Mastermind - 8 in Marathi Detective stories by Aniket Samudra books and stories PDF | मास्टरमाईंड (भाग-८)

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

मास्टरमाईंड (भाग-८)

“काय बोलताय चव्हाण, शुध्दीवर आहात का? अहो बाहेर बोललात तर लोकं मारतील आपल्यालाच ”, पवार म्हणाले

“नाही म्हणजे, नानासाहेबांचं पहिल्यापासुनच भैय्यासाहेबांशी वाकडं आहे. त्या जमीनीच्या वादावरुन तर सध्या फारच बिघडलं होतं दोघांच्यात. लोकांदेखत नानासाहेबांनी भैय्यासाहेबांना जिवे मारण्याची धमकी दिली होती”, चव्हाण वरमुन म्हणाले.

“अहो पण चव्हाण, असं बोलणं वेगळं आणि खरोखर करणं वेगळं”, पवार

“ते आहेच हो .. पण संपत्ती! नानासाहेबच वारस होणार सगळ्या संपत्तीचा. भैय्यासाहेबांना ना मुल ना बाळ!!”, चव्हाण

“बरं. एक वेळ तसं समजुन चालु. पण मग शेवंता आणि अनिताताई? खुन तर एकाच प्रकारच्या हत्याराने झालेत. तुमचं म्हणणं खरं धरलं तर त्या दोघींचा खुनसुध्दा नानासाहेबांनीच केला असं म्हणायचे आहे तुम्हाला?” पवार

“शेवंताचं नानासाहेबांच्या वाड्यावर जाणं येणं होतंच. वंगाळ बाई ती, आणि नानासाहेब सुध्दा तसे रंगेल आणि तितकेच भडक डोक्याचे. काही तरी कुठं तरी बिनसले असेल त्यांच. अनिताताईंच म्हणाल तर नानासाहेबांचे दोन दारुचे गुत्ते बंद पाडले होते तिनं, बिना परमीटवाले. गावाबाहेरच्या वडाखाली चालणारे मटक्याचे धंदे शाळेतील पोरांना वाईट सवयी लागतात म्हणुन पंचायतीत तक्रार करुन त्यावर सुध्दा आन आणली होती.” चव्हाण.

“हम्म.. चव्हाण, तुम्ही म्हणताय त्यात तथ्य दिसतेय खरं. पण आपल्याला लगेच असा आरोप करता येणार नाही, हाती बक्कळ पुरावा असल्याशिवाय. लक्ष ठेवायला हवे. शिवाय, शेवंताच्या खुनाच्या वेळी मिळालेल्या वर्णनाशी नानासाहेबांचे वर्णन जुळत नाही तेंव्हा ती व्यक्ती सुध्दा सापडणं तितकंच महत्वाचे”, पवार

“पण साहेब, त्या वर्णनावर आपण किती विश्वास ठेवायचा. अश्या चार लोकांना विचारुन आपण ते चित्र बनवले आहे जे एकतर झोपेत होते, नाहीतर त्यांनी त्या व्यक्तीला अंधुक प्रकाशात निसटसे पाहीले होते..” चव्हाण

“बरोबर आहे, पण नानासाहेब ४५-५०शीचे, त्यात अंगाने आडदांड, निदान अशी तरी ती व्यक्ती नक्कीच नव्हती नाही का..” पवार, “.. बर एक काम करुयात, उद्या नानासाहेबांच्या वाड्यावर एक चक्कर टाकुन येऊ. सहजच, नेहमीच्या चौकश्यांसाठी आणि काही अंदाज घेता येतोय का बघु.. काय?”

“होय सर”, मान डोलावत चव्हाण म्हणाले.

*****************************

नानासाहेबांचा वाडा भैय्यासाहेबांइतका मोठ्ठा नसला तरी एक भव्य वास्तु म्हणता येईल इतपत मोठा नक्कीच होता. परंतु भैय्यासाहेबांच्या वाड्यावर जो एक प्रसन्नपणा जाणवायचा तो इथे खचीतच नव्हता. गेटवर पहारा देणारे, इतरत्र वावर करणारी लोक ही गुंड कॅटॅगरीतली वाटायची.

