकार समजत असूनही आजी नेहमी घाबरून धावतच बाहेर येत असे. आजीची ती घाबरलेली अवस्था पाहून ओंकार जोरजोराने हसत असे. ते पाहून आजी कौतुकाने म्हणे,
"अरे, लांडग्या, माझी गंमत करतोस काय? मला फसवतोस का रे? पुन्हा असे काही केलेस ना तर मी येणारच नाही."
पण पुढच्या वेळी ओंकार ओरडला की, आजीला राहवत नसे. त्यादिवशीहीतसेच झाले. ओंकारचे ओरडणे कानावर पडताच आजी झोपेतून खडबडून जागी झाली. पलंगाच्या खाली उतरून ती लगबगीने दिवाणखान्यात पोहोचली. डोळे किलकिले करून पाहणाऱ्या ओंकारच्या लक्षात आले की, आजी आली आहे. त्याने जोरजोराने हसायला सुरुवात केली. तशाच अवस्थेत उठत असताना ओंकारच्या लक्षात आले की, आजीचा चेहरा घामाने डबडबलाय. डोके गच्च धरून सोफ्यावर बसता बसता आजी पडलीय हे पाहताच तो लगबगीने उठला. आजीने डोळे गच्च मिटून घेतले होते. हाताने छाती दाबून धरत होती. आजीची ती अवस्था पाहून ओंकारने धावत जाऊन पंख्याची गती वाढवली. आजीच्या शेजारच्या खुर्चीवर पडलेला टॉवेल उचलून आजीच्या चेहऱ्यावर आलेला घाम पुसायला सुरुवात केली. परंतु तिच्या चेहऱ्यावरील घामाच्या धारा थांबत नव्हत्या. त्यामुळे ओंकार घाबरला. त्याने रडवेला होत आवाज दिला,
"आजी, ये आजी ग... बोल ना ग माझ्याशी. मी पुन्हा तुझी खोटी खोटी गंमत करणार नाही ग...."
परंतु आजी काहीही बोलत नसल्याचे पाहून ओंकार गडबडीने उठला. त्याने टेबलावर ठेवलेला 'लँडलाईन' फोन उचलला. परंतु फोन दोन दिवसांपासून बंद असल्याचे लक्षात येताच त्याने रागारागाने फोन आपटला. सचिंत होऊन आजीकडे बघत असताना त्याला काही तरी आठवले. तो धावतच आजीच्या खोलीत गेला. इकडेतिकडे पाहत त्याने उशी उचलली. तिथे असलेला आजीचा भ्रमणध्वनी घेऊन तो पुन्हा दिवाणखान्यात आला. आजीची अवस्था तशीच होती. त्याने भ्रमणध्वनी सुरू केला. त्याच्या बाबांचा क्रमांक जुळवला. परंतु संपर्क होत नव्हता. त्याने भ्रमणध्वनीकडे पाहिले असता रेंज नसल्याचे त्याच्या लक्षात आले. 'आता काय करावे?' असे पुटपुटत तो दाराजवळ आला. आजीची नजर चुकवून ओंकार उन्हामध्ये बाहेर खेळायला जाऊ नये म्हणून आजीने दाराचा वरचा खटका लावला असल्याचे ओंकारच्या लक्षात आले. वयाच्या मानाने ओंकारची उंची कमी असल्यामुळे त्याचा हात तिथे पोहोचत नसे.
