Waghachya odlyat dhul in Marathi Comedy stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | वाघाच्या डोळ्यात धुळ...

Featured Books
  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

  • मंजिले - भाग 14

     ---------मनहूस " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ कहानी है।...

Categories
Share

वाघाच्या डोळ्यात धुळ...

★★ वाघाच्या डोळ्यात धूळ ★★
दुपारचे बारा वाजत होते. दडके अगदी रमतगमत, हलतडुलत कार्यालयात पोहोचले. अधीक्षक भाऊसाहेब यांनी एकदा दडकेंकडे आणि नंतर घड्याळाकडे पाहिले. त्यांच्यासमोरचे हजेरी पत्रक ओढून घेत त्यावर स्वाक्षरी करत दडके म्हणाले,
"भाऊसाहेब, बारा तर वाजलेत आणि तुम्ही घड्याळाकडे पाहता? जसे काय मी आजच पहिल्यांदा उशिरा आलोय किंवा दुसरे कुणी लेट येतच नाही. 'आता वाजले की बारा, आता आलोय ना कार्यालया...' काय झाले सांगू का, आज ना एक माणूस भेटला. त्याला विम्याची माहिती सांगताना वेळ कसा गेला ते समजलेच नाही हो....."
"मिळाली का पॉलिसी?" भाऊसाहेबांनी विचारले.
"तर मग सोडतो काय? एकदा का पाखरू दिसले ना की, त्याला जाळ्यात कसे ओढायचे ह्याचेच प्रशिक्षण आणि कमिशन मिळते आम्हाला...." म्हणत दडकेंनी समोरच्या खुर्चीवर बसलेल्या तरुणीकडे पाहिले. नजरानजर होताच तिने मानेला असा नाजूक आणि नखरेल झटका दिला म्हणता, दडके तर सोडा परंतु सेवानिवृत्तीकडे झुकलेले भाऊसाहेबही गार झाले. काही क्षणांनी सावरलेले भाऊसाहेब म्हणाले,
"दडके, आता आपले स्वातंत्र्य संपले असे समजा..."
"का हो, भाऊसाहेब? तुम्हाला निवृत्त व्हायला अजून काही महिने आहेत तर चिंता कशाला?"
"दडके, मी कधी निवृत्त होतोय हा प्रश्न नाहीतर उद्या माझा बाप हजर होतोय, समोरच्या खुर्चीत बसायला...."
"नवीन बॉस? कोण आहेत? तुम्हाला कसे कळाले?" असे विचारत ती तरुणी भाऊसाहेबांच्या समोर उभी राहिली.
"आत्ता टपालाने पत्र आले आहे. तेव्हा सर्वांनी उद्यापासून दहा वाजता म्हणजे दहालाच...."
"भाऊसाहेब, नवीन बॉस म्हणजे काही वाघ येणार नाही की, कुणी उशिरा आले की, बॉसने लचका तोडलाच म्हणून समजा..."
"अहो, लचके तोडणारा तो वाघ जंगलात असेल पण इथे स्वतःच्या वाघनखांनी म्हणजेच हातातील लेखणीने आपले शरीर सोलून काढणारा वाघ नावाचा अधिकारी....."
"काssय? वाघसाहेब?"
"व..व...वाघ? म्हणजे तो खडूस, कडक, शिस्तप्रिय, प्रामाणिक, सत्यवादी आणि जिथे जाइल तिथे हाहाकार माजवणारा तो...ते...ते...."
"होय. तेच ते. वाघसाहेब उद्या येत आहेत. तेव्हा प्लीज सकाळी लवकर जाग यावी म्हणून गजर लावून ठेवा..."
"भाऊसाहेब, मी आजपासून दीर्घ रजेवर जातो...."
"जमणार नाही. निवडणुकीची आचारसंहिता आजपासूनच लागू झाली आहे. कुणालाही कोणत्याही प्रकारची रजा द्यायची नाही असे पत्रक कालच आले आहे. त्यावर तुम्ही सही केली आहे."
