Swaraja Surya Shivray - 4 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | स्वराज्यसूर्य शिवराय - 4

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

स्वराज्यसूर्य शिवराय - 4

॥॥ स्वराज्यसूर्य शिवराय ॥॥

【भाग चार】

॥॥ जन्म शिवबाचा ॥॥

काळ त्याच्या गतीने सरकत होता. तो कुणासाठी थांबत नाही. कुणासाठी तो लाभदायी असतो तर कुणासाठी तो त्रासदायक असतो. महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात म्हणावा तसा फरक पडला नव्हता. मुघल, आदिलशाही, निजामशाह यांच्यामध्ये कलह, युद्ध सुरुच असायचे. त्यामध्ये होरपळल्या जायची, भरडल्या जायची, नेस्तनाबूत व्हायची ती सामान्य जनता. मराठी सरदार मात्र कधी मुघल, कधी आदिलशाही तर कधी निजामशाही यांच्याकडे सेवा बजावत असत. ही सारी परिस्थिती जवळून पाहणारी, त्या परिस्थितीचे चटके थेट ह्रदयापर्यंत अनुभवणारी जिजाऊ ते सारे पाहून अस्वस्थ होत असे.या अशाच दुश्मनीमध्ये तिने सख्खा भाऊ,गमावला होता तर सोबतच स्वतःच्या दिरालाही तिने गमावले होते. तिने सांत्वन करावे कुणाचे? माहेरच्या माणसांचे करावे की, सासरच्या मंडळीला सांभाळावे? ती स्वतः दुःखाच्या डोंगराखाली तडफडत असताना तिला कुणी सांभाळावे? तिला कुणी आधार द्यावा? जिजाऊ प्रचंड दुःखी, अस्वस्थ होत्या. स्वतःचे भयंकर दुःख विसरून ती सासरच्या नातेवाईकांसोबत हसत होती, प्रसंगी त्यांच्या दुःखात सहभागी होत होती परंतु तिच्या आतमध्ये एक जखम सातत्याने खोलवर भळभळत होती, की शक्ती, युक्ती, ताकद, पैसा, पराक्रम, धाडस, मनुष्यबळ, मराठी भूभागाची खडानखडा माहिती असूनही मोठमोठाले पराक्रमी, शूरवीर मराठी सरदार हे परक्यांच्या दारी का पाणी भरत असतात? ही सर्व मंडळी एक झाली तर या सर्व जुलमी राजवटींना पराभूत करायला फारसा वेळ लागणार नाही. का आमच्या मराठी माणसांना स्वतंत्र असे राज्य नको आहे? किती दिवस ही महापराक्रमी मंडळी दुसऱ्याच्या हाताने पाणी पिणार? स्वतःच्याच नातेवाईकांचे मुडदे पाडणार? आपल्याच लेक-बहिणीच्या भाळी असलेले कुंकू तलवारीच्या एका घावाने पुसणार? स्वतःच्या रक्ताच्या नात्यागोत्यातील चिमुकल्या जीवांना अनाथ करणार? अशा प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या जिजाऊ अस्वस्थ झाल्या की, कुठेतरी एकांती बसून राहायच्या. उत्तरे न सापडणाऱ्या प्रश्नांची सातत्याने उजळणी करीत असताना एक क्रांतिकारी विचार त्यांच्या डोक्यात घोळत असे. त्यांना वाटे बस झाला आता ह्या जुलमी राजवटींचा हैदोस. या जुलमी राजवटींचा नायनाट करावा आणि आपली, आपल्या मराठी माणसांची सत्ता आणावी. मराठी राज्य स्थापन करून रामराज्य आणावे. पण कसे? कुणी आणावे? कसे आणावे? कधी आणावे? जिजाऊला या मराठी प्रदेशावर मराठी माणसाला सिंहासनावर बसलेले पाहायचे होते. या राज्यात त्यांना सर्वत्र भगवा डौलाने, दिमाखाने फडकत असलेला बघायचा होता. अशा प्रश्नांची एक लड जिजाऊंच्या मनात कायम स्फोट घडवून आणत असे. पण हे सांगावे कुणाला आणि कधी? ज्यांना सांगावे ते शहाजीराजे हे तर कधी आदिलशाही, तर कधी निजामशाही यांच्या क्रुर राजवटींच्या सेवेत आणि त्यांच्या विस्तारीकरणात गुंतलेले असत. असे विचार मनात घेऊन जिजाऊ आला दिवस ढकलीत होत्या. अस्वस्थ झालेल्या जिजाऊ मग रामायण, महाभारत या सारख्या धर्मग्रंथांचे वाचन करीत असत. राम, हनुमान, कृष्ण, पांडव यांच्या पराक्रमी कथा वाचताना त्यांच्या भावना उचंबळून येत असत. त्यासोबत सीता, द्रौपदी, कुंती यांच्या कथा वाचताना त्या अंतर्मुख होत असत. जिजाऊंना वाटायचे आपण नाही का, कुंतीमातेप्रमाणे वीर पुत्रांना जन्म देऊ शकणार? कुंतीच्या महापराक्रमी पुत्रांनी धर्माचे रक्षण केले, सुराज्य निर्माण केले, रयतेला सुखी केले तसे मी नाही का करु शकणार?

