Dantnirmulan in Marathi Comedy stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | दंतनिर्मूलन

Featured Books
Categories
Share

दंतनिर्मूलन

** दंतनिर्मूलन **
त्यादिवशी सकाळचा चहा घेण्यासाठी मी सज्ज झालो असताना बायकोने ग्लासभर पाणी आणि चहाचा कप समोर ठेवला. मी पाण्याचा ग्लास उचलला परंतु तो नेहमीप्रमाणे थंडगार लागला नाही म्हणून मी पत्नीकडे पाहिले. माझ्या कटाक्षाचा अर्थ जाणून ती म्हणाली,
"अहो, असे काय पाहता? तुमची दाढ दुखतेय ना म्हणून फ्रीजमधील पाणी दिले नाही."
"अग, तुला माहिती आहे, मला बारा महिने अठरा काळ फ्रीजमधलेच पाणी लागते ते. शिवाय चार दिवसांपासून गोळ्या चालू आहेत, तेव्हा आता काहीही त्रास होणार नाही. आण."
"तुम्ही नाही ऐकणार तर..." म्हणत ती आत गेली. काही क्षणात पाण्याची बाटली घेऊन आली. ती बाटली टि पॉयवर आदळत म्हणाली, "घ्या. दाढेला कळ लागली तर मला सांगू नका."
बाटलीचे झाकण मी दोन घोट पाणी तोंडात घेतले न घेतले की, आपादमस्तक अशी एक कळ आली म्हणता मी कळवळून ओरडल ,"आई ग...."
सौभाग्यवती म्हणाली,"फिटली हौस, झाले समाधान? म्हणत होते ना, थंडगार पाणी पिऊ नका म्हणून. पण ऐकतेय कोण?"
काही क्षणात वेदना आटोक्यात येताच मी चहाचा कप उचलला. एक घोट घेताच पुन्हा तशीच जोरदार कळ आली.
"बघ. आता काय चहा थंडगार होता काय? पण कळ आलीच ना?" असे म्हणत मी एका बाजूने चहा ढकलत गेलो. वेदनांनी कळस गाठला होता. स्नानादि कार्यक्रम आटोपेपर्यंत बायकोने जेवणाची ताटं वाढली. मी जेवायला सुरुवात केली पण दुखरी दाढ कुणालाही जवळ येऊ देत नव्हती. एका बाजूने अन्न खाण्याचा माझा प्रयत्नही यशस्वी होत नव्हता. बळेबळे दोन-चार घास घशाखाली ढकलून ताटावरुन उठलो. जेवणानंतर बडिशेप, सुपारी या नित्यक्रमाची तर आठवणही आली नाही.
कार्यालयात पोहचेपर्यंत ठणका चांगलाच वाढला. कामातही लक्ष लागत नव्हते म्हणून मी आमच्या कौटुंबिक डॉक्टरांना फोन केला. दोन दिवसांपासून त्यांची औषधी चालू होती. ठणक वाढली असल्याचे सांगताच ते म्हणाले,"असे करा. आता दंतवैद्याकडे जा. बहुतेक दाढ किडली असावी. तुम्ही डॉ गाडदियांकडे जा."
"काय झाले रे?" शेजारच्या कारकून मित्राने विचारले.
"दाढ दुखतीय का?" शेजारच्या सौंदर्यवतीने विचारले.
"होय हो." मी कसेबसे उत्तर दिले.
"किडली असणार. काढावीच लागेल." मधाळ आवाजातील प्रेमळ सूचना.
"सुपारी कमी खातोस का? अख्खी सुपारी न फोडता तोंडात टाकतो. मग दाढ किडणारच की."
"अहो, मी दोन महिन्यात निवृत्त होतोय पण अजून दात, दाढा शाबूत आहेत." ज्येष्ठ सहकाऱ्याने स्वतःची शेखी मिरवायची संधी सोडली नाही.
"इस के पिछे क्या राज है ?" मानेला झटका देत, नशीले डोळे रोखत एका मदनिकेने विचारले.
"तंबाकू! ओन्ली तंबाकू!!" ते गृहस्थ ताठ मानेने म्हणाले आणि तिथे हसण्याचे कारंजे फुलले. मीही केविलवाणा हसण्याचा प्रयत्न केला.
