रहस्य कथा- नीलिमा..-१
नीलिमा एक खूप निरागस मुलगी होती. निरागस आणि तशी अल्लडच होती ती. वयाने लहान त्यामुळे समज सुद्धा कमीच होती. पण तिला शिकायची मात्र खूप आवड होती. ती जिद्दीनी शाळेत जाऊन १० वी पर्यंत शिकली पण आजूबाजूच्या परिस्थितीच भान तिला कधी न्हवत. गावात लग्न लवकर होतात त्याचप्रमाणे तिच सुद्धा लग्न लवकर झाल. न कळत्या वयात लग्न झाल आणि आता नीलिमानी जरा समजूतदारपणे वागायची गरज होती पण नीलिमा मात्र मोठी होतच न्हवती. नीलिमाचा बालिशपणा कमी होत नव्हता. नीलिमा सासरी गेली खरी पण सासरी कस वागायचं हे मात्र तिला माहिती न्हवत. त्या घरात काही नियम होते. पण नीलिमा नियम मानणारी न्हवतीच. चंद्र ग्रहणाची रात्र होती. त्यामुळे तिनी ग्रहण पाहू नये अशी ताकीद तिला घरातून मिळाली होती. पण ऐकेल ती नीलिमा कसली. नीलिमा तिच्या मर्जीची मालकीण होती. घरातल्यांच बोलण न जुमानता नीलिमा तिला हव तेच करणार होती. कोणाच ऐकेल अशी नीलिमा न्हवतीच. नीलिमा फक्त स्वतःच ऐकायची आणि नवीन घरात आपण आपला हा स्वभाव बदलला पाहिजे हे भान तिला नव्हत. चंद्र ग्रहण चालू झाल. सगळे गावकरी घराची दार लाऊन लवकर झोपून गेले. नीलिमा च्या घरातले सुद्धा आणि नीलिमा चा नवरा सुद्धा लवकर झोपून गेला. नीलिमा नी सुद्धा झोपायचं नाटक केल पण नीलिमा झोपणार न्हवती. नीलिमा रात्री १२.३० ला उठली. तिनी सगळे झोपले आहेत ह्याची खात्री करून घेतली आणि सावकाश घराबाहेर पडली. तिनी कोणताही आवाज येणार नाही ह्याची काळजी घेतली. आणि नीलिमा चंद्र ग्रहण पाहायला बाहेर पडली. त्यांच्या घराजवळ असलेल्या एका माळरानाकडे जायला लागली. सगळीकड अंधाराच साम्राज्य पसरलं होत. हवा एकदम कुंद झाली होती. अश्या वातावरणात नीलिमा ला जीव घाबरा झाला. तिच्या हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती. तिला वाटल धावत घर गाठू पण तिच्या आतली उत्सुकता तिला तस करण्यापासून आडवत होती. नीलिमा माळरानात पोचली आणि तिनी चंद्र ग्रहण पाहिलं. त्यावेळी तिला काहीच विचित्र वाटल नाही. घरातले कशाला अडवत होते ह्या विचारात नीलिमा स्वतःशीच हसली आणि घरी जायला निघाली. घरी सगळे शांत झोपले होते. नीलिमा बाहेर पडलीये असा अंदाज कोणाला आलाही नाही. नीलिमा घरी आल्यावर अंघोळ न करताच झोपली. तिनी देवघरात जाऊन देवाच दर्शन पण नाही घेतलं. नीलिमा सरळ तिच्या गादीवर जाऊन झोपली.
***
अनुराग नवीनच गावात राहायला आला. त्याला गावातल्या जीवनाचा अभ्यास करायचा होता. अनुराग त्यावर पी.एच.डी करत होता. म्हणूनच त्यानी काही दिवस गावात राहायचा निर्णय घेतला. त्याला गाव खूपच आवडलं होत. त्याला गावात येऊन काहीच दिवस झाले होते. आणि तेव्हाच वर्षातल मोठ चंद्र ग्रहण होणार होत. आपल्या अभ्यासात अजून एक विषय मिळाला म्हणून अनुराग खुश होता. त्याला ग्रहणा बद्दल गावातल्या लोकांकडून माहिती मिळणार होती. त्यानी गावात राहणाऱ्या लोकांशी बोलायचं ठरवलं आणि त्याला गावकऱ्यांची चंद्र ग्रहणाबद्दल मत जाणून घायची होती. ठरल्याप्रमाणे अनुराग सकाळी सकाळी घराबाहेर पडला आणि गावात हिंडायला लागला. गावातली लोकं अतिशय निर्मळ मनाची असतात. ह्याचा प्रत्यय त्याला बाहेर पडल्या पडल्या आला.. अनुराग एका माणसासमोर थांबला.
