Nishad Parva - Part 10 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | निषाद पर्व - भाग 10

Featured Books
Categories
Share

निषाद पर्व - भाग 10

निषाद पर्व भाग १०

अर्जुना, तुझा हा संभावित संधिसाधूपणा लक्षात आल्यावर तुझ्या समोर आऽ वासून राहिलले प्राक्तन ही नियतीची उचित योजना आहे, असे माझे मत बनत चालले आहे. घटनारंभी तुझ्या सारख्या वीराची झालेली गलितगात्र अवस्था पाहून तुझ्यावर अशी वेळ येता कामा नये होती असा विचार माझ्या मनात आला. जनमनातील तुझी प्रतिमा, धनुर्विद्येतील तुझे सामर्थ्य, अक्षरशः पायदळी तुडवून तुला नगण्य ठरवीत दुर्लक्षून, दस्युंनी चालविलेली बेधुंद लुटालूट पाहिल्यावर निर्णयाच्या अंतिम क्षणी तुझ्या सहाय्यार्थ तिरकामठा उचलण्याचा झालेला मोह मलाही आवरता आला नाही. यास्तव माझ्याशी संबंध नसलेल्या घटनेत मी हस्तक्षेप केला."

                "अर्जुना, या घटनेतील माझा हस्तक्षेप ही तुझ्या लौकीकाच्या दृष्टीनेही इष्ट घटना असताना देखील, अपयशाच्या अंतिम क्षणी, क्षात्रतेजाला न शोभणारी मग्रुरी तुला काबूत ठेवता आली नाही. म्हणूनच मी तुझा बदला घेतला तरी चालेल असे तू म्हणू शकलास. माझ्या हेतूविषयी शंका घेऊन पार्था, तू तिसऱ्या वेळेलाही माझ्यावर अन्यायच करु पाहिलास! बदला घेणे हा बलवंतांचा स्थायीभाव असेलही; परंतु त्यासाठी लागणारी तामसी विवेकशून्यता, अर्जुना, माझ्याकडे तरी नाही. कदचित हस्तिनापुरातील अपमानाचा प्रसंग आणि अगुंष्ठ छेद या दोन्ही वेळी बदला घेण्यासाठी मी असमर्थ होतो, म्हणून गप्प राहिलो असा सोईस्कर समज तू करून घेतलेला दिसतो. म्हणून या क्षणी असहाय्य, बलहीन आणि दस्यूंकडून तू पराभूत असता हा मोका मी साधावा असे मोठ्या उदार मनस्कतेने तू मला सांगतोस. वाघ-सिंहादिकांनी शिकार करून भक्ष्यावर यथेच्छ ताव मारला की, त्यांनी त्यागिलेले उच्छिष्ठ कोल्हे, गिधाडांनी खावे त्या प्रमाणे मी तुझ्यावर सूड उगवावा एवढा का मी अधम आहे?"

             ह "अर्जुना, माझ्यावर अन्याय झाला आहे हे सत्य असले तरी त्याचा बदला घ्यावा ही भावना माझ्या मनाला स्पर्श करू शकली नाही. एकतर माझा अव्हेर खुद्द गुरू द्रोणांनी केला. तसेच गुरूदक्षिणा म्हणून अंगुष्ठ छेदाची मागणीही त्यांनीच केली. तथापी त्यांचा बदला मी का घ्यावा? माझा स्वीकार, अव्हेर काहीही निर्णय ते घेऊ शकतात. प्रत्येक निर्णय दुसऱ्याच्या इच्छेनुसार कसा घेता येईल? अंगुष्ठ छेदापूर्वी त्यांच्या प्रेरणेने मी विद्या प्राप्त केली, याची खातरजमाही त्यांनी केली होती. त्याहीपलीकडे जाऊन सांगायचे तर आपल्या इच्छा अनिच्छांचे नियंत्रण खुद्द त्यांच्या हाती तरी कुठे होते? ते कुरू वंशीयांकडून अन् मुख्यत्वे तुझ्यासारख्या शिष्योत्तमाकडून केले जात आहे हे माझ्या ध्यानी आले होते. दोन्ही घटनांचे वेळी त्यांच्या नेत्रातील असहाय्य अगतिक भाव मी अचूक टिपले होते."

        "बरे या घटनांमागील प्रेरक शक्ती तू आहेस असे गृहित धरले तरी प्रत्यक्ष कृतीमध्ये तुझा सहभाग शून्य असल्यामुळेच तुझा बदला घेणेही असमर्थनीय नव्हे का? अर्जुना खरेतर बदल्याच्या भावनेत सतत होरपळत राहून हे सुंदर जीवन सुडाच्या प्रवासात विद्रुप करायचे हा माझा पिंडच नव्हे. आयुष्य जसे आहे तसे जगणारा, इतरांना जणू देणारा मी एक निर्मळ वृत्तीचा निषाद आहे! अर्जुना मोहाचा एक क्षणही मानवाचे पतन व्हावयास पुरेसा ठरतो. हे संपूर्ण घटनेचा साकल्याने विचार करता माझ्या ध्यानी आले आहे. म्हणूनच तुला सहाय्य करण्याची सूचना तू करीत असलास तरी असा अविवेकी निर्णय घेऊन पातकाचा तिहेरी धनी मी कशाला होऊ? 