शहाजीराजे यांनी आदिलशाही सोडून पुन्हा निजामशहाशी हात मिळवणी केली. तशातच त्यांचे सासरे लखुजीराव जाधव हेही निजामशाहीच्या सेवेत आपल्या मुलांसह दाखल झाले. काय योगायोग असतो, किंवा काय विधिलिखित असते ते कुणाला कळत नाही. पण काही वर्षांपूर्वी एका छोट्या कारणाने एकमेकांना संपवायला निघालेले, त्यात मुलाचा आणि भावाचा बळी देणारे सासरे - जावाई पुन्हा निजामाच्या झेंड्याखाली एकत्र आले होते. काळ अत्यंत धामधुमीचा होता. शहाजीराजे यांनाही या नोकरीच्या अदलाबदलीचा कंटाळा आला होता. मुळात स्वाभिमानी असलेल्या शहाजींना दुसऱ्याकडे अशी चाकरी करणे, स्वतःच्या हुशारीचा, पराक्रमाचा उपयोग दुसऱ्यासाठी करणे आवडत नसे. त्यांनाही वाटायचे, 'आपले स्वराज्य असावे, त्या स्वराज्याचा एक मराठी माणूस राजा असावा, तो जनहितार्थ निर्णय घेण्यास समर्थ असावा. पण कसे ? कोण उचलणार हे धनुष्य? समजा माझ्यासारख्या व्यक्तीने तसे धाडस केले तर इतर मराठी शूरवीर, सरदार हे पाठीशी खंबीरपणे उभे राहतील? बादशाह या शूरवीरांचे कान भरून आपल्यावरच हल्ला करायला पाठवणार नाही कशावरून? आपलीच माणसं आपलाच विरोध, पराभव करणार नाहीत का?' अशा विचारश्रुंखलेत शहाजीराजे अडकलेले असायचे. जिजाऊंना पतीची तगमग, तळमळ लक्षात येत असे. आपला पती साधासुधा नाहीतर एक महापराक्रमी योद्धा आहे. शत्रूवरच नव्हे तर ते ज्या कुणाकडे काम करत असतील ती राजवटही शहाजीराजांना वचकून असते, आपल्या पतीचा एक आदरयुक्त दरारा आहे. राजे दुसरा पर्याय नाही म्हणून दो मनाने ही चाकरी करताहेत ही जाणीव असूनही जिजाऊला मनोमन वाटे की, राजांनी ही चाकरीची वस्त्रं उतरवून फेकून द्यावीत. स्वतःच्या हिंमतीने, अंगभूत बळावर रयतेचे, स्वतःचे असे राज्य उभारावे. हे काम अत्यंत अवघड, जीवावर बेतण्यासारखे असे आहे हेही जिजाऊ जाणून होत्या परंतु त्यांच्या मनातला विचार, तगमग त्यांना शांत बसू देत नसे.त्या जहागिरीच्या कामात लक्ष घालत होत्या. सोबत असणाऱ्या जुन्या जाणत्या शहाजींच्या साथीदारांकडून राजकारणातील चढाओढ, गुंतागुंत समजून घेत होत्या. जनतेची आर्थिक स्थिती, सामाजिक आणि धार्मिक कोंडी, सुख-दुःख जवळून अनुभवत होत्या. जनतेचा मुक आक्रोश ऐकताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की, सामान्य लोक या जुलुमशाहीला, रोजच्या लढायांना कंटाळले आहेत, त्रासले आहेत. आतल्या आत एक ज्वालामुखी धगधगतो आहे. या रोषाला, या संतप्त ज्वालांना कुणी प्रकट करणारा मिळाला तर ही भयभीत असली तरी मुळात धाडसी, पराक्रमी जनता या परकियांच्या सत्तेचा सारीपाट, ते मानवी रक्ताने माखलेले सिंहासन उलथवून द्यायला मागेपुढे पाहणार नाही पण या जनतेला एकवटणार कोण? त्यांच्या मनगटातील शक्तीला चालना देणार कोण?