"अरे, देवा! इकडे वाघ, तिकडे सिंह..."
"अगदी बरोबर! इथे वाघसाहेब आणि तिकडे सिंहसाहेब...जिल्हाधिकारी! दोन्हीकडे कामात कुचराई जमणार नाही. फोडून-सोलून खाणारे म्हणून दोघांचीही ख्याती आहे."
"भाऊसाहेब, बरोबर आहे. पण याच सिंहाने त्यांच्याच कार्यालयातील एका शिपायाने सुरुवातीलाच विकेट घेतली होती हे तुम्हाला माहिती आहे का?"
"म्हणजे?"
"त्याचे काय झाले? ज्याप्रमाणे परप्रांतीय अधिकाऱ्यांना सुरुवातीला मराठी भाषा येत नाही. तशीच या सिंहसाहेबांनाही येत नव्हती. कार्यालयातील एक शिपाई रोजच उशिरा येत असे. कर्मचारी कुणीही का असेना त्याला सिंहासमोर जाऊन स्पष्टीकरण द्यावे लागे. त्याप्रमाणे तो शिपाई रोज साहेबांसमोर जाऊन एखाद्या शेळीप्रमाणे ऊभा राहत असे. सोबत डोळ्यात पाणी आणून एकच कारण सांगायचा ते म्हणजे त्याची बायको बाळांतीण झाली...."
"काय? रोज बायको बाळांतीण होत असे. अशा त्याला किती बायका होत्या?"
"बायको एकच होती हो, पण साहेबांना मराठी भाषा कळत नाही याचा तो फायदा घेत असे...."
"मग काय झाले?"
"काय होणार? सिंह आडनाव असलेला कडक अधिकारी एका शिपायासमोर नांगी टाकतो हे आपल्या मराठी माणसाला कसे पचेल? केली एकाने तक्रार."
"बरोबर आहे. पण एक सांगा नेहमी एकच कारण सांगून डाव साधणाऱ्या त्या शिपायाला सिंह माफी का देत होते?"
"त्याचे काय झाले, सिंहानाही वाटायचे ही 'बाळांतीण' काय भानगड असावी. कोणाला विचारावे तर आपण एवढे मोठे साहेब असून साधी गोष्ट कळत नाही या विचाराने ते शांत राहायचे."
"मग काय झाले?"
"सर्वांना वाटले की, तो शिपाई बाराच्या भावात जाणार पण सिंहानी त्याच्या चातुर्याचे, धैर्याचे कौतुक करून त्याला मोठ्या मनाने माफ करताना केवळ ताकीद दिली."
"अहो, तो सिंह परप्रांतीय तरी होता पण उद्या येणारा वाघ शुद्ध मराठी बोलणारा आहे."
"पण, मॅडम, तुम्हाला काय झाले? साहेब उद्या येणार आहेत आणि तुम्ही तर ते 'वर' गेल्याप्रमाणे डोळ्यात पाणी का आणत आहात?"
"भाऊसाहेब, आता तर डोळ्यात अश्रू आलेत पण धाय मोकलून रडावे अशी बातमी तुम्ही दिली हो. आज नऊ स्वेटर विणून देण्याची ऑर्डर मिळाली आहे. ऍडव्हांस पण घेतला आहे. आता प्रश्न असा पडला की, कसे पूर्ण करायचे? हा वाघ काही मला कार्यालयात स्वेटर विणू देणार नाही. भाऊसाहेब, त्यांच्या बदली आदेशाला स्थगिती देता येणार नाही का?"
"असे करा ना, उद्या आल्याबरोबर तो वाघ तुम्हालाच फोडून खाणार म्हणजे.... अधीक्षक या नात्याने तो अगोदर तुमच्याशीच गुफ्तंगू करणार. त्यावेळी इथे कामाचा लोड जास्त आहे आणि स्टाफ कमी असून कर्मचारी आळशी, कामचुकार आहेत...."
"होय. आमची बदनामी करा, काहीही सांगा पण तो वाघ दुसऱ्या क्षणी पळून जायला हवा."