"अहो, असे करा ना, डॉक्टरांकडे जाऊच नका ना..." लडिवाळ आवाजातील एक गोड सूचना. मला जाणवले त्या ललनेने 'अहो' असे म्हटले न म्हटले की, इथून तिथून सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. जणू त्या रमणीने 'अहो' हे उच्चारण प्रत्येकाला स्वतःसाठीच केले असल्याचा भास झाला असावा. तशा दुखऱ्या परिस्थितीतही मला वाटले, किती फरक असतो नाही, घरात 'अहो... अहो..'
ऐकून कंटाळा येतो. तो शब्द कानावर पडताच कपाळावरील आठ्यांचे जाळे घट्ट होते, प्रसंगी चीडचीड होते. परंतु तेच अशी कुणी त्रयस्थ, दिलवालीने 'अहो' म्हटलं की कशा गुदगुल्या होतात. अंगावर शहारे येतात, रक्तसंचय प्रवाही होतो.
"का जाऊ नये? बघताय ना त्याची दाढ किती दुखतेय ती..." माझा शेजारी म्हणाला. माझ्याबद्दल सहानुभूती दाखविताना त्या मदालसेसोबत संभाषण वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे मी जाणले.
"आमच्या की नाही ह्यांची दाढ अशी उठली होती म्हणता, तेव्हा त्यांच्या मित्राने सांगितलेल्या माणसाकडे आम्ही गेलो. त्या माणसाने कशाचे तरी दोन थेंब यांच्या नाकात टाकले..."
"नाकात ते का म्हणून? हे असे झाले ना की, आजार कानी, उपचार नयनी!"
त्या सुंदर तरुणीशी बोलताना त्या ज्येष्ठ व्यक्तीमधील शीघ्र कवित्व जणू उफाळून आले..."
"ऐकून तर घ्या. दोन थेंब टाकताच काही वेळ अशा वेदना झाल्या म्हणता. पण नंतर दाढेतल्या कीड्याची वळवळ आणि ह्यांची तळमळ एकदाच बंद झाली."
"ते झाले हो, कुणाची वळवळ थंडावली, कुणाची तळमळ मंदावली असेल पण त्यामुळे वेगळ्याच चळवळीने जोर पकडला असेल ना?" एक जण हसत म्हणाला. त्याचा मतितार्थ जाणून सारे हसत असल्याचे पाहून ती षोडशा लाजून लालेलाल होत म्हणाली, "ईश्श!" तिच्या त्या मनमोहक अदेवर त्या ज्येष्ठासह सारे लट्टू झालेले असताना मीही माझी दाढदुखी काही क्षण विसरून अचानक म्हणालो,
"सापडला. सापडला. दाढदुखीवर रामबाण इलाज सापडला." तसे सर्वांनी एकदम विचारले,
"कोणता इलाज?" मी त्या मदमस्त तरुणीकडे पाहात म्हणालो, "ईश्श! तुम्ही असेच ईश्श म्हणत राहिलात ना तर माझी दाढदुखी थांबेल बघा...."
"काहीही हं.... ईश्श बाई!" ती पुन्हा झक्कास लाजत म्हणाली.
" मस्ती पुरे करा हो. पण अशी खाजगी औषधी वगैरे सारे बकवासआहे. असे डिग्री नसलेल्या माणसाच्या औषधाने जर दाढदुखी थांबली असती ना तर दवाखाने बंद पडले असते." ते ज्येष्ठ बाह्या सरसावून म्हणाले. कदाचित ती तरुणी त्यांच्यासमोर त्यांना विशेष भाव न देता त्यांच्यासमोर इतर तरुण सहकाऱ्यांशी मनमोकळेपणाने वागते ह्याचा त्यांना राग आलेला असावा.
"एक करा. कोणत्या देवाचे वगैरे राहिले का बघा."
"छट्! तसे काही नसते. तुम्ही डॉक्टरकडेच जा बरे."
"गाडदियांकडे जा."
"डॉक्टर चांगलाच आहे. पण खिसाही तसाच खाली करतो बरे." ती चर्चा सुरू असताना मी अर्ध्या दिवसाची रजा टाकून तडक गाडदियांकडे गेलो. तिथे तोबा गर्दी होती. नाव नोंदवावे म्हणून मी स्वागतिकेकडे पोहोचलो. ती मोबाइलवर बोलत होती. सौभाग्यवती असल्याचा कोणताही अलंकार दिसत नसला तरीही तिचा अविर्भाव मात्र नवऱ्याशी बोलावे असाच होता. एक मात्र नक्की ती प्रियकराशीच बोलत असावी.