'ओ..शट्...' असे बडबडत ओंकारने इकडेतिकडे पाहिले. वर चढून दाराचा खटका काढावा असे त्याला काहीच दिसत नव्हते. एकमेव सोफा तेवढा होता. तो सोफ्याजवळ गेला. त्याने सोफा ढकलण्याचा प्रयत्न केला परंतु सोफा खूप जड असल्याने जागचा हलला नाही. त्याने सारी शक्ती एकवटून सोफा ढकलला. सोफा जणू रुसल्याप्रमाणे थोडाफार सरकला. ओंकारने पुन्हा प्रयत्न केला. सोफा किंचितसा सरकल्याचे त्याला जाणवले पण ओंकारला दम लागत होता. त्याचा चेहरा घामाने डबडबला. पण त्याने प्रयत्न सोडला नाही. तो जोर लावून सोफा ढकलत असताना त्याचा पाय घसरला. तो जमिनीवर पडत असताना त्याचे डोके सोफ्याच्या कडेवर आदळले. दुसऱ्याच क्षणी त्याचे डोळे भरून आले. तोंडातून 'आई.. ग...' हे शब्द बाहेर पडले.परंतु त्याचा आवाज कुणास ऐकू जाणार? ओंकार तसाच उठला. त्याने पुन्हा सोफा ढकलायला सुरुवात केली आणि काही क्षण प्रयत्न केल्यानंतर त्याला जाणवले की, सोफा आणि दरवाजा यामधील अंतर बरेच कमी झाले असले तरीही अजून बरेच अंतर बाकी आहे. ते अंतर कमी करायला बराच वेळ लागू शकतो. तेवढा वेळ आपल्याजवळ नाही हे जाणून ओंकार सोफ्याच्या हातावर चढला. लोंबकळल्याप्रमाणे त्याने दोन्ही हात दरवाजावर टेकवले. दुसऱ्याच क्षणी उजवा हात उचलून खटका काढायचा त्याने प्रयत्न केला. हात पोहचत नाही हे पाहून ओंकारने सोफ्याच्या हातावर असलेले पाय अजून सोफ्याच्या काठाच्या दिशेने सरकवले. दोन्ही पाय जेवढे उंच करता येतील तेवढे उंच करून हात खटक्याजवळ नेला. खटका बोटात पकडला. तो खाली ओढत असताना हात सटकला. त्याने दोन तीन वेळा प्रयत्न केला. शेवटी एकदाचा खटका निघाला. ते पाहून ओंकारला खूप खूप आनंद झाला. खटक्यावरचा हात काढून ओंकार सावकाशपणे सोफ्यावर सरळ उभा राहिला. दुसऱ्याच क्षणी तो खाली उतरला. त्याने आजीकडे पाहिले. तिची अवस्था तशीच होती. दार उघडून त्याने आजूबाजूला बघितले. शेजारची सारी दारे कुलूपबंद होती.
'आता काय करू? शेजारी तर कुणीच नाही.' असे मनाशीच बोलत ओंकार आत आला. आजीचा भ्रमणध्वनी उचलून तो बाहेर आला. त्याने लिफ्टकडे धाव घेतली. लिफ्टजवळ पोहचताच लिफ्ट कुठे तरी अडकली असल्याचा आवाज त्याला ऐकू आला. त्याचा फ्लॅट पाचव्या मजल्यावर होता. वर अजून तीन मजले होते. कोणताही विचार न करता, घामाने आपादमस्तक चिंब भिजलेल्या अवस्थेत ओंकार धावत धावत तीन मजले चढून इमारतीच्या गच्चीवर आला. गच्चीवर पाय ठेवताचतो असा भाजला की, ओंकारच्या तोंडातून 'आई...ग...' असा आवाज निघाला. तशाच अवस्थेत त्याने आजूबाजूला पाहिले. इमारतीच्या पिल्लरच्या एका बाजूला जेमतेम एक पाय मावेल अशी सावली त्याला दिसली. तो पाय भाजत असताना धावतच तिथे गेला. त्या सावलीत त्याने अवघडून एक पाय ठेवला. त्या पायावर दुसरा पाय ठेवला. हातातल्या भ्रमणध्वनीवर त्याने पाहिले. रेंज दर्शविणाऱ्या काड्या दिसताच तो आनंदला. त्याने पटकन बाबांचा क्रमांक जुळवला. तिकडून फोन उचलताचतो म्हणाला,
"ब..ब...बाबा..."
"ओंकार, काय झाले रे?" बाबांनी विचारले.
"बाबा, आजी की नाही...." असे म्हणून ओंकारने सारे ऐकवले. ते ऐकून बाबा म्हणाले,
"ओंकार, घाबरू नकोस. मी लगेच निघतो. आपण आजीला दवाखान्यात नेऊया." त्याला धीर देत बाबा म्हणाले. परंतु तेही घाबरले होते.
"ब...ब..बाबा, एक करा ना, तुम्ही घरी येऊ नका. फार वेळ लागेल हो. त्यापेक्षा फोन करून रुग्णवाहिका पाठवा. मी आजीला घेऊन दवाखान्यात येतो. तुम्ही तिकडेच या."
"बरोबर आहे तुझे. मी तसेच करतो. मी आपल्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला फोन करतो. तो तुला मदत करेल." असे म्हणत बाबांनी फोन बंद केला. ओंकार धावतच खाली आला. आजीची अवस्था तशीच होती. उलट वेदना वाढल्याचे तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होते. ओंकार आजीजवळ बसला. टॉवेलने आजीच्या चेहऱ्यावर आलेला घाम पुसताना तिचा हात हातात घेऊन म्हणाला,
"आजी, मी बाबांना फोन केलाय. बाबा गाडी पाठवत आहेत. आपण लगेच दवाखान्यात जाऊ. तिकडून आईबाबाही येतील. आजी, ये आजी, बोल ना ग......"