"झाले का तुमचे? तुम्ही जी परिस्थिती सांगा म्हणताय ती परिस्थिती वाघासाठी एकदम आदर्श अशी आहे. कामचुकार, आळशी कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेण्यात, त्यांना वाटेवर आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. शिवाय संघटना मदतीला येतील या भ्रमात राहू नका. संघटनेला भीक न घालणारा, न भिणारा असा हा अधिकारी आहे. गेल्याच वर्षी झाडून साऱ्या संघटना वाघांच्या विरोधात एक झाल्या होत्या. परंतु या पठ्ठ्याने बदली स्वीकारली पण संघटनांना शरण गेला नाही. असे असले तरीही ते कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देत नाहीत. कर्मचाऱ्याचे कोणतेही काम असो, नियमांच्या अधीन राहून ते काम अग्रक्रमाने सोडवतात. न्यायाच्या सोबत आणि अन्यायाच्या विरोधात असणारा अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे."
"होय. माझ्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी वाघसाहेबांची पत्नी त्यांच्याच कार्यालयात कारकून होती. आपला नवराच बॉस आहे, आपले कोण काय वाकडे करील या गुर्मीत ती कामकंटाळा करू लागली. ते लक्षात आले आणि एक अत्यंत महत्त्वाची पंजिका पूर्ण करताना हलगर्जीपणा केल्यामुळे वाघांनी तिला चक्क आपल्या बायकोला निलंबित केले."
"बाई ग्ग! काय माणूस म्हणावा हा. एकूण काय तर उद्यापासून बी अलर्ट! नॉट टू बी लेट! वर्क मस्ट बी कंम्प्लीट इन टाइम....."
"चला होऊ द्या. उद्या येणाऱ्या पारतंत्र्यापोटी चहा. भाऊसाहेब आज तुमच्याकडून."
"व्वा! चालेना साहेबावर, ढकलले अधीक्षकावर! वा रे, न्याय! चहासोबत सामोसाही आण. अहो, असे पाहता काय, तुमच्या सर्वांच्या जाचातून, होणाऱ्या मनस्तापातून माझी सुटका होणार या प्रचंड आनंदाप्रित्यर्थ...."
"म्हणजे भाऊसाहेब, आम्ही तुम्हाला एवढा त्रास देतो का?" कुणीतरी विचारले. अशा गप्पा रंगात आलेल्या असताना आलेल्या गरमागरम सामोश्यांवर ताव मारून सर्वांनी चहाचा स्वाद घेतला.
"आत्तापर्यंत असा अधिकारी आला नव्हता. अनेक अधिकारी आले नि गेले. प्रत्येकाला हवे तसे नाचवले. येणारा प्रत्येक बॉस पहिले काही दिवस, नव्याचे नऊ दिवस मी असा आहे, मी तसा आहे. मला उशीर चालणार नाही. कामे वेळेवर करणे हा माझा ध्यास तर प्रामाणिकपणा हा माझा श्वास अशा डिंग्या मारायचे पण कालांतराने अनेक 'भ्रष्टाचार्य' झाल्याचे या डोळ्यांनी पाहिलय, नव्हे त्यांना त्या मार्गावर मार्गस्थ करण्यामध्ये माझा हातखंडा असायचा परंतु येणारा हा वाघ म्हणजे वाघच आहे."
"सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाघाला बदलीची मुळीच भीती नाही. आत्तापर्यंत ते कोणत्याही एका ठिकाणी सलग वर्षभर राहिले नाहीत. उपस्थित होतानाच ते कर्मचाऱ्यांना सांगतात की, बदलीची मला भीती नाही. ही बघा माझी एक बॅग घेऊन आलोय. दुसरे सामान नाही. झाली बदली उचलली बॅग !..."
