Quotes by Pranali Kadam in Bitesapp read free

Pranali Kadam

Pranali Kadam

@kpranali47gmailcom


इवलेसे मन
किती खोल डोह
भटकतो अंधारात
पहा तो....माझा देह

इवलेसे मन
कोमेजले आज
कानावर ना पडती
कोणतेच... साज

इवलेसे मन
साठला कल्लोळ
चेहऱ्यात गुंतले, तो भाव
सगळेच तू..,.ते जाळ

इवलेसे मन
कायास कवटाळी
करावे मोकळे
तुझ्यात...मांदियाळी

इवलेसे मन
हृदयाशी....भांडतो
मनाच्या गाभाऱ्यात
अश्रूगंध....सांडतो

इवलेसे मन
होतो... मग झुंजार
आरसा ही करतो
बघ तो....शृंगार

इवलेसे मन
इवलेसे हे....मन......

कवयित्री व लेखिका
प्रणाली कदम
कल्याण, महाराष्ट्र

Read More
epost thumb

#कठीण
शिर्षक: नसतेस घरी तू जेव्हा
नसतेस तू घरी जेंव्हा!!

आज मी घरी आलो, दार उघडलं आणि तुझी कमी भासू लागली. नसतेस तू घरी जेंव्हा, त्यावेळी अनेक गोष्टींचा मला सामना करावा लागतो. सगळं घर कसं ओकंबोकं वाटतं. तुझ्याशिवाय हे घर जणू एक गुहा वाटते, या घराला आणि मला तुझी सवय झालेली असते. या घरातल्या भिंतींना तुझ्या मायेच्या हाताची कमतरता भासते. त्या भिंती शुष्क वाटतात, जणू तू असल्यावर त्या जिंवत होतात आणि तुझ्याशी बोलू लागतात.


आपली बाल्कणी आणि तिथे लावलेल्या झाडांच्या कुंड्या, किती हिरमुसल्या झाल्या आहेत. मी रोज पाणी घालतो, पण तरी त्यांना मायेचा ओलावा मिळत नसल्याने ते कोमेजल्या सारखे झाले आहेत. मला आठवतं, तू जेव्हा घरी असायची तेव्हा तुझं सगळं आटपून तू त्या झाडां बरोबर गप्पा मारत बसायची आणि मग मी हळूच तुझ्या पाठीशी येऊन तुझी छेड काढत असे.


तू नाहीयेस, आणि घरातला प्रत्येक कोपरा जणू तुझ्या आठवणीत रडत आहे. तू जसं हे घर सोडून गेली आहेस, ते अगदी तसेच आहे. मी कोणत्याही वस्तूला हात लावला नाहीये. कारण हे घर तुझं आहे, त्याला हात फक्त तुझा लागला पाहिजे. ती बेडरूम आणि त्या बेडवरची चादर, अजूनही तशीच सुरकुतलेली आहे. तू नसतेस घरी जेंव्हा, माझं मन आतून तुटत जातो आणि मग ते अस्थिर होवून जाते.


पावसाच्या सरी, आता हातात झेलाव्यात असे नाही वाटत. कारण त्या पावसाच्या प्रत्येक थेंबात मला तुझी आठवण येते. त्या झाडांची सळसळ आणि तो मंद गार वारा नकोसा वाटतो. या सगळ्यामुळे पुन्हा मी त्या आठवणीत रममाण होतो आणि मग आकाशात जशी वीज चमकावी तशी माझ्या हृदयाची तार छेडत एक कळ सणकून जाते. घड्याळाचे काटे टिकटिक आवाज करत आहेत, पण कानाला तो आवाज आता सहन नाही होत. या कानाला फक्त तुझा आवाज ऐकण्याची सवय आहे.


तू नसतेस घरी जेंव्हा, हे घर मला ओसाड वाटते. काळजाचे ठोके सुध्दा मंद होत आहेत, असा मला भास होत असतो. तुझ्याशिवाय श्वास घेणे सुध्दा मला कठीण वाटते. एक एक क्षण मला हा कालांतराचा वाटतो. तुझ्या परतीची वाट मी आतुरतेने पाहत असतो. घरी येवूच नये असे मला वाटते. पण, तुझ्या सगळ्या आठवणी इथे या घरात आहेत. म्हणून मग पाय आपोआप घराकडे वळतात. वाटते मी हे सगळे सोडून तुझ्याकडे धाव घ्यावी, पण मग मला त्यासाठी काही करावे लागेल.


तो दिवस आठवला की अजूनही थरकाप उडतो, सगळ्या अंगाला घाम फुटतो. त्यावेळी ते व्हायला नको होते. मी अजूनही, या सगळ्याला कारणीभूत मलाच मानतो. कारण मी जर तुला एकटीला सोडून गेलो नसतो तर आज तू माझ्या सोबत, इथे असली असती. आज तुझ्या आठवणी, माझ्या डोळ्यांच्या अश्रू मधून धुसर होताना दिसतात. पण हे बघ मी हे डोळे पुसले आहेत. आता मला त्या स्पष्ट दिसत आहेत. तू नसताना, माझ्या सोबतीला आता फक्त तेवढेच उरले आहे.

