निषादपर्व भाग २
पांथस्थाना अडवून, लुटमार करून उदरनिर्वाह करणाऱ्या दस्यूंबद्दल त्याला कमालीची घृणा वाटायची. आता दस्यू लुटारू यदुवंशीयांवर हल्ला करतील तेव्हा अर्जुनाच्या अमोघ शर वर्षावामुळे त्यांना चांगली अद्दल घडेल. अगदी अकल्पितपणे धनुर्विद्येचे एक अद्भुत गारूड आपल्याला पहावयास मिळेल. या विचारांनी त्याची उत्कंठा शिगेला पोचली. तथापि दस्यूंनी यादव समूहावर हल्ला केला, त्यानंतर अर्जुनाची झालेली केविलवाणी अवस्था पाहून त्याचा पुरता भ्रमनिरास झाला. हस्तिनापुराचा बलसंपन्न राजा, गुरूद्रोणाचा पट्ट शिष्य अर्जुन... महाभारत युद्धात अस्त्रविद्येच्या बळावर शत्रू पक्षाचा निष्पात करणारा श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन...! त्याची दुःस्थिती पाहून हळहळणारा निषाद, द्रव्य आणि नारींचे अपहरण करून विजायोन्मादाने गर्जना करीत मार्गस्थ होणारा दस्यू समूह पाहून आपल्या व्रतापासून ढळला. निषादाने आपला तिरकामठा सज्ज केला. मार्गस्थ होणाऱ्या दस्यू लुटारुंच्या दिशेने त्याने शरसंधान केले.
वृद्ध निषादाचे शरसंधान केवळ 'अतर्क्य' याच श्रेणीतले. सूंऽऽसूं असा घनगंभीर आवाज करीत भयात्कारी वेगाने प्रकाश शलाकेप्रमाणे लखलख करीत जाणारे निषादाचे तीर...! दस्यू समूहाजवळ जाताच त्यांना वेढा घालीत त्यांच्या समूहाभोवती चक्राकार गतीने फिरत राहिलेल्या निषादाच्या तीरांनी दस्यूंचा मार्ग रोधला. त्यांची अग्निजिव्हेप्रमाणे लखलखीत अग्रे, वेग अन् चक्राकार फिरताना निर्माण होणारा तीव्र ध्वनी यामुळे दस्यूंचा समूह जागच्या जागी थांबला. संघनायकाने अतिक्रोधीत होऊन आपल्या हातीचे खड्ग चक्राकार फिरणाऱ्या तीरांवर त्वेषाने फेकले. ज्या तीराच्या मार्गात ते खड्ग आले त्या तीराचा आघात होताच ते उंच फेकले जाऊन जमिनीवर पडले. आता मात्र चक्राकार फिरणाऱ्या तीरांचे कडे फोडून बाहेर पडावयाचे धैर्य समूहातील एकाही वीराला होईना. चक्राकार फिरणारे तीर वेग कमी झाल्यावर आपोआप भूमीवर पडतील, असा अंदाज दस्यूंनी केला.
दस्यू लुटारुंच्या दिशेने सरसरत गेलेले बाण पाहताच अर्जुन थक्क झाला. त्यानंतर त्या बाणांनी केलेली किमया पाहताच ते कृत्य खचितच एखाद्या निष्णात धनुर्धराचे आहे. या गोष्टीबद्दल अर्जुनाच्या मनात तीळमात्र संदेह उरला नाही. तथापि.. सांप्रतकाळी संपूर्ण भरत खंडात अर्जुना खेरीज अन्य कोणीही श्रेष्ठ धनुर्धारी उरलेला नाही शिवाय त्या बाणांची अद्भूत किमया पहाता अशा प्रकारचे कोणतेही अस्त्र अस्तित्वात असल्याचे आपणास ज्ञात नाही. या गोष्टींची जाणीव त्याला झाली. तेव्हा मात्र ही किमया म्हणजे साक्षात गोपाळ कृष्णांचीच लीला असणार याची त्याला खात्री पटली. या विचारासरशी बाण आलेल्या दिशेने जरा पुढे जाऊन पहावे असे त्याला वाटले. रथातून पायउतार झाल्यावर मंद गतीने चहू बाजूला वेध घेत पार्थ कदंब वृक्षासमीप पोहोचला.
