Ashihi pravesh pariksha in Marathi Comedy stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | अशीही प्रवेश परीक्षा

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

अशीही प्रवेश परीक्षा


°° अशीही प्रवेश परीक्षा! °°
सुकन्यापुरी नावाचे एक छोटेसे गाव! परंतु या गावाची कीर्ती तशी देशभर पसरली होती. त्याला कारणही तसेच होते. मागील पंचवीस वर्षांपासून सुकन्यापुरीची ग्रामपंचायत निवडणूक कोणताही वाद, तंटा, भांडण न होता बिनविरोध होत होती. या गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पंचवीस वर्षांपासून या गावावर महिलाराज होते अर्थातच ग्राम पंचायत सदस्य म्हणून नऊ महिलांची बिनविरोध निवड होत असे. या नवनिर्वाचित महिला त्यापैकी सरपंच, उपसरपंच यांची निवड करीत असत. या पंचवीस वर्षात गावाची न भूतो न भविष्यती अशी प्रगती झाली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरपंच, उपसरपंच किंवा महिला सदस्य यांच्या कारभारात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, राजकारणी किंवा सदस्यांचे पती कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करीत नसत. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत कारभार पाहात असलेल्या महिलांना पुन्हा संधी मिळत नसे. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन मंडळ बिनविरोध निवडून येत असे. आणखी एक महत्त्वपूर्ण बाब अशी की, दरवेळी निवडण्यात येणाऱ्या नऊ महिला ह्या किमान दहावी उत्तीर्ण असायच्या. सुकन्यापुरीचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे या गावात मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त होती. यावरून ही पुरी किती आधुनिक विचारसरणीची, सकारात्मक वृत्तीची होती हे लक्षात येईल. एकूणएक सरकारी योजनांचा लाभ सुकन्यापुरीला मिळत होता. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या सर्वच्या सर्व योजना कार्यान्वित होत असताना जिल्ह्यातील आणि तालुक्यातील इतर योजनाही गावात राबवल्या जात होत्या. सुकन्यापुरी हे नाव पूर्वापार नव्हते. पहिल्या वर्षी बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांनी गावाचे नाव सुकन्यापुरी ठेवायचे असा निर्णय घेतला होता. सुकन्यापुरी या गावात दहावीपर्यंत शाळा होती. मागील वीसवर्षांपासून या शाळेवर फक्त आणि फक्त महिला शिक्षिका ज्ञानार्जनाचे काम करीत होत्या. ग्रामसेवक, तलाठी यासोबतच सरकारी रुग्णालयातही महिला कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती होत असे. बदली होऊन गेलेल्या स्त्री कर्मचाऱ्यांच्या जागेवर दुसरी स्त्रीच येत असे. त्याचबरोबर महिला मंत्रिमंडळाच्या सुनियोजित धोरणामुळे या गावाच्या काही विशेष योजना होत्या. दरवर्षी सामुहिक विवाह सोहळा हा या गावात गेली वीस वर्षांपासून चालू होता. गावात याकाळात एकही विवाह हा वैयक्तिक पातळीवर झाला नाही. एखादे वर्षी एकाच मुलीचा विवाह असला तरीही सुकन्यापुरीचे गावकरी सामुहिक विवाह असल्याप्रमाणे त्याच उत्साहात तो सोहळा पार पाडत असत. मागील दहा वर्षांपासून सुकन्यापुरीने फार मोठा निर्णय घेतला. त्यानुसार गावात होणाऱ्या सामुहिक विवाह समारंभात पंचक्रोशीती असलेल्या गावात अत्यंत गरीब असलेल्या कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह लावल्या जात होते.....
सामुदायिक विवाहसोहळ्यासाठी एक विशेष मंडळ कार्यान्वित होते. त्या मंडळाची बैठक त्यादिवशी सुरू झाली असताना त्या विवाह मंडळाच्या सचिवांनी सांगितले,
"यावर्षी होऊ घातलेल्या सामुदायिक सोहळ्यासाठी गावातील आणि परिसरातील एक्कावनमुलींची नोंद झाली आहे....."
"यात गावाबाहेरील किती मुलींच्या नोंदी आहेत?" अध्यक्षांनी विचारले.