१६२९ या वर्षातील एप्रिल-मे महिन्यातमध्ये शहाजीराजे काही काळासाठी, आराम करण्यासाठी, कुटुंबासोबत राहण्यासाठी आले होते. जिजाऊंचा आनंद गगनात मावत नव्हता. काय करु अन काय नको अशी त्यांची अवस्था झाली होती. आपली तगमग, अशांतता सारे सारे त्या विसरल्या. राजांच्या सेवेत त्या स्वतःला झोकून देत होत्या. शिवशंकर, भवानीमातेच्या चरणी एक मागणे मागत होत्या. म्हणतात ना, मनापासून सेवा करताना एखादी गोष्ट मागितली तर तो निष्पाप भाव पाहून प्रत्यक्ष भगवानही भरभरून देतो. हातचे काही राखत नाही. शंभू महादेव पावला, आईभवानी धावून आली. कोणती तरी आनंदमयी, चैतन्यमयी चाहूल लागली. जिजाऊच्या सोबत राहणाऱ्या जाणत्या महिलांनी अनुभवातून ती बाब हेरली. जिजाऊंचा तेजाळलेला, आनंद ओसंडून जाणारा चेहरा, त्यांच्या हालचाली ओळखल्या. जहागिरीत लवकरच चिमुकला, गोड पाहुणा येणार, भोसले घराण्याला वारस लाभणार ही बातमी हलक्या आवाजात, कर्णोपकर्णी समजली. सर्वत्र आनंदाचे भरते आले. शहाजीराजेंनाही ती गोष्ट समजली. सांगणारी व्यक्ती इनाम मिळाल्याने कृतकृत्य झाली. शहाजीराजे कमालीचे आनंदले. दिवस जात होते. जिजाऊंचा चेहरा, डोळे वेगळ्याच विश्वात रमत होते. हा काळ म्हणजे आवडणाऱ्या गोष्टी बिनदिक्कतपणे करण्याचा. आंबटगोड, तिखट, चमचमीत खाण्याचे दिवस. सेवेसाठी असणाऱ्या बायका जिजाऊंना काय हवे, काय नको अशी निष्ठेने काळजी घ्यायच्या. मायेने विचारपूस करायच्या पण जिजाऊला काय हवे होते? कोणत्याही स्त्रीला न लागलेले आणि भविष्यात कधी कुणाला लागू न शकणारे डोहाळे जिजाऊला लागले होते. त्यांना हवे होते रयतेचे स्वातंत्र्य, मराठी मुलखात मराठी राजा आणि स्वराज्य! तितक्यात शहाजीराजे यांना पुन्हा लढाईला जावे लागले. जिजाऊंना विश्वासू शिलेदार आणि अनुभवी स्त्रियांच्या हाती सोपवून जड अंतःकरणाने राजे निघाले. पण यावेळी जिजाऊ एकट्या नव्हत्या. भोसल्यांचा वंश, वारसदार त्यांच्या सोबतीला होता. एका अनाहूत परंतु हव्याहव्याशा वाटणाऱ्या, उमलू पाहणाऱ्या गोड सानुल्याची साथ त्यांना होती. त्याचे अस्तित्व त्यांना सुखावणारे, चैतन्यमयी, स्फूर्तीदायी असे होते. दिमतीचे सारेजण जिजाऊची काळजी घेत होते. आस्थेने चौकशी करून काय हवे काय नको ते पुरवत होते. जिजाऊंनाही डोहाळे लागले परंतु त्यांचे डोहाळे सामान्य नव्हते. सामान्य महिलेप्रमाणे त्यांना खाण्यापिण्याचे, नटण्यामुरडण्याचे, मनसोक्त झोपून राहण्याचे, फिरायला जाण्याचे डोहाळे लागले नव्हते. त्यांना हत्तीवर बसून फेरफटका मारावा असे वाटत होते. दूरवर दिसणारे डोंगर चढून जावेत असे मनापासून वाटू लागले. शरीरावर चिलखत चढवावे, हातात तलवार-शस्त्रे घेऊन स्वराज्याच्या शत्रूंवर तुटून पडावे. त्यांच्या ताब्यात असलेला मराठी मुलुख, गडकिल्ले जिंकून घ्यावेत, हिरे-माणिक, सोन्या-चांदीने मढवलेल्या सिंहासनावर बसावे, शिरावर सुंदर छत्र असावे. वाद्यांचा दणदणाट असावा, असे विचार त्यांच्या मनात घोंघावत असताना एकदा तर त्यांना चक्क वाघावर स्वार होऊन चक्कर मारण्याची इच्छा झाली. असे हे जगावेगळे डोहाळे कुणी पुरवावेत? कसे पुरवावेत? कधी पुरवावेत? जहागिरीच्या कामात लक्ष घालून जिजाऊ सातत्याने राजकारण, समाजकारण या सोबत विविध प्रकारच्या व्युहरचना शिकत होत्या. अचानक समोर आलेल्या राजनैतिक, जुलमी संकटातून मार्ग कसा काढायचा हेही त्या मनापासून आत्मसात करीत होत्या. मनोमन एक बैठक तयार होत होती.

