Sanganyapurte brahmgyaan in Marathi Comedy stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | सांगण्यापुरते ब्रह्मज्ञान

Featured Books
Categories
Share

सांगण्यापुरते ब्रह्मज्ञान


*सांगण्यापुरते ब्रह्मज्ञान !*
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या कार्यालयात बसून महत्त्वाचे टपाल तयार करण्यात मग्न असताना केंद्रप्रमुखांचे आगमन झाले. नमस्काराचे आदानप्रदान होताच केंद्रप्रमुख म्हणाले,
"सर, ते टपाल राहू देत. अगोदर शाळेचा परिसर स्वच्छ करावा लागेल. कार्यालयाची, वर्गखोल्यांची सफाई करून जाळेजळमटे काढून टाकावे लागतील."
"का हो, साहेब? आज कुणी येणार आहे का?" मुख्याध्यापकांंनी विचारले.
"आज नाही, उद्या मंत्रीमहोदय आपल्या शाळेला भेट द्यायला येणार आहेत."
"काय सांगता? चक्क मंत्री शाळेत येणार? अरे, बाप रे! आता हो कसे? हा सारा परिसर स्वच्छ करायचा म्हणजे दोन तीन माणसे लावावे लागतील. मुलांकडून परिसर स्वच्छ करून घ्यायचा नाही असा शिक्षण समितीचा ठराव आहे. शिवाय सत्कार आलाच. ठीक आहे. आलीया भोगासी असावे सादर..." असे म्हणत राडेगुरुजींनी शाळेतील सर्व शिक्षकांना बोलावून घेतले. कामाची विभागणी केली. शिक्षक पटापट कामाला लागले. दोन माणसे लावून सारा परिसरही स्वच्छ करुन घेतला. शाळा सुटेपर्यंत सारी कामे आटोपली...
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख लवकरच शाळेत आले. कुणाचाही सत्कार करायचा नाही असा खुद्द मंत्र्यांचा आदेश असल्यामुळे एक मोठे ओझे उतरले असल्याची भावना मुख्याध्यापकांनी अनुभवली. बरोबर अकरा वाजता मंत्री महोदयांचे आगमन झाले. मंत्र्यांसोबत फार मोठा लवाजमा नव्हता. चार-पाच माणसे घेऊन मंत्री पोहोचले. कारमधून मंत्री उतरताच पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापकांनी त्यांचे स्वागत केले. मंत्री राजकारणात येण्यापूर्वी शिक्षक असल्यामुळे ते कोणत्याही गावात गेले की, शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायचे, एखादा विषयही शिकवायचे. उटपटांग या गावातील शाळेत येताच मंत्र्यांनी विचारले,
"सातवा वर्ग कुठे आहे? खूप दिवस झाले वर्गावर गेलो नाही. थोडा वेळ विद्यार्थ्यांसोबत व्यतीत केला म्हणजे वेगळीच स्फूर्ती मिळेल..." असे म्हणत मंत्री मुख्याध्यापकाच्या पाठोपाठ सातव्या वर्गात गेले.
"एक साथ नमस्ते..." असे एका सुरात विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले.
"नमस्ते। बसा. बसा. कोण आहे तुमचा वर्गप्रतिनिधी?" मंत्र्यांनी विचारताच एक मुलगा उभा राहून म्हणाला,
"सर, मी. माझे नाव उत्तम..."
"व्वा! छान! उत्तम, तुझ्या या सातव्या इयत्तेत किती विद्यार्थी आहेत?"
"सर, एकूण पस्तीस विद्यार्थी आहेत. त्यापैकी आज सत्तावीस विद्यार्थी उपस्थित आहेत."
"सत्तावीस म्हणजे आठ विद्यार्थी गैरहजर आहेत. का?"
"त्याचे काय आहे सर? सहा-सात मुले दुसऱ्या गावातून शाळेत येतात कधी निघायला उशीर होतो. कधी कंटाळा येतो म्हणून अधूनमधून येत नाहीत."
"अस्सं का? त्यांचा अभ्यास बुडत असेल ना? त्यांना माझा निरोप सांगा, म्हणावे शाळा बुडवू नये. रोज शाळेत यायला पाहिजे. बरे, मला सांगा आज उपस्थित असणारांपैकी काल कोण कोण शाळेत आले नव्हते?"
