Swaraja Surya Shivray - 16 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | स्वराज्यसूर्य शिवराय - 16

Featured Books
  • अपराध ही अपराध - भाग 24

    अध्याय 24   धना के ‘अपार्टमेंट’ के अंदर ड्र...

  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

Categories
Share

स्वराज्यसूर्य शिवराय - 16

स्वराज्यसूर्य शिवराय

भाग सोळावा

महापराक्रमी मुरारबाजी

शहाजीराजांच्या आकस्मिक निधनानंतर जिजाऊंचे मन सती जाण्यापासून वळविण्यात शिवराय यशस्वी झाले. सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. जिजाऊंशिवाय स्वराज्य स्थापन करण्याची घोडदौड चालू ठेवण्याची कल्पनाच शिवराय सहन करू शकत नव्हते. शहाजी राजे ....शिवरायांचे वडील अचानक गेले. त्या जबरदस्त अशा धक्क्यातून शिवराय हळूहळू सावरले. दुःख करत बसायला वेळ तरी कुठे होता? शिवरायांनी पुन्हा स्वराज्याकडे लक्ष केंद्रित केले. मुधोळ, कुडाळ हे विजय आणि कोकणातील एका बेटावर सिंधुदुर्गसारख्या बळकट किल्ल्याची बांधणी करण्या- सोबतच वेंगुर्ल्याची मोहिम अशा काही यशस्वी मोहिमा शिवरायांनी पूर्ण केल्या.…

तिकडे औरंगजेबाला शिवरायांकडून सातत्याने होणारे पराभव, भल्याभल्या सरदारांची शिवरायांनी मोडलेली खोड ह्या गोष्टी सहन होत नव्हत्या तो भयंकर चिडला होता, संतापला होता. तो सारखा एकच विचार करीत होता की, 'असे का व्हावे? एकापेक्षा एक बलाढ्य सरदार, प्रचंड फौजा देऊन आपण शिवाजीचा पराभव करण्यासाठी पाठवले परंतु झाले उलटेच शिवाजीपुढे कुणाचेच काही चालले नाही. आपल्या शूरवीर सरदारांना धूळ चारून शिवाजी सरळ सुरतेवर चालून जातो म्हणजे काय? सुरत म्हणजे आपला आत्मा! आणि शिवाजी त्या आत्म्यावरच घाव घालतो म्हणजे काय? नाही. नाही. आता शांत बसायचे नाही. काहीही करून शिवाजीचा बंदोबस्त करायलाच हवा, त्याचा नायनाट व्हायलाच हवा. पण कसा? आपल्याजवळ असणाऱ्या मुघल सरदारांजवळ शिवाजीचा विषय काढला की, स्मशानशांतता पसरते. कुणी ब्र काढायला तयार होत नाही. कुणास सांगावे? कुणाला शिवाजी काटा काढायला पाठवावे? मीच स्वतः गेलो तर ? शिवाला हरवणे तसे अवघड नाही. पण त्याच्या किल्ल्यावर निशाण फडकवणे अत्यंत अवघड आहे. मी येतोय हे ऐकून शिवा एखाद्या मजबूत किल्ल्यावर जाऊन बसला तर मग त्याला हरवणे कठीण आहे. बरे, तो लपून बसला असे समजावे तर तसे होत नाही तो लपूनछपून, गनिमीकावा खेळून त्रस्त करून सोडतो. तिकडे जाऊन दोन-चार मराठे सरदार फोडावेत म्हटले तर तेही गळाला लागत नाहीत आणि लागलेच तर फार फायदाही होत नाही. त्यापेक्षा काट्याने काटा काढावा, कुण्यातरी मराठा सरदाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवाजीला टिपावे. कोण आहे असा मराठा सरदार? जो माझ्या हाकेला तर देईलच पण त्या शिवाला चारी मुंड्या चीत करेल ? कोण ? कोण?...." असा विचार करणाऱ्या औरंगजेबाला एका सरदाराची आठवण झाली. औरंगजेब मनात म्हणाला,' जो मार खाऊन परतणार नाही तर मार देऊन, शिवाजीचा सुभा पूर्णपणे मोगलाईत आणेल. त्या शिवाजीला नाक घाशीत दरबारात हजर करेल.' विचार करताना औरंगजेबास एकमेव सरदाराची आठवण झाली. तो म्हणजे जयपूरच्या राजपूत वंशातील अत्यंत पराक्रमी, प्रचंड अनुभवी, बुद्धिमान, भारदस्त असा पोलादी सेनापती म्हणजे मिर्झाराजे जयसिंग! ठरले. जयसिंहाला शिवाजीवर पाठवायचे. आणि मग बघूया, मिर्झाराजाच्या तावडीतून शिवा निसटतो कसा ते? आजवर शिवाजीने मोगलाईस दिलेल्या एकूणएक धक्क्यांचा, पराभवाचा बदला घ्यायला तितकीच सक्षम, जशास तशी उत्तर देऊ शकेल, शहाजीपुत्राला पाणी पाजू शकेल अशी एकच व्यक्ती आणि ती म्हणजे मिर्झाराजे जयसिंग ! विशेष म्हणजे औरंगजेब आणि जयसिंग हे अगदी जवळचे नातेवाईक होते. मिर्झाराजे यांच्या आजोबांची बहीण आणि दुसरे म्हणजे मिर्झाराजे यांची आत्या अशा दोन स्त्रियांचे औरंगजेबाच्या जवळच्या नातेवाईकांसोबत लग्न झाले होते.