"अकरा मुली आहेत."
"बऱ्याच आहेत की. आपण आजपर्यंत यांच्या गावातील लोकांकडून एक पैसाही निधी घेतला नाही. यावेळी त्या-त्या गावातील लोकांनी त्यांच्या वधूसाठी आपण देतो ती संसारोपयोगी भांडी त्यांनी भेट द्याव्यात असे कळवायचे का?"
"बरोबर आहे तुमचे. पण यामुळे आपण जे करतोय ते आपले राहणार नाही. ते तिकडे स्वतःचाच उदोउदो करून घेतील किंवा मग आपण पैसे घेऊन विवाह सोहळा पार पाडतोय अशी चर्चा सुरू करतील आणि मग उगाच आपल्या निस्वार्थ योजनेला गालबोट लागेल."
"अगदी बरोबर आहे. मी काय म्हणतो, खर्च वाढतो आहे तर मग आपण एक योजना आखली तर?"
"कोणती योजना? आर्थिक भार थोडा कमी होत असेल तर आपण नक्कीच राबवू या."
"यावर्षीच्या विवाह सोहळ्यात 'वर' म्हणून येणाऱ्या नवरदेवाकडून थोडीशी...."
"नको. नको. पुन्हा आपल्या सकारात्मकतेला कलंक लावण्याचा प्रयत्न होईल....."
"मला काय वाटते मुलांसाठी एक 'वर प्रवेश परीक्षा' ठेवली तर?"
"मी नाही समजलो."
"कसे आहे, आजकाल कोणत्याही क्षेत्रात विशेषतः शिक्षण क्षेत्रात अगदी बालवाडीपासून ते उच्च शिक्षणासाठी किंवा नंतर नोकरी मिळवण्यासाठी इंट्रस....म्हणजे प्रवेश परीक्षा घेतात. या परीक्षेत पास झाला तरच पुढचा दरवाजा उघडतो. महत्त्वाचे म्हणजे आज मुलींच्या मतांना, त्यांच्या पसंतीला फार महत्त्व आहे. आपल्याही गावातील अनेक मुलींनी त्यांना आलेली स्थळे नाकारली आहेत. मुलींच्या मुलाबाबत ज्या अपेक्षा आहेत अशीच मुले या परीक्षेतून पुढे येतील आणि मुलींच्या आकांक्षानुरुप जोडीदार मिळू शकेल...."
"म्हणजे पूर्वी जसे स्वयंवर रचल्या जात तसेच म्हणा की...."
"बरोबर आहे. हे स्वयंवर एकाच उपवर मुलीसाठी असत. आपली सुकन्यापुरी ही नाविन्याचा ध्यास घेतलेली आहे. यातून एका मुलीसमोर अनेक पर्याय येऊ शकतील तिला तिच्या मतानुसार जन्माचा साथीदार निवडता येईल...."
"पण यामुळे मुलांवर अन्याय होतोय, त्यांना त्यांच्या पसंतीनुसार बायको निवडण्याच्या अधिकारावर गदा येईल अशी भावना निर्माण होईल त्याचे काय?"
"सध्या तरी अनेक ठिकाणी मुले अगतिक होऊन मिळेल ती मुलगी ....त्याहीपुढे जाऊन सांगायचे तर ज्या मुलीने पसंत केले त्या मुलीच्या गळ्यात वरमाला घालून मोकळे होतात. माझे लग्न झाले, मला बायको मिळाली यात समाधान मानत आहेत...."
"खरे आहे. असा प्रयोग करायला हरकत नाही. पण या परीक्षांचे नियोजन कसे करायचे?"
"आपल्या गावात पंचवीस शिक्षिका आहेत. त्यांच्यावर सोपवू हे काम."
"ठीक आहे. शिक्षिकांची एक बैठक घ्या. नियोजन करा....." अध्यक्षांनी सचिवांना सांगितले......
साधारण पंधरा दिवसात जिल्ह्यातील वर्तमानपत्रात, समाज माध्यमाच्या वेगवेगळ्या गटातून एक निवेदन प्रसारित झाले. ते असे........