असे म्हणतात की, अशा परिस्थितीत माता जे जे विचार करते, भविष्यातील स्वप्ने रंगविते किंवा ज्या काही गोष्टी करते ते सारे तिच्या पोटातील बालकाला समजतात. अभिमन्यू नाही का, आईच्या पोटात असतानाच चक्रव्यूह भेदून आत शिरण्याची कला शिकला होता. जिजाऊ जी स्वप्ने पाहात होती, तिच्या मनामध्ये जे क्रांतिकारी विचार घोंघावत होते, थैमान घालत होते ते सारे तिच्या पोटातील बालकाला समजत होते. पोटात असतानाच त्याला स्वराज्याची यथार्थ दशा समजली असावी? या दैन्यावस्थेतून रयतेला बाहेर काढण्याचे, स्वराज्य स्थापन करण्याचे तो ठरवत होता?

दिवस जात होते. जिजाऊंच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज दिसत होते. तशात घात झाला. आनंदी वातावरणावर सुतकी कळा पसरली. त्यावेळी जिजाऊंचे पिताश्री लखुजीराव जाधव सुलतान निजामशाहकडे नोकरीला होते. निजामशाहीतील एक कर्तबगार, धाडसी, पराक्रमी सरदार असा लखुजीरावांचा लौकिक होता. निजामशाहचा मुक्काम त्यावेळी दौलताबादच्या किल्ल्यावर होता.