"अवघड आहे सारे. अहो, परवापासून पोट्ट्याची बारावी आहे... म्हणजे... बारावीची परीक्षा आहे. वाटलं, आपल्या भाऊसाहेबांच्या कृपेने दररोज परीक्षा केंद्रावर जाऊन मुलाला सढळ हाताने मदत करावी पण कसचे काय, आता हा वाघ येतोय म्हटल्यावर पोट्ट बारावीच्या बिळातच अडकणार."
वाघाच्या भीतीने, त्यांच्यावर रंगलेल्या चर्चेत दुपारचे तीन केव्हा वाजले ते कुणालाच कळले नाही.
"भाऊसाहेब, स्वातंत्र्याचे शेवटचे तीन तास साजरे करावे म्हणतोय.....आपल्या कृपाशीर्वादाने घरी जाऊन कुटुंबासमवेत आनंदाचे चार क्षण घालावेत असा विचार आहे...."
"हो..हो.... भाऊसाहेब, आजच्या दिवशी तीन तासांची सामुदायिक दांडी मारुया. चला..." म्हणत भाऊंच्या हो ना ची वाट न पाहता सारे एकामागोमाग एक निघून गेले. डोक्यावर हात ठेवून भाऊसाहेब म्हणाले,
"घ्या. घ्या. माझ्या स्वभावाचा हा शेवटचा फायदा घ्या. उद्या येतोय आपला बाप....."
दुसऱ्या दिवशी सकाळीच सारे दबकत, भीतीयुक्त चेहऱ्याने कार्यालयात दाखल झाले. पाहतात तर वाघसाहेब आधीच येऊन बसले होते. शिपाई हलकेच म्हणाला,
"साहेब, नवाच्या ठोक्यालाच आलेत."
"अरे, बाप रे! आलाय का यम..." असे काही पुटपुटत सारे आपापल्या खुर्चीत बसले. थोड्या वेळाने भाऊसाहेब वाघसाहेबांच्या खोलीतून बाहेर पडले. कुणी काही बोलण्यापूर्वीच त्यांच्या पाठोपाठ वाघसाहेब येताना दिसताच सारे आपापल्या जागांवर उभे राहिले.
"बसा. बसा. मीच बाहेर आलो याचे सर्वांना नवल वाटले असणार. कसे आहे, तुम्हा सर्वांना आत बोलावले असते तर त्यात वेळ गेला असता. माझा निरोप तुम्हाला मिळाल्यानंतर कुणी बाथरुममध्ये, कुणी वॉशरुममध्ये, कुणी पाणी पिण्यासाठी तर काही व्यक्ती मेकअप करण्यासाठी गेल्या असत्या तो वेळ वाया जाऊ नये म्हणून मी स्वतः इथे आलो आहे. माझा परिचय, कामाची पद्धत मी येथे येण्यापूर्वीच कर्णोपकर्णी तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल कारण असे म्हणतात की, वादळ येण्यापूर्वी त्याची सूचना पालापाचोळ्याच्या रुपाने येत असते."
"होय सर. तुम्ही म्हणे, स्वतःच्या बायकोलाच सस्पेंड केले होते...." एक महिला कर्मचारी म्हणाली.
"दोन गोष्टींचे पथ्य पाळले ना तर कोणासही त्रास होणार नाही. एक म्हणजे कार्यालयात वेळेच्या आत पोहोचणे. आणि दुसरे म्हणजे आपापली कामे बिनचूक आणि अगदी वेळेत पूर्ण करणे. महत्त्वाचे म्हणजे माझा एक नारा आहे, असे समजा की, मी तीन प्रकारची माकडं तीही 'खा' ची सदैव सोबत ठेवतो. ती म्हणजे 'खाणार नाही! खाऊ देणार नाही!! खाऊ घालणार नाही!!!..."
"अग बाई, साहेब, तुम्ही तर आपल्या पंतप्रधानांचे पट्टशिष्य आहात की काय? कारण त्यांचाही असाच 'खा-खा' चा नारा आहे म्हणून म्हटलं..." दुसरी महिला कर्मचारी म्हणाली.