मंत्र्यानी विचारताच सारी मुले आदल्या दिवशी अनुपस्थित असणाऱ्या मुलांकडे पाहू लागली. जी मुले आदल्या दिवशी आली नव्हती ती मान खाली घालून एकमेकांकडे बघत होती. प्रथम कुणीतरी उभे राहावे म्हणजे मग आपल्यालाही उभे राहता येईल या विचारात असताना उत्तम म्हणाला,
"ये उभे राहा ना. एरव्ही तर फार पुढे पुढे करता. महेंद्र, तू काल शाळेत नव्हतास तू उभा रहा. मग बाकीची उभी राहतील." त्याप्रमाणे महेंद्र नावाचा मुलगा राहताच इतर पाच मुलेही पटकन उभी राहिली. त्यात दोन मुलीही होत्या. मुले उभी राहिलेली पाहताच मंत्र्यांमधला शिक्षक जागा झाला. ते शिक्षक होते तेव्हाही त्यांना शाळा बुडवलेल्या मुलांचा राग येत असे.
"का रे, तुम्ही काल शाळेत आले नाहीत म्हणून तुम्हाला तुमच्या वर्गशिक्षिकांनी शिक्षा केली नाही का? आम्ही शाळेत शिकत असताना शाळेत न येणारांना आमचे शिक्षक चांगलाच मार द्यायचे. ते म्हणायचे की, 'छडी लागे छमछम, विद्या येई घमघम...' तसे तुमचे शिक्षक तुम्हाला मारत नाहीत?"
मंत्री महोदयांनी विचारताच उभा राहिलेला एक मुलगा म्हणाला,
"नाही सर, आमचे शिक्षक मारत नाहीत..."
"अरे, तुम्ही शाळेत दररोज यावे म्हणून शिक्षा आवश्यकच आहे..." मंत्री बोलत असताना महेंद्र म्हणाला,
"सर, मला आठवतय, मागल्या वर्षी आपण शिक्षणमंत्री असताना छडीचा वापर करायचा नाही म्हणजे शाळेत 'छडीबंदी' केली आहे. छडीचा वापर करणाऱ्या किंवा विद्यार्थ्यांना मारणाऱ्या शिक्षकांना शिक्षा देण्यात येईल असे तुम्हीच म्हणाला होतात. मी टीव्हीवर ऐकले होते. नंतर आमच्या शिक्षकांनीही छडी वापरणे, मार देणे सोडून दिले आहे. सर, एकदा मी आमच्या सरांना तुम्ही म्हणालात ना, 'छडी लागे छमछम, विद्या येई घमघम' या ओळीचा अर्थ विचारला तर त्यांनी भीतीपोटी तो सांगितला नाही."
"खरे की काय? तुझे नाव महेंद्र. मला एक सांग, तुझे बाबा काय करतात?"
"शेजारच्या गावी असलेल्या रेल्वेस्टेशनवर त्यांची चहाची टपरी आहे."
"असे का? तू शिकून कोण होणार आहेस?"
"होण्यासाठी, करता येण्यासारखे तर खूप आहे सर. मला तर पंतप्रधान व्हावे असे वाटते." महेंद्र बेधडकपणे म्हणाला आणि अवाक झालेल्या मंत्र्यांनी विचारले,
"का रे? पंतप्रधान का? तू खूप हुशार आहेस त्यामुळे तू डॉक्टर, इंजिनिअर, पायलट काहीही होऊ शकतोस.?"
"कसे आहे सर, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी खूप खूप पैसा लागतो. तेवढा पैसा माझ्या वडिलांजवळ नाही. मला एक भाऊ, एक बहीण आहे. त्यांनाही शिकवावे लागेलच की. त्यामुळे मी बाबांबरोबर चहाची टपरी चालवणार आहे. त्यामुळे चहा विकता-विकता माझे आणि बहीण-भावाचे शिक्षणही पूर्ण होऊ शकेल..."
"खरे आहे तुझे. बरे, मला सांगा, शाळेतून तुम्हाला पुस्तके मिळतात. बरोबर?"