त्याचवेळी लखुजीरावही सहकुटुंब पत्नी, मुले, भाऊ या सर्वांसह दौलताबादच्या किल्ल्याच्याखाली असलेल्या कुतलघ हौदाजवळ होते. निजामशाहला भेटायला म्हणून लखुजीराव किल्ल्यावर निघाले. सोबत अचलोजी, रघोजी, व यशवंत या मुलांना घेऊन ते गडावर पोहोचले. निजामशाह त्याच्या खास महालात बसला होता. जाधव तिथे गेले. बादशहाला कुर्निसात झाले परंतु वातावरण वेगळे होते. एक प्रकारची भयाण शांतता होती. उपस्थित सरदार, अन्य सारे आणि स्वतः निजामशाह ही शांत होता. त्याच्या मनात काहीतरी खदखदत होते. जाधवांची शब्दानेही चौकशी न करता निजामशाह उठून आत गेला. खरेतर लखुजीरावांचा हा एक प्रकारे अपमान होता. जाधव काही साधेसुधे सरदार नव्हते. ती एक वजनदार आसामी होती. त्यांना योग्य तो मान देणे हे निजामशाहचे काम होते. निजामाचे वागणे पाहून जाधव संतापले. आपल्या मुलांना परतण्याचा इशारा करुन ते वळले आणि घात झाला.'मारा. कापा. झोडा..' अशा आरोळ्या उठल्या. काय झाले ते समजण्यापूर्वी लखुजीराव आणि त्यांच्या मुलांवर सपासप वार होत असताना जाधवांनीही आपापल्या तलवारी, समशेरी उपसल्या. एकमेकांना भिडणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या आवाजाने कानठळ्या बसू लागल्या. त्यासोबतच किंकाळ्याही कानावर पडत होत्या. परंतु गनिमांची तयारी, आवाका आणि संख्याबळ अधिक होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांना काय करायचे ते माहिती होते. दुसरीकडे जाधव कुटुंब कुठल्याही तयारीने आले नव्हते. सारे कसे अनपेक्षित होते. एक फार मोठा धक्का होता. काहीही कळण्यापूर्वी समजण्याच्या आधीच त्यांना धोका देत गनिमांनी गाठले होते. परिणामी एका महायोद्ध्याचा लढाई न करता नुसता पराभवच नाहीतर खून झाला होता. होय! लखुजीराव जाधव आणि त्यांच्या तीनही मुलांचा खून झाला. चौघांनाही कोणतीही चूक नसताना मरणाला सामोरे जावे लागले. काय असेल कारण? निजामाने असे पाऊल का उचलले असावे? असे म्हणतात की, निजामशाह अत्यंत हलक्या कानाचा होता. त्याला कुणी आणि त्यातही त्याच्या जवळच्या माणसाने सांगितलेले पटकन पटत असे तो त्याच्यावर विश्वास ठेवून वागत असे. जाधव प्रकरणीही असेच काहीसे झाले होते. त्याच्या दरबारी हमीदखान नावाचा एक अत्यंत महत्वाकांक्षी, लोभी,हावरट असा एक सरदार होता. जाधवांच्या बाबतीतही असेच झाले होते. याच हमीदखानने जाधवांच्या विरोधात नाही नाही ते सांगून त्याचे कान भरले होते. परिणामी निजामाने तसा आत्मघाती निर्णय घेऊन जाधवांना त्यांच्या मुलांसह संपविले होते. ती बातमी गडाखाली आली. तिथे असलेल्या जाधवांच्या पत्नीला आणि इतरांना धड शोकही करता आला नाही कारण ज्यांनी लखुजीरावांना पुत्रांसहित संपविले होते ते मारेकरी केंव्हाही गडाखाली येऊन तिथे असलेल्या जाधव कुटुंबातील इतर सदस्यांच्या मानेवर सुरा चालवायला मागेपुढे बघणार नव्हते हे लक्षात घेऊन त्यांनी दुःख आवरले.पतीचे आणि मुलाचे शव न घेता, त्यांचे अंत्यदर्शन न घेता सर्वांनी लपतछपत सिंदखेड गाठले. ही बातमी जिजाऊंना समजली. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. डोळे आग ओकू लागले. हात संतापने थरथरत होते. हाताच्या मुठी रागाने आवळल्या जात होत्या. शोक आवरल्या आवरत नव्हता. शहाजीराजे यांनाही या कारस्थानाचा भयंकर राग आला. त्यांचे जरी सासरेबुवाशी वैर होते तरीही जवळचे नाते होते. रणांगणावर शत्रूशी झुंजताना मरण येणे वेगळे आणि अशा दगाबाजपणाचे खून करणे वेगळे. झाल्याप्रकाराने शहाजीराजे खवळले, संतापले. त्यांनी निजामशाही सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे जाणार कुठे? आदिलशाही जवळ करणार की, मोगलशहांना कवटाळणार की, कुतुबशाहीशी हात मिळविणार की अजून कुणी? कुठेही गेले तरी चाकरी ही ठरलेलीच. एकाला झाकावे दुसऱ्याला काढावे असा प्रकार. सर्वत्र वातावरण सारखेच. काय करावे? नाही. नाही. हे थांबायलाच हवे. आपल्या दणकट मनगटाच्या शक्तीने ह्या जुलुमगिरीला साथ द्यायची नाही. कोणतीही 'शाही' मजबूत करण्यापेक्षा आपल्यावर विसंबून असणाऱ्या जनतेला या कचाट्यातून मुक्त केलेच पाहिजे. परकियांसाठी झिजणे, स्वतःचे रक्त सांडणे थांबवलेच पाहिजेत. आता जे काही करु ते स्वतःच्या मराठी जनतेसाठी करु असा विचार करून शहाजीराजे यांनी बंड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. होय! बंडच ते. त्या सर्व जुलमी राजवटींची साथ सोडून स्वतःच्या ताकदीवर वेगळे काही करणे, वेगळी चूल मांडणे म्हणजे बंडच! त्या सर्व दुश्मनांपैकी कुणाची तरी चाकरी न करता स्वतंत्र होणे म्हणजे बंड! एकावेळी अनेक सत्तापिपासूंविरूद्ध लढणे तेवढे सोपे नव्हते परंतु सासऱ्याच्या, मेहुण्यांच्या खुनाने दुखावल्या गेलेल्या शहाजींनी स्वतंत्र होण्याचा, रयतेला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला. राजे पुणे येथे परत आले. जिजाऊला खूप खूप आनंद झाला. तिच्या मनी ज्या भावना होत्या त्या प्रत्यक्षात उतरणार होत्या. तिच्या स्वप्नांची पूर्ती दुसरे तिसरे कुणी नाहीतर स्वतः तिचे पती राजे शहाजी करणार होते. पुण्यात आल्याबरोबर शहाजींनी मालोजीराजांपासून परंपरागत जहागीरीचा कारभार पाहावयास सुरुवात केली. जहागिरीच्या सीमा वाढविण्यासाठी त्यांनी पुण्याच्या आजूबाजूचा, दुश्मनांच्या ताब्यात असलेला आणि विशेषतः आदिलशाहीच्या ताब्यात असलेला प्रदेश पुणे जहागीरीत समाविष्ट करायला सुरुवात केली. खरेतर हे फार मोठे धाडस होते. राजे एकावेळी अनेकांशी शत्रूत्व करत होते. निजामशाही चिडलेली होतीच आता आदिलशहाही संतापला होता. असे असामान्य धाडस केले असल्यामुळे कुणी ना कुणी पुण्यावर चालून येणार हे ठरलेलेच होते, शहाजीराजे ते ओळखून होते. त्यांना भीती युद्धाची नव्हती त्यांच्यापुढे प्रश्न होता जिजाबाईंना ठेवावे कुठे? पुण्यात ठेवणे अत्यंत धोकादायक होते. राजांनी विचार केला, काय करावे, कुठे ठेवावे आणि अचानक त्यांना एक नाव आठवले ते म्हणजे शिवनेरी किल्ला! अत्यंत बळकट असा किल्ला! किल्ल्यावर होते विजय सिधोजी विश्वासराव! जीवाला जीव देणारा, अतिशय विश्वासू असा हा किल्लेदार! जिजाऊंची सर्वतोपरी काळजी विश्वासराव घेतील असा विश्वास शहाजीराजेंना होता. जिजाबाईंनाही शिवनेरी किल्ला आणि विजयरावांची निवड पटली.