प्रणाली कदम
कल्याण महाराष्ट्र

Read More

माहीत नाही मी काय विचार करते.....
काय ठरवते नाही माहीत.....
तुझी खूप मी वाट पाहिली....
तुला खूप मी साद घातली....
पण तू नाही आलास....
मला एकटीलाच तू ,
या रणरणत्या वाळवंटात
सोडून निघून गेलास......
कुठे गेलास नाही माहीत.....
भकास डोळ्यांनी,
मी हा वाळवंट बघत आहे....
यातून मी, कसा मार्ग काढू?
नाही माहीत.....
नेहमीच तू,
मला तुझी सवय लावलीस....
मग मला सुध्दा नेहमीच
आधाराची गरज भासू लागली.....
एकटीने आयुष्य मी
कधी जगलीच नाही....
नाही, तशी कधी वेळच आली नाही.....
कल्पना पण मी तशी केली नाही .....
आता मला नाही काही सुचत.....
का तू, माझा असा छळ मांडलास?.....
साथ नव्हती द्यायची,
मग तू, माझ्या आयुष्यात का आलास?......
तू स्वतः आलास आणि,
स्वतः निघून गेलास.....
निराशेने मी स्वतःला,
अंधारात चाचपडत आहे....
मार्ग नाही सापडत....
फक्त ओसाड वाळवंट दिसत आहेत......
आणि त्या वाळवंटात;
मी सैरबैर नजरेने,
कोणाचीतरी वाट पाहत आहे.....
मला माहीत आहे;
या ओसाड वाळवंटात,
कोणी येणार नाही......
तरी मी वाट बघत थांबली आहे.....
एक मनात आस आहे,
कोणीतरी येण्याची.....
पण कदाचित,
वाट बघता बघता
मी संपून जाईन.....आणि मग
या वाळवंटाच्या धुळीचे कण,
मी गेल्याचे तुला निरोप देतील......
तेंव्हा तुझ्या डोळ्यातून
अश्रू वाहू लागतील.....
तू मला साद घालशील.....
पण त्यावेळी मी नसेन....
तुझी साद ऐकायला.....
तेंव्हा तुला,
मी नसल्याचं दुःख अनावर होईल.....
आणि मग तू,
स्वतःशीच बोलशील.....
पुढल्या जन्मी तू,
फक्त माझी असशील...
फक्त माझी.....!!

Read More

किळस


माणूस जन्माला येतो, पण जगणं विसरतो
स्वत:च्या हव्यासापोटी, शरीर कुरतडतो....
एक एक लचका तोडत, आनंद लुटतो
कोण कुठला तो बांडगुळ, येऊन बसतो
आणि शरीराची चाळणी करून ठेवतो...
अंगाला हात लावला की संताप होतो...
असं वाटतं अंगावर किडे वळवळत आहेत
त्या स्पर्शाने शिरशिरी येऊन किळस वाटते....
सगळं अंग घासून घासून काढावं वाटतं
अगदी चामडी सोलून निघेपर्यंत, रक्त सांडेपर्यंत...
रात्र किरकिर करणारी, भयाण शांतता
हातात कोयती घेऊन, उभी होती ठाम....
आला समोर की सपासप वार करून
आज कोथळाच बाहेर काढायचा होता....
दार ठोठावलं गेलं, कुंडी काढली मी
समोर तो उभा, नशेत आणि छद्मी हास्य....
घेतली कोयती आणि वार करत गेली....
माझ्या पायाजवळच मरून पडला होता....
नेले मी त्याला सरपटत अंधाराचा आधार घेत
नेऊन ठेवले त्याला तिथेच कचरा कुंडी जवळ....
पहाटे जाऊन पाहिलं, ही.. गर्दी जमलेली
कुत्र्यांची आणि कावळ्यांची मेजवानी होती....
सगळे त्याचे मनमुराद लचके तोडत होते
माशा त्याच्या अंगावर घोंघावत होत्या....
कचऱ्या बरोबर शरीराची दुर्गंधी सुटली होती
मला बघून आत पोटात भडभडून आलं....
आत पोटातली मळमळ ती थांबत नव्हती
तिथेच रस्त्यात मी भडाभडा उलटी केली....
तो मेला तरी अंगाला काहीतरी डसत होतं...
आता मला माझीच किळस वाटत होती.....

©®प्रणाली कदम
कल्याण

Read More

शिर्षक - शब्द

हरवलेत शब्द.....
शब्द आणि सर्वच
शब्दांमधून उमटणाऱ्या भावना,
आणि त्या भावनांचा कल्लोळ
मन अगदी आकसून गेलं आहे......
त्या शब्दांना मिळणारा सूर
आता तो बेसूर वाटतो
शब्दांमध्ये येणारा दुरावा,
तोच दुरावा
नात्यांमध्ये आला आहे......
मी शोधण्याचा प्रयत्न करते
पण ते सूर आता सापडत नाही
हरवलेत ते सूर,
लेखणी माझी
आता रुसली आहे......
शब्द जुळत नाही
जुळवण्याचा निष्फळ प्रयत्न
मी सतत करत असते,
पण शेवटी
एकदा हरवले ते हरवले....
आता नाही वाटत
पुन्हा तेच शब्द,
तेच सूर
जुळतील की नाही,
पण वाटतं
पुन्हा ते सूर जुळावेत.....
त्या सूरातून
आलाप बाहेर पडावेत
शब्दांना भावना,
आणि भावना मधून
निघणाऱ्या आठवणी.....
आठवणींचा बांध
अश्रू मधून बाहेर पडावा
आणि सगळं कसं
मोकळं मोकळं वाटावं.....
सगळं मळभ स्वच्छ होवून
मन शांत व्हावे
आणि पुन्हा मी,
ते शब्द जुळवून
त्या शब्दांना
सूरात गुंफून,
एक आलाप द्यावी.......
पण्..........

प्रणाली कदम
महाराष्ट्र

Read More