Aamachya miss aaji in Marathi Children Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | आमच्या मिस ... आजी!

Featured Books
Categories
Share

आमच्या मिस ... आजी!

* आमच्या मिस ... आजी! *
'स्माईल इंग्लिश' स्कुलच्या पहिल्या वर्गात छोटा समीर शिकत होता. शाळा सुटण्याची वेळ होत होती. इवलीशी, गोजिरवाणी बालके थकून, सुकून गेली होती. तरीही मित्रांसोबत खेळत होती. त्यांच्या हालचालींमध्ये काही मिनिटांपूर्वीचा उत्साह, जोश, स्फूर्ती नव्हती तर एक प्रकारची मरगळ होती. समीर एका आसनावर शांत बसला होता ते पाहून त्याच्या मिस त्याच्याजवळ जाऊन म्हणाल्या,
"हाय समीर! हाऊ आर यू? काय झाले? असा उदास का बसला आहेस? आपल्या शाळेचे नाव..."
"स्माईल इंग्लिश स्कुल आहे... माहिती आहे, मिस! सर्वांनी स्माईली असले पाहिजे हेही ठाऊक आहे." समीर म्हणाला.
"मग तू असा का बसलास? जा, तुझा आवडता..."
"मिस, माझे क्रिकेट खेळून झाले. व्हॉलीबॉल, फुटबॉल, रिंग, सायकल, घसरगुंडी, झोका, घोडा, कार सारे सारे खेळून झाले. खूप बोअर होत आहे. मिस, आमच्या इमारतीत की नाही आम्ही मुले वेगळेच खेळ खेळत असतो." समीर म्हणाला.
"हो का? नवनवीन खेळ तुम्हाला कोण शिकवते?" मिसने कौतुकाने विचारले.
"माझी आजी ! तिला की नाही खूप खूप नवीन खेळ माहिती आहेत. आम्ही आज एक नवीन खेळ खेळू का?"
"ठिक आहे. पण शिकवणार कोण? " मिसने विचारताच समीर घाईघाईने म्हणाला,
"मी शिकवेन. मला येतो तो खेळ..." समीर म्हणाला. तसे मिस इतर मुलांचे लक्ष वळवण्यासाठी टाळ्या वाजवत म्हणाल्या,
"कम ऑन स्माईलीज! कम फास्ट! आज आपला समीर की नाही एक नवीन खेळ तुमच्यासोबत खेळणार आहे..."
"हे..हे...! नवीन खेळ! समीर शिकवणार? वॉव! मज्जाच..." असे ओरडत सारी मुले समीरजवळ आली. तसा समीर आनंदला. तो म्हणाला,
"स्माईलीज, गोल बसा हं..." हे सांगताना त्याचा आवेश एखाद्या शिक्षकासारखा होता. लगेच सारी पटापट गोलाकार बसली. तसा समीर धावतच वर्गात गेला आणि कापडाचे डस्टर घेऊन आला.
"हे डस्टर घेऊन मी तुमच्याभोवती गोल गोल फेऱ्या मारेन. मी फिरत असताना ज्या मुलाचे लक्ष माझ्याकडे नाही त्याच्या पाठीमागे मी हे डस्टर टाकीन. त्याला समजले तर त्याने हे डस्टर उचलून
माझ्या मागे पळत येऊन मला पकडायचे. पळताना मी किंवा तो मुलगा जो कुणी आधी त्या मुलाच्या जागेवर जाऊन आधी बसेल तो विजयी होईल. जो पोहोचू शकणार त्याने माझ्याप्रमाणे डस्टर घेऊन पुन्हा नवीन डाव सुरू करायचा..."
"आणि समजा, तू डस्टर मागे टाकलय हे त्या मुलास समजले नाही तर?" मिसने विचारले.