इ. पवार व्हरांड्यातुन आत शिरले. नानासाहेब अडकित्याने सुपारीची खांड फोडत बसले होते. इ.पवारांना बघताच उभे राहीले आणि कडेच्या खाटेकडे हात दाखवत पवारांना बसायला सांगीतले.

“काय पवार साहेब, काय म्हनतोय तपास? काय सुगावा लागला का नाय? अवं गावात तिसरा मुडदा पडलाय!! कसं रहायचं गावात आमी?” कपाळावर आठ्या पाडुन आपले सुपारी फोडण्याचे काम चालु ठेवत नानासाहेब म्हणाले.

पवारांनी एकवार मागे वळुन उभ असलेल्या चव्हाणांकडे पाहीले आणि परत नानासाहेबांकडे वळुन म्हणाले, “नानासाहेब, तपास तर चालुच आहे. काही मार्ग दिसतो आहे, पण त्याबद्दलच उघडपणे बोलणं आत्ता योग्य ठरणार नाही.”

“काय सुगावा लागलाय? जरा आम्हाला तरी कळु द्या”, नानासाहेब
“हो तर. नक्कीच, त्याबद्दलच बोलायला आम्ही तुमच्याकडे आलो आहोत”, पवार म्हणाले, “चव्हाण, तो जरा कागद देता?”

चव्हाणांनी त्यांच्याकडचा कागद काढुन पवारांकदे दिला.

“नानासाहेब, अश्याप्रकारचा सुरा तुमच्या कधी पहाण्यात आला आहे?” तो कागद उलगडुन दाखवत पवार नानासाहेबांना म्हणाले, “आत्तापर्यंतचे सर्व खुन ह्याच प्रकारच्या चाकुने झाले असावेत असा आमचा अंदाज आहे”

नानासाहेबांनी एकवार त्या चित्राकडे निरखुन पाहीले आणि म्हणाले, “नाय ब्वा!”

“फार दुर्मीळ आणि अती प्राचीन काळचा सुरा आहे हा. म्हणलं तुम्हाला जुन्या वस्तु जमवायची हौस, कदाचीत तुमच्या संग्रही असेल तर..” पवार

“म्हंजी, तुम्हाला असं म्हणायचयं ह्ये खुन आम्ही क्येले? ओ पवार साहेब, सरकारी मानुस तुम्ही म्हनुन इज्जतीत हाय, लाथ घालुन हाकलले अस्तं”, नानासाहेब चवताळुन म्हणाले.

“नाही हो नानासाहेब, तुम्ही गैरसमज करुन घेत आहात. तुम्ही कुठं पाहीला असेल म्हणुन विचारलं. शेवटी चौकशी करणं हेच आमचं काम आहे काय?” पवार

पवार आणि नानासाहेब बोलत होते तेवढ्यात आतुन एक पंचवीशीतली तरुणी आणि एक तिशीतला तरुण बाहेर आले.

पवारांच्या चेहर्‍यावरील प्रश्नचिन्ह बघुन नानासाहेब म्हणाले, “ही सुमन, माझी पोरगी, मुंबईला अस्तेय आणि ह्ये शशांक, आमचं होनार जावई. ह्ये बी मुंबईलाच असतंय. भैय्यासाहेबांची मौत झाली म्हणुन आलं होतं इकडं, जातील ४-८ दिवसांत”

“सुमनं?!! हो आठवतेय मला. कॉलेजला म्हणुन जी गावाबाहेर गेली ती आज आलीस बघ!!”, पवार.. पवारांच लक्ष शशांककडे गेले. सडसडीत बांध्याचा, गोरापान, सावळ्या सुमनला थोडासा उजवाच वाटणारा शशांक मान वळवुन दुसरीकडेच बघत होता.

“नमस्कार शशांक राव…”.. पवार म्हणाले..

“नमस्कार..” चेहर्‍यावर पुसटसे हास्य आणत शशांक म्हणाला

“आपण काय करता मुंबईला??” पवार

“माझ्या वडीलांची केमीकल फॅक्टरी आहे..” शशांक.. इ. पवारांच्या प्रश्नांनी अस्वस्थ होत
म्हणाला..