तितक्यात त्यांच्या इमारतीचा वॉचमन आत येत म्हणाला,
"बेटा, घाबरू नकोस. साहेबांचा मला फोन आला होता. रुग्णवाहिका येत आहे...."
"काका, बघा ना,आजी काहीच बोलत नाही हो..."
"बरोबर आहे. पण आजी नक्की बरी होईल..." वॉचमन त्याला समजावून सांगत असताना रुग्णवाहिकेचा आवाज ऐकू आला. काही वेळातच दोन-तीन माणसे स्ट्रेचर घेऊन आत आली. त्यांनी आजीला हलकेच उचलून त्यावर झोपवले. त्यांच्यासोबत ओंकार निघाल्याचे पाहून वॉचमन म्हणाला,
"ओंकार बाळा, तू आजीसोबत जा. मी दार लावून आलोच...."
त्या लोकांसोबत ओंकार खाली आला. त्या लोकांनी आजीला व्यवस्थित रुग्णवाहिकेत झोपवले. ओंकारही आजीचा हात हातात घेऊन तिच्या शेजारी बसला. विशिष्ट प्रकारचा आवाज करत रुग्णवाहिका दवाखान्यात पोहोचली. सोबतची माणसे पटापट खाली उतरली. ओंकारही खाली उतरला. त्याने पाहिले. बाबा तिथे पोहोचले होते. त्यांना पाहताच ओंकारचा धीर सुटला. तो 'बाबा..' असे ओरडत त्यांच्या कुशीत शिरला. इतका वेळ कोंडलेल्या भावना आणि अश्रू वेगाने बाहेर पडले. तो हमसून रडू लागला. तितक्यात ओंकारची आई तिथे पोहोचली. ओंकार आईकडे धावला. तसे त्याचे बाबा डॉक्टरांकडे गेले. ओंकार आणि त्याच्या आईचे अश्रू थांबत नव्हते. थोड्या वेळात आई ओंकारला घेऊन त्याच्या बाबांजवळ आली.....
नंतरचा एक-दीड तास सारे जण बाहेर उभे होते. नर्स, डॉक्टर यांची धावपळ पाहात होते. ओंकार कधी आईचा, कधी बाबांचा तर मधूनच दोघांचाही हात धरत होता. ओंकारने घडलेली हकिकत जशीच्या तशी सांगितली. तितक्यात दोघांचेही लक्ष त्याच्या कपाळाकडे गेले. त्याच्या कपाळावरचे रक्त गोठून तिथे एक गाठ आली होती. ते पाहून त्याच्या आईने त्याला घट्ट आवळून त्याचे खूप सारे पापे घेतले. तितक्यात तिथे डॉक्टरांचे आगमन झाले. डॉक्टर म्हणाले,
"आजींची तब्येत आता धोक्याच्या बाहेर आहे. काळजीचे कारण नाही. सारे अहवाल नॉर्मल आहेत. दवाखान्यात यायला अजून दहा-पंधरा मिनिटे उशीर झाला असता तर काही खरे नव्हते. आम्ही काहीही करु शकलो नसतो...." डॉक्टर बोलत असताना ओंकारच्या आईने त्याला पुन्हा घट्ट आवळले. डॉक्टरांच्या पाठोपाठ सारे आजीच्या खोलीत आले. पलंगावर असलेल्या आजीने हसून सर्वांचे स्वागत केले. अपराधी चेहरा करून उभे असलेल्या ओंकारकडे बघत आजी हळू आवाजात म्हणाली,
"डॉक्टर, सारेच लांडगे जीव घेत नाहीत हो. बघा. माझ्या या लाडक्या लांडग्यानेच आज माझा जीव वाचवला...." असे म्हणत आजीने दोन्ही हात पसरून ओंकारला इशारा केला. दुसऱ्याच क्षणी पाणावलेल्या डोळ्यांनी ओंकार आजीच्या मिठीत शिरलेला पाहून सर्वांनीच डोळ्यांच्या कडा टिपल्या.......
नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका, फेज ०१
क्रांतिवीरनगर लेन ०२,
हॉटेल जय मल्हारच्या जवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१