'सुकन्यापुरी ह्या गावात दरवर्षी सामुहिक सोहळ्याचे भव्य आयोजन केले जाते. केवळ सुकन्यापरीच्याच कन्यांचा नाही तर परिसरातील अनेक गावातील मुलींचा विवाह या सोहळ्यात केला जातो. यावर्षी आम्ही यापूर्वी कधी झाला नसेल असा प्रयोग करत आहोत. यावर्षीही आम्ही सामुहिक लग्न सोहळ्याचे आयोजन केले आहे. परंतु परंपरागत पद्धतीने न जाता यावर्षी आम्ही एक नाविन्यपूर्ण योजना जाहीर करत आहोत. त्याचे नाव आहे, 'वर प्रवेश परीक्षा!' होय! प्रवेश परीक्षा! ज्या विवाहयोग्य तरुणांना या विवाहसोहळ्यासाठी नावनोंदणी करावयाची आहे त्या विवाहोच्छुक तरुणांना प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत उत्तीर्ण होणारांना आमच्या गावातील सुशील, सुंदर, सुशिक्षित, आधुनिक विचारसरणी असलेल्या, महत्त्वाकांक्षी तरुणीशी लग्न करता येईल. यासाठी आमच्या 'www.var entrance examination.com' ही वेब साइट उघडताच पूर्व प्रवेश परीक्षेची नियमावली मिळेल. ही नियमावली ज्यांना पसंत असेल त्यांनी याच साइटवर असलेले वर प्रवेश परीक्षेचे आवेदन पत्र भरून त्याच साइटवर भरुन द्यावे. सोबत दिलेल्या खाते क्रमांकावर परीक्षा शुल्क म्हणून तीन हजार रुपये भरावेत. नंतर आपणास ऑनलाइन प्रवेशपत्र आणि परीक्षेचा दिनांक, वेळ प्राप्त होईल. परीक्षा सुकन्यापुरी येथील शाळेत व अन्य परीक्षा केंद्रावर होईल. पर्यवेक्षक म्हणून उपवर मुली काम पाहतील. एक विचार असाही होता की, या परीक्षेची प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठवून सोडवून घ्यावी. परंतु त्यात उमेदवारांना विचार करायला, कुणाची मदत घ्यायला संधी मिळते. कॉपी करून मेरीट मिळवणारे नवरदेव आम्हाला नको होते. प्रत्यक्ष परीक्षेचे चित्रिकरण करणार असल्यामुळे, समोर परीक्षा घेतल्यामुळे परीक्षार्थींचा आत्मविश्वास, सकारात्मकता, बॉडी लाँगवेज, भाषेवरील प्रभुत्व इत्यादी गोष्टी तपासून पाहता येतील. परीक्षार्थ्यांचे हस्ताक्षर आणि त्याची शास्त्रीय पद्धतीने तपासणी करून परीक्षार्थ्यांचा स्वभाव, वागणूक इत्यादी गुणांची पडताळणी होईल. सर्व उत्तर पत्रिकांची उच्च शिक्षित व्यक्तींकडून तपासणी होईल. त्यानंतर गुणानुक्रमे आणि विवाहयोग्य सुकन्यापुरीतील मुलींची संख्या आणि उपलब्धता लक्षात घेऊन उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.'
'वर प्रवेश परीक्षा' या योजनेची साइट सुरु होताच लाखो तरुणांनी पूर्व प्रवेश परीक्षेची नियमावली संग्रहित करुन घेतली. नियमावली म्हणण्यापेक्षा ती अपेक्षांची यादी होती असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. त्यातील मुख्य अपेक्षा पुढीलप्रमाणे :-
१) मुलगा नोकरी करणारा असावा. शासकीय नोकरीत असलेल्या मुलास प्राधान्य.
२) मुलगा कॉर्पोरेट क्षेत्रात असेल आणि त्याचे वार्षिक उत्पन्न पन्नास लाख रुपये असेल तर अग्रक्रमाने प्राधान्य. मुलाचे स्वतःचे घर असावे.
३) म्हाताऱ्या आणि कमावते नसणाऱ्या आईवडीलांना मुलांसोबत राहता येणार नाही.