"तर मग मी डस्टर टाकल्यावर गोल चक्कर मारुन त्याला याच डस्टरने फटके देईन. मग त्या मुलाने माझ्यासारखीच कृती करायची"
"अरे व्वा! छानच की! स्माईलीज रेडी?" मिसने विचारले.
"ये..स मि..स!..." सारी मुले एका आवाजात ओरडली.
"स्माईलीज, मी धावताना म्हणेन... 'मामाचे पत्र हरवले, ते कुणाला सापडले?' माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणा... 'आम्हाला नाही सापडले...' चला. म्हणा... मामाचे पत्र हरवले..." मुलांनी जोरदार उत्तर दिले,
"ते आम्हाला नाही सापडले..." अशा घोषणा उत्साहाने सुरू असताना मिसने इशारा केला आणि मुलांनी टाळ्यांचा ठेका धरला. थोडा वेळ पळून समीरने अभयच्या पाठीमागे डस्टर टाकले. अभय समीरवर लक्ष ठेवून होता त्यामुळे समीरने आपल्या पाठीमागे डस्टर टाकल्याचे त्याने ओळखले. तो पटकन उठला आणि समीरच्या मागे धावत सुटला. ते पाहून समीरही जोरात पळू लागला. त्यामुळे तो समीरच्या आधी त्याच्या जागेवर जाऊन बसला. अभयवर राज्य आले. अभयने 'मामाचे पत्र हरवले...' असे मोठ्याने ओरडत धावायला सुरुवात केली. दोन-तीन गोल फेऱ्या मारून अभयने हातातील डस्टर वसंतच्या मागे टाकले. ते समजताच वसंतही घाईघाईने उठला. तो कपडा उचलून तो अभयच्या मागे निघाला. अभयनेही पळण्याचा वेग वाढवला पण वेगाने पळण्याच्या नादात तो वसंत कुठे बसला होता ते विसरला आणि पुढे निघून गेला. पाठीमागून आलेला वसंत सावकाश आपल्या जागेवर येऊन उभा राहिला आणि विजयी मुद्रेने सर्व मुलांकडे, मिसकडे आणि विशेषतः अभयकडे बघत आपल्या जागेवर बसला. तसा समीर उभा राहून म्हणाला, "अभय, तुला पुन्हा डाव द्यावा लागेल. त्यामुळे हिरमुसलेल्या अभयने पुन्हा धावायची तयारी सुरू केली असतानाच शाळा सुटल्याची घंटी वाजली. मिसने समीरला विचारले,
"वा! छान! समीर, अजून कोणकोणते खेळ तुला माहिती आहेत?"
"मिस, माझ्यापेक्षा माझ्या आजीला खूप खेळ माहिती आहेत..." समीर सांगत असताना त्यांचा खेळ पाहणाऱ्या स्माईलीच्या मिस हेड तिथे आल्या. त्या म्हणाल्या,
"समीर, खूप छान खेळवलेस मुलांना. एक काम कर, उद्या तुझ्या आजीला घेऊन ये."
"येस, मॅडम!..." असे म्हणत समीर त्याच्या बसजवळ गेला...
समीरच्या घरासमोर त्याची बस थांबली. समीर धावतच घरी गेला. त्याची आजी त्याचीच वाप पाहात दारातच उभी होती. आजीला पाहताच समीर आनंदाने ओरडला,
"आजी, मी आलो..."
"आला ग माय, माझा सोन्या. बरे, दप्तर जागेवर ठेव..."
"शूज आणि सॉक्स व्यवस्थित ठेव. युनिफॉर्म बदल. हातपाय धू. दूध, बिस्कीट घे. आजी, हे ग काय? तेच ते दररोज! पाठ झाले आहे मला. आजी, ऐक ना, आज की नाही मी माझ्या शाळेतल्या स्माईलीजना एक खेळ शिकवला..."
"अरे, व्वा! तू खेळ शिकवलास? खूप मस्त! कोणता खेळ शिकवलास रे?"
"आपला तो ग... मामाचे पत्र हरवले..."