"हो सर. पण यावर्षी गणित, मराठी, इंग्रजी ही पुस्तके नाही मिळाली..." एका मुलाने तक्रार केली आणि मंत्र्यांनी मुख्याध्यापकांकडे पाहताच ते चाचरत म्हणाले,
"मिळाली आहेत. वाटायची राहिली आहेत. लगेच वाटतो..."
"ठीक आहे. आपण या विषयावर कार्यालयात बोलू. विद्यार्थ्यांसमोर नको..."
"चालेल सर." मुख्याध्यापक म्हणाले.
"तुम्हाला गणवेश मिळाले का?"
"मिळाले..." सारी मुले एका आवाजात म्हणाली.
"बुट, सॉक्स..."
"दिले. सरांनी दिले."
"दारिद्र्यरेषेखालील मुलींना एक रुपया रोज मिळाला का?"
"सर... सर... मिळाले पण हिला सत्तावीस रुपये तर मला बावीसच रुपये मिळाले सर..."
"ती त्या महिन्यात तुझ्यापेक्षा पाच दिवस जास्त उपस्थित असेल. बरोबर? तुम्ही मुलींनी दररोज शाळेत उपस्थित राहावे म्हणून तर सरकार पैसे देतेय ना?" मंत्र्यांनी विचारले. तशी ती मुलगी खाली बसत असताना महेंद्र उभा राहून म्हणाला,
"सर, आम्ही पण दररोज उपस्थित असतो. शाळा उघडल्यापासून माझी बहिण एकही दिवस अनुपस्थित नाही मग तिला का पैसे मिळत नाहीत? सर, मी टीव्हीवर बातम्या ऐकतो, वर्तमानपत्र वाचतो त्यामुळे मला आपल्या पंतप्रधानांचे एक घोषवाक्य माहिती आहे..."
"कोणते?" मंत्र्यांनी चाचरत विचारले.
"तेच... 'सब का साथ, सब का विकास..' सर, अशी घोषणा देताना जर सरकार आमच्यावर अन्याय करत असेल आमची साथ देणार नसेल तर आमचा विकास होईलच कसा?..." महेंद्र मंत्र्यांना विचारत असताना विद्यार्थ्यांनी मात्र टाळ्या वाजवून त्याला 'साथ' दिली. निरुत्तर झालेल्या मंत्र्यांनी पुढे विचारले,
"शिक्षक, मुख्याध्यापक कुणाकडून फिस घेतात काय?"
"परीक्षा फिस घेतात. पण कोणाकडून कमी तर कोणाकडून जास्त..."
"बरे. बरे. ठीक आहे. आता सांगा तुम्हाला दररोज शालेय पोषण आहार मिळतो का?"
"म्हणजे खिचडीच ना? मिळते सर. खूप खमंग असते. मी तर डबल घेतो. खूप आवडते."
"आणि की नाही आठवड्यातून एकदा आम्हाला चांगले तूप पण मिळते."
"काय सांगतोस?..." असे आश्चर्याने विचारत मंत्र्यानी मुख्याध्यापकाकडे पाहत विचारले,
"हे कसे काय?"
"सर, आम्ही गावातून काही दाते मिळवले आहेत म्हणजे शिक्षण समितीचा तसा ठराव आहे. आठवड्यातून हे एक दिवस दाते तूप आणून देतात. त्यामुळेच..."
"अच्छा! अच्छा! खूप छान. तुमचे अभिनंदन..." असे म्हणत मंत्र्यांनी आदल्या दिवशी अनुपस्थित असल्यामुळे उभ्या राहिलेल्या मुलांकडे बघत विचारले,
"मुलांनो, तुम्हाला गणवेश, पुस्तके, सॉक्स, बुट, लेखन साहित्य, पैसे मिळतात. शाळेत एवढी छान खिचडी मिळते, शिवाय इतर गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना तूप मिळत नाही तेही तुम्हाला मिळते तरीही तुम्ही शाळेत का येत नाहीत? महेंद्र, तुही काल नव्हतास. मग महत्त्वाचा अभ्यासही बुडाला असेल ना? मग शाळेत यायला हवे का नको?"