४) मुलाचे आईवडील कमावते असले तरीही त्यांना सूनेच्या संसारात ढवळाढवळ करता येणार नाही. उठसूठ कोणताही सल्ला देता येणार नाही. त्यांनी वेगळा संसार मांडला तर त्यांचा भव्य सत्कार केला जाईल.
५) मुलाला मुलीला भारतात सोडून शिक्षण,नोकरीसाठी परदेशात एकट्याला जाता येणार नाही जायचे आवश्यक असेल तर पत्नीला सोबत घेऊन जावे लागेल.
६) घरात बायकोचा शब्द अंतिम असेल.
७) बाळाला केव्हा जन्म द्यायचा हा निर्णय संपूर्णपणे मुलीचा असेल.
८) मुलाने घरकामात मुलीपेक्षा जास्त प्रमाणात सहभागी व्हावे लागेल.
अवघ्या अर्ध्या तासात हजारो मुलांनी प्रवेश प्रवेश परीक्षांचे आवेदन पत्र भरून पाठवले आणि ताबडतोब दिलेल्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये शुल्कही ऑनलाइन भरले. लाखो रुपये खात्यात जमा झाले.उमेदवारांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुकन्यापुरीचे या आगळ्यावेगळ्या योजनेचे आयोजक अत्यंत आनंदी होत होते. परीक्षार्थ्यांची संख्या पाहून परीक्षा दोन टप्प्यात ठेवण्यात आली.
परीक्षेच्या दिवशी सुकन्यापुरी गावाला जणू महायात्रेचे स्वरूप आले. परीक्षार्थ्यांची प्रचंड गर्दी झाली. परंतु आयोजकांनी व्यवस्थित आयोजन, व्यवस्था केली होती. कुठेही गडबड, गोंधळ न होता जिल्हा परिषद शाळा, गावातील मंदिरे, दवाखाने, गावात असलेल्या दोन बँकांच्या इमारती, समाजमंदिर अशा ठिकाणी परीक्षा सुरू झाली. परीक्षा केंद्रावर चित्रिकरण आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांची व्यवस्था करण्यात आली. उपवर मुली,नवविवाहित स्त्रिया, शिक्षिका, इतर स्त्री कर्मचारी पर्यवेक्षण करीत होत्या. एका तासात शंभर प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात द्यायची होती. काही प्रश्न असे होते.........
१) मी घरी नसताना तू काय करशील?
२) मी दररोज तुझा भ्रमणध्वनी तपासून पाहील तुझी प्रतिक्रिया काय असेल?
३) मी तुला एखाद्या मुलीसोबत पाहिले तर तू काय प्रतिक्रिया देशील?
४) आपण दोघे सायंकाळी एकत्र असताना तुझ्या मित्राचा फोन आल्यास तू काय करशील?
५) तू मला आठवड्यातून किती वेळा पंचतारांकित हॉटेलमध्ये नेशील?
६) आपण फिरायला एखाद्या निवांत स्थळी गेलो आणि एका उंच ठिकाणी गेलो आणि मी तुला उडी मार म्हटले तर तू काय करशील?
७) तुझे इतरत्र काही लफडे आहे असा मला संशय आला तर तू काय स्पष्टीकरण देशील?
८) मी फोन केल्याबरोबर तू किती सेकंदात घरी येशील?
९) मी एखादा संदेश पाठवला तर तू किती वेळात त्याचे उत्तर देशील?
१०) मी माझ्या एखाद्या मित्रासोबत फिरायला गेले तर तू कसा प्रतिसाद देशील?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लिहिताना मुले गुंग होती. पर्यवेक्षिका प्रत्येकाचे बारकाईने निरीक्षण करीत होत्या. काही मुले विचारमग्न होती. काही मुलांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह होते. काही मुलांचे चेहरे घामाने डबडबले होते. काही मुले इकडेतिकडे पाहात होती. काही परीक्षार्थी वारंवार पाणी पित होते. काही मुलांच्या चेहऱ्यावर निराशा झळकत होती. काही मुले मात्र कुठेही न पाहता आपली प्रश्नपत्रिका सोडविण्यात दंग होती. वेळ झाली. पर्यवेक्षिकांनी उत्तरपत्रिका जमा केल्या. बहुतांशी मुले उदास चेहऱ्यांनी बाहेर आले.