मनात घोळणारा विचार अंमलात आणण्यासाठी औरंगजेबाने ताबडतोब मिर्झाराजे यांना बोलावून घेतले.बादशहाचा निरोप मिळताच मिर्झाराजे तातडीने दाखल झाले. औरंगजेबाने त्यांना बोलावण्यामागचा हेतू सांगितला. जयसिंहांनी ताबडतोब होकार देऊन ती मोठी जबाबदारी स्वीकारली. औरंगजेब इथेच थांबला नाही तर त्याने मिर्झाराजांसोबत त्यांचा सहाय्यक म्हणून दिलेरखान नावाच्या एका सरदाराची नेमणूक केली. वास्तविक जयसिंह हे औरंगजेबाच्या अगदी जवळच्या नात्यातील. परंतु औरंगजेब मुळात अत्यंत संशयी. त्याच्या मनात कुठेतरी मिर्झाराजे जयसिंह यांच्याबद्दल संशय होता, कदाचित ते राजपूत असल्याने शिवरायांचे आणि त्यांचे सूत जमेल आणि मग मिर्झाराजे शिवाजीला मिळाले तर आपले काही खरे नाही या भीतीपोटी त्याने स्वतःचा हेर म्हणून दिलेरखानास नेमले असावे. ही गोष्ट मिर्झाराजे यांच्याही लक्षात आली. आपल्या खानदानाने जीवाचे रान करून या दरबाराची चाकरी केली, इमानेइतबारे सेवा केली तरीही आपण बादशहाचा विश्वास पूर्णपणे जिंकू शकलो नाही ही खंत जयसिंहांना वाटत होती परंतु औरंगजेबाशी अत्यंत एकनिष्ठ, प्रामाणिक असलेल्या जयसिंहांनी ती गोष्ट फार मनावर घेतली नाही. उलट दरबारात एकापेक्षा एक शूर सरदारांची रांग असताना औरंगजेबाने या कामगिरीवर आपली नेमणूक केली ह्या गोष्टीचे मिर्झाराजेंना फार अप्रूप आणि अभिमान वाटत होता. औरंगजेबाकडे आपली निष्ठा, इमानदारी सिद्ध करण्याची ही एक सर्वोत्तम संधी आहे. तिचे सोने करायचे, शिवाजीचा पार बिमोड करायचा हा मनोमन निश्चय करुन मिर्झाराजे जयसिंग हे फार मोठ्या सैन्यासह शिवरायांच्या स्वराज्याच्या दिशेने निघाले. औरंगजेबाच्या आदेशानुसार मिर्झाराजेंच्या दिमतीला दाऊदखान, इहतशामखान, शेखजादा, कुबादखान, जबरदस्तखान, बख्तियार, मुल्ला याहिया, पूरणमल बुंदेला, राजा गौड, सुजनसिंह बुंदेला, राजा जयसिंह सिसोदिया या बड्या सरदारांसह खुद्द मिर्झाराजे जयसिंह याचा मुलगा कीरतसिंह हे सर्व हजर झाले. मिर्झाराजे यांच्या इच्छेनुसार तोफखाना प्रमुख म्हणून इटली या देशातील निकोलाओ मनुची या हुशार माणसाला पाठवले. जयसिंहांची फौज ज्या ज्या भागातून मार्गक्रमण करेल त्या परिसरातील सरदारांनी मिर्झाराजे यांच्या सेवेत दाखल व्हावे असे फर्मान औरंगजेबाने काढले त्यामुळे मिर्झाराजेंच्या फौजेचा आकडा चांगलाच फुगत होता.