"हो का? मुलांना आवडला का?"
"आजी, मुलांना तर आवडलाच, आमच्या मिसलाही आवडला आणि आमच्या हेड मिसलाही आवडला. त्यांनी ना, उद्या तुला शाळेत बोलावले आहे."
"मला? कशासाठी?"
"मला नाही माहिती. पण तू ये बरे का!"
"बरे. येईल हं. चला तर मग आज 'शिक्षक' म्हणून कामगिरी बजावणाऱ्या आमच्या समीरसाठी त्याची आवडती स्पेशल डिश..." आजी सांगत असताना समीर आनंदाने नेहमीच्या खास अंदाजाने ओरडला,
"हॅट रे बंड्या...!"
सायंकाळी समीरचे आईबाबा कार्यालयातून आले. त्यांची वाट पाहात असलेल्या समीरने त्यांना आत येऊ न देताच 'मामाचे पत्र हरवले' याबाबत मोठ्या उत्साहाने सांगितले. ते ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला. त्याच्या बाबांनी त्याला उचलून वर घेत त्याच्या दोन्ही गालांवर ओठ टेकवत त्याला त्याच्या आईकडे दिले. आईनेही त्याचा कौतुकाने पापा घेतला. रात्री झोपेपर्यंत समीर आईबाबा, आजीला 'पत्राची' गोष्ट वारंवार सांगू लागला. शाळेत आपण वेगळे काही तरी केले, आपल्या मिसप्रमाणे आपणही आपल्या मित्रांना एक खेळ शिकवला हा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून आणि कृतीतून प्रकट होत होता. त्याच आनंदात तो झोपी गेला...
दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाईपर्यंत समीर आजीला 'तू शाळेत यायचे हं.' असे वारंवार बजावत होता. समीरच्या आईबाबांनाही आजीला 'शाळेत जाऊन या' असे सांगितले. सारे आवरून, जेवण करून आजीला शाळेत जायला दुपारचे दोन वाजले. त्या सरळ मुख्याध्यापिकेच्या कार्यालयात गेल. शिपायाने आत जाऊन निरोप दिला. काही सेकंदात बाहेर आलेल्या शिपायाने त्यांना 'आत बोलावलय' असा निरोप दिल्यानंतर त्या आत गेल्या. त्यांना पाहताच मुख्याध्यापिका म्हणाल्या,
"या. आजी, या. बसा."
"तुम्ही बोलावलय असा निरोप समीरने दिला. समीरबाबत काही अडचण नाही ना?"
"नाही हो. आजी, तसे काहीच नाही. त्याची प्रगती अगदी उत्तम आहे. त्याने काल मुलांना एक छान खेळ शिकवला. मी कुणाकडून शिकला असे विचारले तर म्हणाला की, आजीकडून शिकलो. माझ्या आजीला खूप खेळ येतात."
"हो. मी सेवानिवृत्त शिक्षिका आहे. आमच्या मराठी शाळेत असे खेळ, गीते आम्ही नेहमीच घेत होतो."
"बरोबर. आम्ही पण हा खेळ खेळत होतो पण कालौघात विसरून गेलो. आजी, एक कराल का, रोज शाळेत येऊन दररोज एका वर्गाला तुम्हाला माहिती असलेले खेळ, गाणी शिकवाल का? जास्त नाही फार तर अर्धा तास."
"मला आवडेल. पण संध्याकाळी मुलगा-सून यांच्याशी चर्चा करून सांगते."
"ठिक आहे. परंतु सकारात्मक विचार करा. मुलं तेच खेळ, तीच गाणी, तोच अभ्यास या वातावरणात कंटाळतात."
"बरे. मी उद्या कळवते. मी समीरला सोबत घेऊन गेले तर चालेल का?"
"हो. का नाही?..." असे म्हणत हेडमिसने घंटी वाजवली. दुसऱ्याच क्षणी दार उघडून आत आलेल्या शिपायाला म्हणाल्या, "समीरला बॅगसह घेऊन ये."
काही क्षणात पाठीवर दप्तर घेऊन समीर आला. हेडमिस त्याला म्हणाल्या, "समीर, आज तुला आजीसोबत घरी जायचे आहे. तुम्हाला सर्वांना रोज नवेनवे खेळ शिकवायला मी आजीला रोज शाळेत यायला सांगितले आहे."
"वॉव! ग्रेट! ये आजी, म्हणजे तू माझी 'मिस' होणार. मी तुला मिस आजी म्हणू का?" समीरने निरागसपणे विचारले आणि त्या दोघी खळखळून हसल्या.
"समीर, अजून आजीने होकार दिलेला नाही. तुझ्या आईबाबांना विचारून सांगणार आ."
"आईबाबांनाच विचारायचे आहे ना, मग त्यात काय असे अवघड? मी सांगतो त्यांना. ते नाही म्हणणार नाहीत." समीर बोलत असताना आजी हसत हसत निघाली...
रस्त्यानेही समीरचे एकच चालू होते, "आजी, तू नाही म्हणू नकोस. माझ्या शाळेत येऊन खेळ शिकवायचे म्हणजे शिकवायचे. मी काही ऐकणार नाही."
घरी पोहोचल्यानंतर समीर अगतिकतेने आईबाबांची वाट पाहात होता. सारखा दारातून, खिडकीतून बाहेर डोकावत होता. मधूनच घड्याळ बघत होता. त्याची अस्वस्थता पाहून आजी मनातल्या मनात हसत होती. बरोबर सहा समीरच्या आईबाबाचे आगमन झाले. त्यांना पाहिल्याबरोबर समीर म्हणाला,
"बाबा... आई, मला एक प्रॉमिस हवे आहे... दोघांकडून!"
"ते कशासाठी?"
"मी जे मागेन त्यास तुम्ही दोघांनीही पटकन हो म्हणायचे."
"काय असेल बुवा? बरे, काय ते सांग."
"मुळीच नाही. पहिले प्रॉमिस तर द्या."
"ओके. प्रॉमिस..."
"हॅट रे बंड्या! आपली आजी आता माझ्या शाळेत मिस आजी होणार आहे. तुम्ही नाही म्हणायचे नाही."
"मिस आजी? हा काय प्रकार आहे?" गोंधळलेल्या अवस्थेत दोघांनीही आजीकडे पाहून विचारले
"अरे, काही नाही. आज समीरच्या शाळेत गेले होते तर..." असे म्हणत आजीने सारे काही सांगितले...
"म्हणून हा लब्बाड मिस आजी म्हणतो काय? पण आई, खरेच चांगले आहे हो. तुम्हालाही लहान मुलांची आवड आहेच. तुम्ही एक चांगल्या, मनमिळाऊ, प्रेमळ शिक्षिका आहात. दुपारचा वेळ कसा घालवावा हा तुमच्यापुढे प्रश्नच असतो. महत्त्वाचे म्हणजे आज मुलांना जुने खेळ, जुनी संस्कार गीते कुठे माहिती आहेत? तुमच्याजवळ या गोष्टींचे भांडार आहे. संधी आलीच आहे तर ही सारी शिदोरी लहान मुलांसाठी खुली करा. संस्काराचे दालन मोकळे करा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे वयाच्या मानाने तुमची तब्येतही उत्तम आहे. हो की नाही हो?"
"आई, खरेच खूप छान होईल. दे होकार."