"ओ.के. ऑल दि बेस्ट !..." असे म्हणत कुणालाही एक शब्द बोलण्याची संधी न देता वाघ स्वतःच्या पिंजऱ्यात निघून गेले. पाठोपाठ सारे आपापल्या खुर्च्यांवर जाऊन आदळले. प्रत्येकाने आपापल्या बॅगमधील बाटली काढून गटागटा पाणी प्याले. दुसऱ्या क्षणी प्रत्येकाने समोरच्या टेबलवरची आणि पंजिकांवरची धूळ झाडायला सुरुवात केली आणि लगोलग सर्वांना शिंका आणि खोकला यायला सुरुवात झाली, लगेचच सर्वांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येऊ लागले.....
नंतरचे पंधरा दिवस तसे शांततेत गेले. विशेष काही घडले नाही. लगतच्या आठवड्यात शुक्रवार ते सोमवार अशी सलग चार दिवस सुट्टी होती. त्यामुळे दडके त्यांच्या गावी गेले होते. वाघांचा दरारा लक्षात घेऊन त्यांनी रविवारी रात्रीच निघायचा विचार मांडला. त्यावेळी घरच्या लोकांनी सोमवारी सकाळी लवकर जाण्याचा आग्रह केला. स्वतः दडकेंनी असाही विचार केला की, चार दिवसांच्या सुट्ट्या असलेल्या वाघसाहेब त्यांच्या गावी गेले असणार. बदली झाल्यानंतर ते गावी गेलेच नाहीत. त्यामुळे साहेब स्वतःच सोमवारी उशिरा कार्यालयात येतील. या विचाराने दडके सोमवारी लवकरच निघाले तरीही त्यांना कार्यालयात पोहोचायला अकरा वाजले. इतर सारे कर्मचारी समोरच्या पंजिकांमध्ये डोके खुपसून बसले होते. वातावरण एवढे शांत होते की, तिथे एखादी टाचणी जरी पडली असती तरी बॉम्ब पडल्याप्रमाणे सारे दचकले असते. दडके दबक्या पावलांनी भाऊसाहेबांसमोर जाऊन हळूच म्हणाले,
"भाऊसाहेब, मस्टर देताय ना?"
"दडके, तुम्हाला माहिती आहे ना, आजकाल मस्टर माझ्याकडे नसते..."
"म्हणजे? साहेब आले आहेत का?"
"हे वातावरण काय सांगते? लवकर आत जा. अजून उशीर नको. नाहीतर फाडून खातील..."
"भाऊसाहेब, रजा देऊ का? बाप रे! आचारसंहिता..." म्हणत दडकेंनी हातातील बॅग स्वतःच्या खुर्चीवर फेकली. साहेबांकडे जाण्यापूर्वी घोटभर पाणी पिले. घामाने डबडबलेला चेहरा साफ केला. थरथरत्या हाताने दारावर टकटक केली. आतून धीरगंभीर आवाज आला,
"या."
दार ढकलतांना दडकेंच्या शरीरात वेगळाच कंप भरला असल्याचे त्यांना जाणवले. ते थरथरत्या पावलांनी वाघांसमोर उभे राहिले. क्षण-दोन क्षण तसेच गेले. वाघसाहेब संगणकावर काम करीत होते. थोड्या वेळाने संगणकाला जोडलेल्या यंत्रातून एक कागद बाहेर पडला. त्या कागदावर सही करून तो कागद दडकेंकडे देत वाघसाहेब पुन्हा स्वतःच्या कामात मग्न झाले. हातात पडलेल्या कागदावर दडकेंनी नजर टाकली. ती 'कारणे दाखवा' नोटीस होती. ती घेऊन बाहेर पडणाऱ्या दडकेंच्या एकदम लक्षात आले, 'अरे, ही तर केवळ नोटीस आहे. उद्यापर्यंत उत्तर द्यायचे आहे. मला वाटले, सस्पेंड करतात की काय. 'आले होते सस्पेंडवर, भागले नोटीसवर...!'...." असे पुटपुटत बाहेर येताच पुन्हा पाणी पित असताना त्यांच्या मनात विचार आला, 'अरे, असे पन्नास मेमो मिळाले असतील. वाघाची बदली झाली ना की, मग जमवलेल्या साऱ्या मेमोंचा हार करून वाघांना घालून त्यांना आगळावेगळा निरोप देतो..." असा विचार येताच मनोमन हसत दडके खुर्चीवर बसत असताना सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. मात्र सारेच आधी वाघांच्या दालनाकडे पाहत मग दडकेंकडे पाहू लागले. कुणी हाताच्या इशाऱ्याने, कुणी मानेने तर कुणी नजरेने 'काय झाले?' अशी विचारणा करु लागले. प्रत्युत्तरादाखल दडके कागद फडकावून दाखवत होते. दडकेंपासून बऱ्याच अंतरावर असलेला आणि स्वतःची जागा सोडून दडकेंपर्यंत जाण्याचे साहस नसलेला एक कारकून इशाऱ्याने म्हणाला,'पाहू तर दे...'