पौष महिना संपत होता. पौष अमावस्येला सूर्यग्रहण होते. हा योग म्हणजे दानधर्म करण्याची पर्वणी! तिकडे राजगडावर जिजाऊंना ग्रहण पर्वकाळात दानधर्म करण्याची इच्छा झाली. माँसाहेबाची इच्छा शिवरायांनी वरचेवर झेलली. त्यांना आईची इच्छापूर्ती करण्यासाठी काय करू आणि काय नको असे झाले.शिवरायांनी ठरवले. माँसाहेबाची दानधर्म करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी खुद्द माँसाहेबाची सुवर्णतुला करायची आणि ते सारे सुवर्ण दान करायचे. जिजाऊं - सारख्या आदर्श, पराक्रमी, निस्वार्थी, तेजस्वी, परोपकारी, धैर्यशील मातेची तुला करायची म्हणून शिवरायांनी श्रीमहाबळेश्वर या अत्यंत पवित्र, पुरातन तीर्थक्षेत्राची निवड केली. अत्यंत रमणीय, मनमोहक असा परिसर लाभलेले हे देवस्थान. शिवरायांनी निवडलेले हे तीर्थक्षेत्र जिजाऊंनी खूप आनंदाने स्वीकारले कारण शहाजी राजे आणि जिजाऊ यांचे गुरू गोपाळभट हे महाबळेश्वर येथील रहिवासी होते. श्री शंभोशंकर आणि गुरुच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत तो सोहळा होतोय हे ऐकून जिजाऊंचा आनंद द्विगुणित झाला. पुढील गोष्टींना वेळ तो कितीसा लागणार?

सहा जानेवारी सोळाशे पासष्ट या शुभदिनी अत्यंत धार्मिक, समाधानी आणि आनंदी वातावरणात जिजाऊ माँसाहेबाची षोडशोपचारे सुवर्णतुला करण्यात आली. सर्वत्र एखाद्या सणाचे वातावरण होते. शिवरायांनी यानिमित्ताने अजून एक योग साधला. सोनोपंत डबीर हे स्वराज्याचे आणि शिवरायांचे जुने जाणते मार्गदर्शक आणि वकील. कोणतीही कसूर करता पंतांनी अत्यंत निष्ठेने, इमानेइतबारे, निस्वार्थीपणे आपले कार्य केले होते. सोनोपंत डबीर थकत चाललेले पाहून शिवरायांनी जिजाऊंच्यासोबत सोनोपंत यांचीही सुवर्णतुला करून त्यांच्या निस्वार्थ सेवेचा बहुमान केला. राजांनी दिलेल्या त्या आगळ्यावेगळ्या मानाने सोनोपंत गहिवरले. त्यांचे डोळे भरून आले. तुला होईपर्यंत त्यांचे डोळे आसवं गाळीत होती. हा एक नयनरम्य सोहळा ह्रदयात साठवून सारे पुन्हा राजगडाकडे निघाले. परंतु त्याचवेळी एक संकट घोंघावत येत होते. मिर्झाराजे जयसिंह आणि दिलेरखान ही जोडी स्वराज्याच्या दिशेने फार मोठा लष्करी लवाजमा घेऊन दौडत होती...…