“.. नाही, ते झालं.. तुम्ही काय करता.. फॅक्टरी तर वडील बघत असतील ना..??” खोचकपणे पवार म्हणाले..

“हम्म.. मी त्यांना मदत करतो..” शशांक..

“म्हणजे नक्की काय करता?..” पवार आपला प्रश्न सोडायला तयार नव्हते

शशांकच्या चेहर्‍यावर पसरलेल्या वैतागाचे जाळं बघुन नानासाहेब जागेवरुन उठले.. “ओ पवारसाहेब, कश्यापाय छळताय पोरांस्नी..? जावा निघा तुमी, कामं करा…जा रं पोरांनो..”

शशांक लगेच बाहेर पडला..

भैय्यासाहेबांच असं अचानक जाणं सुमनच्या चेहर्‍यावर दिसत होते. चेहर्‍यावर कसनुसं हसु आणुन ती शशांक बरोबर बाहेर पडली.

“बरंय नानासाहेब, येतो आम्ही, परत कधी काही लागलं तर चक्कर टाकीन.. काय?” असं म्हणुन पवार आणि चव्हाण बाहेर पडले.

गाडीत बसताना पवार म्हणाले, “चव्हाण त्या शशांकची बॅकग्राऊंड चेक करा. कुठं रहातो, काय करतो. सगळी माहीती काढा. गावात आलेला प्रत्येक नवीन माणुस माझ्यासाठी संशयीत व्यक्ती आहे”

चव्हाणांच्या चेहर्‍यावर ’काय पण आपलं साहेब’ दर्शवणारे भाव होते.

*****************************

“डॉली!!, तुझा अजुनही माझ्यावर संशय आहे??”, जॉन

डॉली खिडकीबाहेरच बघत होती.

” अगं मी कशाला खुन करु भैय्यासाहेबांचा? माझा काय फायदा त्यात?” जॉन डॉलीला हताश होऊन विचारत होता

“पण मग त्या दिवशी भैय्यासाहेबांनी तुझ्याकडे का बोटं दाखवलं?” डॉली जॉनच्या नजरेला नजर न देता बोलत होती.

“आता ते मी कसं सांगु, भैय्यासाहेब जिवंत असते तर त्यांनीच कारण सांगीतले असते..” जॉन

“आणि त्या दिवशी??..”

“त्या दिवशी काय डॉली? त्या दिवशी काय??, तुला कित्तीदा सांगु समजावुन सांगु? त्या दिवशी घाटात मी नव्हतो! आणि शेणाचं काय घेऊन बसलीस! रात्री तु जरी ह्या गावातुन चक्कर मारुन आलीस तरी कधी ना कधी, कुठं ना कुठं तुझ्या पायाला पण लागेलच! म्हणुन काय तु खुनी झालीस का?”

“आय डोंट नो जॉन..! मला खुप भिती वाटतेय!”, डॉली

“भिती? कुणाची?? माझी?? ओह कमॉन डॉली, डोंन्ट ऍक्ट स्टुपीड ...”, असं म्हणुन जॉन तेथुन निघुन गेला

डॉलीच्या मनात संशयाचे जे भूत बसले होते ते काही केल्या जायचे नाव घेत नव्हते . जॉनने सारवासारव केली खरी पण त्याला हे मान्य करावेच लागत होते कि त्याच्याबद्दल डॉलीच्या मनात जो संशय निर्माण झाला आहे तो त्या परिस्थतीला अनुरूपच होता . भैय्यासाहेबांनी त्याच्याकडे का बोटं दाखवलं ह्याच उत्तर जॉनकडेही नव्हते . परिस्थिती हाताबाहेर जायच्या आधी भराभर पावलं उचलन जॉनला आवश्यक होते. आज डॉली जी त्याच्या इतकी जवळची होती तिला सुद्धा जॉनबद्दल संशय वाटत होता, तर बाकीच्या लोकांचे काय? आधीच तपासाला उशीर होत होता , दबावाखाली येऊन उद्या पोलिसांनी जॉनलाच तुरुंगात टाकले तर?

[क्रमशः]