'आता याला कसा दाखवू?' असा विचार करणाऱ्या दडकेंना एक कल्पना सुचली. त्यांनी त्या मेमोच्या कागदाचे चक्क विमान तयार करून ते त्या कारकुनाच्या दिशेने भिरकावले. पण हाय रे दैवा! ते विमान वर फिरणाऱ्या पंख्यांच्या हवेमुळे रस्ता चुकले. इच्छित स्थळी न जाता कारकुनाच्या बाजूला असलेल्या खिडकीतून आत शिरले. सरळ वाघाच्या पिंजऱ्यात शिरले. परंतु दडकेंच्या दुर्दैवाने ते विमान अशा ठिकाणी उतरले की, ज्याची कल्पना दडकेंनी स्वप्नातही केली नसेल. ते विमान केस नसलेल्या वाघाच्या चमचमीत डोक्यावर 'लँड' झाले. ते विमान आत शिरल्याचे पाहून दडकेंची बोबडी वळली. त्यांना डबडबून घाम फुटला. हातपाय थरथरत होते. काही क्षणात साहेबांच्या दालनातून परतलेल्या शिपायाने ते विमान कुठे उतरले ते हलक्या आवाजात सांगितले आणि दडकेंना सारे कार्यालय गरगर फिरत असल्याची जाणीव झाली. उठून पाणी पिण्या इतकेही त्राण त्यांच्या शरीरात उरले नाही.'नोकरीतले आपले हे काही शेवटचे क्षण' या विचाराने ते सुन्न झाले.
दुपारच्या जेवणाच्या मध्यंतरात वाघसाहेब बाहेर आले आणि सारे कर्मचारी आपापल्या जागेवर उभे राहिले. दडकेही थरथरत उभे राहिले. साहेबांच्या हातातील विमान पाहताच त्यांचा घसा कोरडा पडला. वाघ दडकेंच्या समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले,
"व्वा! विमान तर फार सुंदर बनवले आहे. विमानाची झेपही उत्तुंगच...ठेवा...."असे म्हणत वाघ कार्यालयाच्या बाहेर पडले. त्यांची बॅग घेऊन गेलेला शिपाई परतला तरी सारे आपापल्या जागेवर स्तब्ध उभे होते, जणू कुणाला श्रद्धांजली अर्पण करत असल्याप्रमाणे!
"बाप रे! पाहावे ते नवलच! तुम्ही एवढा अचूक निशाणा साधूनही वाघ एवढा शांत कसा? पंजा मारायचा सोडून साधा गुरगुरलाही नाही?"