मिर्झाराजे जयसिंह हे शिवभक्त होते, शिवाचे उपासक होते. त्यांनी शिवप्रभूची आराधना, पूजा आरंभ केली ती यासाठी की, ते एका फार मोठ्या कामगिरीवर निघाले होते. वाटते तितकी कामगिरी सोपी नाही हे जयसिंह जाणून होते. शिवरायांची ताकद फार नसली तरीही ती धोकादायक होती. कमताकद म्हणवणाऱ्या शिवाजीने भल्याभल्यांना पाणी पाजले होते. कुणाचा कोथळा बाहेर काढला होता, कुणाची बोटे तोडली होती तर मुघलशाहीतील अत्यंत सुरक्षित आणि श्रीमंतीत क्रमांक एक अशी ओळख असलेल्या सुरतेवर छापा मारून मुघलशाही हादरवून टाकली होती. अशा शिवाजीसोबत आपला सामना आहे ही बाब नाही तरी मिर्झाराजे यांना चिंतेत टाकत होती. विचार करायला भाग पाडत होती. सामदामदंडभेद या नीतीचा उपयोग करावा लागेल हे जयसिंहांनी ओळखले आणि त्यासोबत शिवशंकराचा आशीर्वाद असावा म्हणून शिवाची प्रार्थनाही सुरू केली. मोघलांची जोडगोळी स्वराज्यावर चालून येत आहे हे शिवरायांना समजले. ते ऐकून शिवराय डगमगले नाहीत, घाबरले नाहीत. शिवरायांचे साथीदारही घाबरले नाहीत. सर्वांनी मिळून अंदाज घेतला. शत्रू मोठ्या तयारीनिशी बऱ्हाणपुराहून निघालाय म्हणजे त्याला आपल्या कक्षेत यायला वेळ लागणार. तो काही रात्रीचा दिवस करून किंवा वाऱ्याप्रमाणे धावत येणार नाही. त्याला तोंड देण्यासाठी भरपूर पैसा, साहित्य लागणार होते. त्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. शिवरायांनी फार पूर्वीपासूनच सिंधुदुर्गाच्या पुढे असलेले एक शहर धनदौलत मिळवण्यासाठी निवडून ठेवले होते. समुद्रमार्गाने जाऊन शत्रूवर चढाई करणारी ती पहिलीच मोहीम! पण प्रचंड आत्मविश्वास, मावळ्यांची साथ या गोष्टी शिवरायांना वेगळे काही तरी करण्यासाठी प्रेरित करत असत. माँसाहेबाचे आशीर्वाद नेहमीच त्यांच्या पाठीशी असत. कडवाडच्या दक्षिणेला बसनूर हे अतिशय श्रीमंत असे शहर होते परंतु बंदोबस्ताच्या बाबतीत तितकेच गरीब आणि दुर्लक्षित होते. याचा फायदा मावळ्यांनी घेतला. एकेदिवशी सकाळी सकाळी बसनूर शहराच्या सागर किनारी थांबलेल्या जहाजांमधून मावळ्यांनी धडाधड उड्या घेतल्या आणि बसनूर शहरातील श्रीमंतांवर दणादण छापे सुरु केले. शहरात फार मोठा गोंधळ सुरू झाला. 'शिवाजी आला.' हे दोन शब्द ऐकताच बड्याबड्यांचे धाबे दणाणले, जणू दातखिळी बसू लागली. अंगात भीतीने कापरे भरू लागले. प्रतिकार करण्यासाठीही तशी सेना, तशी शक्ती आणि हिंमतही नव्हती. शिवरायांच्या मावळ्यांनी दिवसभर शहरातून जमेल तेवढी जास्तीतजास्त धनदौलत जमा केली. निष्पाप, स्त्रिया, मुले, देवस्थाने यांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचविता प्रचंड धन घेऊन शिवरायांनी परतीचा प्रवास सुरु केला. परततांना त्यांनी गोकर्ण-महाबळेश्वराचे दर्शन घेतले. अंकोला मार्ग परत जातांना शिवरायांनी अजून एक चढाई केली ती आदिलशाहीच्या मुलुखात! कारवार या प्रदेशात शिवराय घुसले. तिथला सुभेदार बहलोलखान कारवार प्रांतात नव्हता. याच प्रांतात इंग्रजांचीही एक वखार होती. शिवराय कारवारात आले या बातमीनेच वखारीत असलेल्या इंग्रजांची पाचावर धारण बसली.शेरखान नावाचा एक सरदार तिथे होता. शिवाजी येत आहेत या बातमीनेच तो हादरला परंतु घाबरला नाही. सुभ्यातील लोकांना विश्वास देत त्याने शिवरायांना निरोप पाठवला की, 'मी कारवार सुभ्यातील जनतेच्या रक्षणाची जबाबदारी सांभाळली आहे. तेंव्हा कारवारला कोणताही धक्का लावता तुम्ही आले तसे निघून जा.' शिवरायांनी शेरखानास उलट निरोप दिला की, 'तुम्ही स्वतः हे शहर सोडून निघून जावे. आमच्या कामात विघ्न आणू नये आणि इंग्रजांच्या वखारीत असलेला माल आमच्या स्वाधीन करण्यास सांगावे.' तो निरोप ऐकून शेरखानाने मनोमन विचार केला. शिवरायांशी लढण्यात अर्थ नाही हे जाणून त्याने इंग्रजी वखारदारांशी चर्चा केली. आणि जास्तीत जास्त खंडणी, नजराणा शिवरायांकडे पाठवला. शिवरायांनीही जास्त ताणून धरले नाही. तो सारा माल घेऊन शिवराय निघाले.…