"हो. हो. नक्की येते. दवाखान्यात काय नेहमीच गर्दी असते. साहेबांना सांगून बरोबर वेळेवर सिनेमा टॉकीजला येते. ओ. के. बाय!" असे म्हणत तिने भ्रमणध्वनी बंद केला. समोरचे रजिस्टर ओढत माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहात विचारले, "नाव..." ती नाव लिहित असताना मी विचारले,
"कितवा नंबर?"
"साठावा! पस्तीस नंबर आतमध्ये आहे. दोन तास लागतील."
"प्लीज, जरा लवकर सोडा ना. दाढ ठणकते हो.... " मी आर्जव करीत म्हणालो.
"इथे येणारे सारे ठणक्याचेच असतात हो. बसा...." तीही ठसक्यात म्हणाली. तसा मी जागा शोधून बसलो. एक-एक पेशंट आत जात होता. कुणी जाताना गालावर हात ठेवून जात होता तर कुणी बाहेर येताना गालावर हात ठेवून येत होता.असाच काही वेळ गेला. एक व्यक्ती आत आली. राजकारणी असावी. आल्याबरोबर त्या मुलीस म्हणाला,
"साहेबांना सांग मी आल्याचे. थांब. असे कर हे कार्ड दे."
त्याने दिलेले कार्ड घेऊन ती मुलगी आत गेली. दोन क्षणात परत येऊन म्हणाली,
"जा. साहेबांनी आत बोलावले आहे."
"हे असे कसे? आपण इथे रांग लावून बसलोय. आणि त्यांना सरळ प्रवेश?" मी शेजारच्या व्यक्तीच्या कानात हळूच म्हणालो.
"अहो, बडे प्रस्थ दिसतेय."
"म्हणजे दवाखान्यातही लग्गाबाजी?"
"व्हीआयपी कोठा!..."
जवळपास पस्तीस-चाळीस मिनिटांनी तो गृहस्थ बाहेर आला तोपर्यंत इतरांना 'नो एंट्री' होती. त्या मुलीजवळ जाऊन मी विचारले,"किती वेळ आहे? दाढ खूप दुखतेय हो."
"बसा. बसा. पंचावन्न आत मध्ये आहे."
मी अस्वस्थपणे बसलो. योगायोगाने छप्पन्न ते एकोणसाठ क्रमांक हजर नव्हते. त्यांची नावे पुकारुन ती मुलगी मला म्हणाली, "जा. काका."
ते ऐकून दाढ ठणकत असूनही मी सहर्ष आत गेलो. आतमध्ये असलेल्या लांब खुर्च्यांवर चार पाच पेशंट पहुडलेले होते. त्यांचे जबड वासलेले होते.प्रत्येकाजवळ एक एक शिकाऊ डॉक्टर उभा होता. तो प्रत्येकाच्या जबड्यात पट्ट्या, यंत्रं अशी वेगवेगळी औजारे घालून त्यांच्या दातांशी खेळत होता. त्यामध्ये दोन डॉक्टर मुलीही होत्या. त्यामुळे भर वैशाख मासी दुपारी थंडगार हवेचा झोत यावा तसे प्रसन्न वाटत होते. मला पाहताच एक तरुणी पुढे येत एका खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाली, "बसा."
मी त्या खुर्चीत बसलो. वाळवंटात पाण्याची शीत लहर यावी तसे ते दालन गारेगार होते.
"काय होतय?" तिने मंजूळ स्वरात विचारले.
"दाढ दुखतेय?"
"कोणती? आ करा. आणखी...." असे म्हणत तिने एक पट्टी माझ्या तोंडात घातली. त्या पट्टीने दाब देत तिने माझा जबडाही दाबून धरला. त्यामुळे चेहऱ्याच्या नसाही दुखू लागल्या. मात्र दुसऱ्या क्षणी तो त्रास जाणवत नसल्याचे जाणवले. कारण ती तरुणी माझ्या शरीरावर ओणवी होत माझ्या चेहऱ्याच्या इतकी जवळ आली की, तिचा गरमागरम श्वास माझ्या चेहऱ्यावर जाणवू लागला.
"ही...ही..दुखतेय का?"
"हो.." मी कसा तरी होकारलो.
"कधीपासून?" तिने माझा जबडा मुक्त करीत विचारले.
"तीनचार दिवस झाले."
"थंडपाणी पिता येते?"
"नाही. थंड, कोमट, गरम काहीही घेतले तरी कळ लागते...झोंबते..."
"बहुतेक दाढ किडली आहे. फोटो काढावा लागेल."
