Mi aani Tabla in Marathi Moral Stories by suresh kulkarni books and stories PDF | मी आणि तबला!

Featured Books
Categories
Share

मी आणि तबला!

लहान पाणी माझ्या हातापायात थोडे बळ आल्यावर, आमचे अण्णा एखाद्या वेळेस म्हणायचे,
"सुऱ्या, तो कोपऱ्यातील तबला घे बर, पाडू -बिडू नकोस!" मग मी डगमगत्या पायाने तो जडशीळ, हो तेव्हा तो जडच वाटायचा, तबला पोटाशी धरून त्यांना आणून देत असे.
"शाब्बास, असाच तो डग्गा पण आण." अण्णा ,म्हणजे माझे वडील. हाच तो माझा तबल्याशी पहिला संपर्क! माझी हि तबला नेण्या -आणण्याची हमाली बरेच दिवस चालली. मी नऊ -दहा वर्षाचा होईपर्यंत. एक दिवस समोर तबला असताना अण्णा म्हणाले.
"सुऱ्या, बस. " मी बसलो.
"थोडी पावडर लाव. "
मी समोरच्या डबड्यातली पावडर घेतली अन तोंडाला फसली.
"गधड्या, तोंडाला नाही, बोटाना!"
मी पुन्हा पावडर मध्ये बोटे बुडवली.
"हा, म्हणजे काय कि बोट तबल्याला चिटकत नाहीत!"
मग त्यांनी मला, 'धा', 'धी ', 'ना ' वगेरे बोल वाजवायला शिकवले. कसा -बसा, केरवा, त्रिताल शिकला अन 'दादऱ्या ' ला बसकण मारली. आम्ही जन्मजात कर्मदरिद्री! वाजवण्यात लक्ष दिले नाही. एका सुंदर विश्वाला मुकलो!

एका दिवशी तबल्याचा ढिला झालेला एक गटकु, अण्णांची नजर चुकून मी पळवला. सुताराच्या किसन्या कडून, त्याची विट्टी करून घेतली. मी अन किसन्यानी दिवसभर गिल्ली दांडू खेळलो. मी एक जोरकस रद्दा मारला, तशी विट्टी समोरच्या घराच्या पत्र्यावर जाऊन पडली. ' पराई गिल्ली हमारा राज' म्हणून खच्चून ओरडलो, म्हणजे समजा उद्या किसन्या नवी विट्टी घेऊन आलातर, 'नई गिल्ली नया राज ' होणार नव्हते! संध्याकाळी शुभंकरोती म्हणून अभ्यास केला. अण्णा ऑफिसातून आल्यावर जेवणे झाली. मग अण्णांनी तबला काढला. गटकु ठोकून तो 'तालावर ' आणताना -एक महाराज गायब!
"सुऱ्या, तबल्याचा गटकु काय झाला?"अण्णा ओरडले
"मघाशी आई तबला पहात होती."
"मला नाही माहित." आईनं त्रोटक उत्तर दिल
"अजून कोण आलत?"
" हो, एक मांजर! हो, त्यांनचं ते नेलं असलं, उंदीर समजून!" माझ्या या उत्तरावर त्या दिवशी अण्णांनी माझ्या डोक्याचा गटकु 'तालावर ' आणला. डोक्यावरच टेंगुळ दोन दिवस हे जग पाहून अंतर्धान पावलं! पुढे पुढे उरलेल्या गटक्याना कीड लागली, मग अण्णा, माझ्या बाभळीच्या गाठीच्या विट्ट्या त्या जागी वापरू लागले!

तबला हे एक ताल वाद्य आहे. (त्या अर्थाने एक तालेवार प्रकरण!) गाण्याचा कणा. तशी काही गाणी तबल्या शिवाय हि होतात, पण 'उभी ' राहत नाहीत. तालात गणिती अचूकता आणि हृदयाचा ठेका असतो. तर पेटी (आणि तंतू वाद्य )ची जवळीक मनाच्या लहरींशी असते! मन आणि पेटी चंचल.(असं माझं मत आहे.) असो.

तबला, यात तबला आणि डग्गा येतो. उत्तर भारतात तबल्याला 'दाया ' म्हणजे उजवा म्हणतात. कारण तो उजव्या हाताने, म्हणजे वर्चस्व (डॉमिनेटिंग )असणाऱ्या हाताने वाजवतात. जर तुम्ही डावखोरे असाल तर 'दाया ' डावीकडे जातो. 'बाया 'म्हणजे आपण ज्याला मराठीत डग्गा म्हणतो तो.