मिर्झाराजे आणि दिलेरखान औरंगाबाद येथे पोहोचले होते. स्वराज्यासाठी शिवरायांना मदत करणाऱ्या सरदारांना पत्र पाठवून औरंगजेबाच्या फौजेला मदत करण्याचे आवाहन केले. सोबतच अफजलखानाचा मुलगा फाजलखानासही त्यांनी मदतीसाठी पाचारण केले. हे करत असताना स्वराज्यातील भूभाग आधी जिंकावा की शिवाजीच्या ताफ्यातील गड आधी जिंकावेत यावरून मिर्झाराजे आणि दिलेरखान यांच्यामध्ये मतभेद झाले परंतु दिलेरखानाला नाराज करणे परवडणारे नाही हे ओळखून मिर्झाराजे यांनी दिलेरखानाच्या प्रस्तावाला होकार दिला. त्याप्रमाणे स्वराज्यातील किल्ले ताब्यात घ्यावेत असे ठरले. तो मोर्चा पुण्यात पोहोचला. त्यावेळी पुण्यात महाराजा जसवंतसिंह राठोड हा ठाण मांडून बसला. मिर्झाराजे येणार म्हणताच तो पुणे सोडून निघून गेला. अशाप्रकारे मिर्झाराजेंना सहजासहजी पुणे प्रांतात प्रवेश मिळाला. पुण्यात आल्यानंतर मिर्झाराजेंनी पुढील टप्प्याचे व्यवस्थित नियोजन केले. त्यांनी पहिली चढाई करण्यासाठी गड निवडला तो म्हणजे पुरंदर! वास्तविक पाहता पुरंदरचा गड हा भक्कम किल्ला होता. तो सहजासहजी जिंकला जाणार नाही हे दिलेरखानाने जाणले. तितक्यात त्याचे लक्ष पुरंदर किल्ल्याच्या जवळ असलेल्या वज्रगडाकडे गेले आणि तो आनंदला. त्याच्या चाणाक्ष नजरेने हेरले की, वज्रगडाहून पुरंदरवर तोफांचा मारा करून पुरंदरला खिळखिळे करताना, आतल्या लोकांना घाबरवता येईल म्हणून त्याने आपला मोर्चा वज्रगडाकडे वळवला. परंतु वज्रगडावरील मावळे लेचेपेचे नव्हते. स्वराज्य रक्षणाचा टिळा लावून, घरादारावर तुळशीपत्र ठेवून ते गडावर जमले होते. त्या शिलेदारांनी अटीतटीची, निकराची झुंज दिली. परंतु शेवटी दिलेरखान जिंकला. वज्रगड ताब्यात येताच त्याने काही सरदारांना पुरंदरच्या किल्ल्यावर तोफांचा मारा करण्याचे आदेश दिले आणि आपण स्वतः पुरंदर किल्ल्यावर चालून गेला. तिथे किल्लेदार होता ... मुरारबाजी! ....मुरारबाजी देशपांडे! पुरंदरला विषारी विळखा पडला. किल्ल्यावरून प्रतिकार सुरू झाला. वास्तविक पुरंदर गडाला पडलेल्या वेढ्यातून गडावर रसद पोहोचविणे अत्यंत कठीण अशी गोष्ट. परंतु शिवरायांच्या शिलेदारांना कठीण असे काही वाटतच नसे. दाऊदखान या क्रुर सरदाराच्या विळख्यातून गडावर मदत पोहचली आणि दिलेरखानाच्या फौजेत दहशत पसरली. दिलेरखानाने दाऊदखानाची खरडपट्टी काढली. तो अपमान सहन झालेला दाऊद म्हणाला, 'हा वेढा म्हणजे निव्वळ पूरंदरच्या भक्कम तटावर डोके आपटून घेण्यासारखे आहे. काहीही निष्पन्न होणार नाही.' त्या दोघांमधील वाद मिर्झाराजेंना समजला. त्यांनी दाऊदकडे शिवाजीच्या राज्यात घुसून धुमाकूळ घालण्याची कामगिरी सोपवली.