"राम राम पाव्हन. शहरातल न व्ह तुम्ही? इथे कस आल?" त्या गावकऱ्यानी बोलायला चालू केल. अनुराग ला त्या माणसाच बोलण खूपच आवडलं.
"राम राम..." शहरातून आल्यामुळे अनुरागसाठी ह्या गोष्टी नवीन होत्या पण त्याच अंदाजात तो त्या माणसाशी बोलायला लागला. पुढे मात्र गावातल्या भाषेत अनुराग ला काही बोलता येईना. त्यानी सरळ त्याच्याच भाषेत बोलण चालू केल, "हो, शहरातून आलोय इथे. जरा अभ्यास करायचं गावातल्या लोकांचा!"
"व्हा व्हा.. आमचा अभ्यास?"
"हो.. थोडी माहिती देऊ शकाल?"
"व्हय का नाही?" अस बोलत तो माणूस बोलायला लागला. अनुराग बरीच माहिती घेत होता आणि त्याच्या नोंद वहीत नोंद करत होता. शेवटी त्यानी ग्रहणाचा विषय काढला, "ग्रहण आहे ना परवा? ग्रहणाचे काही अनुभव सांगू शकाल?" तो माणूस अनुरागच बोलण ऐकत होता पण ग्रहणाच नाव ऐकताच एकदम शांत झाला..आणि जरा वेळानी बोलायला लागला,
"ग्रहण फार वंगाळ असतंय व्ह. पोटुशी ना तर लय वंगाळ."
"मी ऐकलय पण मला फार काही माहिती नाही चंद्र ग्रहणाची! काही अजून माहिती सांगू शकाल? काय होत चंद्र ग्रहणाला?"
"व्हय.." अस सांगत त्या माणसानी चंद्र ग्रहणाच्या दिवशी होणाऱ्या अपघातांविषयी सांगितलं. त्यानी नीलिमा ची कथा सुद्धा सांगितली.. "चंद्र ग्रहण लई वंगाळ. कोणाचा तरी जीव घेऊन जातच. ग्रहणाला तुम्ही बी बाहेर नका हिंडू.. म्या ऐकलय, नीलिमा च भूत रात्री गावात हिंडत असत." अनुरागचा ह्या सगळ्यावर अजिबात विश्वास न्हवता पण अभ्यासाचा भाग म्हणून तो शांतपणे या माणसाच बोलण ऐकून घेत होता. तो माणूस निघून गेला पण अनुराग मात्र विचारात पडला.. बराच विचार करून त्यानी चंद्र ग्रहणाच्या रात्री बाहेर पडायचा निर्णय घेतला. तो निर्णय कितपत योग्य ठरेल हे त्याला माहिती न्हवत पण अनुराग ला गावकऱ्यांच्या बोलण्यात किती सत्य आहे हे तपासून पहायचं होत. जोखीम होती पण अनुराग मागे हाटणाऱ्यातला न्हवता. अनुरागच्या मनात विचारचक्र चालू होत. गावकऱ्यांनी जे सांगितलं, "नीलिमा नी चंद्र ग्रहण पाहिलं आणि त्यांनतर नीलिमा गायब झाली. नीलिमा कुठे गेली, तिच काय झाल, ह्याची ठोस माहिती कुणालाच नाही पण असा समज आहे कि नीलिमा च भूत रात्री हिंडत असत. आणि बाहेर जे कोणी फिरत असेल त्यांना मारून टाकते." ह्यात किती तथ्य आहे ते अनुरागला पडताळून घ्यायचं होत. आत्ताच्या जगात अश्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा हे अनुराग ला पटत न्हवत. खरच नीलिमाच भूत ह्या गावात फिरतंय अश्या विचारात अनुराग होता. त्याची उत्कंठा शिगेला पोचली होती. आणि त्याला सत्य जाणून घ्यायचंच होत. त्यासाठी त्यानी प्रयत्न सुद्धा चालू केले.
अनुजा कुलकर्णी.