"कुणाचा माझा?" मी विचारले.
तशी ती हसत म्हणाली,"तुमचा नाही हो. दाढेचा! फोटोचे वेगळे पाचशे रुपये पडतील. बसा या खुर्चीवर." तिने दाखवलेल्या खुर्चीत मी जाऊन बसलो. तिथे एक तरुण माझ्याजवळ आला. बटणांची खाटखुट करीत त्याने एक प्रखर लाइट माझ्या चेहऱ्यावर सोडला. मला 'आ' वासायला लावून त्याने काहीही न बोलता काही पट्ट्या माझ्या तोंडात सोडल्या तसा त्रास वाढला. शिवाय तो सारखे 'आ' करा असे बजावत असतानाही तशा अवघडलेल्या प्रसंगी अनेकदा ऐकलेल्या आणि गाजलेल्या एका विनोदातील ते शेवटचे वाक्य आठवले,'अरे, मुँए क्या मुंह मे बैठकर दाँत निकालेगा क्या?"
त्याने दुखणारी दाढ निश्चित करून पुन्हा काही तरी माझ्या तोंडात सोडले. दोन चार मिनिटांनी तो म्हणाला," या. बसा. "
मी बाजूला बसल्यावर तो काही वेळ मशिनशी झटत होता. नंतर एक छोटी चकती काढून त्याने ती मुख्य डॉक्टर गाडदियांकडे दिली. त्यांनी मला त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसण्याचा इशारा केला. ती चकती आलटून पालटून, खालीवर पाहात म्हणाले,
"दाढ पूर्णपणे किडली आहे. काढायची असल्यास काढता येईल."
"काढायची नसल्यास?" मी विचारले.
"रुट कॅनाल करून वाचवता येईल."
"माय गॉड! एवढ्याशा तोंडात कॅनाल..." मी तसे विचारत असताना गाडदिया यांच्यासह इतर डॉक्टर आणि तिथे असलेले पेशंट हसू लागले.
"शेतातला कॅनाल नाही हो. तुमच्या दाढेतली किडलेली नस काढून तिथे दुसरी नस टाकण्याच्या प्रक्रियेला म्हणतात."
"ते झाले. पण पैशाचे काय?"
"चार पाच हजार रुपये लागतील."
"काही कमी जास्त?" मी विचारले.
"अहो, संघटनेने ठरविलेली फीस सांगितली मी तुम्हाला. हा दवाखाना आहे. घासाघीस करायला बाजार नाही. तुम्ही नोकरीला आहात का?"
"हो. सरकारी नोकर आहे."
"मग सारे आलबेल आहे. कमी करा कशाला म्हणता? तुम्हाला दहा-बारा रुपयांचे बील देतो. घ्या उचलून. ही औषधी पाच दिवस न चुकता घ्या. सहाव्या दिवशी या."
"पण दाढदुखी कमी होईल ना? ते सिमेंट भरणे, चांदी-सोने भरतात म्हणे..."
"भरतात. पण तुमचा आजार त्या पलीकडे गेला आहे. शिवाय ते सारे प्रकार तात्पुरते असतात. काही दिवसात सारे निघून जाते. पुन्हा मोठ्ठा खड्डा पडतो. फिस आणि फोटो मिळून हजार रुपये झाले." डॉक्टर म्हणाले. फिस देऊन मी बाहेर आलो. शेजारच्या औषधी दुकानातून औषधी घेतली. घरी आलो तर आमच्या घरी महिला मंडळ जमले होते. सेवानिवृत्त झालेले, गल्लीत प्रत्येकाकडे कोण येते, कोण जाते यावर बारीक लक्ष ठेवून असणारे, प्रसंगी येणारा-जाणाराची चौकशी करणारे आमचे चाळमामा दारातच उभे होते. मला पाहताच 'हा लवकर कसा आला?'या प्रश्नाने व्याकूळ झालेल्या मामांनी शेवटी मला विचारले,
"का लवकर आलात?"
"हो. दुपारची रजा टाकली आहे."
"रजेचे नाही विचारत. तुमची तब्येत बरोबर नाही का?"
"हो. दाढ ठणकतेय."
"दाखवलं नाही का?"
"हे काय, आत्ता दाखवूनच येत आहे.... गाडदियांकडे."
"अहो, त्याला कशाला दाखवले? फार लुटतो हो. नावाप्रमाणेच गाडतो... गाडदिया! त्यांनी काय सांगितले?"
"दाढ किडली म्हणे. रुट....."