"अहो, ही वादळापूर्वीची शांतता असू शकेल. परतणारे साहेब वाघाच्या रुपात येऊ नाही म्हणजे मिळवले..." कुणीतरी म्हणाले आणि सारे बाहेर पडले. तोच दिवस नाही तर नंतरचे अनेक दिवस शांततेत गेले. दुसऱ्याच दिवशी दडकेंनी नोटीशीला उत्तर दिले. सारे ते विमान प्रकरण विसरत चाललेले असताना तो दिवस उजाडला. सारे कर्मचारी कटाक्षाने कार्यालयाच्या वेळा, वाघाचे नियम पाळत असताना नानाविध कारणांमुळे एक नाही, दोन नाही तर चक्क पाच कर्मचारी त्यादिवशी उशिरा पोहोचले. आश्चर्य म्हणजे त्या पाचांमध्ये स्वतः भाऊसाहेब होते. कदाचित वाघसाहेब आल्यापासून त्यांचे खरे रुप कुणी अनुभवले नव्हते. जणू वाघ म्हातारा झाला होता, त्याच्या जबड्यातील दात कुणी तरी पाडले होते....
त्यादिवशी वाघसाहेबांच्या टेबलवर हजेरीपट होते. म्हणून भाऊसाहेब आत गेले. त्यांना पाहताच वाघ म्हणाले, " भाऊसाहेब, ही नोटीस! 'कागद वाचवा!' मोहिमेमुळे तुमच्यासह सर्वांना एकच नोटीस बजावली आहे. सर्वांनी मिळून एकाच कागदावर खुलासा लिहावा. कागद आणि वेळ दोहोंचाही अपव्यय टळेल...."
तो कागद घेऊन जड अंतःकरणाने भाऊसाहेब निघाले. त्यांच्या मनात विचार आला, 'निवृत्तीला काही दिवस उरलेले असताना शिक्षेचा डाग उमटतो की काय?'
भाऊसाहेब बाहेर येताच साहेबांकडे जाण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या इतरांना आत न जाण्याचे खुणावून भाऊसाहेब स्वतःच्या जागेवर येऊन बसले. इतर कर्मचारी त्यांच्याजवळ आल्याचे पाहून भाऊसाहेब म्हणाले,
"या कागदावर खुलासा लिहा."
"म्हणजे खुलाशावर निभावले तर. म्हणजे आपले पूर्वीचे 'अच्छे दिन' परतले की काय?" असे म्हणत काने यांनी ती नोटीस घेतली. काळजीपूर्वक वाचली. नंतर खाली स्वतःचे नाव, उशिरा येण्याचे कारण लिहून सही केली. त्यांच्या पाठोपाठ नाकेबाईंनी तो कागद घेतला. त्यांनीही स्वतःचे नाव लिहून उशिराचे कारण लिहिताना काने यांनी लिहिलेल्या कारणाखाली 'वरीलप्रमाणे' असे लिहून स्वाक्षरी केली. त्यांच्या पाठोपाठ इतर दोघांनीही नाकेबाईंची नक्कल करताना नाव लिहून, स्वाक्षरी केली आणि 'वरीलप्रमाणे' असे लिहिले. सर्वात शेवटी भाऊसाहेबांसमोर कागद आला. त्यांनीही इतर कर्मचाऱ्यांचा कित्ता गिरवला. तो कागद शिपायाच्या हातात देऊन 'साहेबांना दे' असे खुणावले. त्याबरहुकूम शिपायाने कृती केली...
तो दिवस शांततेत गेला. तरीही त्या पाचांचा जीव थाऱ्यावर नव्हता. उद्या काही तिसरेच निघू नये. खुलासा न पटल्यास कोणती दंडात्मक कार्यवाही होईल याच विचारात ते सारे होते. खबरदारी म्हणून कुणी संघटनेच्या पदाधिकांऱ्याचा सल्ला घेतला, कुणी वकिलाचा सल्ला घेतला. कोणी नवस केले. 'आयी बला को टाल दे..' यासाठी जे जमेल, जे सुचेल ते सारे केले.....