जिजाऊची शिवनेरीवर जायची तयारी सुरु झाली. शहाजींनी ठरवले की, दिवस मोठे विचित्र आहेत. सारे शत्रू दात ओठ खाऊन आहेत. सूडबुद्धीने कोण कुणीकडून येईल आणि होत्याचे न होते करेल सांगता येत नाही त्यामुळे आपण स्वतःच जिजाबाईसोबत शिवनेरीवर जावे. जिजाऊंना किल्ल्यावर सोडून यावे. त्याप्रमाणे जिजाबाई आणि त्यांच्यासोबत मोठा लवाजमा घेऊन राजे शिवनेरीवर दाखल झाले. नात्याने व्याही असणाऱ्या किल्लेदार विजयराव यांनी शहाजीराजे, जिजाऊ सर्वांचे स्वागत केले. अगोदर सर्व पाहुण्यांनी गडावर असलेल्या शिवाईदेवीचे दर्शन घेतले. शहाजीराजे लगोलग निघत असताना एक भयंकर बातमी आली. राजांना जी शंका होती ती दुर्दैवाने खरी ठरली. शहाजीराजे यांच्या कामगिरीने चवताळलेल्या, खवळलेल्या, संतापलेल्या आदिलशहाने पुण्यावर फार मोठी फौज पाठवली. ती कुणाच्या नेतृत्वाखाली? एखाद्या पराक्रमी मुसलमान सरदाराच्या? मुळीच नाही. काट्याने काटा काढायचा, आपण फक्त दुरून तमाशा पाहायचा हीच खास बाब या राजवटीची होती. शहाजीराजे या शूरवीराचा बदला घ्यायचा ना तर मग पाठवा एक मराठा सरदार. लढू द्या दोघांना. कुणीही मेले तरी शेवटी मराठाच मरणार ना. मग होऊन जाऊ देत दोन मराठी शूरवीरांचा सामना या नेहमीच्या विचाराने आदिलशहाने रायाराव या मराठी सरदाराला फार मोठी फौज देऊन पुणे जहागीरीचा घास घ्यायला पाठवले. ती फौज मोठ्या त्वेषाने पुण्यात घुसली. शहाजीराजे पुण्यात नव्हते त्यामुळे प्रतिकार तोकडा पडला. रायारावांना रान मोकळे सापडले. सूडबुद्धीने ते रयतेवर तुटून पडले. माणसे कापली जाऊ लागली. मोठमोठे खानदानी वाडे जाळण्यात आली. आगडोंब आकाशात झेपावू लागले. सुरूंग लावून मजबूत इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. दुसऱ्या शब्दात पुणे बेचिराख केल्या गेले. असे म्हणतात की, पुण्यातील जमिनीवर अक्षरशः नांगर फिरविण्यात आला आणि तोही गाढवाचा! काय दुर्दशा झाली असेल, काय वाताहात झाली असेल, किती जीव गेले असतील? ही मोजदाद करायला तरी का कुणी शिल्लक राहिले होते? ज्या स्वराज्याची ज्योत शहाजींनी लावली होती ती लवलवणारी ज्योत रायारावांच्या तुफानी वादळात शांत झाली, तिला काही क्षण फडफडही करता आली नाही. निरपराध, निष्पाप जनता तर चिरडली गेली. सुलतानी संकट आले आणि स्वराज्याचा घास अलगत घशात घालून गेले..…