"कोणाला शोधीत आहेस रे अर्जुना?" या शब्दासरशी चमकून वर पाहताच अर्जुन थक्क झाला. जमिनीपासून दीडएक पुरूष उंचीवर फांदीच्या बेचक्यात बसलेला काळाकभिन्न, डोक्यावरचे शिप्तर केस आवरण्यासाठी मृगाजीनाची पट्टी आवळून त्यात गरूडाचे पीस खोचलेला, वयाने त्याच्यापेक्षा थोडा ज्येष्ठ वाटणारा, सडसडीत अंगलटीचा वल्कलधारी निषाद खांद्याला वेत्रकाष्टाचे धनुष्य लटकावून दाढी मिशांच्या जंजाळातून शुभ्र पांढरे दात चमकवीत तोंडभर हसत, लुकलुकत्या भेदक नजरेने पाहताना दिसला. काही घटिकांपूर्वी दस्यूंनी हल्ला केल्यावर आपली शरसंधानाची केविलवाणी धडपड पाहिल्यामुळे तर हा असा छद्मी हसत नसेल ना? या विचाराने पार्थ क्रोधित झाला. राजसुलभ जरबेच्या स्वरात तो उद्गारला, "काय रे वनचरा? तुझे साथीदार शरचक्राच्या वेढ्यात स्थानबद्ध झालेले असताना त्यांना सोडवायचा प्रयत्न न करता तू असा मूढाप्रमाणे हसत काय राहिला आहेस?"
"हस्तिनापुराचे सम्राट, कुरूकुलभूषण धनुर्धर अर्जुनाचे अद्वितीय शरसंधान पाहून मी विस्मयचकित झालो आहे. मला हर्षोन्मादाने हसू आले. तुझ्या सामर्थ्याचे किंचितही भान न ठेवता तुझ्या डोळ्यादेखत अमाप द्रव्य आणि स्त्रिया बळाने हिरावून पळून जाणाऱ्या त्या उन्मत्त दस्यूंना चांगलीच अद्दल घडली. मी काही त्या लुटारूंप्रमाणे दस्यू नाही. आम्हा वनवासींच्या वैचित्र्यपूर्ण वेषभूषेवरून निषाद आणि दस्यू यातील भेद सामान्यातील सामान्यांनेही ओळखावा एवढा स्पष्ट आहे. मी हसलो तो दस्यूंच्या वेडगळपणाला. धनुर्धर अर्जुनाने सोडलेले दिव्य तीर दस्यू लुटारुंच्या वक्षाचा कधी वेध घेणार? हे पहावयाला मी आसुसलो आहे." निषादाचे बोलणे ऐकल्यावर हे दिव्य बाण कुठून आले याचे ज्ञान या निषादालाही नाही हे पार्थाने ओळखले. मग तर खात्रीपूर्वक ही कृष्णलीलाच आहे. लौकिकार्थाने प्रभुंचा अवतार समाप्त झाला असेलही तथापि अर्जुनावरील अकृत्रिम प्रेमापोटी, त्याच्यासारखा श्रेष्ठ धनुर्धर अचंबित व्हावा अशी शरसंधानाची अद्भुत किमया दाखवून "यत्र योगेश्वरो कृष्णः तत्र पार्थो धनुर्धरः" ही उक्ती प्रभूकृष्णांनी सार्थ केली. एवढेच नव्हे "यदा यदाहि धर्मस्यग्लानिर्भवति भारतः" या गीतावचनाचा प्रत्ययही आता जनांना येईल, या विचारांनी पार्थाचे हृदय उचंबळून आल् दस्यू लुटारुंच्या कोंढाळ्याभोवती चक्राकार फिरणाऱ्या तीरांपैकी एकाची गती मंद होत आली. तत्क्षणी निषादाने आपल्या पाठीवरच्या भाल्यातून एक तीर काढला. तो कामठ्यावर सज्ज करीत दस्यू समूहाच्या दिशेने वेध घेऊन निषादाने प्रत्यंचा खेचली. निषादाचे हे कार्य सुरू असता असा वेडेपणा करू नकोस असे अर्जुन सांगणार एवढ्यात निषादाचा तीर सूं ऽऽ सूं करीत सुटला. शरचक्रातील मंदगतीने फिरणारा तीर बाजूला ढकलून नवीन तीर त्याच्या जागी फिरू लागला. शर चक्राबाहेर पडलेला मंदगती तीर निषादाच्या दिशेने माघारी येत त्याच्यासमोर हातभर अंतरावर येऊन जमिनीत रुतला. (क्रमश: )