अनेक मुले एकाच गावातील होती. परीक्षा संपताच ती एकमेकांना भेटली. प्रत्येकाने एकमेकांना एकच प्रश्न विचारला, "का रे, कसा गेला पेपर?"
"काही विचारु नकोस. ती प्रश्नपत्रिका होती की, आगामी काळात म्हणजे सुकन्यापुरीतील सुकन्येशी लग्न ठरलेच तर संकटाची आगावू सुचनावली होती की काय असेच वाटते होते."
"अगदी बरोबर आहे. माझीही तीच परिस्थिती आहे."
तितक्यात तिसरा मुलगा म्हणाला, "अरे, हे तर काहीच नाही. अशी प्रवेश परीक्षा काही प्रथम सुकन्यापुरीतच झाली असे नाही..."
"म्हणजे यापूर्वीही अशा प्रवेश परीक्षा झाल्या आहेत का? तू दिल्या आहेस का?"
"मी नाही दिल्या पण जमाना गुगल का है यारों..."
"म्हणजे? जरा स्पष्ट सांगशील का?"
"अरे, ही विवाहपूर्व परीक्षा जाहीर झाली आणि मी गुगल खंगाळलं ...."
"अच्छा! अच्छा! म्हणजे तुला पुराणात रचलेल्या 'स्वयंवर' ची माहिती मिळाली म्हण की?"
"अरे, नाही. ऐकून तर घे. आपल्या याच काळात....आपल्याच देशात अशी उदाहरणे सापडतील..."
"तुला माहिती आहेत?"
"होय. एक कुटुंब जितके श्रीमंत होते तेवढेच ते धार्मिक होते. त्या मुलीने अशी अट घातली की, जो कुणी विवाहोच्छुक मुलगा अख्खी गीता तोंडपाठ म्हणून दाखवेल त्या मुलाच्या गळ्यात ती वरमाला घालील आणि त्या वरास 'गीतासम्राट' ही पदवी देईल."
"मग आला का एखादा परीक्षार्थी?"
"एखादा? चक्क एकशे एक परीक्षार्थी आले."
"काय सांगतोस काय? बरे, यापैकी किती जणांनी अट पूर्ण केली."
"दोन मुले शेवटपर्यंत टिकली म्हणजे दोघांनी गीता पूर्ण म्हणून दाखवली."
"मग? कुणाची निवड केली आणि ज्याला डावलले ते का?"
"त्या दोघांनी गीता संपूर्ण मुखोद्गत म्हटली असली तरीही एका मुलाचे आरोह अवरोह, उच्चार, आवाजातील चढ उतार इत्यादी बाबी उत्कृष्ट होत्या म्हणून त्याची निवड करण्यात आली."
"कोण होता तो मुलगा?"
"ऐकून आश्चर्य वाटेल, तो मुलगा चक्क परदेशी होता."
"काय? परदेशी? कसे शक्य आहे?"
"मलाही असेच वाटले होते,पण मी ती कॅसेट शोधून ऐकली आणि मला शॉक बसला यार."
"मीही ऐकलय की, परदेशात गीतापठण जोरात सुरू आहे. बरे, दुसरी कुठली परीक्षा सापडली?"
"अरे, एक परीक्षा तर चक्क बिरबलाच्या कथेप्रमाणे होती. झाले काय तर ते हिवाळ्याचे दिवस होते. एका मुलीने अशी अट ठेवली की, जो कुणी गावाच्या बाहेर असलेल्या तळ्यात रात्रभर उभा राहील त्याला मी वरमाला घालीन...."
"बाप रे! कडाक्याची थंडी असताना थंडगार पाण्यात उभे राहणे म्हणजे? आले का कुणी?"
"दुल्हा क्या न करता? पंचवीस मुले आली होती. चार-पाच मुलं कपडे काढताना हुडहुडी भरली म्हणून पळाली, तिघांची हिंमत पाण्यात पाय टाकताच खचली, सहा जण पाणी कमरेच्या वर गेले की, थंडीने कुडकुडत बाहेर पडले. त्यातल्या दोघांना लगेच दवाखान्यात न्यावे लागले. एकाला म्हणे निमोनिया झाला. पाच जणांनी मध्यरात्र होताच पळ काढला. सकाळचा सूर्योदय होईपर्यंत एक जण मुठीत जीव धरून उभा राहिला...."