"बरोबर आहे. पण सर, हा उपस्थितीचा नियम सर्वांनाच लागू असावा ना? तुमच्या छडीबंदीमुळे मार बसत नसेल पण आमचे शिक्षक, येणारे साहेब तुम्ही आत्ता जे सवलतीचे बोललात ना ते ऐकून ऐकून लाज वाटते हो. भीक नको कुत्रा आवर याप्रमाणे आमची 'फुकट नको, बोलणे आवरा' अशी अवस्था झाली आहे हो..."
"नियम तर सर्वांनाच आहेत..." मंत्री बोलत असताना महेंद्र ताडकन म्हणाला,
"कुठे सर? आता तुमचेच उदाहरण घेऊया. तुमच म्हणजे कसे आहे ना, 'लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण...." महेंद्रने बोलायला सुरुवात करताच मुख्याध्यापक पुढे होऊन त्याला बोलू नकोस असा इशारा करत असताना मंत्री त्यांना थांबवत म्हणाले,
"थांबा. थांबा. बोलू द्या. त्याचा आवाज दाबू नका. सारे जण आमच्या पुढे पुढे करतात. असे कुणी बोलत नाही. बोल महेंद्र, बोल. आमचे काय?"
"सर, तुम्हालाही पगार मिळतो. बरेचसे भत्ते मिळतात. अगदी कपडे धुवायचाही भत्ता मिळतो. टेलिफोनसाठी भत्ता, विमानप्रवास फुकटात असतो तरीही तुमची शाळा सुरू असताना..."
"आमची शाळा? अच्छा! तुला अधिवेशन म्हणायचे आहे का? पण तू आमची चांगली शाळा मात्र घेत आहेस? बोल. आमच्या शाळेचे... अधिवेशनाचे काय?"
"सर, तुमचे अधिवेशन सुरू असताना सगळे लोक हजर असतात का हो? सगळ्या खुर्च्या रिकाम्या दिसतात. कुणीतरी एक जण बोलताना दिसतो. त्याचे ऐकायलाही कुणी नसते. मतदान घ्यायचे असेल तर घंटी वाजवून बोलवावे लागते म्हणे. महत्त्वाच्या वेळी तर काय तो व्हीप काढावा लागतो म्हणे. आता तर तुमच्या हेडमास्तरांनी म्हणजे पंतप्रधानांनी दररोजची हजेरी बोलवायचे ठरवले आहे. तुमच्या शाळेत कुणी बोलत असेल तर सारे केवढ्यांदा ओरडतात. त्यावेळी तुमच्या शिक्षकांना..."
"आमचे शिक्षक?" काही समजले नाही अशा अवस्थेत मंत्र्यांनी मुख्याध्यापकाकडे पाहिले तेव्हा ते म्हणाले,
"साहेब, कदाचित त्याला अध्यक्ष किंवा सभापती असे म्हणायचे असेल..."
"होय, सर. त्यांना शंभरवेळा तरी , 'चूप बसा. शांतता ठेवा..' असे सारखे ओरडावे लागते. एखादा कुणी किती तरी वेळ बोलतच राहतो त्यावेळी तुमचे शिक्षकसारखे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ते गृहस्थ ऐकतच नाहीत. बोलतच राहतात..."
"अरे वा, तुला तर भरपूर माहिती आहे."
"सर, मी आधीच सांगितले होते, मला टीव्हीवरच्या बातम्या ऐकायला, वर्तमानपत्र वाचायला आवडते. त्यामुळे..."
"खूप छान..."
"सर, तेवढ्या मोठ्या शाळेत असे असेल, तुमच्यासारखे हुशार विद्यार्थी डुम्मा मारत असतील, तिथल्या शिक्षकांचे ऐकत नसतील तर आम्ही तर खूप लहान आहोत. असे होणारच ना..."
"बरोबर आहे. चला. हेडमास्तर, चला. बहुतेक तुम्ही एक विद्यार्थी नाही तर एक राजकारणी कदाचित उद्याचा पंतप्रधान घडवत आहात..." असे म्हणत मंत्री वर्गाबाहेर पडले आणि थेट कारमध्ये जाऊन बसले.
नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका, फेज ०१,
क्रांतिवीरनगर, लेन०२,
हॉटेल जय मल्हारच्या जवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१