"वाटलेच मला. काहीच फायदा होत नाही. अहो, सहा महिन्यांपूर्वी माझी दाढ अशीच ठणकत होती. डॉक्टरांनी रुट कॅनाल करायला सांगितले. तीन दिवसांची औषधी दिली. नंतर पाचसहा दिवस जावे लागले. रोज कोरुन कोरुन भला मोठा खड्डा केला. त्यात नस टाकली म्हणे. त्या खड्ड्यावर टोपी बसवली, चेंबरवरती झाकण बसविल्याप्रमाणे! आठ दिवस सारे कसे एकदम बेस्ट पण आठ दिवसांनी ती टोपी निघाली की हो...."
"मग?" मी उत्सुकतेपोटी विचारले.
"तसा खड्डा घेऊन जगतोय झाले. माझ्या साडूची दंतकथा.... पुराणातील नाही हो. खरीखुरी दंतकथा वेगळीच आहे. आमचा साडू पस्तीशीचा! झाला की लहान वयातच दाढेचा त्रास सुरु. गेला बिचारा डॉक्टराकडे. परिस्थिती यथातथा म्हणून सरळसरळ काहीही न करता दोनशे रुपयात दाढ काढून टाकावी म्हणून दोन तीन दिवस औषधी घेतली. नंतर गेला..."
"गेला?" मला वेगळीच शंका येऊन मी विचारले.
"डॉक्टराकडे गेला हो. त्यांनी त्याला खुर्चीवर झोपवले. दाढेमध्ये इंजेक्शन दिले. तीन चार मिनिटांनी विचारले की दाढ सुन्न झाली का? लगेच तोंडात अवजार खुपसले आणि त्याबरोबर जी कळ निघाली म्हणता. दिलेल्या इंजेक्शनची औषधी दाढेच्या मुळाशी पोहोचलीच नाही. पुन्हा पाच दिवसांच्या गोळ्या दिल्या...
"मग?"
"पुन्हा पाच दिवसांनी गेले. त्यावेळी डबल...डिबल औषधीचे इंजेक्शन दिले. कशीतरी दाढ काढली. घरी आले. संध्याकाळपर्यंत तोंडात फोडच फोड..."
"ते कशामुळे?"
"पॉवर फुल इंजेक्शनमधील औषधचा परिणाम. पंधरा दिवस अन्नाचा कण नाही की पाणी पिणे नाही. मोजून बारा दिवस सलाइनवर होते. आश्चर्य म्हणजे अर्धी दाढ आतच राहिली.."
"काय सांगता?"
"सहा महिन्यांनी त्या दाढेने डोके वर काढले तेव्हा कळलं."
"मग पुन्हा काढली?"
"न काढून कुणाला सांगणार? त्या प्रकाराचा संसर्ग शेजारच्या दाढेला झाला. पहिली दाढ साफ करताना, खड्डा करताना आणि शेवटी ती दाढ काढताना शेजारच्या हट्टाकट्टा असलेल्या दाढेला धक्का पोहोचला. पुन्हा काही महिन्यातच ती दुसरीही दाढ काढावी लागली. 'लागो बाई लागो, बत्तीशी हालू लागो!' अशी अवस्था झाली. एक एक करता अशाप्रकारे याच गाडदियांनी त्याच्या सगळ्या दाढांवर वरवंटा फिरवला आणि वर पुन्हा नवीन दाढा बसविण्याचा सल्ला दिला."
"नव्या?"
"मग काय? 'शहाण्याने दाताच्या दवाखान्याची पायरी चढू नये' असा तो सर्वांना सल्ला देतो."
"पण मामा, त्रास असह्य झाल्यावर जावेच लागते की..." मी म्हणत असताना आमच्या घरची महिला मंडळाची सभा बरखास्त झाल्याचे पाहून मी घरी आलो. मला पाहताच सौभाग्यवतीचे प्रेम उफाळून आले. तिने विचारले,
"का हो, कमी झाले नाही? लवकर आलात?"
"डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनी गोळ्या दिल्या आहेत. पाणी दे बरे. " तिने आणून दिलेल्या पाण्यासोबत दोन-तीन प्रकारच्या एक एक गोळ्या होत्या. त्या घेतल्या. पलंगावर जाऊन पडलो. थोडा वेळ डोळा लागला. तोंडात वेगळीच संवेदना होतेय या जाणीवेने जाग आली. टाळू, जीभ, तोंडाचा आतील भाग खाजत असल्यासारखे होत होते. जीभ बिचारी आत स्वैरपणे फिरुन सर्वांची खाज जिरवत होती. काही क्षणात तोंडामध्ये आग-आग होऊ लागली. पटकन उठून आरशात डोकावले. आतील सर्व भाग लालभडक झाला होता. खाजणे सुरूच होते परंतु जीभेचा स्पर्शही आता सहन होत नव्हता. अनेक ठिकाणी बारीक पुटकुळ्या दिसत होत्या. पाण्याचा घोट घेतला पण तो दाढेला तर झोंबलाच शिवाय साऱ्या तोंडातही पाणी झोंबले. मला वेगळीच शंका आली. डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन त्यांचा क्रमांक जुळवला. म्हणालो,
"हॉलो, गाडदिया साहेबांना द्या. अहो, इमर्जन्सी आहे. सकाळीच दाखवले. बहुतेक रिऍक्शन आली आहे. ताबडतोब द्या..." क्षण दोन क्षणानंतर डॉक्टरांचा आवाज आला,
"तुमच्या प्रिस्क्रिप्शनवर उजव्या कोपऱ्यात दिनांकाच्या वर एक क्रमांक लिहिलेला असेल तो सांगा." मी तो क्रमांक ...'सतराशे साठ' सांगितला. नंतर काही क्षण टकटक आवाज येत होता कदाचित ते संगणकाची मदत घेत होते. लगेच त्यांनी विचारले,"बोला. काय त्रास होतो?" मी सांगितलेली सारी माहिती ऐकून
ते म्हणाले,"अहो, आधी सांगू नये का? त्यातली कोणती तरी एक गोळी तुम्हाला सहन होत नाही."
"साहेब, ते मला माहिती नव्हते हो." मी रडवेला होत म्हणालो.
"असे करा, लगेच जवळच्या मेडिकलच्या दुकानात जा. तिथून मला फोन करा. मी त्याला सांगतो. आता देतोय त्या गोळ्या पाच दिवस घ्या. आधीच्या साऱ्या गोळ्या बंद करा. पाच दिवसांनी या."
म्हणत त्यांनी फोन बंद केला.
"अहो, काय झाले?"
"अग, गोळ्यांची रिऍक्शन आली आहे. "
"आता हो मग? असे करा. आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडे चला. त्या दाताच्या डॉक्टरच्या गोळ्या राहू द्या. अशा कशा गोळ्या दिल्या?" असे विचारताना ती दात खात असल्याचे माझ्या लक्षात आले.
बायकोचे ऐकून आम्ही आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे गेलो. मला पाहताच डॉक्टर म्हणाले,
"या. काय म्हणते दाढदुखी?"
मी त्यांना सारी दंतकथा ऐकवली. त्यांनी तोंडाचा आतील भाग तपासला. मला म्हणाले,
"एक इंजेक्शन देतो. रात्रीतून कमी होईल." असे सांगून त्यांनी इंजेक्शन टोचले. त्यांनी दिलेल्या गोळ्या घेऊन घरी आलो. बायकोने करुन दिलेल्या ज्युसबरोबर गोळ्या घेतल्या. पंधरा-वीस मिनिटात आग,खाज,दाढदुखीही कमी झाली. रात्रीचे जेवण झाल्यानंतर पुन्हा गोळ्या घेतल्या. रात्री शांत झोप लागली.
सकाळी उठून आरशात पाहिले. लालसरपणा, बारीक फोड कमी झाले होते. ठणक तर जाणवत नव्हती. ब्रश केला. खळखळून चूळ भरून पाणी बेसीनमध्ये टाकले. कशाचा तरी आवाज आला. पाणी निघून खाली निघून गेल्यावर वेगळ्याच शंकेने पाहिले. आवाज कशाचा आला ते लक्षात येताच तोंडात जीभ फिरवली. तोंडात एक खड्डा पडला असल्याचे जाणवले. मी आनंदातिशयाने घरात शिरलो. समोर सौभाग्यवती दिसताच ओरडलो,"अग,फ्रीजमध्ये असलेली थंडगार पाण्याची बाटली आण. अशी पाहतेस काय? अग, दाढ पडली ग आपोआप....." असे म्हणत मी हातात आणलेली किडकी दाढ तिला दाखवली.......
नागेश सू. शेवाळकर,
११०, वर्धमान वाटिका फेज ०१,
क्रांतिवीरनगर लेन ०२,
हॉटेल जयमल्हारच्या पुढे,
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१.