"बिरबलाच्या कथेप्रमाणे तो समोरच्या स्मशानभूमीत असलेल्या लाइटकडे पाहात असेल म्हणून त्याला त्या बयेने नाकारले असेल...."
"नाही. तसे नाही झाले. जेव्हा त्या तरुणाला उजाडलेले दिसले आणि त्याला बाहेर यायला सांगितले तेव्हा आपण परीक्षा उत्तीर्ण झालो असून ती सौंदर्यवती आपणास पती म्हणून स्वीकारणार या आनंदात तो खाली कोसळला....कायमचा!"
"अरे, मग मुलगा मेला म्हणून कुणी त्या पोट्टीवर खटला दाखल केला नाही का?"
"कसा करणार? करारपत्रकावर स्वतः मुलगा आणि त्याच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या सह्या होत्या."
"गेला बिचारा फुकट जीवानीशी! अरे, आजकालच्या मुलींना कसे पटवावे हेच कळत नाही. काय काय अटी झाल्यात मुलींच्या? बाप रे बाप!"
"हो ना. दुसरीकडे मुलांच्या अटी काय तर मुलीचे घायाळ करणारे स्माइल आणि फार तर मुलीला मॅगी बनवता आली तरी पुष्कळ झाले."
"अगदी बरोबर आहे. आता मुलांच्या अपेक्षा आहेतच कुठे? जी कुणी पसंत करेल तिच्यासोबत जीवन कंठायचे..."
"अरे, हे तर काहीच नाही. एका मुलीने ते जादूगार जसे धगधगत्या निखाऱ्यावर चालतात ना तसे ..."
"बाप्पो! जळत्या निखाऱ्यावरुन चालायचे. खड्ड्यात गेली ती पोट्टी आणि ती परीक्षा. मी तर अशी परीक्षा देण्यापेक्षा आजीवन ब्रम्हचारी राहणे पसंत करेन बाबा."
"अबे ऐक तर. निखाऱ्यावरुन एकट्याने सफर करायची नाही तर त्या पोरीला उचलून या काठाहून त्या काठावर न्यायचे...."
"च्यामारी! असे असेल ती पोरगी मिठीत असेल तर मी एका पायावर धावत जाईन...."
"ती परीक्षा आणि ती पोरगी तुलाच लखलाभ! मी काय करेन माहिती आहे का, त्या सौंदर्यवतीला उचलून घेईन त्या पेटलेल्या निखाऱ्याजवळ जाईन. पहिले पाऊल टाकतोय असे दाखवीन आणि त्या काट्टीला चक्क त्या निखाऱ्याच्या मधोमध फेकून पळ काढेन."
"नको रे बाबा.असे भलतेच साहस करु. ती काय तुला सोडणार आहे. पोरींचे चिकटणे म्हणजे घोरपडीप्रमाणे! तू फेकताना ती तुलाही घेऊन पडेल. आणि त्यात ती यशस्वी झाली नाही तर मग तिचा बाप, भाऊ, गावातील लोक आहेतच की, तुझ्या मुसक्या आवळून निखाऱ्यावर फेकायला."
"एक शेवटचे स्वयंवर बघा. एका मुलीने असे स्वयंवर रचले होते की, जो कुणी मुलगा इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारेल त्याच्याशी मी लग्न करेन...."
"अरे, सहाव्या मजल्यावरुन उडी मारल्यावर तो वाचला तर लग्न करेन ना?"
"आणि समजा वाचला तरीही हातपाय शाबूत राहिले पाहिजेत ना?"
"अरे, तुम्ही चर्चा करीतच बसा. अशी स्पर्धा एका तरुणाने जिंकली आहे."
"काय सांगतोस? सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन तो वाचला? त्याचे हातपाय शाबूत राहिले?"
"होय. तो जिवंत आहे, धडधाकट आहे."
"कसे शक्य आहे हे?"