दुसरीकडे मुरारबाजीही स्वस्थ बसला नाही. त्याने ऐनकेनप्रकारे मुघलीसैन्यावर छापे मारून त्यांना जेरीस आणणे सुरु ठेवले. एकदा तर मावळे सरळसरळ बरसणाऱ्या मुघलांच्या तोफेजवळ पोहोचले आणि काही तोफा निकामी करून परतले. दिवसेंदिवस लढाई उग्र होत होती. दिलेरखान गडाच्या माचीवरून गडावर तोफांचा मारा करत होता परंतु तो मारा गडावर पोहोचत नव्हता. गडावरील बुरुज अडथळे निर्माण करीत होते. दिलेरखानाला काय करावे ते समजत नव्हते. शेवटी मिर्झाराजेंनी मार्ग शोधला. गडावरील माचीला भिडून उंच अशा काही माची उभ्या करायच्या आणि मग तिथून गडावर तोफांचा मारा करायचा. त्याप्रमाणे जाड लाकडी फळ्यांची माची तयार झाली. तिथे तोफा पोहोचविण्यात आल्या. या माचीपासून गडावर असलेला 'सफेद बुरूज' लक्ष्य करण्यासाठी निवडण्यात आला. तिथूनच पुरंदरवर घाव घालण्याची तयारी आणि त्याबरहुकूम कार्यवाही सुरू झाली. प्रत्युत्तरादाखल मुरारबाजीच्या शिलेदारानी जोरदार हल्ला केला. कुणीही नमत नव्हते. मराठे हटत नाहीत हे पाहून दिलेरखान संतापला, चिडला. परंतु त्याने हार मानली नाही. तो वेगवेगळ्या प्रकारचे डाव टाकत होता. मावळे कडवा प्रतिकार करत असतानाही तो हटला नाही. एक-एक माची, एक-एक बुरुज जिंकत दिलेरखान पुरंदर जिंकण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत होता.