अशारीतीने स्वराज्य ही कल्पना कागदावरून प्रत्यक्षात उतरत असतानाच लयाला गेली. एका अर्थाने शहाजींचा डाव त्यांच्या अंगावर उलटला. राजे सर्वस्व लुटल्याप्रमाणे हवालदिल झाले. जिजाबाईंनाही अतीव दुःख झाले. पुढे काय हा यक्षप्रश्न राजांपुढे उभा राहिला. कुणातरी दुश्मनाच्या आसऱ्याला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. राजा होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या,तशी हिंमत, ताकद असणाऱ्या एका महापराक्रमी मराठी शूरवीरावर पुन्हा चाकरी करण्याची वेळ यावी यापेक्षा दुसरे दुर्दैव ते कोणते? शेवटी शहाजीराजेंनी शांतपणे, अपमानाचे घोट पित मोगल दरबारी पंचहजारी ही सरदारकी स्वीकारली..…

उजाडला! अहो, तो दिवस उजाडला! ज्या दिवसाची शिवनेरी किल्ल्यावर सारेजण वाट पाहात होते, ज्या दिवसासाठी जिजाऊ शिवाई देवीला नवस बोलल्या होत्या, ज्या क्षणासाठी शहाजीराजेंनी मोठ्या विश्वासाने शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार यांची जिजाऊंचे राखणदार म्हणून नेमणूक केली होती, मोठ्या आत्मविश्वासाने जिजाऊला विजय विश्वासराव यांच्याकडे सोपवले होते तो भाग्याचा दिवस उजाडला, तो आनंदी क्षण आला. जिजाऊच्या पोटी पुत्र जन्माला आला. बाळंतिणीसाठी खास तयार केलेल्या, सजविलेल्या एका खोलीमध्ये जिजाऊंनी एका सुंदर, गोंडस बाळाला जन्म दिला आणि दुसऱ्याच क्षणी शिवनेरी गडावर 'मुलगा झाला हो.....मुलगा झाला....' असे आनंदाने चिंब झालेले आवाज ऐकू येऊ लागले. तो शुभ दिवस होता....शुक्रवार...१९ फेब्रुवारी १६३० ... गडावर चैतन्य आले, समाधान आले, स्फूर्ती आली. लगोलग शहाजीराजे यांच्याकडे खास दूत पाठवून ती बातमी पोहचविण्यात आली. परंतु राजे नेहमीप्रमाणे एका लढाईत गुंतले होते. इच्छा असूनही येऊ शकत नव्हते.

विश्वासरावांनी तात्काळ हुशार, जाणत्या भविष्यकारांना गडावर पाचारण केले. त्यांनी बाळाची कुंडली मांडली आणि म्हणाले,"व्वा ! राजयोग्याची कुंडली आहे. हा कुमार विजयी पताका फडकवणार आहे. मोठा विजय प्राप्त करणार आहे. हा कुलवंत जनतेला न्याय तर देईलच पण अत्यंत सुखी ठेवील. याची कीर्ति सर्वदूर जाईल......" ते शब्द ऐकून सारे आनंदी होत असताना जिजाईही आनंदी, समाधानी दिसत होत्या. वर्षानुवर्षे ह्रदयाशी कवटाळलेल्या स्वप्नांना हा आपला बछडा मूर्त रुप देणार हे ऐकून त्यांचे डोळे आनंदाने भरून आले. रीतीरिवाजाप्रमाणे, भोसले घराण्याच्या परंपरेप्रमाणे दहा दिवसात बाळावर होणारे एक-एक संस्कार होत होते. असे करता करता बारावा दिवस उजाडला. बारशाचा दिवस.बाळाला एक ओळख देण्याचा दिवस.त्याचा थाट काय वर्णावा? भोसले घराण्यातील कुलदीपकाचे बारसे. गडावर गडबडघाई चालली होती, आयाभगिनींची धावपळ चालली होती. मायलेकराला वस्त्रे,विविध अलंकारांनी सजविण्यात आले. कुणीतरी माता पुढे झाली. तिने काजळाचा एक छोटासा टिका बाळराजाच्या भाळी लावला.बाळावर कुणाची वाईट नजर पडू नये यासाठी घेतलेली ती खबरदारी होती. सजवलेल्या पाळण्यात बाळाला टाकण्यात आले. बायका पुढे झाल्या. बाळाला हलकेच पाळण्यातून खालीवर करताना कुणीतरी सुरेल आवाजात पाळणे म्हणायला सुरूवात केली.... बाळाचे नाव ठेवले..... शिवाजी.... शिवाजी...! शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या शिवाईदेवीचे नाव सुकुमार बाळाला देण्यात आले. सर्वत्र आनंदाला उधाण आले, खुशीला भरती आली, समाधानाची एक रेषा सर्वांच्या कपाळी गडद होत गेली..…

नागेश सू. शेवाळकर