"काय झाले? स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी एक करारपत्र झाले होते. जीवीत्वाची जबाबदारी ज्याची त्याच्यावर होती. पण त्या युवकाने करारपत्रात नसलेल्या एका बाबीचा फायदा घेतला. त्याने ज्यावेळी सहाव्या मजल्यावरुन उडी मारली तेव्हा त्याच्या अनेक मित्रांनी खाली जमिनीवर एक मोठी, मजबूत जाळी धरली होती त्यामुळे तो सहीसलामत राहिला पण नंतर एक लोचा झाला..."
"तो कोणता? मुका मार लागला असेल..."
"नाही. तसे काही नाही पण त्या मुलीने दोन आक्षेप घेतले. एक म्हणजे त्या मुलाच्या मित्रांनी जाळी धरली आणि दुसरे म्हणजे तो मुलगा अत्यंत काळाकुळीत होता. म्हणून तिने नकार दिला."
"मुलींच्या नादी लागले की असे होणारच. पुढे?"
"त्या मुलाने चक्क न्यायालयात धाव घेतली. त्याच्या वकिलाने स्पष्ट केले की, करारपत्रात जाळी धरु नये अशी अट नव्हती. आणि मुलाची उंची, रंग, शरीरयष्टी याबाबत कोणत्याही अपेक्षा व्यक्त केलेल्या नव्हत्या...."
"कोर्टाने काय निर्णय दिला रे?"
"मुलाच्या बाजूने! त्या मुलीला त्या मुलासोबत लग्न करावे लागले."
"शाब्बास! बरी जिरवली."
" अरे ऐका ना. समजा कुणी तुला मुलगी कशी पाहिजे असे विचारले तर? काय सांगशील?"
"अरे, बाबा कशाला दफन केलेल्या भावनांना...."
"मी सांगू का, मला अशी मुलगी आवडेल जी मेहनती असेल, जिचे वागणे, राहणे अत्यंत साधे असेल, जी घर स्वच्छ, साफ ठेवेल, ती आज्ञाधारक असेल....."
"तुला घरवाली पाहिजे की, कामवाली पाहिजे...."
"अरे, बाप रे! बोलताबोलता खूप वेळ झाला की......"
"अरे, माझा रिझल्टही आला की..."
"आता अजून कोणती परीक्षा दिली होती?"
"अरे, आपण आत्ता दिलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल आलाय.....फेल झालो यार !"
ते ऐकून सर्वांनी आपापले ईमेल तपासले. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांचा निकाल स्पष्टपणे सांगत होते. आसपासच्या जवळपास सर्वच युवकांची तीच परीक्षा होती. तितक्यात एका गावातील एक तरुण नाचत, ओरडत त्यांच्याकडे येत, दुरुनच आनंदातिशयाने ओरडला,
"अबे, बन गया, मेरा काम हो गया। अरे, बघताय काय मी या परीक्षेत उत्तीर्ण झालो. मेरी शादी होनेवाली है। बजाओ रे बजाओ। ढिंगच्याक ढिंग. चलो. आज माझ्याकडून गावातील मित्रांना पार्टी.." तो सांगत असताना त्याच्या गावातील मित्र आणि इतर परीक्षार्थीही त्याच्याकडे विस्मयाने, तर काही जण असूयेने पाहात होते. इतर काही मुलेही उत्तीर्ण झाली होती परंतु उत्तीर्णांची संख्या तशी कमीच होती. अनेक मुलांना प्रतिक्षायादीत ठेवले होते. सुकन्यापुरीतील काही मुलींना प्रतिक्षायादीतील मुलाशी लग्न करायची इच्छा झाली तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार होते......