दुसऱ्या दिवशी सर्व जण वेळेपूर्वीच कार्यालयात पोहोचले. पाहतात तर वाघसाहेब, भाऊसाहेबांच्या खुर्चीत बसले होते. त्यांच्या समोर हजेरीपट होते. येणारा प्रत्येक जण हजेरीपटावर स्वाक्षरी करून भाऊसाहेबांच्या शेजारी उभा राहत होता.हजेरी पत्रकावर नजर टाकून वाघ म्हणाले,
"बरे झाले. सारे लवकर आले. भाऊसाहेब, काल तुमचा पाचही जणांचा खुलासा वाचला...." बोलताना मध्येच थांबून वाघांनी खिशातून पाचशे रुपयाची नोट काढून शिपायाजवळ देऊन म्हणाले,
"जा. ह्याचे पेढे आण. अरे, पाहतोस काय? आपल्या कार्यालयातील पाच कर्मचाऱ्यांच्या बायका काल बाळंत झाल्या आहेत. त्याचा आनंद साजरा करु...."
"काssय?"
"पाच जणांच्या ? कसे शक्य आहे? " दबलेल्या आवाजातील चर्चा ऐकून वाघ म्हणाले,
"असे आपसात बोलू नका. खोटे वाटतेय का? तुम्ही प्रत्येकाने तसे लेखी दिले आहे. वाचा...." असे म्हणत वाघांनी तो कागद भाऊसाहेबांकडे दिला. भाऊसाहेबांनी तो वाचला आणि शेजारी असलेल्या काने यांचेकडे दिला. तितक्यात वाघ म्हणाले,
"कसे आहे भाऊसाहेब, ते म्हणतात ना 'नकल करने को, अकल चाहिए।' तसेच तुमचे सर्वांचे झाले. प्रथम काने यांनी खुलासा लिहिला की, 'सकाळी बायको बाळंत झाली.' योगायोगाने त्यांनी तीन महिन्यांपूर्वी घेतलेल्या रजेचा प्रस्ताव मान्यतेसाठी माझ्यासमोर होता. त्यांनी प्रस्तावात रजेचे कारण
'पत्नीचे निधन' असे लिहिले होते. कदाचित काल बाळंत झालेली त्यांची पत्नी दुसरी असेल..."
"न...न...नाही. दुसरी नाही..." कानेंची बोबडी वळलेली पाहून त्यांना पुढे बोलू न देता वाघ म्हणा,
"हे झाले कानेंचे. त्यानंतर कानेंना फॉलो करणाऱ्या नाकेबाईंनी उशिराचे कारण 'वरीलप्रमाणे' असे लिहिले. याचा अर्थ नाकेबाईंची पत्नी बाळंत झाली....." वाघ बोलत असताना नाकेबाई काही तरी बोलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून त्यांना थांबवून वाघ पुढे म्हणाले,
"जी गत नाकेबाईंची तीच अवस्था हातेबाई तुमची!तुमचीही बायको बाळंत झाली? भाऊसाहेब,
तुम्हीसुद्धा 'वरीलप्रमाणे' असे लिहून निवृत्तीला थोडे दिवस शिल्लक असताना बायको बाळंत झाली आहे असे लेखी दिले आहे. थांबा. भाऊसाहेब, थांबा. माझे बोलणे पूर्ण होऊ द्या. आता राहिले दाढे! तुम्हीही मोठ्या झोकात 'वरीलप्रमाणे' असे लिहिले आहे. कदाचित तुमच्या चौघांपेक्षा त्यांचे अक्षर अधिक सुंदर, वळणदार आहे. सही करतानाही त्यामध्ये त्यांनी एक कलात्मकता साधलीय. तरुणाईचा जोश असावा. परंतु परवाच्या दिवशीच यांनी एक महिना रजा मिळावी म्हणून दिलेल्या अर्जासोबत स्वतःच्या लग्नाची पत्रिका जोडली आहे. कालच्या खुलाशाप्रमाणे ते लग्न व्हायच्या आधीच बाप बनले आहेत. चला. आणलेस का पेढे? सर्वांनी आपल्या सहकाऱ्यांना अपत्य प्राप्त झाल्याच्या आनंदात पेढे खा....." असे म्हणून वाघ स्वतःच्या दालनात गेले.......
नागेश सू. शेवाळकर
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१