सर्वांच्या आग्रहाखातर आजीने स्माईल इंग्लिश स्कुलमध्ये जायला सुरुवात केली. समीरचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याच्या वर्गातील आणि शाळेतील मुलेही खुश झाली. आजींना शाळेत आलेले पाहताच मुले 'मिस आजी आली. मिस आजी...' असा पुकारा करु लागली. दोन तीन दिवसातच आजी समीरच्या शाळेत चांगल्याच लोकप्रिय झाल्या. आजीने त्यांच्या काळातील आणि आज लोप पावत असलेले अनेक खेळ, संस्कारगीतं, बडबडगीते शिकवायला सुरुवात केली. ते सारे ऐकताना, खेळताना, करताना ती मुले अधिकच स्माईली होऊ लागली. विशेष म्हणजे शाळा सुटण्यास अर्धा पाऊण तास असताना मुले कंटाळवाणी होतात. कोमेजून गेलेली असतात. आजीने मुद्दाम शेवटचा तास निवडला. त्या तासामध्ये खेळून, गाऊन मुले टवटवीत, प्रफुल्लीत होत घरी जाऊ लागली. मुलांमध्ये झालेला बदल पालकांच्याही लक्षात आला. अनेकांनी दूरध्वनी कर तर काही पालकांनी प्रत्यक्ष शाळेत येऊन चौकशी केली. मुले घरीसुद्धा तीच गीते गुणगुणू लागली. शाळेचा गृहपाठ झाल्यावर मिस आजीचा खेळ खेळू लागली. एकंदरीत स्माईली इंग्लिश स्कुलमधील मुले अधिकच स्माईली झाली.
पाहता पाहता एक महिना झाला. मिस आजीने त्यादिवशी समीरच्या वर्गात स्वतःचा तास संपवला. तितक्यात त्यांना शिपायाने कार्यालयात बोलावले असल्याचा निरोप दिला. आजी कार्यालयात पोहोचताच मिस हेड म्हणाल्या,
"आजी, या. बसा. मुले, पालक, आमचा स्टाफ सारेच तुमच्या शिकवणीवर, कामावर खुश आहेत. महिना झाला. ही शाळेतर्फे फुल ना फुलाची पाकळी..."
"अहो, नाही. खरेच काही गरज नाही. खरेतर माझाही खूप छान वेळ गेला. महत्त्वाचे म्हणजे या साऱ्या चिमुकल्यांसोबत राहून माझी तब्येतही छान सुधारलीय. दोन महिन्यांपूर्वी शुगरचे निदान झाले होते. नेहमीप्रमाणे 'हाय शुगर' निघाली. काल पुन्हा तपासली तर एकदम नॉर्मल आलीय. ही किमया आहे... या चिमुकल्या स्माईलीजच्या स्माईलमुळे! त्यामुळे खरे सांगते मला काहीही नको."
"नाही. तसे नाही. हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. घ्या..." मुख्याध्यापिकेचा आग्रह आजींना मोडता आला नाही. त्यांनी ते पॉकेट स्विकारले. त्यांचा निरोप घेऊन आजी बाहेर आल्या. समीर त्यांची वाट पाहात होता. घरी परतताना आजीने समीरसाठी त्याच्या पसंतीने एक सुंदर पोशाख घेतला. त्याला कार आवडते म्हणून एक मोठी कार घेतली. समीरला खूप आनंद झाला. दोघेही घरी परतले. आजीने लगेच सर्वांसाठी सर्वांच्या आवडीचे जेवण बाहेरून बोलावले. ऑफिसमधून परतलेले समीरचे आईबाबा तो सारा थाट पाहून आश्चर्यात पडल्याचे पाहून आजी म्हणाली,
"अरे, असे आश्चर्याने काय पाहता? आज समूच्या मिस आजीचा पहिला पगार झाला आहे. अरे, मला मिळणाऱ्या पेंशनपेक्षा जास्त म्हणजे पंचवीस हजार मिळाले आहेत मला."
"हे...हे..." अत्यंत आनंदाने दोन्ही हात एका विशिष्ट पद्धतीने उंचावत समीर ओरडला. त्याच्या आईबाबांनी आजीचे अभिनंदन केले. समीरचा आनंदोत्सव बघण्यासारखा होता...
नागेश सू. शेवाळकर