दुसऱ्या दिवशी वर प्रवेश परीक्षा मंडळ, सुकन्यापुरीची आणि ग्राम पंचायत समितीची बैठक सुरू झाली. मंडळाच्या सचिवपदी असलेल्या, अविवाहित मुलीने सारा हिशोब मांडला. विशेष म्हणजे प्रवेशपरीक्षेच्या शुल्कापोटी मंडळाच्या खात्यात दोन कोटी रुपये जमा झाले होते. खर्च मात्र काही हजार रुपये झाला होता. फार मोठी रक्कम हाती लागली होती. त्यामुळे प्रचंड उत्साही झालेल्या सुकन्यापुरीकरांनी त्यावर्षी होणारा सामुहिक विवाह सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय घेतला. गावातील उपवर मुलींकडे उत्तीर्ण आणि विवाहयोग्य मुलांची यादी पाठवण्यात आली. सर्व मुलींनी आपापला वर निवडला. तरीही जे परीक्षेत उत्तीर्ण झाले होते परंतु मुलींच्या पसंतीस उतरले नव्हते अशा मुलांची माहिती शेजारच्या गावात देण्यात आली. त्या गावातील मुलींनी एकाही मुलाला पसंती दिली नाही. त्यांचे उत्तर मोठे मनोरंजक होते. ते असे,
'सुकन्यापुरीतील नाकारलेला माल पसंत करायला आम्ही वेड्या नाही आहोत. हा प्रकार म्हणजे दुकानदाराने विक्री होऊन होऊन शेवटी राहिलेला कंडम माल सेल लावून अर्ध्या किंमतीत खपवण्यासारखे आहे. सुकन्यापुरीकरांनी आमचा घोर अपमान केला आहे. आम्ही त्याचा निषेध करीत आहोत. वेळ पडल्यास सुकन्यापुरीच्या सुकन्यांनी पसंत केलेल्या पोट्ट्यांनाच उचलून आणून त्यांच्याशी आम्ही विवाह करु....' ती धमकी सुकन्यापुरीच्या लोकांनी हसण्यावर नेली....
हळूहळू सामुहिक विवाह सोहळ्याची तयारी सुरू झाली. त्यावर्षी गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. ज्याला त्याला विभागून दिलेले काम जो तो अत्यंत चोखपणे आणि इमानेइतबारे पार पडत होता. कुठेही काहीही अडचण आलीच तर सारे एकत्र बसून तोडगा काढत होते. लग्नाचा दिवस जवळ आला. तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली. लग्नाच्या दिवशी नवरदेवांची वऱ्हाडी मंडळी दाखल झाली. सुकन्यापुरीकरांनी सर्व नवरदेव आणि वरांचे पाहुणे, मित्रमंडळ यांचे जोरदार स्वागत केले. लग्नघटिका जवळ आली. नवरदेव मंडपात विराजमान झाले आणि एक गोष्ट लक्षात आली की, वरांच्या अपेक्षित संख्येपेक्षा चार वर कमी आले आहेत. धावपळ सुरू झाली. शोधाशोध सुरु झाली आणि एक धक्कादायक बाब पुढे आली की, सुकन्यापुरीतील वेगवेगळ्या आठ वधूंनी चार वरांना पसंती दिली होती म्हणजे एक वर दोघींनी निवडला होता. त्यामुळे जिथे आठ नवरदेव येणे गृहीत धरले होते तिथे चारच वर आले होते. वधूंनी वरांची निवड केली. त्यांना रीतसर निरोप गेले. त्या चौघांच्या लक्षात ही बाब आली होती पण त्यांनी त्याबाबत यासाठी विचारणा केली नाही की, काही तरी वेगळे नियोजन असेल ऐनवेळी कुणीतरी एक वधू आपल्या गळ्यात वरमाला घालेल शिवाय नवरदेवाच्या पसंतीला शून्य किंमत होती, कुणीही विचारले नव्हते. म्हणून ते चौघे चुपचाप बसले होते. दुसरा अजून एक मोठा घोळ झाला. प्रवेश फॉर्ममध्ये वय किंवा जन्मतारीख हे रकाने टाकायला सुकन्यापुरीचे वर प्रवेश परीक्षा मंडळ विसरले होते. त्यामुळे वर्षानुवर्षे मुलीकडून नकार मिळालेला परंतु हिंमत न हारलेल्या एका पन्नास वर्षीय 'तरुणाने' ती परीक्षा दिली होती. शेकडो मुलींनी नाकारलेला तो वर त्या परीक्षेत मात्र विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाला होता आणि तो सजधज के मोठ्या उत्साहात बोहल्यावर आपल्या वधुची आणि गळ्यात पडणाऱ्या वरमालेची प्रतिक्षा करीत होता.......
नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका फेज ०१,
क्रांतिवीरनगर लेन ०२, जयमल्हार हॉटेलजवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३. (९४२३१३९०७१)