घेतला. शेवटी मुरारबाजीने एक धाडसी निर्णय घेतला. क्षणोक्षणी मुघलांच्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या मावळ्यांना पाहून मुरारबाजीने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. सातशे शूरवीर मावळे घेऊन स्वतः दिलेरखानावर चालून जायचे. समोरासमोर लढाई करून शत्रूचा फडशा पाडताना त्या दिलेरखानाच्या नरडीचा घोट घ्यायचा. एकदा निर्णय झाला म्हणजे झाला. माघार घ्यायची नाही. दुसरीकडे दिलेरखानाचे हजारो सैनिक गड चढू लागले. समोरासमोर सारे भिडले. प्रचंड रणकंदन माजले. कुणीही माघार घेत नव्हते. मावळे अत्यंत जोशाने, तडफेने झुंज देत होते. मराठे लढत शत्रूला मागे हटवत होते. मराठ्यांचा तो त्वेष पाहून दिलेरखान चक्रावून गेला. मुरारबाजीच्या शूरवीरांनी थेट दिलेरखानाच्या छावणीकडे कुच केले. स्वतः मुरारबाजी प्राणपणाने शौर्याची पराकाष्ठा करीत होता. त्याची हिंमत, शौर्य, पराक्रम पाहून दिलेरखान लढायचे थांबला. तो मुरारबाजीस थांबवून म्हणाला,

"अरे, शूरवीर बहाद्दर सैनिका, तुझ्या पराक्रमावर, धाडसावर मी खूप खुश झालो आहे. शिवाजीची साथ सोड. आमच्या बाजूला ये. तुझ्या शौर्याला साजेल असे भरपूर काही मिळवून देईन. तुला जहागीरी मिळवून देईल."

मुरारबाजी देशपांडे या स्वाभिमानी मावळ्याने ते ऐकले. मुरारबाजी प्रचंड संतापला. आवेशाने, तुच्छतेने दिलेरखानाकडे पाहून म्हणाला, "अरे, ती भीक हवीच कुणाला? हिंमत असेल तर हत्ती सोडून खाली ये. समोरासमोर लढ आणि मग बघ स्वराज्यासाठी, शिवरायांसाठी लढणाऱ्या मावळ्याची ताकद...." असे बोलत असताना मुरारबाजीच्या दोन्ही हातातील तलवारी दिलेरखानाच्या माणसांची कत्तल करीत होत्या. ते पाहून आणि मुरारबाजीचे अभिमानाचे बोल ऐकून दिलेरखान मनोमन संतापला. त्याने धनुष्यबाणाची दोरी थोडी जास्तच जोर लावून खेचली. तो बाण 'सूं... सूं...' असा आवाज करत मुरारबाजीच्या दिशेने निघाला. भयानक वेगाने मुरारबाजीच्या गळ्यात घुसला.... त्या बाणाने स्वतःचे काम चोख बजावले. दिलेरखान आणि पुरंदरचा किल्ला यांच्यामध्ये छातीचा कोट करुन उभ्या असलेल्या मुरारबाजीची 'मोडेल पण वाकणार नाही.' या बाण्याची मान धडावेगळी केली. एक शूरवीर स्वराज्यासाठी कोसळला, प्राणाची आहूती देऊन शांत झाला.... कायमचा !

नागेश सू. शेवाळकर.