        "एकतर आपल्याशी संबंध नसलेल्या घटनेत हस्तक्षेप करू नये हा निषाद म्हणून माझा श्रेष्ठ धर्म आहे. दुसरे म्हणजे लुटालूट करणे हा दस्यूचा व्यवसाय असून तोच त्यांचा योगक्षेम आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की, यदुवंशीयांना सुरक्षितपणे हस्तिनापुरापर्यंत नेण्याचे उत्तरदायित्व तुझ्यावर असून देखील त्याचा गांभिर्याने विचार देखिल तू केला नाहीस. अर्जुना, स्वसामर्थ्याच्या फाजिल आत्मविश्वासामुळेच हा अनवस्था प्रसंग तू ओढवून घेतला आहेस. एवढेच नव्हे तर तुझ्या अहंकारापोटी भग्नमनस्क यदुवंशीयांवरही दुरवस्था आली आहे. एखादी शस्त्र सज्ज अश्वस्वारांची तुकडी जर तू बरोबर घेतली असतील तर हा लाजिरवाणा प्रसंग उद्भवलाच नसता. पण सामर्थ्याची, लौकिकाची फाजिल घमेंड बाळगून पवित्र राजधर्माची पायमल्ली तू केली आहेस."

            "अर्जुना, निसर्ग नियमानुसार तुझे प्राक्तन तुझ्या समोर ठाकले असता या घटनेला येथील वृक्ष-लतांप्रमाणे मी ही एक नगण्य साक्षीदार आहे, याचे भान न ठेवता विधी योजनेत हस्तक्षेप करावयाचे पातक माझ्या हातून घडले असते. तथापि भावनेच्या आहारी जाऊन आततायी निर्णय न घेण्याचे बाळकडू निर्सगाने आम्हां निषादाला चाटविलेले असते. त्यामुळेच स्वतःची चूक सुधारण्याची संधी मी अद्यापही गमावलेली नाही. अर्जुना, हस्तिनापूर पर्यन्तचा तुझा प्रवास सुकर व्हावा अशा माझ्या सदिच्छा जरूर राहतील. पण तुझ्या विनंतीप्रमाणे आशीर्वाद देणे हे मला तरी अनुचित वाटते. मी तुझ्यापेक्षा कनिष्ठ पंचमवर्णीय असल्यामुळे मी तुला आशीर्वाद देणे हा पवित्र धर्म संकेताचा भंग होईल. बरे सामर्थ्य श्रेष्ठत्वाचा मुद्दा विचारात घेतला तरीही तुझ्यापेक्षा श्रेष्ठ ठरणे दूरच पण मी तुला तुल्यबळही होऊ शकत नाही. कारण माझे शरसंधान अंगुष्ठाशिवाय आहे. अन् ही बाब तुझ्या धनुर्विद्या शास्त्राला संमत असणे मला तरी असंभव वाटते."

"अर्जुना,आशीर्वाद देण्याचा अधिकार सिद्धवाणीच्या तपाचरणी ऋषि मुनींनाच शोभतो. त्यामुळे तुलाच काय पण अखिल विश्वात कोणालाही आशीर्वाद देण्याएवढे तपःसामर्थ्य वा कर्तेपण मजकडे नसताना मी तुला आशीर्वाद देणे म्हणजे तुझा उपहास तुझी वंचना करणेच ठरेल.! त्यापेक्षा उर्वरित जीवन प्रवासात माझ्या वृत्ती शांत संयमी रहाव्यात असा आशीर्वाद इंद्रप्रस्थाचा स्वामी या नात्याने तूच मला दे...!" असे बोलत निषादाने अर्जुनाचे पद वंदन केले. अर्जुनाने वामहस्त उंचावित त्याच्या नमस्काराचा स्वीकार केला. "पार्था! शेवटी प्रत्येकाच्या प्राक्तनात जे अटळ आहे ते ज्याचे त्यानेच भोगायला हवे. आता या प्रसंगातून सुरक्षितपणे बोहर पडण्यासाठी मी तुला सहाय्य केलेच तरीही हस्तिनापूर गाठीपर्यंत अजूनही दीर्घपल्ला बाकी रहातो. त्या संपूर्ण मार्गात तुला सुरक्षिततेची हमी देण्याएवढे सामर्थ्य मजकडे नाही... आणि असलेच तरीही आतातेच तुझे उदाहरण पहाता तसा धाडसी निर्णय घेण्याएवढे आता माझे वयही राहिलेले नाही..."

          एकलव्याचे कथन पूर्ण झाले. शरमेने अधोवदन झालेल्या पार्थाला आपल्या संवेदनाच जणू बधीर झाल्याची जाणीव झाली. एकलव्याने आपला तिरकामठा सज्ज करून दस्यू लुटारुंच्या कोंढाळ्याकडे मोहरा वळविला. त्याने एकामोगामाग एक असे तीन तीर सोडलेले पहाताच पार्थ अनिमिष नेत्रांनी त्या बाणांची किमया पाहू लागला. तीनही तीरांनी शर चक्राचा भेद केल्यावर गरगरा फिरणारे शरचक्रातील तीर एक एक करून माघारी येत एकलव्याच्या समोर जमिनीत रूतले. शरचक्राचा वेढा दूर होताच दस्यू संघनायकाने परिस्थितीचा अंदाज घेऊन साथिदारांना संकेत केला. तत्क्षणी आनंदाने आरोळ्या मारीत द्रव्य आणि यादवनारी यांच्यासह दस्यू समूह मार्गस्थ होऊन काही क्षणताच गर्द वनराईमध्ये दिसेनासा झाला. हताश झालेला पार्थ दोन्ही हातांनी मस्तक गच्च आवळीत मटकन खाली बसला. एकलव्याने निर्विकारपणे जमिनीत रूतलेले तीर उपसून काळजीपूर्वक भात्यात ठेवले. कामठा खांद्याला लटकावून पार्थाकडे पहाणे जाणीवपूर्वक टाळून एकलव्य मंद मंद पावले टाकीत आपल्या राहुटीच्या दिशेने चालू लागला. (समाप्त)