तबला हे खरेच एक तालेवार प्रकरण असते. हे महाराज कधी खाली भुईवर बसत नाहीत. याना स्वतंत्र बैठक लागते! तबल्याला आणि डग्ग्याला वेगवेगळी! त्या छछोर गिटारी सारखे हे, गळ्यात पडत नाहीत, कि लाडे -लाडे त्या गिटारी सारखे खांद्यावर चढत नाहीत, कि लोचट 'माऊथ ऑर्गन 'सारखा मुका घेत नाहीत! तबला म्हणजे एकदम खानदानी काम हो! गाण्याची एखादी महिफल असावी, मग यांचा रुबाब पहावा. या पंगतीत पहिला मान यांचाच. हे एकदा स्थानापन्न झाले कि पाहावे. अहाहा! साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोड! किंचित स्थूल नारायणाच्या शुभांगी सालंकृत नऊ वारीतली लक्ष्मी बसल्याचा भास होतो! सणावाराच्या ह्या मेहुणा सोबत 'ब्राम्हण ' असावा तशी पेटी बैठक मांडते. मग याज्ञीक 'गायक' येतात, सभेला विनम्र अभिवादन करून, 'सा' चे प्रोक्षण सोडतात! त्यांच्या शेजारी दोन तंबोरा धारक, त्या 'सा'ने आपल्या तंबोरारुपी जोड समया चेतावतात. या जोड समया महफिल संपे पर्यंत एका लईत तेजाळत रहातात! महफिलीत उदबत्तीचा सुगंध दरवळू लागतो! इकडे तब्ब्लची, तबल्याना नमस्कार करून, तो 'सा', जो एव्हाना पेटीच्या पट्टीत पाझरलेल्या असतो, तो अलगत तबल्यावर घेतात. तो तबल्याला पण गरजेचा असतो. हा 'सा ' हि त्या चीजेची बेस लाईन असते. यावर साऱ्या गाण्याचा तोल असतो. पाश्च्यात्य संगीतात याला एक गोड नाव आहे tonic! गुटगुटीत संगीताचा आधार! असो. एव्हाना श्रोत्यांची संगीत क्षुधा अनावर झालेली असते. ' कर्णी (ध्वनी )कवळ घेता ....... 'श्रोता भूतली कोठे असतो ? 'अधांतरी हे झुले नभांगण ... ' अश्या अवस्थेला तो पोहंचला असतो! तर अशी असते हि संगीत महफिलची जादू! सगळा आनंद नाही हो, शब्दात पकडता येत, त्यात आम्ही शब्ददरिद्री! या साठी महफिलीत हजेरी लावून अनुभवावे लागते! महेफील संपते. टाळ्यांचा कडकडाट होतो. सगळ्यांच्या नजर गायकाकडेच! 'व्वा ,व्वा '. क्या बात है ', ' बढिया ' सगळं तिकडेच. गाण्या दरम्यान गायक, एखाद्या समेला तब्ब्लची कडे मान डोलवतात, तेव्हड्या दादेवर तो खूष! तब्ब्लचीने महफिल संपल्यावर केलेल्या नम्र कुर्नीसातला, सुद्धा श्रोते नजरअंदाज करतात! तो गपचिप तबला डग्ग्याचे, बेरहमीने कान पकडून पडद्याआड जातो. अरे जरा संभालकें लेजावो तबलेको, उस्ताद!, क्यू कि,
' ये तुम्हारा अतीत है,
ये तुम्हारा अजीज है,
ये तुम्हारी मजबुरी है,
ये तुम्हारी शान है,
ये तुम्हारी जान है,
और यही तुम्हारी मंजिल भी है!'

तबल्याचे स्वामित्व ताला कडे आहे. तसे बरेचसे ताल आहेत पण, नेहमी वापरले जाणारे काही ताल म्हणजे तीनताल (१६मात्रांचा ), झुमरा (१४), तीलवाडा (१६), धमार (१४), एकताल (१२), जपताल (१०), केरवा (८), रूपक (७), दादरा (६). धमार ,एकताल हे संथ आणि माध्यम लयीचे सोबती, तर जपताल ,रूपक, दादर गती फुलवतात. पण त्रिताल हा ठेका संथ आणि गतिमान दोन्ही लयीत उपयुक्त आहे. कारण हा एक अतिशय बांधेसूद (सिमेट्रिक )ताल आहे. त्यामुळे तो संथ आणि गतिमान लयीत आपली छाप (कि थाप )सोडतो! याशिवाय काही अभावाने वापरले जाणारे ताल, जसे अदाचौताला (१४), दीपचंदी (१४), शिखर (१७), सुलताल (१०), तीवर (७), पंचम सवारी (१५). ब्रह्मताल, यात तर तब्ब्ल अठावीस मात्रा आहेत! वादकांच्या मनाची, मनगटाची,आणि स्मृतीची सत्व परीक्षाच! आणि गाणारा किती संथ गतीत तरंगत असेल देव जाणे! मी या तालावरची एखादी चीज /गाणे खूप दिवसा पासून शोधतोय.

तबल्याच्या शाईस आम्ही लहानपणी तबल्याचा डोळा म्हणायचो. एक सरळ डोळ्याचा आणि एक बांगा डोळ्याचा! अण्णा देवाघरी गेले. आणि तबला माळ्यावर अज्ञातवासात! एकदा बायकोने ती 'अडगळ ' माळ्यावरून खाली काढली. मी तो साफ करून, पुसून नीट झाकून कोपऱ्यात ठेवला. अण्णांच्या जुन्या आठवणीने उर भरून आला. दुसरे दिवशी दोन फुले वाहिली, बरे वाटले. खूप सैल झाला होता, शाई उडाली होती. नीट करून कधी मधी वाजवण्याचे मनाशी पक्के केले. चार दिवसांनी अण्णांचे श्राद्ध होते. दुपारी चार पर्यंत धामधूम संपली. रात्री जेवण नव्हते, म्हटले तबल्यावरून हात फिरवावा. काल पर्यंत्त तो ज्या कोपऱ्यात होता, तो कोपरा आज रिकामा होता!
"आग, माझा तबला?"
"तो न, परवाच भंगारवाल्याला दिला! नुस्ती मेली अडगळ! सगळी कीड लागली होती! बुळुबुळु पीठ घरभर पसरत होत!"
माझ्या काळजाचा ठोका चुकला! खरे सांगतो त्या वर्षी नंतर अण्णांचे श्राद्ध काही माझ्या हातून नाही घडले! बायको साठी ती 'अडगळ 'होती, पण माझ्यासाठी, तो ' ठेवा ' होता! माळ्यावरून तो 'बांगा 'डोळा माझ्याकडे आशेने पहात असावा, आज ना उद्या एखादी थापा पडेल म्हणून! त्या दिवशी माळ्यावरच्या, त्या अडगळीच्या माझे घर आणि मन रिकामे केले!

सु र कुलकर्णी ---आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .